Tuesday 5 September 2017

पालकत्व शिकवता येत नाही, ती मुलांसोबत शिकण्याची कला आहे

प्रवास पालकत्वाचा :
"Having a child is like getting a tattoo ... on your face. You better be committed."
—"Eat Pray Love" by Elizabeth Gilbert
पालक होऊ पाहाणाऱ्या आणि पालक असणाऱ्या प्रत्येकाने हे वाक्य डावीकडून उजवीकडे निदान तीन वेळा वाचावं. तुम्ही कितव्यांदा पालक बनणार, तुमच्या घरात कोण असतं, तुमचं चिंगरं मुलगा की मुलगी, तुमच्या दोन मुलांत किती वर्षांचा फरक आहे, तुमचा तसंच मुलांचा स्वभाव या आणि अश्य़ा किती तरी गोष्टींवर या टॅटूचा रंग, आकार, चित्र अवलंबून असतो. पालकत्व शिकवता येत नाही, ती मुलांसोबत वाढत वाढत शिकण्याची कला आहे. तरीही समाजशास्त्रज्ञांनी पालकत्वाच्या होयबा पालक (जेली फिश पॅरेन्ट्स), आदर्श पालक (टायगर पॅरेन्ट्स), मालक पालक (डॉल्फीन पॅरेन्ट्स) आणि कोरडे पालक (ऑस्ट्रीच पॅरेन्ट्स) अश्या काही टेम्प्लेट तयार केल्या आहेत. स्वतःकडे डॊळसपणे बघितलं किंवा काही छोट्या परीक्षा दिल्या की तुम्हाला तुमची टेम्प्लेट सहज समजते.
तेरा वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा पहिल्यांदा पालक झालो तेव्हा मुलाला असंच वागवायचं किंवा आपली पालकत्वाची अमूक एक टेम्प्लेट आहे असं कुठं डोक्यात नव्हतं. आमच्या पालकांची आम्हाला वाढवायची पद्धत आणि आम्हाला आदर्श वाटणारी काही आई-बाबा मंडळी यांचं बेस्ट ऑफ बोथ वर्ल्डस असं काही तरी आपण वागू असं कुठं तरी सबकॉन्शसली वाटायचं. नऊ वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा पालक झालो, तेव्हा आमचे पालकत्वाचे ठोकताळे बऱ्यापैकी तयार होते, त्याचा हा सारांश.
माझा थोरला तेव्हा सहा-सात वर्षाचा असेल. रोज रात्री एक गोष्ट सांगायची असा आमचा अरेबियन नाईट्सचा प्रयोग सुरु होता. त्यात कधी तरी ’श्यामची आई’ उगवली आणि तिसऱ्याच दिवशी श्य़ाम हा एक नंबरचा बावळट मुलगा असणार असं माझ्या मुलानं जाहीर करुन टाकलं. कडेलोट म्हणजे ’सिनेमा बघणं वाईट असतं रे बाळा’ असं वाक्य कुठल्याश्य़ा गोष्टीत आलं आणि महीन्यातून सरासरी एक सिनेमा बघणाऱ्या वाईट्ट लोकांनी श्य़ाम आणि त्याच्या आईला कुठल्याश्य़ा कपाटात कायमचं कैद करुन टाकलं. मुलांमध्ये व्हॅल्यु सिस्टीम (चारित्र्य हा फारच मोठा शब्द!) निर्माण करायची तर श्यामच्या आईच्या हातचा तयार काढा उपयोगाचा नाही हे तेव्हाच लक्षात आलं. चांगलं-वाईट, चूक-बरोबर, खरं-खोटं यांच्या संकल्पना मुलांच्या मनात पालक काय बोलतात, कसं वागतात यावरुन तयार होतात. घरात त्यामुळे चौघांसाठीही नियम तेच असतात. जे मुलांसाठी वाईट, ते आम्ही करत नाही आणि ज्या गोष्टी आम्हाला मान्य असतात त्या साठी आम्ही मुलांना आडवत नाही. यात घरी परत येण्याच्या वेळेपासून खाण्याच्या सवयीपर्यंत, लोकांशी वागण्याच्या पद्धतीपासून रीतीभातीपर्यंत सगळ्या गोष्टी येतात.
स्क्रीन टाईम हा आजच्या पालकांचा काळजीचा विषय. टीव्ही, टॅब, स्मार्टफोन यांचा चक्रव्युह भोवंडून टाकणारा आहे. व्यसनाच्या पातळीवर गेलेलं मोबाईल गेमचं, सोशल मिडीयाचं वेड आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नवनवीन समस्या घरोघरी दिसतात. दुर्दैवाचा भाग म्हणजे या समस्या आहेत याचं भानही कित्येक पालकांना नाही. आमच्याकडे मुलांचा टॅब फक्त उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्यासुट्टीत बाहेर निघतो. त्यावर लॉग-ईन आमच्या ईमेल आयडीने असल्यानं आम्हाला मुलं काय डाऊनलोड करतात हे लगेच कळतं. थोरल्याकडे क्लासला जाण्यापुरता फोन असतो आणि सगळ्यांच्या फोनचे स्क्रीन लॉक एकाच किल्लीने उघडतात. आमच्या सोसायटीत खेळायला भरपूर जागा आणि मुलं आहेत. त्यामुळं आमच्याकडे खरेखुरे सबवे सर्फर दिसतात आणि सोबतच फुटबॉल आणि क्रिकेटचा घमासान. मुळात आम्हाला सिनेमे पाहायला आवडतात त्यामुळे सुट्टीच्या दिवशी आम्ही घरी किंवा बाहेर एखादा सिनेमा नक्कीच बघतो. पण आठवडाभर आमचा टीव्ही रोज जेमतेम तासभर चालतो.
आम्ही लहानपणी केलेल्या काही गोष्टी मुलांमध्ये उतरलेल्या बघतो तेव्हा जनुकांच्या चिवटपणाचं कौतुक वाटतं. धाकट्यानं नुक्तंच अवांतर वाचन सुरु केलय पण थोरला भरपूर वाचतो. त्यांना लायब्ररी तर आहेच शिवाय आम्ही त्यांना पुस्तकांच्या दुकानात तासंतास सोडून देतो ते निराळंच. प्रत्येकाची आदर्श पालकत्वाची व्याख्या निराळी असते. आम्हाला जमलेल्या आणि न जमलेल्या गोष्टीं आम्ही मुलांसमोर ठेवतो. त्यातलं त्यांना जे आवडतं, जे जमतं ते त्यांनी निवडावं. आमच्या प्रतलापल्याडच्या त्यांच्या आवडींना आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करतो. ते कधी जमतं तर कधी साफच फसतं. पण यात संवादाची एक नवीन शक्यता नक्कीच दडलेली असते.
आम्ही दोघंही छोट्या शहरांत वाढलो, मोठे झालो, आमच्या संवेदना महानगरीय नाहीत. शहरातली नाती, दैनंदिन ताण, अंतरं, व्यवहार, सोई न् प्रश्न या आणि इतर अनेक गोष्टी आमच्या पालकत्वाच्या व्याखेत डोकावत राहिल्या. पालक म्हणून काही गोष्टी ठरवून केल्या गेल्या तर काही चुकतमाकत शिकत गेलो. काही गोष्टी ठरवूनही जमल्या नाहीत तर काही पार चुकल्याच. या चर्चा कधी मोकळेपणानं होतात तर कधी वैतागून. हे स्वतःला असं वारंवार चाचपून पाहाणं मात्र गरजेचं. शेवटी हा प्रश्न चेहऱ्यावर गोंदवलेल्या टॅटूचा आहे!
 संवेद गळेगावकर

No comments:

Post a Comment