Tuesday 19 September 2017

मला वंशाचा दिवा न म्हणता वंशाची उदबत्ती समजतात

प्रवास पालकत्वाचा:
‘प्रवास पालकत्वाचा’ या विषयावर लिहा.' असं जेव्हा नवी उमेदमधून सांगणं आलं तेव्हा मी दचकलो. पालक म्हणजे कुठली भाजी आहे का त्यावर विनोद करायला? पण जसाजसा मी यावर गंभीरपणे विचार करत गेलो तसं माझा पालकत्वाचा प्रवास अपेक्षित नसून माझ्या पालकांचा प्रवास अपेक्षित आहे हे लक्षात आलं. आणि मग ही आजोबा- बाबा- मी आणि माओ अशा आमच्या चार पिढ्यांची कहाणी उलगडत गेली.
भाग पहिला
माझे बाबा आणि मी, यांच्यात फक्त दिसण्यातच साम्य आहे. वटवृक्षाच्या छायेत इतर कुठली झाडं जगत नाहीत म्हणे, तसंच बाबांच्या छत्रछायेत मी नेहमीच खुरटत आलोय. तसं, आमच्या ब्रह्मे घराण्याचे कोणतेही दैवी गुण माझ्यात उतरलेले नाहीत हे बाबांनी लहानपणीच ओळखलं होतं. 'माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा अपेक्षाभंग' असं ते मला नेहमी म्हणायचे. माझ्यात ब्रह्मेंचे गुण इतके कमी दिसतात की बाबा मला वंशाचा दिवा न म्हणता वंशाची उदबत्ती समजतात.
माझं सगळं लहानपण तसं बऱ्यापैकी दुःखाकष्टात गेलं. फार पूर्वीच्या काळी कष्ट म्हणजे म्युनिसीपालटीच्या दिव्याखाली उपाशी राहून अभ्यास करणं वगैरे बाळबोध संकल्पना होत्या. हल्लीच्या पिढीत नेट कनेक्शन स्लो असणं, टॅब हँग होणं अशा काही परमदुःखाच्या व्याख्या आहेत. माझ्या बाबतीत असं काही नव्हतं. मला पाहताच बाबा दुःखी व्हायचे.
मी कुठंतरी हरवून जावा अशी त्यांची सुप्त इच्छा असावी. मी हरवावा यासाठी त्यांनी गल्लीतल्या छत्रीवाल्या रामासमोरच्या मारूतीला नवस बोललेला असं मी ऐकून आहे. 'उत्तम पुरुष केवळ दैवावर हवाला न ठेवता प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात.' या उक्तीला अनुसरून बाबा फक्त नवसावर अवलंबून न राहता आपल्या बाजूनं प्रयत्न करत असायचे. कधी मला सारसबागेत घेऊन गेले की आठवणीनं तिथं विसरून यायचे. एकदा माझ्या बदल्यात पिंजऱ्यातलं माकड घरी घेऊन गेले होते. मी त्यांच्यापाठोपाठ घरी पोचलो तेव्हा हातभर जीभ बाहेर काढून 'अरेच्चा! तू असा कसा परत आलास बुवा?' असं आश्चर्यानं म्हणाले होते. पोरं हमखास हरवणारे सिनेमातले कुंभ के मेले पाहून 'एकदा आपणही तिथं जाऊया' असा बाबांनी माझ्याकडं हट्ट केलेला आठवतोय.
शेजारच्या चंदूचे बाबा त्याला झाडावर चढायला शिकवायचे. बाबा मला ट्रान्सफॉर्मरच्या खांबावर चढायला उत्तेजन द्यायचे. निमाच्या बाबांनी तिच्यासाठी मुंबईहून छोटा कॅमेरा आणला होता तर बाबा माझ्यासाठी पिग्मी आदिवासींचे विषारी भाले कुठं मिळतात याची चौकशी करत होते.
माझ्या मित्रांचे आईवडील त्यांना सुट्टीला सांगली, नागपूर, मुंबई, नाशिक, इंदोर अशा गावी नेत; तर बाबा मला सुट्टीत टकमक टोक, हिरकणीचा कडा, ड्यूक्स नोज असल्या साहसी सुळक्यांवर नेत. तिथं गेल्यावरही उगाच 'जरा बघ रे तिथं वाकून.' असं मला सुचवत असायचे.
मी हरवलो आहे, वीसवीस वर्षं झाली तरी मी अजिबात सापडत नाहीय, आसेतूहिमाचल माझा शोध अखंड चालू आहे, पोलिस-खाजगी गुप्तहेर वगैरेंनी माझ्या शोधात हात टेकल्यानं आता इंटरपोल आणि मिलीटरी कमांडोंकडं ही शोधमोहीम दिली आहे, ते देशातलं घरनघर विंचरून काढतायत, माझ्या काळजीपोटी आईनं घरातली सगळी अंथरूण-पांघरुणं धरलीत, मला परत आणून देण्याच्या बक्षीसाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे अशा मुंगेरीलाल दिवास्वप्नात बाबा तासनतास रमून जात.
जेव्हा ते स्वप्नातून जागे व्हायचे तेव्हा मी त्यांच्या पायाशीच काही खुडबूड करत बसलेलो दिसलो की ते खट्टू होत. आणि नव्या जोमानं मला दूरच्या ठिकाणी घेऊन जात. पण दरवेळी मी मांजरासारखा त्यांच्याआधी घरी परत यायचो. माझं सगळं लहानपण घरची वाट धुंडाळण्यात गेलं.
माझा पालकत्वाचा प्रवास असा पालकांचं घर शोधत सुरु झाला.
 ज्युनियर ब्रह्मे

No comments:

Post a Comment