Tuesday 13 February 2018

टीम व्हिजनची नवी दृष्टी



नवी मुंबईतला संदेश भिंगार्डे काही वर्षांपूर्वी एका अंध मुलीचा पेपर लिहिण्यासाठी सहायक म्हणून गेला होता. त्याच वेळी या मुलांसाठी अजून काहीतरी करायला हवं याची जाणीव झाली.
साहित्य , नाटक-सिनेमा, विविध कला, पर्यटन, ट्रेकिंग यातून आपण किती आनंद मिळवत असतो! हा आनंद दृष्टीआव्हानित मुलांनाही मिळायला पाहिजे असं संदेशला वाटलं. अभ्यास, परीक्षांसाठी अंधांचं वाचनिक, लेखनिक होण्यापलीकडे मदत केली पाहिजे. त्यांना कलांचा आस्वाद घेता यावा ,निसर्गाची ओळख व्हावी, त्यांनी एक समृद्ध व्यक्ती म्हणून समाजात जगावं यासाठी काही करावं, असं वाटत होतं. यातूनच जुलै २०१३ मध्ये, उदय झाला टीम व्हिजनचा. यात साथ मिळाली प्रज्ञा पटेल, ऋतुजा शिंदे, अभय पाटील, पविथ्रा रामस्वामी, मृणाली खोपकर या कॉलेजमित्रमैत्रिणींची.
टीम व्हिजन अंध मित्रमैत्रिणींना ट्रेकिंगला घेऊन जाते. ट्रेकिंगदरम्यान कसं चालायचं, कुठे पाय ठेवायचा, कुठे नाही वगैरे प्रत्यक्ष मार्गदर्शन केलं जातं. निसर्गसौंदर्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. चित्रपट, नाटक बघताना त्यातल्या कलात्मक बाबी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.
गायन ,वक्तृत्व, वाद, नृत्य, चित्रकला अशा वेगवेगळ्या स्पर्धा टीम व्हिजन घेते.
अभ्यास,व्यक्तिमत्त्व विकास, करिअरविषयक मार्गदर्शन केलं जातं. मुलांना आव्हानांवर मात करत आनंदानं जगण्याचं बळ देण्याचं काम टीम व्हिजन अगदी मनापासून करत आहे . या मुलामुलींसाठी ध्वनिमुद्रित वाचनालय टीम व्हिजनने सुरू केलं आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषांमधल्या पुस्तकांच्या ऑडीओ फाइल्स मुलांसाठी तयार करून पोचवल्या जातात. आतापर्यंत सुमारे 600 दृष्टीआव्हानित मित्रमैत्रिणींशी टीम व्हिजनचे बंध गुंफले आहेत.
-विजय भोईर.

No comments:

Post a Comment