Tuesday 27 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं


आमचं लग्न फक्त दोन प्रेमीजिवांचं मिलन नव्हतं तर एकमेकांना एकमेकांच्या साथीने परिपूर्ण करणं होतं. अपंगत्व अंगावर कशामुळे येतं असं तुम्हांला वाटतं? अनेक कारणांमुळे आपण घरात सतत काही न काही निर्णय घेत असतो. ते पूर्ण करून संसार नीट चालवतो वा आपली हौस भागवतो. मात्र या निर्णयप्रक्रियेत जेव्हा कुटुंबातील अपंग व्यक्तीला जाणिवपूर्वक वा अजाणतेपणे सामील करून घेतलं जात नाही. तेव्हा, आपल्यातील कमतरतेच्या टोकदार जाणिवेने मन जखमी होतं. लग्नाआधी आणि नंतरही मला अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. पण, संधी असली की, मी माझं मत प्रदर्शित करते.
पण, काहीवेळा सगळ्यात जवळच्या व्यक्तींकडून आपल्याला डावललं जातंय, आपल्यालाही एखादं मत असू शकतं हेच विचारात घेतलं जात नाही तेव्हा आपलं अपंगत्व ठळकपणे जाणवतं.पण, दहा महिन्याच्या ओजसला घेऊन स्वतंत्र संसार मांडला तेव्हा स्वतंत्रपणे निर्णय घेण्यातली मजा, जबाबदारीची जाणीव आणि घेतलेले निर्णय पार पाडताना होणारी धांदल सर्वच गोड आणि भुरळ पाडणारं होतं. एकट्याने संसार करण्याचा निर्णय हा आम्हा उभयतांच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय होता.
खरंतर, ओजसचं आयुष्यात येणं हेच आम्हाला स्वतःचं घर असावं या विचाराशी घेऊन आलं. त्याचा पहिला वाढदिवस स्वतःच्या घरातच साजरा करायचा असं ठामपणे ठरवून घर शोधलं आणि जे आवडलं ते घेतलंही. अर्थात हे ठरवणं जितकं सोपं तितकंच अंमलात आणणं कठिण होतं आमच्यासाठी. आमच्यावर कधीही कोणतीही महत्त्वाची जबाबदारी वा धावपळ करण्याची पाळी आली नव्हती. पण, एकदा ठरवलं म्हणजे मागे हटायचं नाही असा माझा हट्टी स्वभाव. म्हणूनच आम्ही ते स्वप्न कसं प्रत्यक्षात साकारलं ते थोडक्यात सांगते. १५ एप्रिल २०१६. ओजसचा पहिला वाढदिवस. मार्च संपत आला आणि आम्ही ओजसच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग सुरू केलं. घरातल्यांशी बोलून काय ते ठरवू असं भरतचं म्हणणं. पण, मी त्यावर आक्षेप घेतला. ‘आपल्या घरात आपल्या बाळाचा वाढदिवस कसा करायचा हे आपणच ठरवूयात’. मी इतक्या ठामपणे म्हटलं की, भरत लगेच कामाला लागला. आम्ही सुट्ट्यांचं गणित केलं. वाढदिवशी रामनवमी असल्याने बॅंक हॉलीडे तर १४ ला आंबेडकर जयंतीची सुट्टी होती. घर नवीन. आणि ओजसचा वाढदिवसही पहिला. त्यामुळे सर्व पाहुणे पहिल्यांदाच आमच्या घरी येणार होते. म्हणून सत्यनारायण पूजा घालावी असंही आम्ही ठरवलं. त्या अनुषंगाने मी लॅपटॉप उघडला आणि नावं लिहायला सुरुवात केली. नातेवाइक आणि मित्रमैत्रिणींची संख्या सव्वाशेच्या घरात पोहोचली. पुढचा प्रश्न म्हणजे जेवण. बऱ्याच केटरिंगवाल्यांशी आम्ही बोललो. त्यातून एकाला निवडलं आणि मेनू ठरवला.
विरारमधल्या केक बनवणाऱ्या प्रत्येक बेकरीशी फोनवर बोलून घेतलं. त्यातल्या एकीला डिजाइन्स वॉट्सॅप करायला सांगितलं. टेस्टिंगला पेस्ट्रीसुद्धा मागवली. मिकीमाऊस हातात चार फुगे घेऊन पळतोय आणि त्या फुग्यावर Ojas लिहिलंय असा केक फायनल झाला. मग आम्ही माणसं दोन गटात विभागली. फोनाफोनीला सुरुवात केली. एकीकडे जशी जमेल तशी स्वच्छतेची मोहिमही आम्ही राबवत होतोच. पण, नुकतेच पाय फुटलेल्या ओजसने “तुम्हाला ते शक्य नाही”असं दाखवून दिलं. तो नुकताच पावलं टाकायला शिकला होता. त्यामुळे एका जागेवर बसणं त्याच्याने शक्य नव्हतंच. सतत काही तरी धरून उभंच रहा, टेबलावरचं ओढ किंवा कशावर तरी चढण्याचा प्रयत्न करा. चळवळ्यावर लक्ष ठेवणं जिकिरीचं व्हायचं. त्याच्या वाळ्यांना असलेल्या घुंगरांनी तो कुठे जातोय आणि काय करत असावा हे आम्ही समजून घेत असू. मी आईंना आणि मम्मीला दोन दिवस आधी यायला सांगितलं आणि स्वच्छता त्यांच्यावर सोपवली.
पूजा म्हटली की, पुजेचं सामान, प्रसाद बनवणं, नैवेद्याचं तयार करणं सारंच आलं. आधी आम्ही भटजींशी सामानासहित यावं असं ठरवून घेतलं. मग, प्रसादाच्या सामानाची खरेदी केली. पुजेच्या दिवशी सकाळी माझ्या मावशीने प्रसाद आणि नैवेद्याचा स्वयंपाक केला. एकूण आमच्या आगाऊपणे घेतलेल्या निर्णयाला सगळ्यांचाच हातभार लागला. वाढदिवसाला नातेवाइक आणि मित्रमैत्रिणी आपल्या कुटुंबासहित आले. केटरर्सला दृष्टिहीन लोक अधिक असल्याची कल्पना दिलेली असल्याने त्यांनी जेवण वाढण्याचं कामही स्वतःहून घेतलं. ओजससुद्धा फारसा रडला नाही. बासुंदी पुरीच्या बेताचं मित्रमैत्रिणींनी खूपच कौतुक केलं हेही महत्त्वाचं. एकूण काय तर पूजा आणि वाढदिवसाचा अनोखा मिलाफ सर्वांच्या साक्षीने आनंदाने पार पडला.
आपल्या घरात पूजा घालणं किंवा मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करणं हे खरंच खूप विशेष नसतंच. विशेष असतो त्या अरेंजमेन्टमधला आपला उत्साह, सहभाग आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य. नाही तर विचार करा की, तुम्ही आपल्या मुलीच्या वाढदिवसाला बाहुलीचा केक आणायचा म्हणता आणि तुमच्याच जवळचं कोणीतरी पटकन् तुम्हाला तोडून म्हणतं की, त्यातलं तुम्हाला काय कळतं? असं कोणीतरी दुर्लक्ष करणं दुखावतंच ना! एक व्यक्ती म्हणून विकास होण्यासाठी या सर्वातून जावं लागतं. कदाचित पावलोपावली स्वतःची काम करण्याची इच्छा, योग्यता आणि क्षमता समोरच्याला पटवून द्यावी लागत असल्याने आणि बऱ्याचदा त्या दुर्लक्षित होत असल्याने माझ्यासारख्या अनेक अपंग लोकांचं मन अधिक संवेदनशील, अधिक ठाम आणि आत्मविश्वासाने फुलत असावं. माझ्या या लेखन प्रपंचातून खरंच मी काय साधलं? मोकळेपणी बोलता येणं प्रत्येकालाच जमत नसतं. मला माझ्या समस्या, माझी धडपड आणि त्यातून वाट काढून व्यवस्थितपणे जगण्याची माझी प्रक्रिया शब्दबद्द करता आली ती निव्वळ नवी उमेदमुळे. फक्त तेवढंच नाही. सर्व वाचकांच्या प्रतिक्रियांनी आपलं कोणीतरी ऐकतंय ही सुखद भावना संपूर्ण मालिकेत सोबत करत राहिलीय. तुम्हा सर्वांचे व्यक्तीशः मी आभार मानते. शिवाय कोणत्याही दृष्टीहीन वा अपंग व्यक्तीशी काहीही प्रश्न, शंका किंवा सहज संवाद साधावासा वाटला तर तो नक्की साधावा. मीही फेसबूकवर उपलब्ध आहेच. धन्यवाद.


 - अनुजा संखे

No comments:

Post a Comment