Friday 2 February 2018

जन्मकथा: कातकरी बोलीभाषेतील पाठ्यपुस्तकाची!

लातूरच्या गजानन जाधव यांचं स्वप्नं होतं, शिक्षक व्हायचं. आणि ते झालेही. २००६ साल. पहिलीच नियुक्ती झाली जि.प. शाळा पालेखुर्द, तालुका रोहा, जिल्हा रायगड इथं. या गावातील बहुतांश वस्ती कातकरी आदिवासी जमातीची. आत्तापर्यंत केवळ पुस्तकातच वाचलेल्या या आदिवासींसोबत काम करण्याची प्रत्यक्ष संधी मिळाली. शाळेत सर रूजू झाले खरं, पण त्यांच्या लक्षात आलं की बहुतांश विद्यार्थी शाळेला दांडी मारण्यातच धन्यता मानतात. आजूबाजूला प्रचंड दारिद्र्य बघून ते अस्वस्थ व्हायचे, पण म्हणूनच या मुलांना शिक्षणाची गोडी लावणं आवश्यक आहे, हे त्यांना जाणवायचं.जाधव सर सांगतात, “सुरुवातीची 2-3 वर्ष यांची जीवनशैली समजून घेण्यात आणि मुलांशी मैत्री करण्यात निघून गेली. त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करायचो. मात्र माझी मराठी आणि या मुलांची कातकरी बोलीभाषा यात प्रचंड तफावत होती. आपण ज्याला चिमणी म्हणतो, त्याला ते ‘चिडू’ म्हणतात, फुलपाखराला ‘भिंगरुट’ म्हणतात तर पावसाला ‘पाणी’ म्हणतात. मी हळूहळू त्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न करू लागलो. कधी चित्र दाखवून तर कधी जंगलातले पक्षी- प्राणी दाखवून त्यांना कातकरी भाषेत काय म्हणतात हे जाणून घेत होतो.”
                                                                                             
सरांच्या या प्रयोगामुळे कातकरी विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढली. अभ्यासातील रसही वाढला. 2013-2014 च्या शैक्षणिक वर्षात सरांनी मराठी आणि कातकरी बोलीभाषेतील शब्दांचा एक संग्रह तयार केला. सुमारे 100-150 शब्दांचा तो संग्रह कातकरी भाषा अजिबातच न येणाऱ्या शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणारा होता, शिवाय मुलांनाही त्यातून मराठी शब्द शिकायला मिळत होते. ‘जीवन शिक्षण’ या विद्या प्राधिकरणातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या मासिकात 2014 च्या जून महिन्यात याविषयी सरांचा लेख प्रसिद्ध झाला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.
हा प्रतिसाद त्यांना सुखावून जाणारा होताच, पण यापेक्षा जास्त प्रयत्न करायला हवेत हे सरांना जाणवत होते. कारण रायगडमधील एकट्या रोहा तालुक्यातील 141 शाळांमधून अडीच हजारांच्यावर कातकरी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवाय महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतही या कातकरी आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. म्हणूनच 2015-2016 मध्ये त्यांनी पहिलीचं मराठी बालभारती पुस्तक संपूर्णपणे कातकरी बोलीभाषेत तयार केलं.
सरांनी हे पुस्तक पीडीएफ फॉरमॅटमधे तयार केलेलं असून ते व्हॉटसअप, इमेल आणि पेनड्राईव्हच्या माध्यमातून अनेक शिक्षकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. गेली दोन वर्षे जाधव सर 'शिक्षणाची वारी' या अभिनव उपक्रमांत सहभागी होत असून आजपर्यंत सुमारे 15 हजार शिक्षकांनी त्यांच्या स्टॉलला भेट देऊन पुस्तक पेनड्राईव्हमधून किंवा स्मार्टफोनमध्ये नेलंय.
जाधव सर जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांसोबत कातकरी बोलीभाषेतच बोलण्याचा प्रयत्न करीत होते. शाळेत अभ्यास शिकवतानाही ते कातकरी शब्दांच्या आधारे आधी कविता/धडा समजावून सांगत. सरांचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांना आवडला नसता, तरच नवल! दूर कुठल्यातरी गावावरुन आलेले सर, आपल्या भाषेत बोलतात इतकंच नव्हे तर अवघड वाटणाऱ्या अभ्यासातील गोष्टीही आपल्याच भाषेत सोप्या करुन सांगतात, हे विद्यार्थ्यांना फारच भावलं. आत्तापर्यंतचे सर आपल्याला शिकवायचे, पण हे जाधव सर तर स्वत:च आपल्याकडून शिकतात, ही भावना विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही सुखावणारी होती.
 - स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

No comments:

Post a Comment