Saturday 17 February 2018

तमाशाच्या पैशांतून विद्यार्थ्यांना मिळाले टॅब

पुण्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीची जिल्हा परिषद शाळा. तुम्ही अगदी गुगल मॅपवर शोधायला गेलात तरी आयएसओ 9001/2008 मानांकित वाबळेवाडी जि.प. शाळा सहजच सापडते. शाळेत प्रवेश केला की नजरेत भरते डावीकडे उत्तम राखलेल्या हिरवळीतील ‘अंक- अक्षर उद्यान’ आणि उजवीकडे विद्यार्थ्यांसाठी खुला रंगमंच. हिरवळीत साकारलेल्या या उद्यानात मधे- मधे लावलेल्या फरशांवर अंक आणि अक्षरे तसेच, बेरीज- वजाबाकी आणि गुणाकाराची चिन्हे रेखाटलेली आहेत. त्यावर खेळता- खेळता मुलांचा सहज अभ्यास होतो. समोरच कौलांची बैठी इमारत असलेली छोटी शाळा आहे. या शाळेची एकही भिंत रिकामी नाही. भिंतीवर नद्यांची नावे, इंग्रजीचे शब्दार्थ, गणित आणि विज्ञानाची सूत्रे असे बरेच काही आकर्षक रंगात रंगविलेले दिसले.थोडंसं पुढे गेलो की विज्ञान कक्ष दिसतो, मग संगणक कक्ष दिसतो आणि कलाकुसरीला वाहिलेला ‘आर्ट क्लास’ ही दिसतो. आपल्याला खरेतर इयत्ता, तुकडी असे वर्ग बघण्याची सवय असते. विज्ञान कक्ष अनेक सुंदर आणि साध्या-सोप्या उपकरणांनी सजलेला होता. इथं ग्रहताऱ्यांची बनलेली आणि आपणहून फिरणारी सूर्यमाला आहे, पचनसंस्था, श्वसनसंस्था यांचे जोडता येणारे आणि वेगळे करता येणारे कृत्रिम पार्ट आहेत, सौरऊर्जेवर पाणी तापविणाऱ्या बंबाची प्रतिकृती, नद्यांवर बांधलेल्या धरणाची प्रतिकृती आणि अगदी चारचाकी गाड्यात इंजिन कसे काम करते त्याचीही प्रतिकृती आणि अनेक तक्ते आहेत.
वाबळेवाडीची शाळा खरंच सर्वार्थाने वेगळी आहे. या शाळेत इयत्ता आणि हुशारीनुसार तुकड्या पाडून शिक्षण दिले जात नाही. इथं तुम्हांला आवड असलेल्या वर्गात बसून शिकता येते. म्हणजे गणिताची आवड असणाऱ्यांसाठी ‘गणित कक्ष’, प्रयोगातून विज्ञान शिकायचे असेल तर ‘विज्ञान कक्ष’!! एकाच वेळी वेगवेगळ्या वयाची मुले एका विषयाचा अभ्यास करत असतात आणि तो पारंपरिक घोकंपट्टीचा नसतो तर प्रात्यक्षिक ज्ञानाचा आणि कृतीआधारित अभ्यास असतो. गणितासाठी सुद्धा ज्ञानरचनावादाचा उपयोग करीत ‘अंक- अक्षर उद्यान’, आईस्क्रीमच्या काड्या, गोट्या, रंगीत मणी यांच्या सहाय्याने हसत खेळत गणित शिकविले जाते. शिवाय कंटाळा आला की मातीकाम, कागदकाम, शिवणकाम शिकविणारा सुंदर ‘आर्ट क्लास’ आहेच. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे एक कायमस्वरूपी प्रदर्शनच या कक्षात मांडलेले आहे


महाराष्ट्रातील काही मोजक्या शाळांप्रमाणे वाबळेवाडीची शाळादेखील विनादप्तर शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅब मिळालेले आहेत. 100 टक्के डिजिटल होण्याची या शाळेची गोष्टही ऐकण्यासारखी आहे. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे सर त्याविषयी बोलताना सांगतात, “प्रत्येक गावात दरवर्षी एखादी यात्रा- जत्रा भरते, आमच्याही गावात दरवर्षी ग्रामदैवताची यात्रा भरते. यात्रा म्हणलं की सगळ्या प्रकारचे हौसे- नवसे- गवशे येतात. गेली कित्येक वर्षे गावातल्या यात्रेतील तमाशाचे संपूर्ण शिरुरला आकर्षण असायचे. मात्र एका वर्षी यात्रेसाठी झालेल्या सभेत मी या संगणकयुगात विद्यार्थ्यांसाठी संगणक आणि टॅबची गरज आहे, हा मुद्दा मांडला. कोणत्याही मनोरंजनापेक्षा मुलांचे भविष्य महत्त्वाचे असल्याचे समजावून सांगितले आणि ग्रामस्थांनी सुमारे 1.20 लाखांची तमाशाची सुपारी रद्द करुन ते पैसे शाळेचा संगणक कक्ष उभारण्यासाठी दिले” हे ऐकून अर्थात गावाचेही कौतुक वाटले.


- स्नेहल बनसोडे-शेलुडकर. 

No comments:

Post a Comment