Thursday 21 September 2017

काहीतरी वेगळं करण्याची इच्छाच मेकॅनिक बनवून गेली

‘ती’च्या उमेदकथा - नवरात्रोत्सव विशेष

काहीतरी वेगळं करण्याची इच्छाच मालती गिरी यांना मेकॅनिक बनवून गेली. चारचाकी गाड्यांची दुरूस्ती करणं, वॉशींग सेंटर चालविणे ही कामं बऱ्याचदा पुरुषच करताना दिसतात. मात्र परभणी शहरातील गंगाखेड रस्त्यावर ताडेश्वर वॉशिंग सेंटरवर पुरूषांऐवजी मालती गिरी ही सर्व कामं करताना दिसतात. मालतीबाईंनी हे काम सुरु केलं 13 वर्षांपूर्वी. आज त्याचं वय आहे 54.
मालतीबाईंच शिक्षण फक्त चौथी. परभणीतील बाभूळगाव त्यांचं माहेर. 1977 मध्ये ताडपांगरी येथील तुकाराम गिरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरची परिस्थिती बेताची. त्यातून लग्नावेळी तुकाराम यांना नोकरी नव्हती. कामाच्या शोधात 80 साली गाव सुटलं. परभणीत आल्यावर त्यांनी टेलरिंगचं काम सुरु केलं. पत्नीने मदत केली तर चार पैसे अधिक मिळतील म्हणून त्यांनी मालतीबाईला शिलाई मशिन घेऊन दिली. परिस्थिती जाणून मालती यांनीही दूधविक्री, शिवणकाम यासारखे छोटे व्यवसाय सुरू केले. घर चालू लागलं आणि 1981 मध्ये तुकाराम यांना वीज कंपनीत नोकरी मिळाली. आणि काही दिवसांतच चालक पदावर ते सेवेत कायम झाले.



बदलीमुळे तुकाराम बाहेरगावी जाऊ लागले आणि कुटुंबाची जबाबदारी मालतीबाईंवर आली. शिलाई मशिनच्या जोडीला त्यांनी म्हैस विकत घेऊन दूधविक्री, मिरचीकांडप, साडीविक्री असे गृहउद्योग सुरु केले. आपण शिकू शकलो नाही ही खंत मनात होतीच. त्यामुळेच मुलाबाळांना शिकवायचं ही जिद्द मनी रुजली होती. आता त्यांचा दिवस पहाटे साडेचार वाजता सुरु व्हायचा. आणि संपायचा तो रात्री 11 वाजता.
अर्थातच या जोडप्याच्या कष्टाचं चीज झालं. चारही मुलं डॉक्टर झाली.
मधल्या काळात त्या पतीकडून ट्रॅक्टर शिकल्या. इथूनच मालती यांचा गॅरेज चालकाचा प्रवास सुरु झाला. लहानपणापासूनच मशिनरी हाताळणे, दुरुस्ती याबद्दलचं कुतूहल इथं कामी आलं. चालक म्हणून सेवेत असताना तुकाराम यांनाही वाहन दुरुस्तीबद्दल माहिती होती. आपल्यालाही वाहन दुरुस्ती आली पाहिजे, असा अट्टाहास मालती यांचा असायचा. त्यांची आवड पाहून तुकाराम यांनीच त्यांना वाहन दुरुस्तीचे धडे दिले.
मालतीबाई म्हणतात, “आता राहतोय ती जागा मिस्टरांनी घेऊन ठेवली होती. इथं आल्यावर काय काम करायचं, असा प्रश्नह माझ्यासमोर होता. मुलं शिकायला बाहेर पडलेली. हे कामाला जायचे. मला म्हणाले, आता चार-पाच वर्ष निवांत बस. “मी सांगितलं, मी नाही बसून खाणार”. मग सर्व्हिस सेंटर सुरू करायचं ठरलं. आता मला त्या कामाची माहिती होती. आणि काही कारणामुळे मला शिलाई मशीन चालवायची नव्हती. जागा होतीच मग सेंटर बांधलं. सुरूवातीला लोकांना विशेष वाटायचं, एक बाई सर्व्हिस सेंटरचं काम करते याचं. एकदा एकजण आला. गाडी धुऊन झाल्यावर म्हणाला, “तुम्हाला नवरा नाही का? म्हटलं, का हो? तसं म्हणाला, नाही, नवरा नसलेल्या बायका असं कुठलंही काम करतात नाईलाज म्हणून”. मिस्टर तेव्हा घरात होते, मी त्यांची ओळख करून दिली आणि सांगितलं, मला आवड आहे म्हणून हे करते हे काम. कधी एखादा बाई आहे म्हणून समजून घेतो. तर कधी एखादा बाई आहे म्हणून मुद्दाम वेडेवाकडे बोलतो”.



रोज सकाळी 7 वाजता सर्व्हिस सेंटरचं काम सुरु होतं. ट्रॅक्टर, ट्रक, रिक्षा, जीप, दुचाकी अशी सर्व प्रकारची वाहने धुऊन, ग्रिसींगचं काम स्वतः मालतीबाई करतात. विशेष म्हणजे ही सर्व कामं करत असताना त्यांच्या अंगात असतो टीशर्ट आणि काळवंडलेली पॅन्ट, केस विस्कटू नयेत म्हणून डोक्याला कॅप लावलेली.
त्यांची मोठी मुलगी पूजा नॅचरोपॅथीची पदवीधारक आणि डीएमएलटी झाली आहे. दुसरी बेबी एमबीबीएस असून वैद्यकीय अधिकारी आहे. तिसरा कैलास वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तरची तयारी करीत आहे. तर धाकट्या दत्तात्रयने परभणीतील दंत वैद्यकीय महाविद्यालयातून बीडीएसची पदवी घेतली आहे. चारही मुलांना मालतीबाईंनी डॉक्टर बनविण्याचा संकल्प केला आणि तो आपल्या मेहनतीच्या बळावर पूर्णही केला आहे.



मालतीबाई सांगतात, “आज माझी चारही मुलं डॉक्टर झाली यातच मला समाधान आहे. महिला म्हणून व्यवसायात काही अडचणी आल्या तर त्या दूर करायला मी अनुभवातून शिकत गेले. वेगवेगळ्या स्वभावाची, विचाराची माणसं व्यवसायाच्या निमित्ताने भेटतात. त्यांच्या अनुभवातून तसेच प्रत्येकाकडून काही ना काही शिकत राहिल्यामुळे आज हे यश मिळालं आहे.
- मालती गिरी, गॅरेज चालक, परभणी
- बाळासाहेब काळे.

No comments:

Post a Comment