Saturday 30 September 2017

- सुगंधी फ्रान्सिस, सोनिया गिल, किरण मोघे – अखिल भारतीय जनवादी महिला संघटना

‘ती’च्या उमेदकथा - नवरात्रोत्सव विशेष
ऑनर किलिंगच्या भीषण प्रकारातून वाचलेल्या मीता आणि सीमा आज मानाचं जीवन जगत आहेत. त्यांची सत्यकथा समजून घ्यायला हवी."बरं झालं मॅडम तुम्ही या मुलीची जबाबदारी घेता आहात. नाही तर हिची रवानगी सुधारगृहात झाली असती. तिथे तिचे आणखी हाल झाले असते." असं पोलिसच म्हणाले तेव्हा मुलीला संरक्षण देण्याचं आम्ही पक्कं केलं. ऑनर किलींगची केस हाताळणाऱ्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुगन्धीताई सांगत होत्या.
ऑनर किलींग ! शब्द जरी उच्चारला तरी अंगावर शहारे येतात. तथाकथित इभ्रतीखातर केलेला आपल्याच नातलगाचा खून.
भारतभर दरवर्षी एक हजाराहून अधिक ऑनर किलिंगच्या केसेस होतात. अशाच ऑनर किलिंगच्या घटना १९९९ मध्ये पनवेल आणि २००४ मध्ये वसई इथे घडल्या. मात्र तिथे 'सैराट’ इतकं भीषण घडलं नाही. मुलींच्या नातलगांनी त्यांच्याच समोर त्यांच्याच नवऱ्यांचे, नवऱ्याच्या इतर नातलगांचे जीव घेतले गेले. मात्र या घटनांमधल्या मीता आणि सीमा या मुली मागे जिवंत राहिल्या. त्यावेळी त्या कोणत्या मानसिकतेतून गेल्या असतील याची कल्पना करणंदेखील अशक्य आहे. पीडित मीता आणि सीमा या घटनेनंतर एकाकी पडल्या. अशा स्थितीत कोणीही पुढे यायला तयार नसताना देशपातळीवर महिलांच्या हक्कांसाठी लढणारी 'जनवादी महिला संघटना ' मदतीसाठी पुढे आली. संघटनेच्या जेष्ठ कार्यकर्त्या सुगंधी फ्रांसिस ,सोनिया गिल आणि किरण मोघे या तिघींनी या मीता-सीमा यांची जबाबदारी घेतली.
कोर्टात केस जाताच पनवेलची मीता व वसईची सीमा यांच्या पालकत्वाचा, सुरक्षिततेचा प्रश्न पुढे आला. केसदरम्यान या मुलींच्या जिवाला धोका होता. मीताचे नातेवाईक तर ही एकटी सापडली तर हिलाही ठार करू अशी उघड उघड धमकीच देत होते. अशा वेळी कुणाला कळू न देता तिला इकडे तिकडे हलवलं जात असे. कोर्टात सुनावणीच्या वेळीही तिच्या येण्याबाबत गुप्तता पाळली जायची.
   सुगंधीताई सांगतात, “आम्हा कार्यकर्त्यांना मारण्यासाठी गुंडदेखील पाठवले होते”. इतक्या वाईट परिस्थितीतसुद्धा त्या मीतासोबत खंभीरपणे उभ्या राहिल्या. सीमा या घटनेदरम्यान गरोदर होती. तिची जास्तच काळजी घेणं गरजेचं होतं. सुगंधी, सोनिया आणि किरण यांनी स्वखर्चाने सीमाची सुरक्षित राहण्याची सोय केली. केसेस पुढे रेटल्या. केस संपल्यावर पुढे कुठे जायचं,काय करायचं, यापुढे कसं जगायचं या चिंतेने ग्रासलेल्या असताना त्यांनी या दोन्ही मुलींचं पालकत्वच स्वीकारलं. म्हणजे काय केलं?
मीताला शिकवलं आणि तिचं लग्न करून दिलं. ती शिक्षिकेची नोकरी करत आहे. आपल्या कुटुंबात सुखाने राहात आहे. सीमाला तर तिच्या बाळासह स्वतः सुगंधी फ्रान्सिस यांनी सून म्हणून स्वीकारलं. दोघीही सुगंधी आणि किरण यांना आईचा दर्जा देतात. मीता-सीमाच्या मुलांच्या त्या आजी झाल्या आहेत. त्यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या भीषण प्रसंगाचं सावट निवळलं आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीसाठी त्या कृतज्ञ आहेत. .
लता परब.

मुलं शिकावीत म्हणून जीवाचं रान करते...

‘ती’च्या उमेदकथा - नवरात्रोत्सवविशेष
औरंगाबाद शहरातल्या बन्सीलाल नगरची मनपा शाळा. रंग उदास झालेली, खिडक्यांच्या काचा तुटलेली, गरिबांघरच्या पोरांची... नेहमीसारखीच... पण या शाळेत एक गोष्ट मात्र वेगळी आहे. ती म्हणजे या शाळेची मुख्याध्यापिका शाळा टिकावी, मुलं शिकावीत म्हणून जीवाचं रान करते... तिचं नाव आहे अनिता जनार्दन भडके.
अनितामॅडम मूळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या, भूम तालुक्यातील सुकटा या गावातील. माहेर याच तालुक्यातलं पाथरूड. बाप दादासाहेब बोराडे. त्यांनी अनिताला दहावीपर्यंत शिकवलं आणि दहावीची परीक्षा दिल्याच्या 15 व्या दिवशीच तिचं लग्न लावून दिलं. वरात औरंगाबादला आली. सोबत आलं मनातलं शिकायचं आणि शिक्षक व्हायचं स्वप्नदेखील. 
थोड्यात दिवसात निकाल लागला. आणि अनिता दहावीला बोर्डात पहिल्या आल्या. स्वप्नं पूर्ण होतील अशी आशा वाटू लागली. पण डीएड करण्यास नवऱ्याने नकार दिला. तब्बल पाच वर्षं नवऱ्याने शिकायला परवानगी द्यावी म्हणून त्या प्रयत्न करत राहिल्या. शेवटी एकदा नवऱ्याची नजर चुकवून घराशेजारी असलेल्या डीएड कॉलेजला प्रवेश घेतला. यावेळी कदाचित त्यांची चिकाटी बघून नवऱ्यानेही सूट दिली आणि डीएड झालं. आता पुढचा टप्पा होता, शिक्षक म्हणून नोकरीचा. इथंही पुन्हा नवऱ्याचा नकार. पाच वर्षं प्रयत्न करत राहिल्या आणि मॅडम महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्या.स्वप्न साकार झालं. आणि कर्तृत्व दाखवायची संधीही मिळाली. मॅडम काही दिवस कंचनवाडीच्या मनपा शाळेत होत्या. इथे फक्त सव्वाशे मुलं होती. गावात रिकाम्या फिरणाऱ्या शाळाबाह्य मुलांचं प्रमाण खूप जास्त होतं. मॅडमनी ही सगळी मुलं शाळेत आणायचं ठरवलं. त्यासाठी सर्वप्रथम वर्गातली छडी फेकून दिली. गाणी, कविता, कथा, गोष्टी सुरू झाल्या आणि मुलांचा आकडा अडीचशे पार करून गेला. पण दुसऱ्याच महिन्यात मॅडमची बदली झाली. बदली रद्द करण्यासाठी गावकऱ्यांनी शाळेला कुलुपही ठोकलं. महापालिकेच्या इतिहासात एक शिक्षकासाठी झालेलं हे पाहिलं आंदोलन. पुढे मॅडम बन्सीलाल नगरच्या मनपा शाळेत आल्या इथे तर विद्यार्थ्यांची वानवाच. मॅडमनी वस्त्या, पालावर फिरून भटक्या विमुक्तांची, दलितांची, गरिबांची, शाळा सुटलेली, शाळेत न जाणारी अशी सगळी मुलं गोळा करून शाळा सुरू केली. या मुलांना येण्याजाण्यासाठी वाहनांची सोय सुरू केली. आज या शाळेत शिक्षकांच्या वर्गणीवर, एक तीस सिटांची बस, एक 18 सिटांची व्हॅन आणि सहा सहा सिटांच्या दोन रिक्षा सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे याचे सगळे पैसे मॅडम आणि शाळेतले शिक्षक आपल्या पगारातून वर्गणी करून देतात. शाळेजवळ राहणाऱ्या मुलांना त्यांनी सायकल घेऊन दिल्या. आजही त्यांना पंक्चर काढायला, हवा भरायला मॅडमच पैसे देतात. दुपारच्या खिचडीची सोय उत्तम असते. शाळेची गोडी लागावी म्हणून मॅडम शाळेत कधी जांभळं, बोरं, पेरू, केळं अशी फळं आणतात आणि वाटतात. मुलंही खुशीत असतात.
आता मॅडमची रिटायरमेंट जवळ आलीय. मॅडम म्हणतात, "रिटायरमेंटनंतर मला एक शाळा उघडायची आहे, जिथं गरीब श्रीमंत असं कॉम्बिनेशन असणार आहे. त्या शाळेत श्रीमंतांना फी आणि गरिबांना मोफत शिक्षण देणार." या शाळेसाठी मॅडमनी तीस वर्षांपूर्वी अर्धा एकर जमीन घेऊन ठेवली आहे. महिन्याला शंभर रुपये करत त्यांनी या जागेचे पैसे फेडलेत, निवृत्त झाल्यानंतर त्या येणाऱ्या पेन्शनमधून शाळानिर्मितीचा खर्च भागवणार आहेत. 
नोकरी करतच अनिता यांनी आपलं पुढचं शिक्षणंही पूर्ण केलं. त्यांनी बीए, बीएड, एमए, एमड आणि एमफिल पूर्ण केलं. शिक्षणशास्त्रात पीएचडी करायचं हे त्यांचं पुढचं स्वप्न. ज्या महिलेचं दहावी झाल्यानंतर पंधराव्या दिवशी लग्न होतं, बोर्डात पहिला येऊन डीएड करायला पाच वर्षे लागतात, डीएड ला प्रथम येऊन नौकरी करायला पुढची पाच वर्षे जातात... तीच महिला शिक्षकी पेशात आपल्या कामाने आदर्श निर्माण करत, शिक्षणाच्या सगळ्याच डिग्र्या पादाक्रांत करते. हा प्रवास खरंच थक्क करून सोडणारा आहे. 
अनिता जनार्दन भडके, मुख्याध्यापिका, मनपा शाळा.
- दत्ता कानवटे.

सामाजिक जाणिवेचा यवतमाळचा दुर्गोत्सव


रात्र चढत जाते तशी रस्त्यांवर वाढणारी गर्दी...जिल्ह्या-जिल्ह्यातून, परराज्यातून आलेले लाखो भाविक...डोळे दिपवणारी रोषणाई...थेट इतिहासात नेणाऱ्या, जुनं वैभव दाखविणाऱ्या कलाकृती...आणि प्रत्येक मंडळाकडून दिला जाणारा सामाजिक संदेश हे चित्र आहे यवतमाळच्या नवरात्रोत्सवाचं. अमरावती परिमंडळात तीन हजार सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळं. त्यातील 2 हजार 590 मंडळं एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आहेत. या दुर्गोत्सवातले खरे कलाकार म्हणजे इथले मूर्तिकार. 'जिवंत' भासणारी दुर्गेची मूर्ती हे इथलं वैशिष्ट्य. या मूर्ती थेट भक्तांच्या मनाचा ठाव घेतात.
दरवर्षी येथील दुर्गोत्सव गर्दीचा उच्चांक मोडत आहे. या काळात यवतमाळ शहरात अंदाजे 100 ते 200 कोटींच्या वर उलाढाल होते. दररोज किमान 1 ते 2 लाख भाविक या उत्सवात सहभागी होतात. नवरातरी आधी दोन महिने सर्व मंडळांचं काम सुरू होतं. कोणता देखावा, त्यातून कोणता सामाजिक संदेश देणार, यासाठी मंडळांमध्ये स्पर्धा लागलेली असते.
‘स्व. बब्बी पहेलवान सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळा’चे हे 76 वे वर्ष. यावर्षी अवयवदान, देहदानाबाबत जनजागृती करून इच्छुकांचे अर्ज भरून घेत आहे. तसंच व्यापाऱ्यांना डस्टबीन वाटप, वृक्षलागवड केली जात असल्याचं मंडळाचे अध्यक्ष अतुल दवंडे आणि सचिव देवा राऊत यांनी सांगितलं. ‘समर्थ दुर्गोत्सव मंडळा’ने बेटी बचावचा संदेश देत दुर्गादेवीच्या दरबारात नऊ कन्यांचा देखावा साकारला आहे. तुळशीचे महत्व अधोरेखित करून ऑक्सीजन देणारे रोपटे घरी लावा, असा संदेश मंडळाने दिला आहे. यवतमाळचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी अध्यक्ष असलेल्या ‘जयहिंद दुर्गोत्सव मंडळा’ने रक्तदान शिबिराचे आयोजन करून शासकीय रक्तपेढीला मदत केली आहे. या मंडळाचं 54 वे वर्ष आहे. ‘शिवराय दुर्गोत्सव मंडळा’चं हे पहिलंच वर्ष. या मंडळाने नऊ दिवस प्रबोधनपर व्याख्यानमालेचं आयोजन केलं आहे. या नऊ दिवसात शासकीय दवाखान्यात जन्माला येणाऱ्या कन्येचा आणि मातेचा विशेष सत्कार या मंडळाकडून केला जात असल्याचं मंडळाचे अध्यक्ष सचिन येवले यांनी सांगितलं. होतकरू महिलांना शिलाई मशीन वाटप, शाळकरी मुलींना सायकल वाटप असे विविध सामाजिक उपक्रम मंडळांमार्फत सुरू आहेत. एकविरा दुर्गोत्सव मंडळाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 'आत्महत्येचा विचार आल्यास तत्पूर्वी आम्हाला प्रत्यक्ष भेटा, बोला मार्ग निघेल', असं आश्वासक आवाहन त्यांनी केलं आहे. अनेक मंडळांनी स्वच्छ भारत मोहिमेचे कॅम्पेन केलं आहे. मंडळाचे पदाधिकारी सामाजिक संघटनांना सोबत घेऊन दररोज सकाळी शहर स्वच्छ करतात.
कोलकातानंतर देशात यवतमाळ येथे सर्वात मोठा दुर्गोत्सव साजरा होतो. या उत्सवाला १०० पेक्षा अधिक वर्षाची परंपरा आहे. यवतमाळच्या दुर्गोत्सवाची पाहिजे तशी प्रसिद्धी होत नसल्याने अस्वस्थ झालेल्या चंद्रेश सेता यांनी 1 ऑक्टोबर 2016 रोजी 'यवतमाळ नवरात्री डॉट कॉम' या संकेतस्थळाची निर्मिती केली. यावर यवतमाळच्या नवरात्र उत्सवाचा इतिहास, मंडळांची नावं, पदाधिकारी, मूर्तींची छायाचित्रे, व्हीडीओ, नवरात्रीतील प्रत्येक दिवसाचे महत्व अशी सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे आता 55 देशातील नागरिक थेट उत्सवात ऑनलाइन सहभागी होतात. नवरात्रीत दररोज 3 ते 4 हजार भाविक या संकेतस्थळावरून नवरात्र उत्सवाचा आनंद लुटतात.
दुर्गोत्सव पाहण्यासाठी बाहेरगावावरून येणाऱ्या‍ भाविकांसाठी विविध सामाजिक संघटना फराळ, पाणी, चहाची व्यवस्था ठेवतात. विशेष म्हणजे सर्व धर्माचे लोक या दुर्गोत्सवात आत्मियतेने सहभागी होतात. त्यामुळे या काळातही शहरातील सामाजिक सौहार्द कायम असते. त्याची दखल घेत यावर्षी जिल्हा पोलीस दलातर्फे प्रथमच 'दुर्गोत्सव अवार्ड' मंडळांना देण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस दलाने मंडळांसाठी स्पर्धेचं आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील क्रमांक एकचा हा दुर्गोत्सव! पण पुणे, मुंबईतील गणेशोत्सवाच्या तुलनेत प्रसिद्धीपासून काहीसा दूर असल्याची खंत मात्र यवतमाळकरांना आहे.

- नितीन पखाले.

Thursday 28 September 2017

बेबीताई गायकवाड, भाजीविक्रेती, कवयित्री, सामाजिक कार्यकर्ती

‘ती’च्या उमेदकथा - नवरात्रोत्सव विशेष
पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी हा दुष्काळी भाग. परिस्थितीमुळे बेबीताई कुटूबासह 1994 साली नगरला आल्या. पतीला एका कंपनीत रोजगार मिळाला, लवकरच कंपनी बंद पडली. गायकवाड कुटूंबासह पाचशे कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला अन् तिथून सुरू झाला जगण्याचा संघर्ष. बेबीताईने अहमदनगर शहरातील प्रोफेसर चौक भागात भाजीचं दुकान सुरू केलं.
समाजासाठी काही करण्याची वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत गाडगेबाबा, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन राय यांची पुस्तकं वाचत त्यांच्या कामाला सुरुवात झाली. त्यांनी 20 महिलांसोबत त्यांनी ‘क्रांती ज्योती महिला मंडळ’ सुरू केलं. आज काळ बदलला तरी विधवा महिला कुंकू लावत नाहीत. समाजही हे मान्य करत नाही. हे त्यांनी हेरलं. ही पद्धत बंद पाडायची हेच पहिलं काम बेबीताईंनी हाती घेतलं.2012 सालचा मकर संक्रांतीचा दिवस. शहीद सैनिकांच्या वीरपत्नींसाठी बेबीताईंनी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजला. राज्यातील हा पहिलाच कार्यक्रम. या कार्यक्रमाला विधवा महिला उपस्थित राहतील की नाही ही मोठी शंका होती. मात्र तब्बल २९ महिला या कार्यक्रमाला आल्या. त्यानंतर पुढील प्रत्येक कार्यक्रमाला या महिला आपल्या कुटुंबासह उपस्थित रहात आहेत. दर संक्रांतीला हा कार्यक्रम होतो. अगदी तरुणपणी वैधव्य आलेल्या दोघींचे त्यांनी पुनर्विवाहही करून दिले.

क्रांतीज्योती मंडळाचे त्यांनी 2015 मध्ये ‘स्वंयंसिद्धा फाउंडेशन’मध्ये रूपांतर केलं. आता नगर शहरापुरतं काम मर्यादित न राहता जिल्हाभरात व्याप वाढू लागला आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अाता व्याख्यानं, गरीब, अादीवासी शाळकरी मुलांना शैक्षणिक अाधार, महिलांसाठी वाचनालय असे उपक्रम सुरु केले अाहेत. जिल्हातील सुमारे शंभर महिला फाऊंडेशनशी जोडल्या गेल्या आहेत.
बेबीताईचा मूळ छंद कविता करण्याचा. तोही कामासोबत सुरूच राहिला.


महिला अत्याचार, हुंडाबळी, लेक वाचवा यासह पाणी अडवा, पाणी जिरवा अशा सामाजिक उपक्रमांवर त्या सातत्याने ठिकठिकाणी व्याख्यान देतात. शिवशंभो प्रतिष्ठानचा आदर्श माता, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा रत्नशारदा, लोकसत्ता दैनिकातर्फे नवदुर्गा आणि राज्य शासनाच्या प्रथम भाषा संवर्धनाचा कवी मंगेश पाडगावकर यासारख्या विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. 

  बेबीताई गायकवाड, भाजीविक्रेती, कवयित्री, सामाजिक कार्यकर्ती.

Wednesday 27 September 2017

कमल कुंभार, शेळी आणि कुक्कुटपालन

‘ती’च्या उमेदकथा – नवरात्रोत्सव विशेष
जिल्हा उस्मानाबाद. हिंगळजवाडी गाव. येथील कमल कुंभार. कमल यांच्या आईचा बांगड्या भरण्याचा छोटेखानी व्यवसाय होता. त्यामुळे उद्योगाचं बाळकडू त्यांना आईकडूनच मिळालं. आईसोबत कमल बार्शीला बांगड्या खरेदीला जात. त्यातून बांगड्यांचे प्रकार, नवनवीन व्हारयटी, भावातील तफावत असे बारकावे त्या शिकत गेल्या. पुढे विवाहानंतर त्यांनी हिंगळजवाडीत स्वत:चा बांगड्यांचा व्यवसाय सुरू केला. दोन हजार रुपये भांडवलावर सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये बचतगट स्थापन केला. कमलताई बचतगटाच्या सचिव झाल्या. त्यांनी गटातील महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करायला सुरुवात केली. केवळ बचत गटावर अवलंबून न राहता ‘आशा कार्यकर्ती’ म्हणूनही काम सुरु केलं. 




बचतगटाद्वारे अनेक महिलांना व्यवसायमार्गदर्शन केल्यामुळे त्यांच्या कामाचा आवाका वाढला. सुमारे 400 बचतगट बांधले गेल्यानंतर त्यांनी बचतगटांचं तालुकास्तरीय फेडरेशन तयार केलं. या फेडरेशनवर त्यांना संचालक म्हणून संधी मिळाली. महिलांना 5 ते 25 हजारापर्यंत कर्ज देण्याची तरतूद फेडरेशनने केली. त्यामुळे शेकडो महिलांना स्वावलंबी होता आलं. वेगवेगळी प्रशिक्षणे घेत त्यांनी साडी, बांगडी, कुक्कट, शेळीपालन, जनरल स्टोअर्स, किराणा दुकान असे अनेक लघुउद्योग उभारले आहेत. दोन वर्षे महावितरणच्या वीजबिल वाटपाचं कामही केलं. त्यातूनही त्यांना चांगला नफा मिळाला.
कमल कुंभार यांनी आजवर जवळपास चार हजार ग्रामीण महिलांना उद्योग उभारणीसाठी प्रेरित केलं. या महिला उद्योजक म्हणून आत्मनिर्भर बनल्या आहेत. या सगळया प्रवासात अनेक समस्या आल्याच. पण सातत्याने काहीतरी नवीन करण्याची आवड आणि त्यासाठी लागणारं प्रशिक्षण घेत गेल्यामुळे कामात गती मिळाली, असं त्या सांगतात.
आता तर कमल कुंभार यांच्या कामाची दखल संयुक्त राष्ट्रसंघाने घेतली आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमातंर्गत न्युयॉर्क येथे त्यांना नुकताच ‘इक्वेटर’ पुरस्कार देण्यात आला. कोणताही उद्योग सुरु करतांना त्याची तपशिलात माहिती घ्यायची. त्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन प्रशिक्षण घेण्यावर श्रीमती कुंभार यांचा भर आहे.
‘जागृती महिला बचत गटा’च्या नावाने कमल यांनी २०१५ मध्ये गावातच पाच एकर जमीन भाड्याने घेतली. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांनी उस्मानाबादी शेळी प्रकल्पाची सुरुवात केली. जोडीला कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय सुरू केला. महिन्याला ६०० ते ७०० कोंबडी पिलांची विक्री आणि दररोज ७० ते ८० अंड्यांची विक्री होते. आज त्यांची महिन्याची आर्थिक उलाढाल लाखावर पोचली आहे. त्यांनी परिसरातील अन्य महिलांनाही स्वावलंबी बनविलं आहे. छोट्याशा खेड्यात त्यांचा सुरू झालेला उद्योग अन्य महिलांसाठी प्रेरणादायी आहे. उद्योगातून त्यांनी स्वत:चा बंगला बांधला, गाडी घेतली. कमल यांचं शिक्षण केवळ दहावी. पण कल्पकता, नवं शिकण्याची आवड, त्यातून नवे उद्योग सुरू करण्याची धडपड आणि जिद्द या जोरावर आज त्या ग्रामीण स्त्रियांचं रोल माॅडेल बनल्या आहेत. 


- कमल कुंभार, शेळी आणि कुक्कुटपालन.
- चंद्रसेन देशमुख.

Tuesday 26 September 2017

सुनयना 'अजात'

'ती’च्या उमेदकथा – नवरात्रोत्सव विशेष
जी जात नाही ती 'जात'! आज समाज जात, धर्मकेंद्री होत असताना एक तरूणी तिच्या पणजोबांनी शंभर वर्षांपूर्वी विदर्भात जातीप्रथेविरोधात केलेल्या बंडाची पुनरावृत्ती करीत आहे. सुनयना 'अजात' हे तिचं नाव. गेल्या वर्षभरापासून ती या लढाईत उतरली आहे. त्यासाठी विविध महाविद्यालयात जाऊन ती विद्यार्थ्यांना भेटते. त्यांच्याशी बोलते आहे.



१९२०-३० च्या दशकात सुनयनाचे पणजोबा गणपती महाराज यांनी समाजातील रूढी, परंपरा, कर्मकांडाविरोधात आवाज उठवून समाजाच्या प्रत्येक प्रश्नाला कृतीतून उत्तर दिले. जात न मानणाऱ्यांचा 'अजात' संप्रदायच त्यांनी निर्माण केला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व जाती, धर्मातील हजारो कुटुंबांनी आपल्या जातीची कवचकुंडले फेकून दिली आणि ते 'अजात' झाले. मात्र गणपती महाराजांच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीला खुद्द शासनानेच पुन्हा 'अजात' या जातीचे लेबल चिकटवले आणि त्यांना जातीच्या चौकटीत बंदिस्त केले !
सुनयना मुळची मंगरूळ दस्तगीर (ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) येथील. या परिसरात 'अजात' संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. ‘अजात’ संप्रदायाचा इतिहास रंजक आहे. यासंदर्भात सुनयना म्हणाली, "मंगरूळ दस्तगीर या गावात १८८९ साली जन्माला आलेल्या गणपती उर्फ हरी भबुतकर यांनी स्त्री-पुरूष समानतेचा लढा उभारला. सृष्टीत स्त्री आणि पुरूष या दोनच जाती असून मानवता हा एकच धर्म आहे, असे विचार गणपती महाराज आपल्या कीर्तनातून गावोगावी मांडू लागले. त्यासाठी 'श्वेत निशाणधारी अजात मानवसंस्था' त्यांनी स्थापन केली. कृतीतून समाजाला उत्तर देण्यासाठी गणपती महाराजांनी निम्न जातीतील एका विधवेशी लग्न केलं, ते साल होतं १९१७. या निर्णयाला समाजाकडून प्रचंड विरोध झाला. त्यांना बहिष्कृत करण्यात आलं. पण ते मागे हटले नाही. त्यांनी आपल्या विचारांची माणसे जोडली आणि जातीअंताची लढाई सुरू झाली. विदर्भातील सुधारणावादी विचारांचा हा पहिला लढा. समाजातील रूढी, परंपरांवर गणपती महाराजांनी 'श्री पापलोप ग्रंथा'तून सडकून टीका केली. स्त्रीशिक्षण आणि स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी 'श्वेत निशाणधारी अजात धर्मसंस्था' निर्माण केली. मंगळसूत्र, कुंकू, जोडवे हे स्त्री दास्याचे प्रतीक आहे, असं ते म्हणायचे. स्त्रियांची मासिक पाळी ही नैसर्गिक असून या काळात त्यांना घराबाहेर बसायला सांगणे हे हिंस्त्र आणि निर्दयीपणाचे कृत्य आहे, असं ते परखडपणे सांगायचे.”
‘अजात’ संप्रदायातील स्त्री-पुरूष श्वेत वस्त्रेच परिधान करतात. कपाळावर पांढरे गंध लावून पांढरा ध्वज घेऊन फिरतात, कारण पांढरा रंग हा सर्व रंगांचे मूळ असण्यासोबतच शांतीचे प्रतीक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गणपती महाराजांच्या कार्याची दखल घेतली. त्यामुळे अमरावती येथे १९२५ मध्ये झालेल्या 'अखिल भारतीय ब्राह्मणेत्तर बहिष्कृत परिषदे'चे अध्यक्षपद गणपती महाराजांना मिळालं. दुर्दैवाने गणपती महाराजांच्या निधनानंतर हा संप्रदाय बदेखल झाला. 'अजात' शिक्का बसल्याने कोणत्याच जाती-धर्माचे लोक या संप्रदायाला आपलं मानायला तयार नव्हते. तेव्हा अनेकांनी आपल्या मूळ जाती शोधून सरकारला माफीनामे लिहून देत जातीचे दाखले तयार केले. दरम्यानच्या काळात प्रशासनाने 'अजात' ही जात असल्याचा जावईशोध लावून या संप्रदायातील असंख्य विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर 'अजात'ची 'जात' म्हणून नोंद केली! गणपती महाराजांची पणती सुनयनासुद्धा या निर्णयाची बळी ठरली. सुनयनाने शासनाच्या या बेपर्वाईविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जात न मानणाऱ्यांना पुन्हा गणपती महाराजांच्या विचारांनी एकत्र आणून तिने निर्जातिकरणाचा आपला लढा सुरू केला आहे. ती म्हणते की, “तुमच्या आडनावावरून तुमची जात कोणती याचा अंदाज आजही सुशिक्षित आणि अडाणी लोक घेतातच. त्यातूनच जाती-पातीचे राजकारण सुरू होते आणि समाज विखुरला जातो. हे चित्र आजची विवेकवादी तरूणाईच बदलू शकते. शतकापूर्वी जो संदेश आपल्या कृतीतून माझे पणजोबा गणपती महाराजांनी दिला त्याचे अनुकरण करण्याची हीच योग्य वेळ आहे. याची सुरूवात मी स्वत:पासून केली आहे. मी माझ्या माहेरच्या, सासरच्या दोन्ही आडनावांची बिरूदावली काढून टाकली आहे. आता माझी ओळख केवळ सुनयना ‘अजात’ इतकीच आहे!”
आज सुनयनाने यवतमाळला 'समर्पण' नावाची संस्था स्थापन केली. जातीअंताच्या या लढाईत तरूणाईने समर्पित वृत्तीने सहभागी व्हावं, असं आवाहन सुनयनाने केलं आहे.
सुनयना अजात - संपर्क : 8275289455
- सुनयना 'अजात'
- नितीन पखाले.

Monday 25 September 2017

मनीषा रहाटे, पेट्रोलपंप चालक, खेड, रत्नागिरी

‘ती’च्या उमेदकथा – नवरात्रोत्सव विशेष 
‘तुमच्या पेट्रोल, डिझेलमध्ये बिघाड आहे, तुम्ही पंप बंद करा, नाहीतर आमच्यासारखे वाईट कोणी नाही’ अशा धमक्या वारंवार आल्या. एक महिला काय पेट्रोलपंप चालवणार म्हणून अनेकांनी खिजवले. काहींनी तर त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा हल्ला या महिलेने एकटीने परतून लावला. ती डगमगली नाही, या सगळ्याविरुद्ध ठाम उभी राहिली. आणि तीन वर्षातच तिने या क्षेत्रात जम बसविला. आज रत्नागिरी जिल्हय़ातीलच नाही तर महाराष्ट्रातील पहिली महिला पेट्रोलपंप चालक म्हणूनही तिला मान मिळाला. ती धाडसी महिला म्हणजे रत्नागिरीतील खेडमधील बोरज पेट्रोलपंप मालक मनिषा रहाटे.
विशेष म्हणजे मनीषाचा पेट्रोलपंप 24 तास सुरू असतो आणि पंपावरील कर्मचारीही महिलाच आहेत. केरळ राज्यातल्या महिलांच्या पुढाकारानंतर महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्हय़ातील या महिलेने हे धाडस केले. सध्या महिलांच्या नावाने अनेक पेट्रोलपंप विविध जिल्हय़ात काढण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र त्यांचे पुरूष कुटुंबीय हा व्यवसाय सांभाळतात. कर्मचारीही पुरूषच असतात. स्वतःच्या नावाने जेव्हा आपण काम घेतो तेव्हा स्वतःच ते सांभाळायला हवं, असंही मनिषाने आवर्जून सांगितलं. 
रत्नागिरी जिल्हय़ातील खेड तालुक्यामधील बोरज हायवेवर मनिषा रहाटे यांनी 2015 मध्ये पेट्रोलपंप सुरू केला. महिलांसाठी असलेल्या कोटय़ातून मनिषा रहाटे यांना हे काम मिळालं. लहानपणापासून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असलेल्या मनिषाने आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्याच्या जोरावर पेट्रोलपंप सुरु केला. पेट्रोलपंप सुरू करायचा मनात आलं तेव्हाच महिलांना काम करायची संधी द्यायचं ठरवल्याचं, मनीषा सांगतात. 
सिव्हील इंजिनियर म्हणून पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालयात त्यांनी रत्नागिरी व चिपळूण येथे दोन वर्षे काम केलं. स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय असावा अशी महाविद्यालयीन जीवनापासून त्यांची इच्छा होती. त्यामुळे नोकरीत मन रमेना. त्याचवेळी त्यांनी पेट्रोलियम व्यवसायात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला.
पेट्रोलपंप सुरू केल्यानंतर अनेक वाईट अनुभवांना मनिषाला सामोरं जावं लागलं. आलेल्या प्रत्येक अडचणीला मनिषाने खंबीरपणे उत्तर दिलं. ‘श्री महालक्ष्मी’ या नावाने हा पेट्रोलपंप सुरू आहे. याठिकाणी चार मुली दिवसाभर काम करतात आणि रात्री पुरुष कर्मचारी काम करतात. 24 तास मनिषाचे या पेट्रोलपंपावर लक्ष असते. 
मनीषा म्हणतात, “हायवेवर पेट्रोलपंप असल्यामुळे दिवसभर शेकडो प्रकारची माणसं या ठिकाणांहून ये-जा करत असतात. कित्येकदा महिलांकडे विचित्र नजरेने पाहणारे असतात. मात्र माझ्या या मुलींकडे कोणी वाईट नजरेने पाहूच शकत नाही. या मुली म्हणजे दुर्गाअवतार आहेत. राक्षसी वृत्तीवर प्रतिहल्ला करायचा हे मीच त्यांना शिकवलं आहे. त्यामुळे माझ्या महिला कर्मचाऱ्यांना कोणाचाही त्रास नाही.”
- जान्हवी पाटील.

कल्पना दिवे, कृषी उद्योजक, तिवसा, अमरावती

‘ती’च्या उमेदकथा – नवरात्रोत्सव विशेष

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका. इथलं तळेगाव ठाकूर गाव. येथील कल्पना दिवे यांनी बचतगटाच्या माध्यमातून एक गृहउद्योग सुरु केला. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाला भाव मिळावा, शेतकरी महिलांना काम मिळावं हा या बचतगटाचा उद्देश.



अल्पावधीतच त्या उदयॊगाची भरभराट झाली असून महाराष्ट्राबाहेरही त्यांच्या पदार्थांना मागणी आहे. दिवे कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच. संयुक्त कुटुंब. या कुटुंबातील पुरुष मंडळी शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात. कुटुंबातील महिलांना देखील प्रयोगशीलता स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच गृहविज्ञान विषयात पदवी घेतलेल्या कल्पना दिवे यांनी गावातील 11 शेतकरी महिलांना सोबत घेतलं. आणि 2002 साली ‘गोदावरी महिला बचतगटा’ची स्थापना केली. बचत गटाद्वारे त्यांनी सुरुवातीला लोणचं बनविण्यास सुरुवात केली. सध्या या बचत गट समूहातर्फे 10 प्रकारची लोणची, तीन ते चार प्रकारचे पापड, सरबतं यासह आवळा कॅन्डीची निर्मिती करण्यात येते. या बचतगटाचा एक खास पदार्थ म्हणजे आवळा - खवा पुरणपोळी. ही पुरणपोळी सध्या संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असून आता विदर्भाबाहेर तिला मागणी आहे.
जिल्हाभरात जिथे जिथे कृषी प्रदर्शनी असते तिथं या महिला आपल्या मालाची जाहिरात, विक्री करतात. महिन्याकाठी एक लाख रुपयाच्या वर गटाची उलाढाल आहे. ज्या महिलांना शेतीची कामं जमत नाहीत त्या महिलांना कल्पना यांनी शिकवलं. आणि बचतगटामार्फत रोजगार निर्माण करून दिला. त्यामुळे गावातील महिला आज आंनदी आहेत.

बचतगटामार्फत रोजगार निर्माण करून दिला

‘ती’च्या उमेदकथा – नवरात्रोत्सव विशेष

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका. इथलं तळेगाव ठाकूर गाव. येथील कल्पना दिवे यांनी बचतगटाच्या माध्यमातून एक गृहउद्योग सुरु केला. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाला भाव मिळावा, शेतकरी महिलांना काम मिळावं हा या बचतगटाचा उद्देश.
अल्पावधीतच त्या उदयॊगाची भरभराट झाली असून महाराष्ट्राबाहेरही त्यांच्या पदार्थांना मागणी आहे. दिवे कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच. संयुक्त कुटुंब. या कुटुंबातील पुरुष मंडळी शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात. कुटुंबातील महिलांना देखील प्रयोगशीलता स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच गृहविज्ञान विषयात पदवी घेतलेल्या कल्पना दिवे यांनी गावातील 11 शेतकरी महिलांना सोबत घेतलं. आणि 2002 साली ‘गोदावरी महिला बचतगटा’ची स्थापना केली. बचत गटाद्वारे त्यांनी सुरुवातीला लोणचं बनविण्यास सुरुवात केली. सध्या या बचत गट समूहातर्फे 10 प्रकारची लोणची, तीन ते चार प्रकारचे पापड, सरबतं यासह आवळा कॅन्डीची निर्मिती करण्यात येते. या बचतगटाचा एक खास पदार्थ म्हणजे आवळा - खवा पुरणपोळी. ही पुरणपोळी सध्या संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असून आता विदर्भाबाहेर तिला मागणी आहे.
जिल्हाभरात जिथे जिथे कृषी प्रदर्शनी असते तिथं या महिला आपल्या मालाची जाहिरात, विक्री करतात. महिन्याकाठी एक लाख रुपयाच्या वर गटाची उलाढाल आहे. ज्या महिलांना शेतीची कामं जमत नाहीत त्या महिलांना कल्पना यांनी शिकवलं. आणि बचतगटामार्फत रोजगार निर्माण करून दिला. त्यामुळे गावातील महिला आज आंनदी आहेत.


- कल्पना दिवे, कृषी उद्योजक.
 - अमोल देशमुख, अमरावती


Sunday 24 September 2017

दोघंही अनाथ, पण त्यांच्यासाठी सरसावले अनेक हात, दोन जीवांचा विवाहसोहळा..

ते दोघं अनाथ. ना नाव, ना गाव. ना आई, ना वडील. पण, त्यांच्यासाठी कुणी मुलीचे तर कुणी मुलाचे मामा बनून पाठीशी उभे राहिले. पुरोहिताने शुभमंगल सावधान, म्हणताच शेकडो हातांनी त्यांना शुभाशिर्वाद दिले आणि या अनाथ दांपत्याचा विवाह सोहळा संपन्न झाला. 



उस्मानाबाद शहरालगतच्या खेडपाटीजवळील स्वआधार गतीमंद मुलींच्या बालगृहात 13 सप्टे रोजी सनईचे मंगलमय सूर घुमत होते. यावेळी उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ.अभय शहापूरकर यांची उपस्थिती होती. सोहळ्याची महिनाभरापासून तयारी करण्यात येत होती. रांगोळ्या, तोरणांनी सजलेलं बालगृह, दारी मंडप, सनईच्या मंगलमय सुरांमध्ये वऱ्हाडीमंडळींची सुरू असलेली लगीनघाई.
‘स्वआधार गतीमंद बालगृहा’त अंजली आणि सुजितकुमार विवाहबध्द झाले. अंजली कळंबच्या ‘सहारा अनाथ बालगृहा’त वाढली तर सुजितकुमार पुण्यात. दोघांना कुणी नातेवाइकही नाहीत. अंजली सज्ञान झाली. आणि संस्थेचे सचिव शहाजी चव्हाण यांच्याकडे तिच्या विवाहासाठी प्रस्ताव आला. चव्हाण यांनी पुण्यातल्या सुजितकुमारची माहिती घेतली. त्यानंतर अंजलीच्या विवाहाची तयारी सुरू झाली. अंजली आणि सुजितकुमार यांच्या संसारासाठी लागणाऱ्या साहित्यापासून विवाहाच्या निमंत्रणपत्रिकेपर्यंत सगळी कामं करण्यासाठी अनेक हात पुढे आले. कुणी भांडी, फ्रीज, कुलर, कुणी रूखवत तर कुणी पैसे दिले. विशेष म्हणजे 6 महिने पुरेल इतकं किराणा साहित्यही त्यांना देण्यात आलं. उस्मानाबादेतील पत्रकारांनी तसेच समाजसेवी तरुणांनी पुढाकार घेतला आणि बुधवारी थाटामाटात विवाह पार पडला.
कळंब रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.सुनिल पवार यांनी मुलीचे मामा तर यशश्री क्लासेसचे संचालक प्रा.रवी निंबाळकर मुलाचे मामा म्हणून उभे राहिले. यावेळी गतीमंद बालगृहातील मुली, कळंबच्या बालगृहातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. विवाहानंतर सजविलेल्या वाहनातून वाजतगाजत नवदांपत्य पुण्याच्या दिशेने रवाना झालं. नांदा सौख्यभरे!

Friday 22 September 2017

मोलकरीण संघटना

‘ती’च्या उमेदकथा - नवरात्रोत्सव विशेष
“घरातील काही अडचणींमुळे मोलकरीण म्हणून काम करायला लागून आता २५ वर्षं झाली. काम करतांना लक्षात आलं की तुम्हा लोकांसारखी काम करतांनाची सुरक्षितता आम्हाला नाही. त्या विरूध्द आवाज उठवूनही १७ वर्षं झाली. या काळातल्या अथक संघर्षात घरकामगार, मोलकरणीसाठी कायदा आलाही पण आजवर त्याची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे आजूबाजूचं वातावरण काहीसं गढुळलं आहे. मात्र पुन्हा या विरोधात एल्गार पुकारण्याची आमची तयारी आहे”, घरकामगार मोलकरणी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा संगीता उदमले हिरीरीने बोलत बोलत होत्या. 


नाशिक शहर परिसरात घरकाम करणाऱ्या महिलांची संख्या २० ते ३० हजारांच्या आसपास आहे. असं असूनही त्यांच्या प्रश्नांविषयी, आरोग्य, कामावरील सुरक्षितता याविषयी बोलण्यास फारसं कोणी तयार नव्हतं. कामाच्या वेळा निश्चित नाहीत, प्रसुतीरजा नाही, आरोग्यसुविधा नाहीत, कामावर सुरक्षितता नाही हे सगळंच संगीता उदमले यांना जाणवलं. त्यांना नाशिक जिल्हा घरकामगार, मोलकरीण संघटनेचं सहकार्य मिळालं. आणि त्यांनी २००७ मध्ये या विरोधात आवाज उठविला. महिलांना संघटित करण्यास सुरूवात केली. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत असतांना घरकामगार मोलकरणी कायदा अस्तित्वात यावा यासाठी प्रयत्न सुरू केले. कधी मोर्चा, आंदोलन, निवेदन असे निषेधाचे विविध मार्ग त्यांनी अवंलबले. मात्र हे करत असतांना कामाच्या ठिकाणी महिलांना त्रास व्हायचा. 


तुम्हाला हक्क का हवेत, सुट्ट्या का हव्यात अशी विचारणा व्हायची. यासाठी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांसह त्यांनी परिसरात बैठका घेण्यास सुरूवात केली. ‘आम्ही आमचा हक्क सरकारकडेकडे मागतो’ तुम्ही फक्त पाठिंबा द्या, या शब्दात त्यांना कामाच्या ठिकाणीही समज द्यावी लागली. त्यांच्या सततच्या रेट्यामुळे जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटनेचं मंडळ आकारास आलं. मंडळात आजपर्यंत १२ हजार घरकामगारांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केल्यानंतरही त्या महिलांना ओळखपत्र मिळवून देण्यात अडचणी आल्या. अधिकाऱ्यांनी कागदपत्रासह वेगवेगळ्या कारणांनी अडवणूक केल्याचं त्या सांगतात. 




याच कालावधीत २०१२ मध्ये कायदा संमत झाला. संघटनेने याचा आनंदोत्सवही साजरा केला. मात्र पाच वर्ष उलटले तरी त्याची अंमलबजावणी नसल्याने महिलांचा धीर आता खचण्यास सुरूवात झाली आहे. “ताई, आपण भांडलो पण काय उपयोग झाला नाही” अशा शब्दात महिला सल बोलवून दाखवतात. पण संगीता म्हणतात, “खरी सुरूवात इथून पुढे आहे. आमचा कायदा तयार आहे. सरकार म्हणतो तो रद्द झाला. रद्द तर रद्द पण किमान असंघटित कामगारांच्या सुरक्षित भविष्यासाठी काय असा जाब आम्ही आता विचारणार असल्याचं त्या सांगतात.” त्यासाठी आता ‘पाठीवर हात ठेवत फक्त लढ म्हणा’ असे म्हणणाऱ्यांची गरज असल्याचं त्या शेवटी बोलून दाखवतात.

 - संगीता उदमले
- प्राची उन्मेष

Thursday 21 September 2017

काहीतरी वेगळं करण्याची इच्छाच मेकॅनिक बनवून गेली

‘ती’च्या उमेदकथा - नवरात्रोत्सव विशेष

काहीतरी वेगळं करण्याची इच्छाच मालती गिरी यांना मेकॅनिक बनवून गेली. चारचाकी गाड्यांची दुरूस्ती करणं, वॉशींग सेंटर चालविणे ही कामं बऱ्याचदा पुरुषच करताना दिसतात. मात्र परभणी शहरातील गंगाखेड रस्त्यावर ताडेश्वर वॉशिंग सेंटरवर पुरूषांऐवजी मालती गिरी ही सर्व कामं करताना दिसतात. मालतीबाईंनी हे काम सुरु केलं 13 वर्षांपूर्वी. आज त्याचं वय आहे 54.
मालतीबाईंच शिक्षण फक्त चौथी. परभणीतील बाभूळगाव त्यांचं माहेर. 1977 मध्ये ताडपांगरी येथील तुकाराम गिरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरची परिस्थिती बेताची. त्यातून लग्नावेळी तुकाराम यांना नोकरी नव्हती. कामाच्या शोधात 80 साली गाव सुटलं. परभणीत आल्यावर त्यांनी टेलरिंगचं काम सुरु केलं. पत्नीने मदत केली तर चार पैसे अधिक मिळतील म्हणून त्यांनी मालतीबाईला शिलाई मशिन घेऊन दिली. परिस्थिती जाणून मालती यांनीही दूधविक्री, शिवणकाम यासारखे छोटे व्यवसाय सुरू केले. घर चालू लागलं आणि 1981 मध्ये तुकाराम यांना वीज कंपनीत नोकरी मिळाली. आणि काही दिवसांतच चालक पदावर ते सेवेत कायम झाले.



बदलीमुळे तुकाराम बाहेरगावी जाऊ लागले आणि कुटुंबाची जबाबदारी मालतीबाईंवर आली. शिलाई मशिनच्या जोडीला त्यांनी म्हैस विकत घेऊन दूधविक्री, मिरचीकांडप, साडीविक्री असे गृहउद्योग सुरु केले. आपण शिकू शकलो नाही ही खंत मनात होतीच. त्यामुळेच मुलाबाळांना शिकवायचं ही जिद्द मनी रुजली होती. आता त्यांचा दिवस पहाटे साडेचार वाजता सुरु व्हायचा. आणि संपायचा तो रात्री 11 वाजता.
अर्थातच या जोडप्याच्या कष्टाचं चीज झालं. चारही मुलं डॉक्टर झाली.
मधल्या काळात त्या पतीकडून ट्रॅक्टर शिकल्या. इथूनच मालती यांचा गॅरेज चालकाचा प्रवास सुरु झाला. लहानपणापासूनच मशिनरी हाताळणे, दुरुस्ती याबद्दलचं कुतूहल इथं कामी आलं. चालक म्हणून सेवेत असताना तुकाराम यांनाही वाहन दुरुस्तीबद्दल माहिती होती. आपल्यालाही वाहन दुरुस्ती आली पाहिजे, असा अट्टाहास मालती यांचा असायचा. त्यांची आवड पाहून तुकाराम यांनीच त्यांना वाहन दुरुस्तीचे धडे दिले.
मालतीबाई म्हणतात, “आता राहतोय ती जागा मिस्टरांनी घेऊन ठेवली होती. इथं आल्यावर काय काम करायचं, असा प्रश्नह माझ्यासमोर होता. मुलं शिकायला बाहेर पडलेली. हे कामाला जायचे. मला म्हणाले, आता चार-पाच वर्ष निवांत बस. “मी सांगितलं, मी नाही बसून खाणार”. मग सर्व्हिस सेंटर सुरू करायचं ठरलं. आता मला त्या कामाची माहिती होती. आणि काही कारणामुळे मला शिलाई मशीन चालवायची नव्हती. जागा होतीच मग सेंटर बांधलं. सुरूवातीला लोकांना विशेष वाटायचं, एक बाई सर्व्हिस सेंटरचं काम करते याचं. एकदा एकजण आला. गाडी धुऊन झाल्यावर म्हणाला, “तुम्हाला नवरा नाही का? म्हटलं, का हो? तसं म्हणाला, नाही, नवरा नसलेल्या बायका असं कुठलंही काम करतात नाईलाज म्हणून”. मिस्टर तेव्हा घरात होते, मी त्यांची ओळख करून दिली आणि सांगितलं, मला आवड आहे म्हणून हे करते हे काम. कधी एखादा बाई आहे म्हणून समजून घेतो. तर कधी एखादा बाई आहे म्हणून मुद्दाम वेडेवाकडे बोलतो”.



रोज सकाळी 7 वाजता सर्व्हिस सेंटरचं काम सुरु होतं. ट्रॅक्टर, ट्रक, रिक्षा, जीप, दुचाकी अशी सर्व प्रकारची वाहने धुऊन, ग्रिसींगचं काम स्वतः मालतीबाई करतात. विशेष म्हणजे ही सर्व कामं करत असताना त्यांच्या अंगात असतो टीशर्ट आणि काळवंडलेली पॅन्ट, केस विस्कटू नयेत म्हणून डोक्याला कॅप लावलेली.
त्यांची मोठी मुलगी पूजा नॅचरोपॅथीची पदवीधारक आणि डीएमएलटी झाली आहे. दुसरी बेबी एमबीबीएस असून वैद्यकीय अधिकारी आहे. तिसरा कैलास वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तरची तयारी करीत आहे. तर धाकट्या दत्तात्रयने परभणीतील दंत वैद्यकीय महाविद्यालयातून बीडीएसची पदवी घेतली आहे. चारही मुलांना मालतीबाईंनी डॉक्टर बनविण्याचा संकल्प केला आणि तो आपल्या मेहनतीच्या बळावर पूर्णही केला आहे.



मालतीबाई सांगतात, “आज माझी चारही मुलं डॉक्टर झाली यातच मला समाधान आहे. महिला म्हणून व्यवसायात काही अडचणी आल्या तर त्या दूर करायला मी अनुभवातून शिकत गेले. वेगवेगळ्या स्वभावाची, विचाराची माणसं व्यवसायाच्या निमित्ताने भेटतात. त्यांच्या अनुभवातून तसेच प्रत्येकाकडून काही ना काही शिकत राहिल्यामुळे आज हे यश मिळालं आहे.
- मालती गिरी, गॅरेज चालक, परभणी
- बाळासाहेब काळे.

Wednesday 20 September 2017

‘ती’च्या उमेदकथा

‘ती’च्या उमेदकथा - नवरात्रोत्सव विशेषविद्यार्थिनींची मासिक पाळी हा विषय शाळेतल्या शिक्षिका कसा हाताळतात ते समजून घेण्यासारखं असतं. अलिकडे औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातल्या गोळेगाव इथली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बघितली. तिथल्या शिक्षिका पिंकी सोनावणे भेटल्या. त्यांची कामावरची पकड चेहर्‍यावरूनच जाणवत होती. त्यांनी मासिक पाळी काळातल्या स्वच्छतेच्या व्यवस्थापनासंबंधीचं प्रशिक्षण घेतलं होतं.
प्रशिक्षणामुळे विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून गेल्याचं त्यांनी सांगितलं. युनिसेफच्या भारती सहलिया यांनी घेतलेल्या ट्रेनिंगमध्ये विद्यार्थिनींनी मासिक पाळी काळात स्वच्छता कशी राखावी आणि या नैसर्गिक क्रियेकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, कसा असावा यावर चर्चा झाली.
सोनावणेबाई प्रांजळ कबुली देत म्हणाल्या, “खरं तर मीच मासिक पाळीविषयी खरी माहिती प्रथमच घेत होते. मासिक पाळीविषयीच्या संभ्रमांपायी मीच बर्‍याचदा कामात, आत्मविश्वासात कमी पडले होते. ट्रेनिंगमध्ये या विषयावर उघड चर्चा झाली तेव्हा मलाही अवघडल्यासारखं झालं होतं. मात्र मासिक पाळीविषयीचे समज गैरसमज या विषयावर भारतीताई बोलू लागल्या तेव्हा चर्चेत रस येऊ लागला. एका वेगळ्याच विश्वासाने आतून उभारी घेतली.”
“याच गोष्टी वर्गात मुलींना सांगू लागले तेव्हा मुली अवघडल्यासारख्या झाल्या. मुलींना वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून खुलवून पाहिलं, तरी त्या बोलायला तयार होईनात. मग मी माझे स्वतःचे अनुभव, गैरसमज याविषयी चर्चा सुरू केली. त्यानंतर मुली हळूहळू तोंड उघडू लागल्या.”
“एकीने उठून सांगितलं, "बाई प्रियंका काल खोटं कारण सांगून शाळेतून मध्येच निघून गेली. तिला पाळी आली होती. " वर्गात हशा पिकला. मी मात्र गंभीर झाले. त्याचबरोबर खजीलही. खजील अशासाठी की आपण एक स्त्री शिक्षक असूनही आपण या मुलींचे प्रश्न समजून घेतले नाहीत. त्या वारंवार सुट्टी घेतात किंवा शाळेतून मध्येच निघून जातात याचं कारण समजून घेतलं नाही. आता मात्र तसं होऊ द्याच नाही असं ठरवलं. शाळेचे मुख्याध्यापक संजय वैष्णव यांनीही प्रोत्साहन दिलं.”
“आता वर्गात खूप फरक जाणवतोय. मुली जवळ आल्यात. त्यांचा विश्वास मी संपादन केला आहे. त्या घरातल्या गोष्टीही शेअर करू लागल्या आहेत. मुलींच्या अभ्यासातून त्यांचा वाढलेला आत्मविश्वास दिसू लागलाय. मुलींच्या सूप्त गुणांना प्रकाशात आणण्यासाठी मीही प्रयत्न करते आहे. मुली खुप खुश दिसतात. आता वर्गातील उपस्थितीही वाढली आहे.”
शरीर-मनाने सुदृढ स्त्रिया ही समाजाची गरज आहे. अशा स्त्रियाच निरोगी समाज तयार करतात. मासिक पाळीतून मनुष्य जन्मतो. त्यामुळे मासिक पाळी विषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायलाच हवा. त्यातच समाजाचं भलं आहे. पिंकी सोनावणे तेच काम करत आहेत.


- पिंकी सोनावणे, प्राथमिक शिक्षिका, गोळेगाव, जि औरंगाबाद
 - लता परब

Tuesday 19 September 2017

मला वंशाचा दिवा न म्हणता वंशाची उदबत्ती समजतात

प्रवास पालकत्वाचा:
‘प्रवास पालकत्वाचा’ या विषयावर लिहा.' असं जेव्हा नवी उमेदमधून सांगणं आलं तेव्हा मी दचकलो. पालक म्हणजे कुठली भाजी आहे का त्यावर विनोद करायला? पण जसाजसा मी यावर गंभीरपणे विचार करत गेलो तसं माझा पालकत्वाचा प्रवास अपेक्षित नसून माझ्या पालकांचा प्रवास अपेक्षित आहे हे लक्षात आलं. आणि मग ही आजोबा- बाबा- मी आणि माओ अशा आमच्या चार पिढ्यांची कहाणी उलगडत गेली.
भाग पहिला
माझे बाबा आणि मी, यांच्यात फक्त दिसण्यातच साम्य आहे. वटवृक्षाच्या छायेत इतर कुठली झाडं जगत नाहीत म्हणे, तसंच बाबांच्या छत्रछायेत मी नेहमीच खुरटत आलोय. तसं, आमच्या ब्रह्मे घराण्याचे कोणतेही दैवी गुण माझ्यात उतरलेले नाहीत हे बाबांनी लहानपणीच ओळखलं होतं. 'माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा अपेक्षाभंग' असं ते मला नेहमी म्हणायचे. माझ्यात ब्रह्मेंचे गुण इतके कमी दिसतात की बाबा मला वंशाचा दिवा न म्हणता वंशाची उदबत्ती समजतात.
माझं सगळं लहानपण तसं बऱ्यापैकी दुःखाकष्टात गेलं. फार पूर्वीच्या काळी कष्ट म्हणजे म्युनिसीपालटीच्या दिव्याखाली उपाशी राहून अभ्यास करणं वगैरे बाळबोध संकल्पना होत्या. हल्लीच्या पिढीत नेट कनेक्शन स्लो असणं, टॅब हँग होणं अशा काही परमदुःखाच्या व्याख्या आहेत. माझ्या बाबतीत असं काही नव्हतं. मला पाहताच बाबा दुःखी व्हायचे.
मी कुठंतरी हरवून जावा अशी त्यांची सुप्त इच्छा असावी. मी हरवावा यासाठी त्यांनी गल्लीतल्या छत्रीवाल्या रामासमोरच्या मारूतीला नवस बोललेला असं मी ऐकून आहे. 'उत्तम पुरुष केवळ दैवावर हवाला न ठेवता प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात.' या उक्तीला अनुसरून बाबा फक्त नवसावर अवलंबून न राहता आपल्या बाजूनं प्रयत्न करत असायचे. कधी मला सारसबागेत घेऊन गेले की आठवणीनं तिथं विसरून यायचे. एकदा माझ्या बदल्यात पिंजऱ्यातलं माकड घरी घेऊन गेले होते. मी त्यांच्यापाठोपाठ घरी पोचलो तेव्हा हातभर जीभ बाहेर काढून 'अरेच्चा! तू असा कसा परत आलास बुवा?' असं आश्चर्यानं म्हणाले होते. पोरं हमखास हरवणारे सिनेमातले कुंभ के मेले पाहून 'एकदा आपणही तिथं जाऊया' असा बाबांनी माझ्याकडं हट्ट केलेला आठवतोय.
शेजारच्या चंदूचे बाबा त्याला झाडावर चढायला शिकवायचे. बाबा मला ट्रान्सफॉर्मरच्या खांबावर चढायला उत्तेजन द्यायचे. निमाच्या बाबांनी तिच्यासाठी मुंबईहून छोटा कॅमेरा आणला होता तर बाबा माझ्यासाठी पिग्मी आदिवासींचे विषारी भाले कुठं मिळतात याची चौकशी करत होते.
माझ्या मित्रांचे आईवडील त्यांना सुट्टीला सांगली, नागपूर, मुंबई, नाशिक, इंदोर अशा गावी नेत; तर बाबा मला सुट्टीत टकमक टोक, हिरकणीचा कडा, ड्यूक्स नोज असल्या साहसी सुळक्यांवर नेत. तिथं गेल्यावरही उगाच 'जरा बघ रे तिथं वाकून.' असं मला सुचवत असायचे.
मी हरवलो आहे, वीसवीस वर्षं झाली तरी मी अजिबात सापडत नाहीय, आसेतूहिमाचल माझा शोध अखंड चालू आहे, पोलिस-खाजगी गुप्तहेर वगैरेंनी माझ्या शोधात हात टेकल्यानं आता इंटरपोल आणि मिलीटरी कमांडोंकडं ही शोधमोहीम दिली आहे, ते देशातलं घरनघर विंचरून काढतायत, माझ्या काळजीपोटी आईनं घरातली सगळी अंथरूण-पांघरुणं धरलीत, मला परत आणून देण्याच्या बक्षीसाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे अशा मुंगेरीलाल दिवास्वप्नात बाबा तासनतास रमून जात.
जेव्हा ते स्वप्नातून जागे व्हायचे तेव्हा मी त्यांच्या पायाशीच काही खुडबूड करत बसलेलो दिसलो की ते खट्टू होत. आणि नव्या जोमानं मला दूरच्या ठिकाणी घेऊन जात. पण दरवेळी मी मांजरासारखा त्यांच्याआधी घरी परत यायचो. माझं सगळं लहानपण घरची वाट धुंडाळण्यात गेलं.
माझा पालकत्वाचा प्रवास असा पालकांचं घर शोधत सुरु झाला.
 ज्युनियर ब्रह्मे

Monday 18 September 2017

पेशा डॉक्टरकीचा, छंद खडू शिल्पांचा



परभणीतील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ.देवानंद ओमणवार. स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करताना त्यांनी एकीकडे खडूशिल्प आणि चित्रकलेचा छंद जोपासला आहे. त्यासाठी त्यांचा दिनक्रमही अडथळा ठरत नाही, हे विशेष! हा छंद म्हणजे निखळ आनंद मिळविण्याचं एक माध्यम असल्याचं ते मानतात. चित्रकलेची आवड लहानपणापासूनची. त्यामुळे त्यांना व्यावसायिक दृष्टीकोनातून हा विषय अभ्यासायचा होता; परंतु वडिलांच्या आग्रहामुळे ते वैद्यकिय शिक्षणाकडे वळले. वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करताना संधी मिळेल तिथं त्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांची चुणूक दाखविली आणि कलेची उपासना सुरू ठेवली.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांच्या चित्राचं प्रदर्शन भरवलं होतं. डॉक्टरी पेशात असूनही ओमणवार यांनी निराळाच छंद जोपासला आहे, तो म्हणजे खडूची शिल्पे निर्माण करण्याचा! डॉक्टरी पेशामुळे त्यांचा संबंध खरंतर इंजेक्शनच्या सिरीज, औषधांच्या बाटल्यांशीच यायचा. तरीही कामातून रिकामा वेळ मिळाला की, ते आपल्या दवाखान्यात पांढरे किंवा रंगीत खडू घेवून शिल्प बनविण्यात मग्ना होतात.
मागील बारा वर्षात त्यांनी शंभराहून अधिक खडूशिल्पे तयार केली आहेत. एका मित्राने भेट दिलेल्या डेन्टलच्या अवजारांपासून ते खडू कोरतात. यासाठी निडल्सचा वापर ते कल्पकतेने करतात. प्रत्येक छंदाचं एक वैशिष्टय असतं. त्यामागे निरीक्षण आणि कष्टही असतात. डॉ. रेवणवार नावाच्या मित्राने त्यांना कार्व्हिंग सेट भेट दिला. डॉ.ओमणवार यांनी त्यातील सुईला स्टॅन्ड बनवून घेतला आणि अधिक प्रभावीपणे खडू कोरण्याचं काम सुरू झालं. डॉ.ओमणवार सांगतात, “अल्कॉन, केल्पार्क खडू कोरायला सोपे जातात. त्यामध्ये वाळू नसते. कोरताना हा खडू तुटत नाही. या कामासाठी लागणारे लाल, निळ्या, पांढर्या. रंगाचे खडू खास मुंबईहून मागवावे लागतात. लहानपणापासून चित्रकला चांगली असल्यामुळेच असेल; पण एखादा खडू हातात घेतला की, मला त्यात ठराविक आकृती दिसू लागते. त्यानुसार मी खडूवर कोरण्यास सुरूवात करतो आणि मग साकारू लागतात निरनिराळे शिल्पे.”
ओमणवार यांनी एका खडूपासून धन्वंतरी देवतेचे दोन हात, दुसर्याा खडूपासून दोन हात आणि तिसर्याय खडूपासून शरीर कोरलं आहे. तसंच उंदरावर बसलेला गणपती बनवला आहे. अखंड खडू कोरून कोठेही छेद न देता, तुकडा न जोडता 4, 5 व 6 काड्यांची साखळीही त्यांनी कोरली आहे. हे शिल्प बनविताना 13 खडू तुटले तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही.
खडूवरंच कोरीव काम करायला वेळ कसा मिळतो असं विचारल्यावर डॉक्टर म्हणाले, “इच्छा असली की वेळ मिळतो. एखाद्या महिलेची सिझेरियन शस्त्रक्रिया करताना लागणारा शार्पनेस व अचुकता खडू कोरण्याच्या छंदातून मिळते”.
डॉ.ओमणवार यांनी साकारलेल्या खडूशिल्पांमध्ये साप, मगर, बेडूक, नंदीबैल, ससा आदी प्राण्यांसह अखंड बांगड्या, समई, लाकूडतोड्या, विविध मॉडेल्सचा समावेश आहे. श्री शिवाजी महाराज, भगवान शंकर, साईबाबा, डॉ. मनमोहनसिंग, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन या विभूतीबरोबरच इस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभुपाद यांची रेखीव व सुंदर खडूशिल्पे त्यांनी तयार केली आहेत. हनुमान, दुर्गामाता, नृसिंह, धनुष्यबाण हाती घेतलेला अर्जुन, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, श्रीकृष्ण, गजानन महाराज अशी असंख्य खडूशिल्पे डॉक्टरांनी बनविली आहेत. खडूंची प्रकृती पाहून त्याला रूपसौष्ठव देत रहायचं आणि मूड असेल तसं काम करायचं, हा मंत्रच त्यांनी जपला आहे.
वेळ नाही म्हणून आपण आपल्या अनेक आवडी बाजूला ठेवत असतो. आवडीच्या गोष्टीसाठी सवड काढायची ठरवली तर नक्कीच मिळते, हीच गोष्ट डॉ.देवानंद ओमणवार आपल्या कृतीतून सांगत आहेत.

- बाळासाहेब काळे.

Sunday 17 September 2017

‘तिरकीटधा’नं घडवलं



उस्मानाबाद जिल्हा. उमरगा तालुका. इथलं कराळी गाव. इथले तबलावादक खंडेराव मुळे. अभंग, भावगीत, गवळण, भारूड, भक्तीगीत, आंबेडकरी गीते - कुठल्याही गाण्याचा कार्यक्रमाला खंडेराव मुळेंची तबलासाथ उल्लेखनीय असते. मुळे दोन्ही डोळ्यांनी अंध. त्यामुळे ते तबला वाजवायला कसं, कुठं शिकले असतील असा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्यांची तबला वादनाची सुरुवातच रंजक आणि रोचक वातावरणात झाली.
मुळे यांचं लहानपण कराळीत गेलं. तिथं शेजारी राहणाऱ्या एकनाथ पांचाळ यांच्या घरी नेहमी भजनाचा कार्यक्रम व्हायचा. मुळे यांनी पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संप्रदायाचा मार्ग धरला. पांचाळ यांच्या हाताखाली मुळे तयार होऊ लागले. आता तबल्यातल्या पुढच्या शिक्षणाचे त्यांना वेध लागले. त्यासाठी लातूरच्या पंडित शांताराम चिगरी यांच्याकडे जायचं ठरलं. इथून पुढं मात्र मुळे यांना अनंत अडचणीना तोंड द्यावं लागलं. कारण लातूरला जायचं तर बसचा प्रवास. दोन वर्षे त्यांनी रोज हा प्रवास केला तर दोन वर्ष लातूरलाच घर केलं. या धडपडीचं फळही त्यांना तबला अलंकार या पदवीतून मिळालं. निव्वळ तबल्यातच नाही तर गायन कलेतही त्यांनी संगीत विशारद पदवी मिळवली. 




तबल्याची साथ, हार्मोनियमचे स्वर आणि सुरेख आवाज हा मुळे यांच्या कार्यक्रमाचा युएसपी. मुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘भीम निळाईच्या पार’, हा कार्यक्रम महाराष्ट्रात १०० ठिकाणी सादर केला. तसंच ‘आपलं घर’ या नळदुर्ग संस्थेतील मुलांसाठी राज्यभर ‘तारे समानतेचे’, हा गाण्याचा कार्यक्रम सादर केला. त्यातून मिळालेला निधी संस्थेतील मुलांसाठी देण्यात आला. मुळे यांनी सध्या उस्मानाबाद येथे संगीत अॅकॅडमी सुरू केली असून, ते नव्या मुला-मुलींना संगीताचे धडे देत आहेत. मुळे सांगतात, “सामान्य कुटुंबातील व्यक्ती असूनही संगीतामध्ये मानसन्मान मिळाला. नवीन पिढीने या क्षेत्राकडे वळायला हवं. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये संगीतात प्रावीण्य मिळविलेल्या व्यक्तीला मान-सन्मान मिळतो. मला संगीतामुळे सामाजिक प्रतिष्ठा मिळाली”. 


- चंद्रसेन देशमुख.

Friday 15 September 2017

पाव्हणं ऐकता का, मला आत्ताच लगीन न्हाय कराचं!

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :
ही गोष्ट आहे २०१५ सालातली, आठवीत शिकणाऱ्या कोमलची. जालना जिल्ह्यातलं रोहणेवाडी या छोट्या गावातली ही घटना. कोमलसाठी नातेवाईकांनी स्थळ आणलं. “पोरींचं बाशिंगबळ जड असतंया. दाखवून तरी देवूयात एकडाव पाव्हण्यांना!” असं म्हणत ‘मुलगी दाखविण्याचा’ कार्यक्रम ठरला. आठवीतल्या कोमलला जबरदस्तीने साडी नेसवली गेली आणि पाहुण्यांसमोर तिला नेऊन उभं केलं गेलं.
आठवीची पोर, पुरती बावचळून गेली. नमस्कार- चमत्कार झाल्यावर ‘तुझं नाव काय? कितवीत शिकते?’ असे प्रश्न विचारले गेले आणि कोमलला कंठ फुटला ” माझं नाव कोमल हाए आणि मला तुमच्याशी लगीन कराचंच नाय” आजूबाजूच्या मोठ्यांनी तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला, पण कोमलनी कुणालाही जुमानलं नाही, “मी अजून लहान हाए, आणि आठवीत शिकते. मला इतक्यात सौंसार करायचा न्हाय, मला साळा शिकायची हाय. इतक्या ल्हान वयात लगीन करू नगा. पुढं पोरीचं आणि जल्माला येणाऱ्या बाळाचं लई लुकसान होतं असं आमच्या मीना- राजू मंचात शिकवत्यात. मी माय- बापाला लई येळा सांगितलं, तरीबी ऐकनांत. पाव्हणं ऐकता का, मला आत्ताच लगीन न्हाई कराचं!!”

आणि महत्त्वाचं म्हणजे पाहायला आलेल्या पाहुण्यांना आणि कोमलच्या आई- वडिलांना त्यांची चूक उमजली. मुलीला शिकण्याची इच्छा आहे आणि एवढ्या लहान वयात तिचं लग्न करणं चुकीचं आहे, हे तिच्या अशिक्षित आई- वडिलांनाही कळलं. आता कोमल नववीत शिकतेय आणि शिक्षिका होण्याचं तिचं स्वप्न आहे.
कोमल एकटीच निडर झालीये असं नाही, तर तिच्या वर्गमैत्रिणी आता पूर्वीसारख्या लाजऱ्या आणि अबोल राहिलेल्या नाहीत. उदाहरणार्थ- कोमलच्या शाळेत आजूबाजूच्या गावातूनही काही मुली येतात. त्यांना भरपूर चालून तसेच एसटीने शाळेला यावं लागतं. या प्रवासादरम्यान एका मुलीची त्यांच्याच शाळेतला एक मुलगा छेड काढत होता. ती मुलगी बिचारी घाबरून गेली होती, तिला शाळेतही यायची भीती वाटू लागली. त्यावेळी कोमलने आणि तिच्या वर्गमैत्रिणींनी त्या मुलीला आधार दिला. ‘आम्ही तुझ्यासोबत येतो आणि त्याला बरोबर धडा शिकवतो’ असा मैत्रिणींनी चंग बांधला. ज्या मुलीची छेड काढली जात होती तिच्यासोबत मुली बसस्टँडपर्यंत जायच्या आणि एकेदिवशी त्यांनी त्या मुलाला बसस्टँडवरच जाब विचारला. शिवाय त्याचं नाव, पत्ता याची माहिती काढून शिक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवली. मग शिक्षकांनी मुलाच्या पालकांना बोलावून समज दिली. अशाप्रकारे एका विद्यार्थिनीचं शिक्षण चालूच राहिलं.
रोहणेवाडी प्रथा-परंपरा पाळणारं, मुलालाच वंशाचा दिवा मानणारं आणि मुलीच्या जन्मापासून तिच्या लग्नाची काळजी करणारं गाव. हुंड्याची प्रथा कागदोपत्री दिसत नसली तरी इथं ती आवर्जून पाळली जाते आणि मग आई- बाप कमी हुंड्यात लग्न ठरलं तर मुलीच्या वयाचा विचार न करता तिचं लग्न लावून देतात. जालना जिल्ह्यातला मुलींचा जन्मदर 1000 मुलग्यांमागे 937 मुली इतका कमी. त्यामुळे लहानवयातच मुलीचं लग्न होणं, ही तशी सर्रास आढळणारी गोष्ट. स्वतःच धीट होतं आपल्या लग्नाचा चाललेला प्रयत्न एकहाती उधळून लावला, हे खरंतर कौतुकास्पदच. 


- स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

Thursday 14 September 2017

कुरुंजीतलं गमभन




तीन वर्षांपूर्वी कुरुंजी नावाचं गाव या जगात आहे हे ही माहीत नव्हतं. कुरुंजीला मी योगायोगानेच पोचले. आधीची संस्था सोडल्यावर वेगळ्या पद्धतीची शाळा एखाद्या खेड्यात सुरू करणे हे उद्दि्ष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही लोकांपर्यंत पोचत होतो. प्रीती भंडारी या मैत्रिणीने तिच्या कुरुंजीच्या जागेबद्दल सांगितले. तिला ही वेगळ्या पद्धतीच्या शाळेत रस होता. ती जागा द्यायला तयार होती.
यासाठी गावात आम्ही एक मीटिंग घेतली. पण गावकऱ्यांचं म्हणणं वेगळं पडलं. गावाला लागून एक सरकारी आश्रमशाळा आहे. गावातली मुलं पण इथेच जातात. गावकरी म्हणाले, तुम्ही इथं शाळा सुरू केली तर आमच्या गावातल्या आश्रमशाळेवर परिणाम होईल. तुम्हाला जे काम करायचे ते तुम्ही आमच्या आश्रमशाळेत करा. आम्ही होकार दिला.
दरम्यान गावात एक लहान घर भाड्यानं घेतलं होतं. मी गुरुवारी / शुक्रवारी सकाळी पुण्याहून सरळ आश्रमशाळेत जात असे. तिथून मग कुरुंजीतल्या घरी राहून शनिवारी संध्याकाळी परतत असे. शाळेत वेगवेगळ्या वर्गांबरोबर काही उपक्रम करत असे. चित्रकला, मुक्त खेळ वगैरे.
शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी सकाळची शाळा सुटल्यानंतर मी मुलांबरोबर चालत घरी येत असे. अशा प्रकारे गावातल्या मुलांबरोबर ओळख झाली आणि माझं कुरुंजीचं घर हे गावातल्या मुलांचं हक्काचं ठिकाण झालंय. मी गावात असताना एखादं मूल बराच वेळ घरी आलं नाही तर आईवडील इथंच बघायला येतात.
कुरुंजी हे भोरपासून 40 किमीवर असलेले एक चिमुकले गाव. ऑफिशियली लोकसंख्या हजाराच्या वर असली तरी बरीच मंडळी पुण्या मुंबईत राहतात. आता राहणारी साठेक कुटुंबं आहेत. भरपूर पाऊस, भाटघर धरणाचं पाणी गावामागे असल्यामुळे निसर्गसंपन्न ठिकाण आहे. जवळपास काही उद्योग धंदे वगैरे नसल्यामुळे खूपच शांत भाग आहे. दिवसातून तीन चारदा बस येते. बाकी खाजगी जीप क्वचित. एकप्रकारचा संथपणा आहे. पावसात भात लावला जातो. दुसरे पीक नाही. सगळी कुटुंबं एकमेकांशी नात्यानं जोडलेली आहेत. त्यामुळं एक community चा फील येतो. हरिजन वस्ती वेगळी आहे. पण तसं येणं जाणं दिसतं एकमेकांकडे.
याआधी मी वीस वर्षे सामाजिक संस्थेत काम केलं होतं. पण यात गावाचा सततचा संपर्क नसे. एक तर ग्रामीण कार्यालय गावाबाहेर स्वतंत्र वेगळं होतं, दुसरं म्हणजे मीटिंग इ.साठी थोडा वेळ गावात जाऊन पुन्हा संस्थेच्या कार्यालयातच आम्ही बसत असू.
इतकी वर्षे काम करूनही गावातले लोक नक्की कसे राहतात, त्यांचं समाजजीवन, त्यांच्या चालीरीती, समजुती याबद्दल प्रत्यक्ष अनुभव नव्हता. त्यामुळे नवीन काम सुरू करण्याआधी आपण ज्या लोकांबरोबर, ज्या परिस्थितीत, वातावरणात काम करणार आहोत ते स्वतः राहून समजावून घेणे गरजेचे वाटले.
या राहण्याला दुसरेही जास्त महत्त्वाचे कारण आहे. Existential Knowledge Foundation या आमच्या संस्थेत आम्ही ‘शिकणे’ learning या विषयावर काम करतो. माणसाचं मूल किंवा कोणताही सजीव जन्मल्यापासून शिकतच असतो. कारण जगण्यासाठी ती अत्यावश्यक गोष्ट आहे. सभोवतालची परिस्थिती, माणसं मुलाच्या शिकण्यावर प्रभाव पाडत असतात. जगण्यासाठी आवश्यक skills मूल असं अनुभवातूनच शिकतं, आत्मसात करतं. मुलाला जेवढं मोकळं अवकाश मिळेल तेवढं ते बहरून येतं. पण शिक्षण फक्त शाळेशीच निगडित केल्यामुळे विशेषतः शहरात मुलांच्या सहज शिक्षणाचा संकोच होतोय.
ग्रामीण भागात मुलांना बरीच मोकळीक असते. त्यांच्या भोवती शेती, पशुपालन अशा बऱ्याच प्रक्रिया चालू असतात आणि मुलांचा त्यात अर्थपूर्ण सहभाग असतो.
त्यामुळे खेडयात राहून तिथे सहज शिकणे ( natural learning) कसे होत असते, निसर्गाला धरून कसे जगणे चालू असते, traditional wisdom वर कसा भर आहे या सगळ्या गोष्टींचे निरीक्षण करणे, प्रत्यक्ष तिथे राहून
समजून घेणे हा उद्देश्य इथे राहण्यामागे आहे.
हे समजून घेण्यासाठी लागेल तेवढा वेळ द्यायची मी तयारी ठेवली आहे. खरं तर हे माझ्यासाठी एक निरंतर शिकणे आहे. त्यामुळे निरीक्षण आणि अनुभव यातूनच मला गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आधीच्या सगळ्या समजुती, वाचनामुळे मिळालेली माहिती या सगळया गोष्टी मागे टाकून माझा मित्र जिनन म्हणतो तसं, I dont know , मला काहीच माहीत नाही अशी कोरी पाटी घेऊन मी इथं आले आहे. त्यामुळं सगळं आकलन नवीन असेल आणि first hand knowledge, मी स्वतः समजून घेतलेलं असेल.
यासाठीच प्रश्नावली, मुलाखती अश्या कृत्रिम पद्धती न स्वीकारता मी सहज पद्धतीने होणाऱ्या वेगवेगळ्या लोकांशी गप्पा, भेटी आणि निरीक्षणे यातूनच माझे शिकणे चालू राहील.
- रंजना बाजी

Monday 11 September 2017

लतीफकाकांची पुस्तकलेणी

लतीफकाकांच्या मुला-नातवंडांनी भरलेल्या घरातच चक्क 30 हजार पुस्तकांनी भरलेली कपाटं आणि 3 खोल्या बघून अबब व्हायला होतं. प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जायचं आणि त्यासाठी स्वतःच अभ्यास करायची काकांची सवय. त्या त्या विषयातली पुस्तकंच त्यांचे मार्गदर्शक! काकांच्या या स्वयंअध्ययन आणि अचूकतेच्या ध्यासातूनच ही वैयक्तिक लायब्ररी निर्माण झालीय. अगदी पाळीव प्राणी, पक्षी पाळावेसे वाटले तरी त्याची पूर्ण माहिती घेऊन मग ते कृती करतात. मराठी, हिंदी, इंग्रजी सोबतच फार्सी, अरबी, उर्दू, अशा अनेकविध भाषेतली शैक्षणिक आणि इतर विषयांची अशी प्राथमिक ते अगदी पदवीपर्यंतची सर्व पुस्तके त्यांच्याकडे आहेत. शिवाय माहिती, तंत्रज्ञान, विज्ञान, महिला, लहान मुलं, त्यांचे विविध प्रश्न, आरोग्य, कलाकुसर, अन्न पदार्थ तसेच विविध गोष्टी बनवायला शिकणे अशा अनेक शिकायच्या गोष्टींचा मोठा आणि तो ही सिरीजमध्ये असा संग्रह काकांनी मेहनतीतून निर्माण केलाय. 




लतीफकाका औरंगाबादमधल्या टाइम्स कॉलोनीत राहतात. पाटबंधारे विभागातून कार्यकारी अभियंता या पदावरून काका निवृत्त झाले आहेत. आज काकांच्या खाजगी ग्रंथालयात साधारणपणे 400 ते 500 वेगवेगळ्या विषयांची प्रत्येकी 50 ते 100 पुस्तके जमा केली आहेत. शिवाय 7,8 भाषांच्या डिक्शनरी, एनसायक्लोपेडियांनी काकांची कपाटे भरलेली आहेत. धार्मिक ग्रंथांचं एक खास दालनच आहे काकांचं.
काही खास दैनिकं, साप्ताहिकं पाक्षिकं, मासिकं ही वर्षानुसार बाईंडिंग करून काकांनी जतन केलेली आहेत. नॅशनल जिओग्राफी मासिकांचे 1967 पासूनचे सर्व अंक इथे सापडतील. आणखी म्हणजे अनेक पेन, पेन्सिली, खोडरबर, जुने कंदील, जुन्या काही वस्तू अशा अनेक गोष्टी काकांच्या संग्रही आहेत.
आता काकांनी पंचाहत्तरी ओलांडलेली आहे. तरीही ते स्वतःच या पुस्तकांची, ग्रंथालयाची देखभाल करतात. पुस्तक खरेदीसाठी भारतात ते अनेक ठिकाणी फिरले आहेत. आणि या सर्वासाठी ते दर महिन्याला 5 हजार रुपये खर्च करतात. 





आपल्या कामात सतत व्यग्र असणारे आणि मितभाषी लतीफकाका डायरीतून मात्र बोलके होतात. 1962 पासून लिहिलेल्या त्यांच्या सर्व डायऱ्या पुस्तकासारख्याच आहेत. काकांचे चिराग-ए-अब्दी हे एक पुस्तकही प्रकाशित झालंय. काका गरजू मुलांसाठी अरबी आणि उर्दूचे क्लासेसही घेतात. 





या संग्रहातली किमान 25 हजार पुस्तकं काकांनी वाचली आहेत. साधारण परिस्थितीतून ही पुस्तकांच्या सोबतीने माणसं कशी मोठी होतात हा आशावाद काका लायब्ररीत येणाऱ्या सर्वांना देतात. आपल्या या कामाचा फारसा गाजावाजा करायला काका तयार नव्हते पण त्यांच्या दिवंगत पत्नी आयेशा यांच्या स्मृतीत हे ग्रंथालय सर्वांना खुलं करण्याच्या विचारात काका आता आहेत. औरंगाबादच्या वाचकांना ते लवकरच उपलब्ध होईल. लेण्यांमधून विविध संस्कृतींचा वारसा आपल्यापर्यंत पोहोचतो तशीच ही लतीफकाकांची पुस्तकलेणी सर्वधर्म समभाव आणि सर्व शिक्षेचा वारसा देतील. जिज्ञासू वृत्तीतून एक सामान्य माणूस वैयक्तिक पातळीवर असा मोठा पुस्तक संग्रह बनवतो. आणि गरजूना ते ग्रंथालय विनामूल्य उपलब्ध करून देतो हे आगळं उदाहरण ठरावं. 


- गीतांजली रणशूर, पुणे.

Sunday 10 September 2017

सोनाकाकीची जिद्द खरी, कमनशिबावर मात करी



सोनाकाकी. वय ७५. चेहरा थकलाय आणि हाताला थोडासा कंप सुटतो. पण तरीही काकीची जिद्द काही कमी नाही झालेली. मी समोर बसून प्रश्न विचारतो, "काय काय कामं केली काकी आयुष्यात?" किंचित हसून काकी मिश्किलपणे म्हणते, "चोरी न शिंदळकी सोडून बाकी सारं केलं बापा मी आयुष्यात."
काकीचा नवरा अपंग. नांगर हाणला; पाळी, कोळपन, पेरणी सगळं काकी एकटी करायची. पुढं काकीच्या हाती मोटारसायकल आली. मोटरसायकल चालवत ती डेअरीला दूध टाकायला जायची. काकीनं मळणीयंत्र, ट्रॅक्टर चालवला. ती अडाणी असूनही कशातच मागे नाही राहिली.




पण या जिद्दी सोनाकाकीच्या आयुष्याची कहाणी म्हणावी तितकी सोपी नाही. माहेर औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील पिपरगाव. ती थोडी वयात आली आणि गरिबीला वैतागलेल्या तिच्या बापाने तिचं लाखेगावतल्या गुलचंद चुंगडे यांच्याशी लग्न लावून दिलं. इथं मात्र काकीची घोर फसवणूक झाली होती. नवऱ्याची पहिली बायको जळून मेली तेव्हा तिला वाचवताना गुलचंद यांचा कमरेखालचा सगळाच भाग जळून गेला होता. नवरा अपंग झालेला.





नवरा अंथरणाला खिळून असायचा. अन काकी..! भर उन्हाळ्यात वरून सूर्य आग ओकत असताना, तापलेल्या मातीत वखर हणायची, भर पावसात एकटीनं पेरणी करायची, आणि भर थंडीत रात्री पिकाला पाणी द्यायची. भुताखेताची भीती तर तिनं केव्हाच फेकून दिली होती. मळणी झाल्यानंतर काकी स्वतः पोतं उचलून गाडीत भरायची, घेऊन यायची. काकीनं एकटीच्या जिद्दीवर शेतात 30 फूट खोल विहीरही खोदली.
संसाराचा गाडा ओढता ओढता काकीने आता या घराला सोन्याचे दिवस आणलेत. घरी किराणा दुकान आहे. दत्तक घेतलेल्या मुलासाठी मोटारसायकल आहे. शेतात भरभक्कम कडं टाकलेली विहीर आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत शेतीची अवजारं काकीच्या कोठारात आहेत. कधीकाळी बैलगाडीत बसून कासरा ओढणारी ही बाई आता नव्या यंत्रांचे ब्रेकही तितक्याच सहजतेने दाबते.
सोनाकाकीची जिद्द आणि संघर्ष सर्वांनाच प्रेरक ठरो.

- दत्ता कानवटे.

तुझे- माझे वेगळे l कसे चक्र घड्याळाचे?


सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :
नंदुरबार जिल्हा. नवापूर तालुक्यातलं वडसत्रा नावाचं छोटं खेडं. इथल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी ‘मीना-राजू मंचा’चा एक उपक्रम घेतला. नाव होतं ‘घड्याळाचं चक्र’. यात शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना कार्डबोर्डचं घड्याळ रंगवायला दिलं जातं. सकाळी उठल्यापासून तुम्ही काय काय करता? खेळ, जेवण, झोप, अभ्यास, टीव्ही पाहणे, घरातली कामं, भांडी घासणे, स्वयंपाकात मदत अशा कामांना किती वेळ देता ते वेगवेगळ्या रंगाने रंगवायचं असतं.
अर्थातच मुलग्यांच्या घडयाळात खेळ, झोप, टीव्ही पाहणे या गोष्टी जास्त रंगवल्या गेल्या. तुलनेने मुलींच्या घड्याळात घरातली कामं, भांडी घासणं, भावंडांना सांभाळणं या बाबी ठळकपणे दिसून आल्या. यातून मुलग्यांना आपोआपच समजलं की, आपण ज्या वेळात खेळ आणि मस्ती करत असतो, त्याच वेळात आपल्याच वयाच्या मुली मात्र घरची कामं करत असतात. म्हणजेच ‘घड्याळाचे चक्र’ उपक्रमाचा चांगला परिणाम दिसून आला. आपणही आपल्या घरातल्या आई- आजी आणि बहिणीला मदत केली पाहिजे, याची जाणीव त्यांना शिकविणाऱ्या सुगमकर्त्यांनी, म्हणजेच ‘मीना- राजू मंचा’चे सत्र घेणाऱ्या शिक्षकांनी या उपक्रमाद्वारे करून दिली.

मुला- मुलींशी चर्चा केली. आम्हांलाही खेळायला आवडतं, पण घरातल्या कामांमुळे बाहेर जाता येत नाही. अनेकदा कामाच्या ताणामुळे अभ्यासालाही पुरेसा वेळ मिळत नाही अशी तक्रार अनेक मुलींनी केली. याउलट मुलांचा वेळ टिव्ही आणि खेळ यात जात होता. सुगमकर्त्याने मुलांशी बोलता- बोलता ‘आई सगळ्यांच्या आधी उठते, सगळ्यांसाठी जेवण बनविते, पाणी भरते, डबे भरते आणि सर्वांची कामं करून रात्री सगळ्यात उशीरा झोपते’ या वास्तवाची जाणीवही मुलांना करून दिली. यामुळे मुलगे अंतर्मुख झाले. आई, आजी अथवा बहिणीला त्यांनी घरकामात मदत करायचं वचन दिलं.
आता नंदुरबार जिल्ह्यात वडसत्रा गावातले मुलगे महिलांना घरकामात मदत करू लागले आहेत. शिवाय बहिणींना सांगितलेली कामं ते स्वत: अंगावर घेऊन बहिणीला अभ्यास आणि खेळण्यासाठी प्रोत्साहन देतात. इतकंच नव्हे तर आळशीपणा करणाऱ्या वडील अथवा आजोबांनाही कामात मदत करण्याची विनंती करतात. गावातल्या महिला या बदलाबद्दल ‘मीना राजू मंचा’चे आभार मानतात.
घड्याळाचे चक्र’‘ या अनोख्या उपक्रमाबरोबरच इतर उपक्रमांबद्दलही जाणण्यासाठी वाचा
लेखन: स्नेहल बनसोडे- शेलुडकर

Thursday 7 September 2017

ठळकपणाच्या पलीकडचा प्रदेश

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी :
- तर मग असं आहे की निरोपाची वेळ आलीय. तात्पुरत्या का होईना! तसे निरोप असल्याशिवाय पुनर्भेटीची मजा नाही, नाही का?
गेले चौदा आठवडे आपण भेटतोय. इतक्या सलग मी आजवर फेसबुकवर कधीच लिहिलं नव्हतं नि इतक्या प्रतिसादाची अपेक्षा तर बिलकुलच केलेली नव्हती. ‘नवी उमेद’चं यात श्रेय मोठंय. खूप नव्या माणसांशी ‘नवी उमेद’नं मला जोडून दिलं नि खरंच नवा उत्साह दिला. जगण्यातल्या माझ्या छोट्याछोट्या अनुभवांना नि सापडलेल्या इटुकल्या युक्त्यांना समजून घेत माणसं बोलती झाली. शारीरिक अपंगत्त्वापलीकडे नि टिपिकल ‘प्रेरणादायक’ कॅटेगरीतून मुक्त अशी माणसं पाहायला लावावीत, त्यांचे प्रश्न कळावेत हा ही माझा इथं प्रयत्न राहिला. तो वाचकांनी बर्‍यापैकी समजून घेतला. नुसतंच भारावून जाण्यापेक्षा माणसं कृतीशील झाली तर बदल होणारच आहेत, फक्त भावुकतेच्या वेष्टणातून त्यांना बाहेर काढण्याचं काम चालूच राहायला हवं, सारखे एकमेकांना चिमटे काढत जाग ठेवायला हवी हे जाणवलं. माझ्या मैत्रिणीनं, रेणुकानं बोलता बोलता मला सांगितलेलं की बघ ना गं, आपल्याला वाटत होतं, फेसबुक हे व्हर्च्युअल माध्यम आहे... जगण्यापासून एका विशिष्ट अंतरावर राहणारं...तसं आता उरलेलं नाही. माणसांना खर्‍याखुर्‍या जगण्यासाठी मदत करणारी सिस्टीम इथं उभी राहते, व्यवस्थांना या भिंतींवर लिहिलेल्या मजकुराची दखल घ्यावी लागते नि बदल होतात. मळभ फिटतं. आता पूर्वीसारखं व्हर्च्युअल म्हणता येणार नाही या माध्यमाला! - या तिच्या म्हणण्याची प्रचिती मला आलीच! नवी उमेद टीम तर हा अनुभव रोज घेतेय...
तरीही मित्रांबरोबर याच्या उलटही चर्चा झाली.
- म्हणजे असं की फेसबुकवरच्या माणसांशी मैत्री होऊन काही तुरळक भेटी झाल्या तेव्हा ती माणसं सहजसाधी, कुठल्याही आविर्भावाविरहित भेटली होती. गप्पा झाल्या होत्या. आचरट विनोद शेअर झाले होते. समजुतींचे कसलेही घोटाळे उद्भवले नव्हते. पण फेसबुकवर जेव्हा यापैकी काहींच्यात बारकीसारकी हमरीतुमरी, चकमक किंवा स्फोटक युद्धं घडली तेव्हा धक्का बसलेला की हे असं कसं सगळं? आपल्याला कळलंच नव्हतं की काय? जी माणसं आत्ता आपल्यासमोर पेटलीहेत ती प्रत्यक्षात आपल्याला नि एकमेकांनाही किती छान भेटली होती नि वागली होती! रामायण-महाभारतात जसं दोन वीर लढताना सेकंदभर दिसायचे नि नंतर त्यांची ती चमत्कारिक अस्त्रंशस्त्रं ऊन-पाऊस, आग-वारा, साप-मुंगूस खेळायची तेव्हा ते वीर गायब होऊन त्या अस्त्रांच्या चमत्कारांनी भ्रमायला व्हायचं... फेसबुकवरच्या युद्धातही माणसं मागं सरली जाऊन त्यांचे इगो, बरेवाईट मुद्दे, मुद्दे बाजूला ठेवून झडलेली मतांतरं वगैरेंनी डोकं जडावून गेलं काही काळ. - या सगळ्यात आपल्याला नेमकं काय वाटतंय नि जे वाटतंय ते या माणसांच्या पलीकडे नेता येऊन ‘योग्य कृती’ घडतेय का आपल्याकडून याचं निरिक्षण करत राहाणं रोचक होत गेलं. कळलं की फेसबुकसारखं डिजिटल माध्यमही माणसाळलंय. तेही माणसांसारखाच अंदाज देत नाही. त्याला गृहित धरता येत नाही. अखेर फेसबुक जिवंत आहे ते माणसांमुळेच! या प्लॅटफॉर्मवर नवी नाती सापडतात, घडतात तशी ती जगण्याची अक्कलही दोन ठोके देऊन शिकवून जातात. दुधारी इथंही. तेव्हा त्या भिंतीपलीकडे जातानाही सावध व प्रत्यक्ष भेटल्यावर पुन्हा भिंतीतून आजमावतानाही सावध असावं हे बरं. दिसतं त्या पलीकडं खूपच उरतं! नकारात्मकही नि सकारात्मकही.
माझे डॉक्टर अजित कुलकर्णी. कुठल्याही अतिरेकी भावनावेगाला निरूत्तर करून टाकणारे. एका जवळच्या पेशंटविषयी विचारायला मी त्यांना फोन केलेला. विचारायला म्हणण्यापेक्षा, मनातलं पोहोचवण्यासाठी की तुम्हाला वाटतंय की प्रयत्न करावेत, पण अशा स्थितीत भाजीपाल्यासारखं जगणं किती कठीण आहे नि त्यापेक्षा मृत्यू स्वीकारार्ह! - तर डॉ.कुलकर्णी म्हणाले होते, ‘‘हे बघा, एखाद्या शरीरात ९९% सगळं निगेटिव्ह आहे नि १% कुठंतरी प्रयत्नाला दाद मिळेल असं वाटतं तर मी त्या एका टक्क्याकडेच जाणार नि तुम्हालाही सांगतो की तिकडं बघण्यातली एकाग्रता ९९ भाग वाईटाच्या पेक्षा स्थिती जास्त सुसह्य करते. आपले रेडिओलॉजिस्ट डॉ.संतोष सरूडकर यांचं ‘डायग्नॉसिस’ मला फार आवडतं. दिसणार नाही अशी गोष्ट त्यांना तत्काळ दिसते. ते खोलात शिरून अवगत झालेलं कौशल्य आहे. पण आता ‘आम्ही’ जे ठळक दिसतंय त्यापेक्षा जे दिसत नाही ते हुडकण्याच्या स्टेजला आलेलो आहोत. असंख्य अडचणी ठळक दिसणं-वेळेआधी कळणं हा म्हटलं तर प्लस पॉईंट आहे. पण ते कळतंय हे तुमच्या अनुभवावरून नि त्यामुळे आलेल्या वकुबामुळे! ते आलेलं आहे, तर आता जे आलेलं नाही त्या न दिसणार्‍या भागाकडे पाहायला शिकलं तर कदाचित नवा प्रदेश कळेल, चांगल्या शक्यतांचा. तुम्ही व्हीलचेअरवर आहात हे सत्य आहे, ते कळलं आहे. आम्ही तुम्हाला बघताना तुमची व्हीलचेअर आमच्या लक्षात येत नाही... पण तुम्हीही ती विसरला आहात ना?’’
कुठच्याही ठळक गोष्टींपलीकडं जो प्रदेश उरतो त्याची लांबी, रूंदी, खोली नि घनता ठाऊक नाही... ठाऊक नाही म्हणून उत्सुकता नि भीती आहे ... तरीही, तिकडं जायला लागण्यानं बरं नि खरं वाटणारे.
- सोनाली नवांगुळ