Saturday 17 February 2018

खाऊच्या पैशांची 'टॉयलेट' कथा



रोजगारासाठी पुण्याला गेलेले आईवडील. त्यामुळे घरात फक्त त्या दोघींचंच वास्तव्य. घरात टॉयलेट नसल्याने रात्री, अपरात्री नैसर्गिक विधीसाठी या चिमुरड्या बहिणींनी बाहेर जायचं कसं?
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील आमला तांडा इथल्या निकिता आणि अस्मिता या बहिणींची ही गोष्ट.
घरची गरिबी. या दोघीही सुटीच्या दिवशी मोलमजुरीला जातात. आईवडिलांनी पाठवलेल्या पैशात त्यांचा शिक्षणाचा खर्च व उदरनिर्वाह भागवायचा. घरची सर्व कामं करून दोघीही अभ्यास करतात. आपल्या घरीसुद्धा शौचालय असावं, असं त्यांना सतत वाटत होतं. ते कसं होणार याची चिंता होती. गावात तपासणीसाठी आलेल्या गुड मॉर्निंग पथकाने खड्डा असेल, तर शौचालयाचं बांधकाम करून देण्याची हमी दिली. स्वप्नवत वाटणारं टॉयलेट साकारण्यासाठी निकिता-अस्मिताची धडपड सुरू झाली. आई बाबा तर पुण्याला. खड्डा खोदण्यासाठी पैसे आणायचे कुठून? शाळेत बचत बँकेत जमा केलेले पैसे काढायचे आणि त्यातून खड्डा खोदायचा, ही कल्पना निकिताला सुचली. हे पैसे काढून तिने शौचालयाचा खड्डा खोदला. जे मोठ्यांना जमलं नाही, ते त्या चिमुकलीने करून दाखविलं.


स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गावागावांत शौचालय बांधकाम करण्यासाठी दिग्रस पंचायत समितीचे गुड मॉर्निंग पथक तालुक्यात जनजागृती करीत आहे. तालुक्यातील आमला (तांडा) येथे हे पथक पोहोचलं. त्यांनी नागरिकांना शौचालय बांधकामाची माहिती दिली. ’खड्डा तुम्ही खोदून द्या, सरकार शौचालयबांधकाम करून देते’, असं त्यांनी नागरिकांना सांगितलं. हे ऐकून आठवीतल्या निकिता राजेश राठोडची उत्सुकता शिगेला पोहोचली. तिने खाऊचे आणि शाळेच्या बचत बँकेत जमा केलेले पैसे एकत्र करून सरपंच किरण तायडे, पोलिस पाटील माया जाधव व ग्रामस्थांच्या मदतीने 800 रुपयांत खड्डा खोदून घेतला.
दुस-या दिवशी गुड मॉर्निंग पथक गावात येताच त्यांना आता शौचालय बांधून द्या, अशी विनंती केली. तिची इच्छाशक्ती बघून गुड मॉर्निंग पथकाने सर्व कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून निकिताच्या घरी शौचालयाचं बांधकाम सुरू केलं आहे. तिच्या या धडपडीचं कौतुक होत आहे. बालवयात निकिताने समाजासमोर स्वच्छतेचा आदर्श ठेवला. “गावात घरोघरी शौचालय बांधलं जात आहे. पण, आम्हा बहिणींना उघड्यावर शौचास जायला लागायचं. त्याची आम्हाला लाज वाटत होती. त्यामुळेच खाऊंच्या पैशातून शौचालय उभे करण्याची कल्पना सुचली”, असं तिने सांगितलं. 

- नितीन पखाले.


1 comment:

  1. निकीता ताईचा बँक अकाउंट नंबर मिळेल का? म्हणजे काहीतरी मदत करता येईल

    ReplyDelete