Saturday 10 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 4

माझ्या भविष्यकाळाबद्दल रंगवलेली स्वप्न पूर्ण होऊ शकतात, हा विश्वास मम्मीपप्पांमध्ये डॉक्टर जयेश यांनी निर्माण केला. दादरच्या कमला मेहता अंध मुलींच्या शाळेत मला घातलं. आणि माझ्या सर्वांगीण विकासाबद्दल असलेल्या त्यांच्या आशा आणखीनच पल्लवित झाल्या. पहिलीच्या वर्गात माझा प्रवेश झाला. माझ्यासारख्याच आणखी दहा जणी त्या वर्गात होत्या.
तो दिवस मला अजून आठवतो. २५ जुलै १९९४ रोजी माझी ऍडमिशन झाली. शाळेचा तिसरा तास चालू होता. आणि अनिताताई वर्गाला ब्रेलवाचन शिकवत होत्या. त्या वर्गात काय शिकवत आहेत, ते त्यांनी मला लक्ष देऊन ऐकायला सांगितलं. ते ऐकून नंतर क्रमाने त्यांना बोलूनही दाखवलं. माझ्या अचूक सांगण्याने त्या खूपच प्रभावित झाल्या. लगेच त्यांनी मला ब्रेल वाचायचं शिकवायला सुरुवात केली. देवनागरी लिहिताना मुलांना बाराखडी प्रथम शिकवली जाते. तसंच ब्रेललेखन वा वाचन शिकवताना प्रथम विशिष्ट टिंबांच्या समुहावरून बनलेल्या अक्षरांचे गट तयार केलेले असतात, तेच शिकवलेही जातात.
मला पहिल्याच दिवशी अ, ब, ल, क हा गट शिकवला. एका मोठ्या गॅपनंतर तीच अक्षरं मला ओळखायला लावली. मी ती बरोबर ओळखली आणि अनिताताईंनी माझ्याकडे व्यवस्थित लक्ष पुरवायला सुरुवात केली. त्यांच्या आणि मंजिरीताईंच्या विशेष शिकवण्यामुळे मी आठवडाभरातच ब्रेल लिहाय-वाचायला शिकले. शाळा खूपच व्यावहारिक होती असं म्हणता येईल. क्रमिक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास तर घेतला जायचाच. शिवाय रोजच्या व्यवहारात उपयोग होऊ शकतील, अशा गोष्टीही मुलींना शिकवण्याकडे शाळेचा कल असायचा. क्रमिक अभ्यासाबरोबरच संगीत, नृत्य, हस्तकला हे विषय अनिवार्य होते. गाणं किंवा विणकाम, शिवणकाम किंवा क्ले वर्कमधल्या प्रकारात किमान उत्तीर्ण होण्याइतके गुण मिळाले नाहीत, तर ती विद्यार्थिनी चक्क सगळ्याच परिक्षेत नापास होई. मग, क्रमिक अभ्यासक्रमात तिला कितीही भरगच्च मार्क मिळालेले असोत. यामुळे आमच्या शाळेतल्या कोणत्याही मुलीला या सर्व कलाप्रकारांमध्ये किमान पास होण्याइतकं तरी प्राविण्य असतंच. याचा मला अभिमान आहे.
मुलींचा खरोखरंच सर्वांगीण विकास व्हावा यावर शाळेचा भर असे. दृष्टीहीन मुलांना सर्वच पालक व्यवस्थित हाताळू शकतात, असं नाही. त्यामुळे डोळस मुलांना जे ज्ञान पाहून आणि निरिक्षणातून सहज मिळतं, ते या मुलांना मिळत नाही. म्हणजे दुकानातून वस्तू कशा विकत घ्याव्यात, पैसे कसे द्यायचे, आपली वस्तू बरोबर आहे-नाही, हे कसं तपासायचं, हे तोंडी सांगून कळणं शक्य नसतं. प्रात्यक्षिकाशिवाय हे शिकणं शक्य नाही, हे ओळखूनच शाळेने दुकानप्रकल्प चालवला होता. यात आम्हा मुलींना प्रत्येकी एक रुपया मिळे. तो घेऊन वर्गानुसार ठरलेल्या दिवशी आम्ही दुकानात जाऊन जे आवडेल ते घेऊन येत असू. आणलेला खाऊ वर्गात घेऊन यावा लागे. सर्व वर्गमैत्रिणींमध्ये तो थोडा थोडा वाटावाही लागे. त्यामुळे शेअरिंग ही संकल्पनाही मनावर कोरली गेली. व्यवहाराला आपलेपणाचा स्पर्श झाला, तो या शेअरिंगच्या कल्पनेतून.
आज मी अशी कितीतरी मुलं पाहते जी आपली वस्तू, खाऊ कोणालाच द्यायला मनापासून तयार होत नाहीत. ओजसही त्यांपैकीच. आपलं खेळणं पटकन कुणाला मनापासून देणार नाही. पण, ते तुझंच आहे, तुझा मित्र वा मैत्रिण थोड्या वेळापुरतं त्या खेळण्याशी खेळेल हे सतत त्याला सांगणं, समजावणं, ही माझी जबाबदारी आहे, नाही का? वाटून खायचं कसं, हे त्याला कळावं म्हणून आम्ही एक प्रयोग नेहमी करतो. कोणताही खाऊ द्यायचा झाला तर तो एकाच डिशमध्ये काढून त्याच्या पुढ्यात ठेवतो. आणि थोड्या वेळाने आळीपाळीने त्याच्याकडे तो मागतो.सुरुवातीला तो देत नव्हता. पण, आता कोणीही मागितलं तर तो काहीतरी देतोच देतो. स्वतःहून ऑफर करणंही हळूहळू तो शिकेल अशी आशा आहे.
आणखी एका बाबतीत शाळेचा उल्लेख करायलाच हवा. दृष्टीहीन व्यक्ती एकटीने चालू शकते, बाहेरच्या जगात वावरू शकते, प्रवास करू शकते, हा आत्मविश्वास दृष्टीहीन विद्यार्थिनीच नव्हे तर तिच्या पालकांमध्ये निर्माण करणं सोपं नसतं. हे करताना मुली पूर्णार्थाने स्वतंत्र व्हाव्यात, असा उद्देश मनाशी बाळगून त्यांना एकट्यानं चालण्याचं, जगात वावरण्याचं प्रशिक्षण शाळा देते. आठवीतल्या मुलींना आधी पांढरी काठी कशी हाताळावी, हे शिकवलं जातं. शाळेच्या प्रांगणात चालण्याचा सराव झाल्यावर, रस्त्यावर त्यांना कसं चालावं, याचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं. एकट्यानं चालताना लोकांची मदत कशी घ्यावी, आपल्याला काय मदत हवी आहे, ते कसं सांगावं, त्यांनी आपला हात कसा पकडावा आणि आपण त्यांना कसं पकडावं, हे प्रत्यक्षपणे शिकवलं जातं. मग, मुलगी नीट तयार झालीये, असं वाटल्यावर तिची परीक्षा म्हणून तिला एकटीला बाहेर पाठवलं जातं. मोबिलिटी शिकवणाऱ्या शिक्षिका तिच्याशी एकही शब्द न बोलता तिचं सबंध रस्ताभर निरीक्षण मात्र करत राहतात.
एकूण काय, कॉलेजला जाताना बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने पहिलं पाऊल टाकायला मला माझ्या शाळेने शिकवलं. आईवडिलांनी मी या जगात आल्यावर चालायला शिकवलं होतं, तेवढंच महत्त्वाचं, किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचं ,पुढे टाकलेलं हे पाऊल होतं!
- अनुजा संखे

No comments:

Post a Comment