Thursday 8 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं- 4

"मम्मी, अगं, मला वाडीत एकटीला सोडून सगळ्या पळून गेल्या. साप, साप, असं ओरडत होत्या. मी हळूहळू आले चालत. पण, इथे लागलं.” मी कपाळावर हात दाबून, पण, न रडता मम्मीला सांगत होते. या प्रसंगातली मी फार तर सहा वर्षांची. मम्मीने माझ्या पाठीवर हात फिरवला आणि समजावणीच्या सुरात म्हणाली, “अगं, हात थोडे पुढे ठेवून चालायचं म्हणजे तुला लागणार नाही. मी विचारते हं, सरलाला तिथे खरंच साप होता का, ते. पण, त्या असं करतात ना तुला! तू आपली घरात भांडी खेळत जा. त्यांच्यात जात जाऊ नकोस.”
हे माझ्या लहानपणचं. पुढे एकदा या प्रसंगाविषयी मम्मी मला म्हणाली, “हे समजावून सांगताना, तुला समजेल की नाही, यापेक्षा मला हे कधी समजेल हा विचार माझ्या डोक्यात थैमान घालत होता. कालपर्यंत या मुलींमध्ये सर्वात चुणचुणीत तू म्हणून मला तुझा अभिमान वाटत असे. तीच तू त्यांच्यापासून एका अपंगत्वामुळे तोडली जावीस?” मम्मीचा स्वर थरथरला. वाटलं, डोळ्यात जमा होणारे अश्रू ती थोपवून धरतेय. ‘अगं, तू रड मोकळेपणाने’असं तिला सांगावंसं वाटलं. पण बोलता नाही आलं.
मलाही ती सांगत असलेला प्रसंग स्पष्ट आठवत होता. मला भीती वाटावी या हेतूने नाही. पण, खेळात एका वेलीचा हातभर लांबीचा तुकडा घेऊन साप साप म्हणत सगळी टोळीच मला आमच्या बिल्डिंगमागच्या वाडीत एकटं सोडून गेली होती. रोजची नजरेखालची ती वाट मी पायाखाली आणत, धडपडत आवाजाचा वेध घेत पार केली. कुणी तरी मला घरी सोडलं. खरं तर, काय झालं, हे मी सांगितल्यावर खूप घाबरली होती. साप जर खरंच तिथे असता, तर माझी लेक कसं वाचवेल स्वतःला. तिची भीती अवाजवी नव्हती. बिल्डिंगच्या मागे, बाजूला आंबा, नारळ, पेरू अशी बरीच झाडं होती. त्यांच्या आश्रयाने गवत, छोटी झुडपं यांचीही बरीच दाटी असायची. बऱ्याचदा त्या गचपणात साप दिसायचे. अशात हा प्रसंग घडलेला. बिल्डिंगच्या मागल्या वाडीतलं माझं स्वैर बागडणं बंद झालं.
असंच एकदा, लपाछपीसाठी नेहमीच्या टोळक्यात मी सामील झाले होते. लपायची जागा म्हणजे पेरूचं मोठं मोठं वाढलेलं झाड. आम्ही त्यावर सराइतपणे चढलो. मी त्यावेळी पूर्णतः दृष्टीहीन झाले होते. पण नेहमीच्या माणसांप्रमाणे मी नेहमीची झाडंही ओळखू शकत होते. झाडावर बसलेली असताना एक मुलगी जवळ आली आणि ‘चल खाली’ असं म्हणाली. काही न समजून मी पटकन खाली उतरले. चिंगीने उतरल्या क्षणी माझा हात पकडला आणि धावत सुटली. आम्ही मम्मीकडे पोहोचलो आणि तिने सांगितलं की, माझ्यापासून काही अंतरावर असलेल्या एका फांदीवर हरणटोळ होती.
मम्मीने मला पोटाशी घट्ट धरलं. “तुला किती वेळा सांगायचं की, जाऊ नकोस झाडाझुडपात म्हणून? कधी समजेल तुला की...” तिला आपल्या मुलीला पुन्हा दिसूच शकणार नाही, हे सत्य पचवणं जड जात होतं. त्यामुळे मुलीला समजावून देणंही क्ठीण होऊन बसलं होतं. मुलीचं भावविश्व बदलत असल्याने तिला होत असलेला त्रास आणि त्याचं येणारं दडपण. तर दुसरीकडे, शस्त्रक्रिया होऊनही कधीच दिसू शकत नाही या डॉक्टरांच्या निदानामुळे पंचविशीतल्या माझ्या मम्मीची खूप चिडचिड व्हायची. कधी तिचा राग देवावर निघायचा, कधी पप्पांवर, कधी माझ्या लहान भावांवर, तर कधी खुद्द माझ्यावर.
मम्मीपप्पांना माझं अंधत्व सहन करण्याचा मार्ग दाखवला तोही एका डॉक्टरनेच. दृष्टीहीन व्यक्ती शिकू शकतात. आणि त्या तुमच्या आमच्यापेक्षा मोठ्या हुद्द्यावरही जाऊ शकतात, हे त्यांनी अनेक उदाहरणं देऊन माझ्या मम्मीपप्पांना पटवून दिलं. दादरच्या कमला मेहता अंध शाळेत जाऊन माझ्या शिक्षणाची सोय करायला सांगितली.
- अनुजा संखे

No comments:

Post a Comment