Sunday 24 September 2017

दोघंही अनाथ, पण त्यांच्यासाठी सरसावले अनेक हात, दोन जीवांचा विवाहसोहळा..

ते दोघं अनाथ. ना नाव, ना गाव. ना आई, ना वडील. पण, त्यांच्यासाठी कुणी मुलीचे तर कुणी मुलाचे मामा बनून पाठीशी उभे राहिले. पुरोहिताने शुभमंगल सावधान, म्हणताच शेकडो हातांनी त्यांना शुभाशिर्वाद दिले आणि या अनाथ दांपत्याचा विवाह सोहळा संपन्न झाला. 



उस्मानाबाद शहरालगतच्या खेडपाटीजवळील स्वआधार गतीमंद मुलींच्या बालगृहात 13 सप्टे रोजी सनईचे मंगलमय सूर घुमत होते. यावेळी उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ.अभय शहापूरकर यांची उपस्थिती होती. सोहळ्याची महिनाभरापासून तयारी करण्यात येत होती. रांगोळ्या, तोरणांनी सजलेलं बालगृह, दारी मंडप, सनईच्या मंगलमय सुरांमध्ये वऱ्हाडीमंडळींची सुरू असलेली लगीनघाई.
‘स्वआधार गतीमंद बालगृहा’त अंजली आणि सुजितकुमार विवाहबध्द झाले. अंजली कळंबच्या ‘सहारा अनाथ बालगृहा’त वाढली तर सुजितकुमार पुण्यात. दोघांना कुणी नातेवाइकही नाहीत. अंजली सज्ञान झाली. आणि संस्थेचे सचिव शहाजी चव्हाण यांच्याकडे तिच्या विवाहासाठी प्रस्ताव आला. चव्हाण यांनी पुण्यातल्या सुजितकुमारची माहिती घेतली. त्यानंतर अंजलीच्या विवाहाची तयारी सुरू झाली. अंजली आणि सुजितकुमार यांच्या संसारासाठी लागणाऱ्या साहित्यापासून विवाहाच्या निमंत्रणपत्रिकेपर्यंत सगळी कामं करण्यासाठी अनेक हात पुढे आले. कुणी भांडी, फ्रीज, कुलर, कुणी रूखवत तर कुणी पैसे दिले. विशेष म्हणजे 6 महिने पुरेल इतकं किराणा साहित्यही त्यांना देण्यात आलं. उस्मानाबादेतील पत्रकारांनी तसेच समाजसेवी तरुणांनी पुढाकार घेतला आणि बुधवारी थाटामाटात विवाह पार पडला.
कळंब रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.सुनिल पवार यांनी मुलीचे मामा तर यशश्री क्लासेसचे संचालक प्रा.रवी निंबाळकर मुलाचे मामा म्हणून उभे राहिले. यावेळी गतीमंद बालगृहातील मुली, कळंबच्या बालगृहातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. विवाहानंतर सजविलेल्या वाहनातून वाजतगाजत नवदांपत्य पुण्याच्या दिशेने रवाना झालं. नांदा सौख्यभरे!

No comments:

Post a Comment