Saturday 24 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -13

ऑफिसमधल्या कामाबद्दल मी पुढे विस्ताराने लिहीन. आधी आम्ही घर कसं आवरतो-सावरतो हे सांगते. संध्याकाळ म्हणजे कसरत. हे करू की, ते? असं होतं. बेबी सिटिंगमधून ओजस आणि ऑफिसातून भरत घरी येण्याच्या आधी मी घरी येते. पहिली धांदल उडते ती स्वयंपाकाची. मी घरात येते आणि हात पाय धुवून सरळ किचन गाठते. बऱ्याचदा काय बनवायचं ते ठरवूनच येते. सहसा वरणभात, एखादी भाजी बनवायची असते. मी गॅस कसा पेटवते? त्याहीपेक्षा मी स्वयंपाक कसा करते हे जाणून घ्यायला सगळ्याच स्त्रिया आतूर असतात.
आवाज, गंध, स्पर्श आणि वेळेचा अंदाज यांवर माझं स्वयंपाक करताना बारीक लक्ष असतं. तुम्ही लक्ष देऊन ऐकलंत तर लक्षात येईल की, गॅस लावतानाही ‘फट्’ असा आवाज येतो. त्यावरूनच मला कळतं की, गॅस लागला आहे. काहीही बनवताना मी आधी भांडं धुवून घेते. मग ते गॅसवर ठेवून गॅस लावते. एक दोन मिनिटं ते भांड तसंच राहिलं की, त्यातलं पाणी सुकतं आणि मग मी पुढची फोडणी वगैरे सोपस्कार करते.
चिकन रस्स्याची माझी रेसिपीच तुम्हांला माझा स्वयंपाक कसा होतो ते सांगेल. ही रेसिपी निवडण्यामागचं कारण चिकन बनवताना भाजणं, वाटण, तळणं, चिरणं, साफ करणं असं सगळंच करावं लागतं. तुमची बरीचशी उत्तरं यातून मिळतील असं वाटलं म्हणून हे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसवर भांडं चढवल्यावर तो लावण्याआधी लागणारी प्रत्येक सामुग्री मी किचनच्या कट्ट्यावर काढून ठेवते. तेल घातलं आणि मग मसाले शोधत बसले असं करत नाही.
संसारात अगदी नवीन असताना एकदा, कुकरमधल्या तेलाने जाळ पकडला होते. मी आणि भरत आम्ही दोघंच घरी होतो. कशीबशी आग विझवली होती. पण, त्या प्रसंगाने कायमचा धडा शिकवला हे मात्र खरं.
मी आधी खोबऱ्याचा मोठा तुकडा चिमट्यात पकडून तो गॅसवर भाजते. त्या भाजत्या खोबऱ्याचा खमंग गंध सुटला की, गॅस बंद करून मी तोच चिमटा बेसिनमध्ये धरते आणि अंधूक झालेल्या ज्वाळेवर जोरजोरात फुंकर घालून ती विझवते. आग विझली की, नळाखाली तो तुकडा धरून हाताने हळूहळू चोळून काळेपण घालवते. मग तो तुकडा मिक्सरच्या भांड्यात ठेवते. सोललेल्या लसणाच्या ८-१० पाकळ्या, दोन तिखट हिरव्या मिरच्या, कोथिंबिर, आल्याचा मोठा तुकडा, दोन काळीमिरी, दोन लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा आणि वरून नावालाच पाणी घालते. मिक्सरवर वाटण करून घेतलं की, गॅसच्या शेजारी ठेवते. हे झाल्यावर मी सुरीने कांदे चिरते. गरम मसाल्याचे डबे, लसणाच्या आणखी काही पाकळ्या आणि चिरलेला कांदा मी हाताशी ठेवते. कूकर गॅसवर ठेवून गॅस पेटवते. थोड्या वेळाने मी तीन पळ्या तेल घालते. तेल गरम झालं की, त्याचा एक गंधही येतो आणि तडतड असा आवाजही येतो. मग, मी त्यात दालचिनीचा मोठा तुकडा, काळीमिरी, लवंग एकएकच घालते. गरममसाला त्यात तळला गेला की, एक गोडसर तिखट असा खूपच खमंग वास येतो. त्यावर लसूण ठेचून घालते. चर्रर्र... आवाज यायचा जरा कमी होतोयसं वाटलं की, त्यावर कांदा घालते. कांदाही छान नाद निर्माण करतो. लाल होताना त्याचाही मस्त गंध सुटतो. मग, त्यावर मी वाटण घालते. ते चमच्याने एकजीव करताना थोडंसं सुकतंयसं वाटलं की, त्यावर एक चमचा हळद, दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ घालते. या प्रमाणात आता फरक पडत नाही. सवय झालेय मला. चमचे इकडचे तिकडे होऊ न देण्याची तेवढी काळजी घ्यायची बस्स! सगळं एकजीव झालं की, त्यावर चिकन घालून ते मी मंद आचेवर मिक्स करत राहते. रटरटचा आवाज हलकासा यायला लागला की, त्यात मी ग्लासाच्या मापाने पाणी घालते आणि मग, कूकर पुन्हा गॅसवरून उतरवून त्यावर झाकण घट्ट दाबून बसवते. तो पुन्हा गॅसवर ठेवून गॅस चालू करते आणि स्लो गॅसवर दोन शिट्ट्या घेते. खरंतर टोपातच शिजवलेलं चिकन मला आवडतं. पण, ते पर्फेक्ट शिजल्याचं मला नेमकं कळत नाही म्हणून मी कुकरचा पर्याय निवडला आहे.
हे सर्व मी करत असताना भरत पूर्णपणे ओजसला सांभाळत असतो. त्याच्यासोबत गार्डनमध्ये जाणं, घरात कधी क्रिकेट तर कधी चेस खेळणं तर कधी त्याच्यासोबत त्याचे प्रश्न सोडवणं असं सगळंच तो करतो. आम्ही हे एन्जॉय करतो, हेही तेवढंच खरं.
- अनुजा संखे 

No comments:

Post a Comment