
जिल्हा उस्मानाबाद. हिंगळजवाडी गाव. येथील कमल कुंभार. कमल यांच्या आईचा बांगड्या भरण्याचा छोटेखानी व्यवसाय होता. त्यामुळे उद्योगाचं बाळकडू त्यांना आईकडूनच मिळालं. आईसोबत कमल बार्शीला बांगड्या खरेदीला जात. त्यातून बांगड्यांचे प्रकार, नवनवीन व्हारयटी, भावातील तफावत असे बारकावे त्या शिकत गेल्या. पुढे विवाहानंतर त्यांनी हिंगळजवाडीत स्वत:चा बांगड्यांचा व्यवसाय सुरू केला. दोन हजार रुपये भांडवलावर सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये बचतगट स्थापन केला. कमलताई बचतगटाच्या सचिव झाल्या. त्यांनी गटातील महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करायला सुरुवात केली. केवळ बचत गटावर अवलंबून न राहता ‘आशा कार्यकर्ती’ म्हणूनही काम सुरु केलं.

कमल कुंभार यांनी आजवर जवळपास चार हजार ग्रामीण महिलांना उद्योग उभारणीसाठी प्रेरित केलं. या महिला उद्योजक म्हणून आत्मनिर्भर बनल्या आहेत. या सगळया प्रवासात अनेक समस्या आल्याच. पण सातत्याने काहीतरी नवीन करण्याची आवड आणि त्यासाठी लागणारं प्रशिक्षण घेत गेल्यामुळे कामात गती मिळाली, असं त्या सांगतात. आता तर कमल कुंभार यांच्या कामाची दखल संयुक्त राष्ट्रसंघाने घेतली आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमातंर्गत न्युयॉर्क येथे त्यांना नुकताच ‘इक्वेटर’ पुरस्कार देण्यात आला. कोणताही उद्योग सुरु करतांना त्याची तपशिलात माहिती घ्यायची. त्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन प्रशिक्षण घेण्यावर श्रीमती कुंभार यांचा भर आहे.
‘जागृती महिला बचत गटा’च्या नावाने कमल यांनी २०१५ मध्ये गावातच पाच एकर जमीन भाड्याने घेतली. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांनी उस्मानाबादी शेळी प्रकल्पाची सुरुवात केली. जोडीला कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय सुरू केला. महिन्याला ६०० ते ७०० कोंबडी पिलांची विक्री आणि दररोज ७० ते ८० अंड्यांची विक्री होते. आज त्यांची महिन्याची आर्थिक उलाढाल लाखावर पोचली आहे. त्यांनी परिसरातील अन्य महिलांनाही स्वावलंबी बनविलं आहे. छोट्याशा खेड्यात त्यांचा सुरू झालेला उद्योग अन्य महिलांसाठी प्रेरणादायी आहे. उद्योगातून त्यांनी स्वत:चा बंगला बांधला, गाडी घेतली. कमल यांचं शिक्षण केवळ दहावी. पण कल्पकता, नवं शिकण्याची आवड, त्यातून नवे उद्योग सुरू करण्याची धडपड आणि जिद्द या जोरावर आज त्या ग्रामीण स्त्रियांचं रोल माॅडेल बनल्या आहेत.
- कमल कुंभार, शेळी आणि कुक्कुटपालन.
- चंद्रसेन देशमुख.
No comments:
Post a Comment