Monday 11 September 2017

लतीफकाकांची पुस्तकलेणी

लतीफकाकांच्या मुला-नातवंडांनी भरलेल्या घरातच चक्क 30 हजार पुस्तकांनी भरलेली कपाटं आणि 3 खोल्या बघून अबब व्हायला होतं. प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जायचं आणि त्यासाठी स्वतःच अभ्यास करायची काकांची सवय. त्या त्या विषयातली पुस्तकंच त्यांचे मार्गदर्शक! काकांच्या या स्वयंअध्ययन आणि अचूकतेच्या ध्यासातूनच ही वैयक्तिक लायब्ररी निर्माण झालीय. अगदी पाळीव प्राणी, पक्षी पाळावेसे वाटले तरी त्याची पूर्ण माहिती घेऊन मग ते कृती करतात. मराठी, हिंदी, इंग्रजी सोबतच फार्सी, अरबी, उर्दू, अशा अनेकविध भाषेतली शैक्षणिक आणि इतर विषयांची अशी प्राथमिक ते अगदी पदवीपर्यंतची सर्व पुस्तके त्यांच्याकडे आहेत. शिवाय माहिती, तंत्रज्ञान, विज्ञान, महिला, लहान मुलं, त्यांचे विविध प्रश्न, आरोग्य, कलाकुसर, अन्न पदार्थ तसेच विविध गोष्टी बनवायला शिकणे अशा अनेक शिकायच्या गोष्टींचा मोठा आणि तो ही सिरीजमध्ये असा संग्रह काकांनी मेहनतीतून निर्माण केलाय. 




लतीफकाका औरंगाबादमधल्या टाइम्स कॉलोनीत राहतात. पाटबंधारे विभागातून कार्यकारी अभियंता या पदावरून काका निवृत्त झाले आहेत. आज काकांच्या खाजगी ग्रंथालयात साधारणपणे 400 ते 500 वेगवेगळ्या विषयांची प्रत्येकी 50 ते 100 पुस्तके जमा केली आहेत. शिवाय 7,8 भाषांच्या डिक्शनरी, एनसायक्लोपेडियांनी काकांची कपाटे भरलेली आहेत. धार्मिक ग्रंथांचं एक खास दालनच आहे काकांचं.
काही खास दैनिकं, साप्ताहिकं पाक्षिकं, मासिकं ही वर्षानुसार बाईंडिंग करून काकांनी जतन केलेली आहेत. नॅशनल जिओग्राफी मासिकांचे 1967 पासूनचे सर्व अंक इथे सापडतील. आणखी म्हणजे अनेक पेन, पेन्सिली, खोडरबर, जुने कंदील, जुन्या काही वस्तू अशा अनेक गोष्टी काकांच्या संग्रही आहेत.
आता काकांनी पंचाहत्तरी ओलांडलेली आहे. तरीही ते स्वतःच या पुस्तकांची, ग्रंथालयाची देखभाल करतात. पुस्तक खरेदीसाठी भारतात ते अनेक ठिकाणी फिरले आहेत. आणि या सर्वासाठी ते दर महिन्याला 5 हजार रुपये खर्च करतात. 





आपल्या कामात सतत व्यग्र असणारे आणि मितभाषी लतीफकाका डायरीतून मात्र बोलके होतात. 1962 पासून लिहिलेल्या त्यांच्या सर्व डायऱ्या पुस्तकासारख्याच आहेत. काकांचे चिराग-ए-अब्दी हे एक पुस्तकही प्रकाशित झालंय. काका गरजू मुलांसाठी अरबी आणि उर्दूचे क्लासेसही घेतात. 





या संग्रहातली किमान 25 हजार पुस्तकं काकांनी वाचली आहेत. साधारण परिस्थितीतून ही पुस्तकांच्या सोबतीने माणसं कशी मोठी होतात हा आशावाद काका लायब्ररीत येणाऱ्या सर्वांना देतात. आपल्या या कामाचा फारसा गाजावाजा करायला काका तयार नव्हते पण त्यांच्या दिवंगत पत्नी आयेशा यांच्या स्मृतीत हे ग्रंथालय सर्वांना खुलं करण्याच्या विचारात काका आता आहेत. औरंगाबादच्या वाचकांना ते लवकरच उपलब्ध होईल. लेण्यांमधून विविध संस्कृतींचा वारसा आपल्यापर्यंत पोहोचतो तशीच ही लतीफकाकांची पुस्तकलेणी सर्वधर्म समभाव आणि सर्व शिक्षेचा वारसा देतील. जिज्ञासू वृत्तीतून एक सामान्य माणूस वैयक्तिक पातळीवर असा मोठा पुस्तक संग्रह बनवतो. आणि गरजूना ते ग्रंथालय विनामूल्य उपलब्ध करून देतो हे आगळं उदाहरण ठरावं. 


- गीतांजली रणशूर, पुणे.

No comments:

Post a Comment