Friday 15 September 2017

पाव्हणं ऐकता का, मला आत्ताच लगीन न्हाय कराचं!

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :
ही गोष्ट आहे २०१५ सालातली, आठवीत शिकणाऱ्या कोमलची. जालना जिल्ह्यातलं रोहणेवाडी या छोट्या गावातली ही घटना. कोमलसाठी नातेवाईकांनी स्थळ आणलं. “पोरींचं बाशिंगबळ जड असतंया. दाखवून तरी देवूयात एकडाव पाव्हण्यांना!” असं म्हणत ‘मुलगी दाखविण्याचा’ कार्यक्रम ठरला. आठवीतल्या कोमलला जबरदस्तीने साडी नेसवली गेली आणि पाहुण्यांसमोर तिला नेऊन उभं केलं गेलं.
आठवीची पोर, पुरती बावचळून गेली. नमस्कार- चमत्कार झाल्यावर ‘तुझं नाव काय? कितवीत शिकते?’ असे प्रश्न विचारले गेले आणि कोमलला कंठ फुटला ” माझं नाव कोमल हाए आणि मला तुमच्याशी लगीन कराचंच नाय” आजूबाजूच्या मोठ्यांनी तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला, पण कोमलनी कुणालाही जुमानलं नाही, “मी अजून लहान हाए, आणि आठवीत शिकते. मला इतक्यात सौंसार करायचा न्हाय, मला साळा शिकायची हाय. इतक्या ल्हान वयात लगीन करू नगा. पुढं पोरीचं आणि जल्माला येणाऱ्या बाळाचं लई लुकसान होतं असं आमच्या मीना- राजू मंचात शिकवत्यात. मी माय- बापाला लई येळा सांगितलं, तरीबी ऐकनांत. पाव्हणं ऐकता का, मला आत्ताच लगीन न्हाई कराचं!!”

आणि महत्त्वाचं म्हणजे पाहायला आलेल्या पाहुण्यांना आणि कोमलच्या आई- वडिलांना त्यांची चूक उमजली. मुलीला शिकण्याची इच्छा आहे आणि एवढ्या लहान वयात तिचं लग्न करणं चुकीचं आहे, हे तिच्या अशिक्षित आई- वडिलांनाही कळलं. आता कोमल नववीत शिकतेय आणि शिक्षिका होण्याचं तिचं स्वप्न आहे.
कोमल एकटीच निडर झालीये असं नाही, तर तिच्या वर्गमैत्रिणी आता पूर्वीसारख्या लाजऱ्या आणि अबोल राहिलेल्या नाहीत. उदाहरणार्थ- कोमलच्या शाळेत आजूबाजूच्या गावातूनही काही मुली येतात. त्यांना भरपूर चालून तसेच एसटीने शाळेला यावं लागतं. या प्रवासादरम्यान एका मुलीची त्यांच्याच शाळेतला एक मुलगा छेड काढत होता. ती मुलगी बिचारी घाबरून गेली होती, तिला शाळेतही यायची भीती वाटू लागली. त्यावेळी कोमलने आणि तिच्या वर्गमैत्रिणींनी त्या मुलीला आधार दिला. ‘आम्ही तुझ्यासोबत येतो आणि त्याला बरोबर धडा शिकवतो’ असा मैत्रिणींनी चंग बांधला. ज्या मुलीची छेड काढली जात होती तिच्यासोबत मुली बसस्टँडपर्यंत जायच्या आणि एकेदिवशी त्यांनी त्या मुलाला बसस्टँडवरच जाब विचारला. शिवाय त्याचं नाव, पत्ता याची माहिती काढून शिक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवली. मग शिक्षकांनी मुलाच्या पालकांना बोलावून समज दिली. अशाप्रकारे एका विद्यार्थिनीचं शिक्षण चालूच राहिलं.
रोहणेवाडी प्रथा-परंपरा पाळणारं, मुलालाच वंशाचा दिवा मानणारं आणि मुलीच्या जन्मापासून तिच्या लग्नाची काळजी करणारं गाव. हुंड्याची प्रथा कागदोपत्री दिसत नसली तरी इथं ती आवर्जून पाळली जाते आणि मग आई- बाप कमी हुंड्यात लग्न ठरलं तर मुलीच्या वयाचा विचार न करता तिचं लग्न लावून देतात. जालना जिल्ह्यातला मुलींचा जन्मदर 1000 मुलग्यांमागे 937 मुली इतका कमी. त्यामुळे लहानवयातच मुलीचं लग्न होणं, ही तशी सर्रास आढळणारी गोष्ट. स्वतःच धीट होतं आपल्या लग्नाचा चाललेला प्रयत्न एकहाती उधळून लावला, हे खरंतर कौतुकास्पदच. 


- स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

No comments:

Post a Comment