Tuesday 20 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -10

लग्न झालं आणि मी संपूर्णतः वेगळ्या प्रकारच्या वातावरणात आले. सासरकडच्या वागण्याबोलण्याच्या पद्धतींपासून ते जेवणाखाण्याच्या सवयीपर्यंत सर्वच तऱ्हा निराळ्या होत्या. जुळवून घेणं सुरू झालं ते पहिल्या दिवसापासूनच. घरातली सगळी कामं सुरुवातीला मी करायचे पण, त्यांची सवय नसल्याने ती कसलेल्या गृहिणीप्रमाणे तंतोतंत होत नसत. सासूबाईंना हे आवडत नसे. एकदोनदा मला त्या यावर रागावल्या. मग मी माझ्या स्वभावाप्रमाणे स्पष्ट सांगून टाकलं की, आई, मी लग्नाआधी ही कामं कधीच केली नव्हती. पण, मी केलेलं काम जर तुम्हाला आवडत नसेल तर पुन्हा कधीच करणार नाही. आणि खरोखरच तेव्हापासून मी झाडू मारणं आणि लादी पुसणं ही दोन्ही काम करणं बंद केलं. आईंनीही मला ती पुन्हा कधीच करू दिली नाहीत आणि हे सारं प्रेमाने आणि समजुतीने झालं हे विशेष. त्या माझं खूप करायच्या. अगदी पाण्याचा ग्लास हातात आणून द्यायच्या. सुरुवातीला मला हे छान वाटायचं. पण, मी नोकरी करत नसल्याने सतत काहीच न करता घरात बसून राहणं अंगावर यायला लागलं. मी किचनमध्ये काम करता यावं म्हणून प्रयत्न करू लागले. पण, आईंना ते आवडलं नाही. त्यांनी मला किचनमध्ये काम करायला प्रोत्साहन दिलंच नाही. त्यांना खूप भिती वाटायची की, मी गॅस कसा चालू करणार? चटका लागला तर? आणि मी स्वयंपाक बनवला तरी तो कसा असेल चवीला? हे प्रश्न बहुधा त्यांना पडत असावेत. काही का असेना पण, माझी किचनमध्ये लुडबूड करण्याची हौस मात्र विरत चालली होती. त्यांचं मन नेटकेपणाने वळवण्याचा मी आणि भरतने खूप प्रयत्न केला. पण, ते काही सहजासहजी शक्य झालं नाही.
माझ्या गर्भारपणात गावाला अचानक काहीतरी तातडीचं काम निघालं आणि आईपप्पांना तिथे जावंच लागलं. तेव्हा मी आनंदाने सर्व जबाबदारी घेतली. त्यांना जायला सांगितलं. कितीतरी दिवसांनी मी किचनमध्ये येत होते. मला बाकी कामांची आवड नसली तरी स्वयंपाकाची आवड होती. त्यामुळेच थोडंफार बनवायलाही शिकले होते.
पण, आई गेल्यावर जेव्हा लायटर हाती धरला आणि गॅस चालू करण्याची वेळ आली तेव्हा माझा हात भितीने थरथरत होता. मी कसाबसा गॅस चालू केला आणि पोहेच बनवले. या घटनेने मला विचार करायला भाग पाडलं की, मी माझ्या आत्मविश्वासाची किंमत चुकवून एकत्र कुटुंब टिकवून धरलं पाहिजे का? प्रश्न एवढा कठिण होता की, एकटीने तो सॉल्व होणार नाही हे मला कळून चुकलं. भरतशी एक मित्र म्हणून जे काही वाटतंय ते स्पष्टपणे बोलायचं असं ठरवलं. संध्याकाळी भरत ऑफिसमधून आल्यावर ही बाजू पटवून सांगितली आणि त्याला बिनदिक्कतपणे ती पटली. आम्हा दोघांचा स्वतंत्र संसार हाच यावर उपाय असू शकतो असं आम्हा दोघांचं एकमत झालं आणि योग्य वेळ येताच यासंदर्भातला आपला निर्णय मोठ्यांना सांगायचा असंही आम्ही ठरवलं. हा निर्णय घेणं तितकंसं सोपं नव्हतं. दोन्ही घरच्या प्रत्येक नातेवाइकाच्या ‘आम्ही सर्व करू शकतो’ हे गळी उतरवावं लागलं. आनंदाने मुळीच नाही पण, आमच्या हट्टाने सर्वांनी ते मान्य केलं. यातच ओजसचा जन्म झाला आणि तो थोडा मोठा झाल्यावर वेगळा संसार मांडायचं आम्ही ठरवलं.
बाळ आपलं भविष्य सुरक्षित करून आल्यासारखंच आमच्या जीवनात आलं. मला एका बॅंकेत क्लर्कची नोकरी मिळाली तर भरत ऑफिसर म्हणून दुसऱ्या बॅंकेत रुजू झाला. दोघांच्या बॅंकेतल्या नोकऱ्यांनी स्वतःचं घर असावं या स्वप्नाला धुमारे पुटले. ओजसचा पहिला वाढदिवस स्वतःच्या घरातच व्हावा असं ठरवून आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. स्वतःचं घर होईपर्यंत आम्ही एकत्रच राहिलो. घराचा ताबा मिळाला आणि दहा महिन्यांच्या ओजसला घेऊन मी आणि भरत दोघंच फ्लॅटवर दाखल झालो.
नोकरी सांभाळून संसार करण्याला मम्मी तारेवरची कसरत का म्हणत होती ते पहिल्या दिवशीच कळलं. ओजसची आजारपणं, स्वयंपाक करणं, कपडे, भांडी आवरणं, एक ना दोन. जी काम दोन वर्षाच्या संसारात केलीच नाहीत ती एकदमच अंगावर आली. मी आणि भरतने सगळी कामं वाटून घेतली आणि ती करू लागलो. आजही कपडे मशिनला लावणं, वाळलेले कपडे काढून त्यांच्या घड्या घालणं आणि धुतलेले वाळत घलणं हे काम भरत करतो. मी, स्वयंपाक आणि भांडी कधीतरी. मला बरं नसलंच तर किंवा कधी एकट्यानेच रहायची वेळ आलीच तर भरतला स्वतः पुरतं अन्न शिजवता यावं या हेतूने मी त्याला खिचडी, मॅगी, चहा आणि कॉफी हे पदार्थही
बनवायला शिकवले आहेत. आता खूप आव्हानं, जबाबदारी आणि त्यासोबतच येणारी टेन्शन्स आहेत. पण, एकमेकांशी वागण्यातला मोकळेपणा, ओजसला वाढवण्यातलं स्वातंत्र्य आणि मनानेच काहीबाही कॉंबिनेशन करण्याची मोकळीक या बदल्यात आम्हांला मिळालंय हे काही कमी नाही.
 - अनुजा संखे

No comments:

Post a Comment