Tuesday, 24 July 2018

विठ्ठलनाम मुखाने घेऊया ... रोपे लावीत पंढरीसी जाऊया...

आषाढी एकादशीनिमित पंढरपुरात येणा-या वेगवेगळ्या दिंडया. त्यातली वेगळी दिंडी, वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांची. दिंडीत टाळ-मृदंगाएेवजी टिकाव-फावडे. वृक्षदिंडीत दोन टेम्पो. एकात शंभर महिला, तर दुसऱ्यात दहा पुरुष वारकरी, जेवणाचं साहित्य, रोपे. वाटेत कुठेही वारकरी झाडे लावतात. ज्या गावात दिंडी थांबते, तिथलं मंदिर वारकरी स्वच्छ करतात. त्यानंतर मंदिरात तुळस, ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे मंदिरासमोर वड, उंबर, बेलाची झाड लावणं. विविध प्रकाराची एक हजार रोपं वाटून श्रमदान. संध्याकाळी वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांचं मुलीला शिकवा -सक्षम बनवा, व्यसनमुक्ती, जलसंधारण अशा सामाजिक या विषयावर प्रवचन.
देशमुख बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातल्या ममदापूर पाटोदा गावातले. ३५ वर्षांपासून ते पर्यावरणावर काम करत असून वृक्षलागवडीची त्यांना लहानपणापासून आवड. आजपर्यंत जवळपास पाच लाख लोकांना मोफत वृक्ष. २००८ मध्ये संत तुकाराम महाराजांच्या ४०० व्या जयंतीचं औचित्य साधून त्यांनी ममदापुर पाटोदा ते पंढरपूर वृक्षदिंडी सुरू केली. 
प्रस्थानाच्या दिवशी गावात रोपांची मिरवणूक काढली जाते. बीड, नगर, शिर्डी, देहू , आळंदी , सासवड, नारायणपूर ,जेजुरी, शिखर शिंगणापूर मार्गे वाखरीत. तिथल्या विठ्ठल कारखान्यावर दिंडीचा मुक्काम. वाखरीत येणाऱ्या सर्व पालख्यांचं दर्शन घेऊन वारकऱ्यांना विचारून रोपं आणि शेवगा, हादगा, कारले, दोडके,भोपळे, गवार, भेंडीच्या बिया भेट दिल्या जातात. पुढे पंढरपूरला बाेधले महाराजांच्या मठात दिंडी विसावते. मग नामदेव पायरीचं दर्शन घेत वारकऱ्यांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून रोपांची भेट.
दिंडीत सुधाकर यांच्या पत्नी मोहिनी तसंच मुलं सुमोद आणि सृष्टीही सहभागी होतात. 
-दिनेश लिंबेकर .

Monday, 23 July 2018

नगरचा सेंद्रिय माल पुण्यात ५२ ठिकाणी घरपोच, २०० ठिकाणी दुकानातून विक्री. मुंबईत ५० ठिकाणी घरपोच, ३२ दुकानातून विक्री.

अहमदनगरपासून ३५-४० किलोमीटरवर तालुक्यातलं शेवटचं गाव- गुंडेगाव. तिन्ही बाजूनं डोंगर. शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून. अलीकडेच जलयुक्त शिवार योजनेत सहभाग. त्यामुळे पाण्याची सोय झालेली गावात हुलगे, मटकी, कारळे, मूग, उडीद, तीळ, सोयाबीन, जवस, तूर,बाजरी, ज्वारी यांची शेती. पूर्वीपासूनच शेतमाल बहुतांशकरून सेंद्रियच. मात्र माल दर्जेदार असूनही अंतरामुळे बाजारपेठ मिळत नसे. 
साधारण १५ वर्षांपूर्वी संतोष भापकर यांनी गावातल्या प्रगतिशील शेतकऱ्यांना एकत्र आणलं. मग झाली 'संपूर्ण शेतकरी गटाची' स्थापना. १०० सदस्य . १८०० एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती. त्यासाठी गोमूत्र, शेणखत , पंचामृताचा वापर. संतोष यांनी मालाची पुण्या-मुंबईत कशा प्रकारे विक्री करता येईल , याचा अभ्यास केला. काहींना मार्केटिंगचं प्रशिक्षण दिलं.
गटातल्या शेतकऱ्यांकडून संतोष बाजारभावापेक्षा जास्त दरानं खरेदी करतात. मालाची रस्त्याच्या बाजूला विक्री होते. रस्त्याने प्रवास करणार्‍या, माल खरिदणार्‍या प्रवाशांना व्हिझिटिंग कार्डस देणं सुरू केलं. गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्नांना चांगलं यश आलं. मासिक उलाढाल पाच लाख रुपये. १०० ग्रॅम ते पाच किलोचं पॅकिंग पुण्यात ५२ ठिकाणी घरपोच. २०० ठिकाणी दुकानातून विक्री. तर मुंबईत ५० ठिकाणी घरपोच, ३२ दुकानातून विक्री. ऑर्डर घेण्यासाठी संपूर्ण शेतकरी नावाचं अँप विकसित...एवढं सगळं घडलं.
संतोष यांच्या पत्नी ज्योती विक्री व्यवस्था बघतात. श्रीगोंद्याच्या ज्योती, एमएसस्सी ऑरगॅनिक. सन २०१३ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या. रायगड जिल्ह्यात नायब तहसीलदारपदी त्यांची नियुक्तीही निश्चित होती. मात्र गटासाठीच काम करण्याचं ध्येय ठेवत त्यांनी नोकरी नाकारली.
-सूर्यकांत नेटके,अहमदनगर

Saturday, 21 July 2018

बीडचा जरेवाडी पॅटर्न!- भाग एक

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका. या शाळेतील संदीप पवार सरांना ‘आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार’ मिळालेला आहे. म्हणूनच शाळा पाहण्याची देखील उत्सुकता होती. आम्ही जरेवाडी शाळेत पोहोचलो. शाळेच्या आजूबाजूच्या टेकड्या एवढ्या हिरव्यागार आहेत की शाळा म्हणजे एखाद्या हिल स्टेशनवरचं हॉटेलच वाटलं.
विद्यार्थ्यांनी आमचं फुलं देऊन स्वागत केलं. तेवढ्यात एक सहावीतील चुणचुणीत विद्यार्थिनी पुढे आली आणि स्वत:ची ओळख करून देत म्हणाली, 'जरेवाडी जिल्हा परिषद शाळेत आपले हार्दिक स्वागत. मी तुमची गाईड, मी तुम्हांला संपूर्ण शाळा दाखविणार आहे.' शाळा दाखविण्यासाठी विद्यार्थी गाईड!! या संकल्पनेला दाद देत आम्ही तिच्या मागे चालू लागलो.
सर्वात प्रथम शाळेचे भलेमोठे आवार, तिथं छानसं व्यासपीठ. मग काही पायऱ्या चढून गेलो की ज्ञानरचनावादी साहित्याने सजलेल्या वर्गखोल्या, कलादालन, विद्यार्थी बचत बँक, विज्ञान प्रयोगशाळा आणि तिथून जवळच पोषण आहार शिजविण्यासाठी स्वयंपाकघर. तिथून पुढे 'मीना राजू मंचा'च्या शिवी बंद अभियानाची शपथ लिहिलेली होती. आम्हांला ती विद्यार्थिनी आणखी काही पायऱ्या चढून वर घेऊन गेली. एका बाजूला गांडूळ खत प्रकल्प दिसत होता. आणखी एक जिना चढलो आणि मग दिसला इ लर्निंग कक्ष. तिथंच छानसं ग्रंथालय आणि विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कवितांचे तब्बल 68 कविता संग्रह आहेत. हो, आणि एक गोष्ट तुम्हांला सांगायची राहिलीच, या शाळेतील बहुतांश विद्यार्थी म्हणजे ऊसतोडणी कामगारांची मुलं आहेत. म्हणूनच शाळेच्या समोर ऊस तोडणी मजुरांच्या मुलांसाठी शाळेने बांधलेलं हंगामी वसतिगृह आहे.
त्याआधी मुलांनी संपूर्ण शाळेसमोर माझी एक छोटेखानी मुलाखत घेतली. दोन विद्यार्थिनी मुलाखत कर्त्या होत्या आणि शाळेतील कोणताही विद्यार्थी प्रश्न विचारीत होता. फक्त मराठीतच नव्हे तर, उत्तम इंग्रजीत सुद्धा मुलं-मुली वेगवेगळे प्रश्न विचारीत होते.
शाळेतील मुलांची सर्वांगीण प्रगती पाहून मी थक्क झाले. याबद्दल संदीप पवार सरांशी संवाद साधला असता ते म्हणाले, “मी जेव्हा शाळेत रूजू झालो, तेव्हा तिथे गावाचा उखंडा होता. लोक तिथे कचरा टाकायचे, गायी- गुरांना चरायला आणायचे. शाळेत विद्यार्थ्यांना यावेसे वाटले पाहिजे असे स्वच्छ आणि चांगले वातावरण हवे, असे मला वाटत होते. मी गावकऱ्यांना विनंती केली आणि हळूहळू शाळा आमचीच आहे, या भावनेने ग्रामस्थ मदत करू लागले.
शाळेचा विस्तार करून शाळा आठवीपर्यंत करायची होती, तेव्हा गावकऱ्यांनी पुढाकार घेत शाळेला दोन एकर जागा दान दिली. या गावातील बहुतांश कुटुंबांचे हातावर पोट आहे, तरीही लोकांनी जवळपास साडेसतरा हजार रुपयांची लोकवर्गणी शाळेला गोळा करून दिली.”
सरशाळेत गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम घेतात. त्यात विद्यार्थ्यांचे स्वयंअध्ययन, गटात अभ्यास घेणे, रेडिओ आणि टीव्हीवरील अभ्यासाशी निगडित कार्यक्रमांची मदत घेणे, असे प्रयोग करतात. अभ्यासाशिवाय वर्तमानपत्र आणि पुस्तकांचे अवांतर वाचन, वक्तृत्त्व, कविता लेखनासारख्या वेगवेगळ्या स्पर्धा, स्काऊट- गाईड यातून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना दिली जाते.

- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

अश्विनी कमलाकर हंचाटे हिची ही गोष्ट.

अश्विनी कमलाकर हंचाटे. लातूर महानगरपालिकेच्या मंठाळे नगरातील शाळा क्रमांक नऊची ती विद्यार्थिनी. वडील पोटाच्या विकाराने त्रस्त. त्यातच त्यांचं निधन झालं. आईचाही आधार सुटलेला. अश्विनीसह तिच्या दोन भावडांच्या पायाखालची वाळू सरकली. मदतीला कोणी नाही आणि जवळेचेही दूर गेले. तरीही एकमेकांना आधार देत या भावंडांनी कंबर कसली. ताईचं शिक्षण व्हावं आणि पोटाला भाकर मिळावी म्हणून भावंडे हाती पडेल ते काम करु लागली. आणि चूल पेटती राहिली. सर्वांचा स्वयंपाक, धुणी-भांडी, झाडलोट यात अश्विनीही थकून जायची. तरीही दररोज पाच तास अभ्यास करायचाच हे तिनं ठरवलं. आणि तसं करूही लागली. तिची जिद्द पाहून शिक्षकही तिच्या मदतीसाठी पुढं आले. त्यांनी शाळेत अभ्यासिका उपलब्ध करुन दिली. वहया–पुस्तकांचाही खर्च उचलला. कष्टाचं चीज झालं. अन दहावीच्या परीक्षेत तिला ९४ टक्के गुण मिळाले.
अश्विनी सांगते, “मनोबल वाढेल अशी आपुलकी गुरुजनांनी दिली. यामुळे मला बळ आलं. शिक्षकांचं मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळे हे यश मिळवता आलं.” हे म्हणतानाही तिच्या डोळ्यात पाणी दाटून येतं.
अश्विनीच्या जिद्दीची गोष्ट मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांनी ऐकली. त्यांनी तिला त्यांच्या घरी बोलावून घेतलं. तिचं कौतुक केलं. आता अश्विनीला डॉक्टर व्हायचं आहे. आणि तिच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारीही दिवेगावकर यांनी घेतली आहे.
- प्राजक्ता जाधव.

गडचिरोलीची मधकन्या

प्राजक्ताने वयाच्या अवघ्या तिशीत, गडचिरोलीतली एक यशस्वी उद्योजक अशी ओळख मिळवली आहे. बीफार्म आणि एमबीए(मार्केटिंग) शिक्षणानंतर पुणे शहरात मिळालेली नोकरी सोडून प्राजक्ता अदमाने गडचिरोलीत परतली, ती काही निराळं करण्याच्या जिद्दीने. वनस्पतीशास्त्राची ओढ आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या युवक-युवतींसाठी काही काम उभं करण्याची इच्छा यातून निर्माण झाला, तिचा ‘कस्तुरी हनी’ प्रकल्प. आपला नक्षलग्रस्त जिल्हा वनस्पतीसमृद्ध आहे. पण इथल्या आदिवासी जनतेला मागदर्शन देणारं कुणी नाही, या विचारातून प्राजक्ताने आधी महिती गोळा करणं सुरू केलं. नोकरी सांभाळत, मधमाशी पालन व्यवसाय सुरू केला. या विषयाचा अधिक अभ्यास करून, प्रशिक्षण घेऊन नोकरी सोडली आणि व्यवसायाला वाहून घेतलं. वर्षभरापूर्वी तिने गडचिरोली तालुक्यात खुर्सा इथे सुरू केलेल्या व्यवसायाचं एक वेगळेपण आहे. 
प्राजक्ता सांगते, “मधाची मागणी वाढल्यावर वेगवेगळ्या फुलांचे मध त्या त्या फुलाचा सुवास मिसळून बनवणं सुरू केलं. मधुमेह आणि अन्य रोगांवर इलाज करण्यासाठी मधाचा उपयोग कसा करायचा, ही माहिती आयुर्वेदातून मिळवली. आणि त्या त्या प्रकारचे मध बनवायला सुरूवात केली. यासाठी, ज्या ठिकाणी फुलोरा असतो, त्या त्या ठिकाणी मधपेटया स्थलांतरित करत राहावं लागतं. सुर्यफूल, रेशम, जांभूळ, बोर अशा विविध झाडांच्या ठिकाणी मधमाशीच्या पेट्या लावतो. पेट्यांत जमा झालेल्या मधाला साफ करून बाटल्यांत भरतो. 100 ग्रामपासून 1 किलोपर्यंत वजनाच्या मधाच्या बाटल्या आमच्याकडे उपलब्ध आहेत. एक किलो मघ 380 रु दराने विकतो.” 
व्यवसाय सुरू करण्यासाठी प्राजक्ताने सुमारे अडीच लाख रुपये गुंतवले. आणि वर्षभरातच खर्च वजा जाता साडेतीन ते चार लाख रुपये कमावले. मधविक्रीबरोबरच मध बनवण्याच्या पेट्याही विकण्यासाठी ती बेरोजगार युवक-युवतींना प्रेरित करत असते, सल्ला देते, मदतही करते. तिने स्वतः सात तरूणांना काम दिलं आहे. त्यांना प्रत्येकी पाच हजार ते सात हजार मासिक वेतन ती देते. आता हाच व्यवसाय तिने उत्तर प्रदेश आणि राजस्थान राज्यातील झालावाड़ आणि उत्तर प्रदेशातदेखील सुरु केल्याने तिथल्या युवकांनाही रोजगाराची संधी देणं तिला शक्य झालं आहे. अनेक पारितोषकांनी सन्मानित झालेल्या प्राजक्ताचं काम खरोखर प्रेरणादायी आहे. 
- ओमप्रकाश चुनारकर .

आम्ही तुम्हाला शिकवलं, तर तुम्ही शिकाल का?


अमरावती शहर. गजबजलेला इर्विन चौक. दररोज मॉर्निग वॉकसाठी इथं येणाऱ्या आलोक आणि रुचिर यांच्याकडे परिसरात फिरणाऱ्या मुलांनी कधी पैसे, बिस्कीट मागणं हेही रोजचंच. हे रोजचं चित्र बघून हे दोघं विचलित झाले. या मुलांनी शाळेत जाण्याऐवजी अशा प्रकारे पैसे मागणं दोघानांही पटेना. त्यांनी सहजच मुलांकडे शाळेबद्दल चौकशी केली. आम्हांला शाळेत घातलेलं नाही, असं उत्तर मुलांकडून आलं. आम्ही जर तुम्हाला शिकवलं तर तुम्ही शिकाल का? या आलोकच्या प्रश्नावर मुलांनी होकार दिला अन फुटपाथवरच्या शाळेला सुरुवात झाली. लगेच दुसऱ्या दिवसापासून चौकातील बंद दुकानांसमोर सकाळी साडेसहा ते आठ यावेळेत शाळा भरू लागली.
आलोक कुमार मूळचा वाराणसीचा तर रुचिर त्यागी ग्वाल्हेरचा. दोघंही इंदूर आयआयटीमधून बीटेक झाले आहेत. तीन वर्षांपासून दोघंही अमरावतीत एका खाजगी शिकवणी वर्गात मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिकवतात.
शाळेत सुरुवातीला आली तीन मुलं. हळूहळू संख्या वाढत गेली. आणि शाळेत आता १५ ते २० मुलं येऊ लागली. मुलं शाळेत यावीत, रमावीत म्हणून या दोघांनी त्यांना पाटी, पुस्तक, वह्या दिल्याच. शिवाय रोजच्या नाश्त्याचीही सोय केली. शिकवणी सुरु झाल्यानंतर १० ते १२ दिवसातच मुलं इंग्रजी, मराठी वर्णमाला, अंक ओळख, पाढे पटापट शिकू लागली. आपली मुलं शिकत आहेत हे पाहून आई - वडीलही त्यांना नियमित या शाळेत पाठवत आहेत. यापैकी १२ मुलांना या शैक्षणिक सत्रापासून अमरावती महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशसुद्धा देण्यात आला आहे. आता शहरात इतरत्र फिरणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांनाही या शाळेत आणण्याची इच्छा आलोक व रुचिर यांनी व्यक्त केली आहे.
- अमोल देशमुख.

Tuesday, 17 July 2018

ट्रॅफिक पोलीस नव्हे स्वयंसेवी 'ट्रॅफिक मॅन'!


औरंगाबाद शहर. जालना रोड. अमरप्रित चौक. गाड्यांचा कर्णकर्कश आवाज, जीवघेणी धूळ. धूर. वाहनांची प्रचंड वर्दळ आणि त्यासोबत प्रचंड गोंगाट. या गोंगाटाला चिरत एक अत्यंत शांत स्वभावाचा मध्यमवयीन माणूस संयमाने, नम्रपणे या चौकात वाहतुकनियमन करत असतो. विवेक श्रीकृष्ण चौबे. तुम्हाला वाटेल, या चौकात ड्युटी करणारा हा कुणी ट्रॅफिक पोलीस असावा. पण नाही. हा आहे एक सामान्य माणूस तुमच्या माझ्यासारखा..! रोज संध्याकाळी शहरातल्या वेगवेगळ्या चौकात वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वतःचे तीन तास खर्च करणारा. अगदी स्वेच्छेने.
विवेक चौबे औरंगाबादच्या सिडको भागात झाम्बड इस्टेट या भागात राहणारे. 52 वर्षांचे. शिक्षण दहावीपर्यंत. अख्खी हयात वॉचमनची नोकरी. सध्या महाराष्ट्र बँकेत गनमॅन. पगार जेमतेम. ड्युटी संपल्यानंतर पोलिसांनी दिलेला लाल डगला अंगावर चढवून हातात पोलीस स्टिक घेऊन चौकात दाखल होणं, हा दिनक्रम. एक-दोन दिवस नाही, तर गेल्या आठ वर्षांपासूनचा. थंडी, ऊन, वारा- पावसात कधीच सुट्टी न घेता चौबे ही सेवा देतात.

आठ वर्षांपूर्वीची एक घटना यासाठी कारणीभूत ठरली. रोपळेकर चौकात सिग्नल बसवलेला नव्हता. रोजच वाहतूक कोंडी. एकदा, रुग्णवाहिकेलाही रस्ता मिळेना. तिथेच उभ्या असलेल्या विवेक चौबे यांना राहवलं नाही. अस्वस्थ झालेल्या चौबे यांनी शेजारी उभ्या असलेल्या एका गार्डची शिट्टी घेतली. रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला. पण त्यांची अस्वस्थता एवढ्यावर थांबली नाही. रोज तीन तास चौबे त्या चौकात थांबू लागले. वाहतूक सुरळीत होऊ लागली. त्यांचे कष्ट पाहून वाहतूक शाखेनं तिथं सिग्नल बसवला. 
चौबे सांगतात, "लोक माझा आदर करतात. आठवणीत राहिलेला एक क्षण म्हणजे माझं हे काम पाहून एका मुलीनं मला खूप अदबीनं गुलाबाचं फूल दिलं होतं. आपल्याबाबतही कुणालातरी आदर वाटतो , ही भावना सुखावणारी होती. त्यामुळे, हे काम करण्यासाठी माझा विश्वास दुणावत गेला."
प्रिय औरंगाबादकरांनो, कधी भेटलाच तुम्हाला हा स्वयंसेवी ट्रॅफिक माणूस, तर तुम्हीही त्याला नक्की एक गुलाबाचं फूल द्या... आपण त्यांचं तेवढं देणं लागतोच.
-दत्ता कानवटे.

रिजवाना: रत्नागिरीतील पहिली महिला पीएसआय


शासकीय अधिकारी व्हावं, असं रिजवानाला शाळेत असल्यापासूनच वाटत असे. रिजवाना लालसाब ककेरी. आज रत्नागिरीतील पहिली महिला पीएसआय अधिकारी म्हणून तिने ओळख निर्माण केली आहे.
रत्नागिरी शहरापासून जवळच असणाऱया एमआयडीसी झाडगांव परिसरात राहायला, घरची परिस्थिती बेताची, आईवडिलांनी दररोज मेहनत केल्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह. ''आईवडील अशिक्षित. मात्र मुलांनी भरपूर शिकावं म्हणून दिवसरात्र मेहनत घेणारे. गेल्या चार वर्षांपासून परिस्थिती पूर्वीपेक्षा बरी आहे. भाऊ सनट्रिंग काम करतो, त्याचा मोठा हातभार घराला लागतो. आई फिरून कपडे विकण्याचा व्यवसाय करते. बाबा पानपट्टी चालवतात '' रिजवाना सांगत होती.
ती शाळेत असताना वडील ठेकेदाराकडे कामाला होते. मात्र अशा काही अडचणी निर्माण झाल्या की वडिलांना घरीच राहावं लागलं. तिची शाळा गोदूताई जांभेकर विद्यालय. शाळेतल्या सगळ्या शिक्षकांची मदत झाल्याचं सांगते. मैदानी खेळात पारंगत असलेली रिजवाना राष्ट्रीय स्तरावरील धावपटूही आहे.
चार वर्षांपूर्वी तिनं एमपीएससी अभ्यास सुरू केला. दिवसाला १०-१२ तास अभ्यास. स्पर्धा परीक्षेच्या १०० ते १५० पुस्तकांचं वाचन. शिक्षणाधिकारी एस.जे.मुरकुटे यांना ती यशाचं श्रेय देते. याखेरीज खो-खोचे राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र साप्ते यांनी नेहमीच मोलाचं सहकार्य, स्फूर्ती दिल्याचं रिजवाना सांगते.
महाविद्यालयीन शिक्षण गो.जो.महाविद्यालय. बीए झाल्यानंतर रिजवानानं एलएलबीची पदवी घेतली . कायदेशिक्षण पूर्ण करणारी पोलीस निरीक्षक म्हणून रिजवानाकडे पाहिलं जाणार आहे. कोकणातल्या मुलांचा स्पर्धापरीक्षा देण्याचा कल तुलनेनं कमी आहे. रिजवानाच्या यशानं इतर विद्यार्थीसुध्दा स्पर्धा परीक्षेकडे वळतील अशा प्रतिकिया जिल्ह्यातील नामवंत अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
 -जान्हवी पाटील

गांजूरवाडी- जिल्हा परिषद शाळा ते राष्ट्रपती पुरस्कार!

लातूरच्या चाकूर तालुक्यातली गांजूरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. शाळा तशी चार खोल्यांचीच, चौथीपर्यंत वर्ग असणारी आणि द्विशिक्षकी. शाळेचे गोपाळ सूर्यवंशीसर ‘राष्ट्रपती आदर्श शिक्षक’ पुरस्कारानं सन्मानितशाळा ज्ञानरचनावादी साहित्यानं भरगच्च. सूर्यवंशी
सरांना कलाकुसरीची आणि चित्रकलेची आवड. त्यांनी संपूर्ण शाळा स्वखर्चानं आणि स्वहस्ते रंगवलेली. एका वर्गाच्या छतावर त्यांनी रेखाटलेली सूर्यमाला .
टाकाऊतून टिकाऊ शैक्षणिक साहित्य तयार करण्याचा सरांचा प्रयत्न.
जुन्या टायरला रंग देऊन,बिसलेरीच्या जुन्या बाटल्या वर्तुळाकृती चिकटविलेल्या आहेत. त्या प्रत्येक बाटलीवर दशकोटी,कोटी, दशलक्ष, लक्ष असे लिहिलेले आहे. आपण कोणतीही सात- आठ अंकी संख्या सांगायची, ती
ऐकताच विद्यार्थ्यांचा गट लगेच त्या टायरभोवती योग्य त्या ठिकाणी उभा राहतो. उदा. 35,89,61,234. ही संख्या देताच ९ विद्यार्थी एक गट तयार करतात. प्रत्येक विद्यार्थी या संख्येतल्या एका आकड्याचं प्रतिनिधित्व करतो. आपल्या आकड्यानुसार मग हा विद्यार्थी, नेमक्या
बाटलीसमोर जाऊन उभा राहतो. उदाहरणार्थ, ३(१० कोटी), ५(कोटी), ८(दश लक्ष), ९(लाख/लक्ष),
६(१०हजार), १ (हजार), २(शंभर), ३(दश, ४(एकक). आणि मग ३५ कोटी ८९ लाख ६१ हजार दोनशे
चौतीस ही संख्या विद्यार्थी सहज सांगू शकतात. सूर्यवंशी सर सांगतात, ‘यावरून विद्यार्थी अंकांची स्थानिक किंमत योग्य प्रकारे सांगू शकतात. कुठला आकडा कुठे येतो, हे खेळातून चटकन लक्षात येतं. हवेच्या दाबाचा प्रयोगही भन्नाटच.
'शाळेतील बहुतांश मुलं गरीब शेतकरी आणि मजुरांची. त्यांना जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आम्हा दोन्ही शिक्षकांचा प्रयत्न आहे.’ असं सूर्यवंशी सर सांगतात.
ते या शाळेत 2007 साली रूजू झाले. शाळेला आधी स्वत:ची इमारतही नव्हती. आधी गावातल्या मारूती मंदिरात वर्ग भरायचे. नंतर गावातले
ज्येष्ठ नागरिक बब्रूवान शिंदे यांनी 60 बाय 55 चौरस फूट जमीन शाळेला दान दिली आणि त्यावर वर्गखोल्या बांधल्या गेल्या. शाळेच्या विकासासाठी सरांनी स्वकमाईतून आत्तापर्यंत सुमारे पाच लाख रूपये खर्च केले आहेत. त्यात रंगकाम, अत्यावश्यक शैक्षणिक साहित्य, पत्रा शेड उभारणी आणि दुरुस्त्यांचा
समावेश आहे.
विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून बालसाहित्याची चांगली पुस्तके आणि मासिके
शाळेत येतात. दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याला सानेगुरूजींच्या ‘बालसाधना’चा
दिवाळी अंक दिला जातो. सूर्यवंशी सरच त्यासाठी वर्गणी भरतात.
-स्नेहल बनसोडे-शेलुडकर

एक दप्तर मोलाचं

नाशिकचा जगदीश पांडुरंग बोडके. चार चौघांसारखा युवक. पण लहानपणापासूनच दुसऱ्याच्या मदतीसाठी तत्पर. सभोवताली राहणाऱ्या लोकांसाठी काय करता येईल या विचाराने पछाडलेला. त्याच्या विचाराला साथ लाभली घरच्यांची आणि त्याच्या मित्र परिवाराची. महाविद्यालयीन विश्वात पाऊल ठेवल्यावर त्यानं समविचारी मित्र शोधले. त्यांना सोबत घेत त्याने ‘उधाण युवा ग्रुप’ या बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली. ‘चला सामाजिक बांधिलकी जपूया’ ही या संस्थेची टॅगलाईन.
‘एक दप्तर मोलाचं’ हा यावर्षीचा त्यांचा उपक्रम. आदिवासी पाड्यावर शैक्षणिक साहित्य पोचवण्यासाठी सुरु केलेला. यासाठी शहरातील नागरिकांकडून ग्रुपने काही दप्तरं जमा केली. पदरमोड करत काही नवी दप्तरं घेतली. अशी ६०० दप्तरं या मुलांनी दिंडोरी तालुक्यातील आंबेगण गावातील डांग सेवा मंडळ संचलित ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत नुकतीच पोचवली आहेत. त्या सोबत मुलांना अन्य शैक्षणिक साहित्य व खाऊही देण्यात आला. याविषयी जगदीश सांगतो, “शैक्षणिक साहित्याच्या नव्या नवलाईपासून आजही काही विद्यार्थी कोसो दूर आहेत. हे चित्र बदलायचं म्हणूनच हा उपक्रम आम्ही हाती घेतला. आता हा उपक्रम जिल्ह्यात जास्तीजास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील.”
शिष्यवृत्तीविषयीचे प्रश्न, विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक याविरोधात आम्ही आवाज उठवला. शारीरिक, मानसिकदृष्ट्या दिव्यांग मुलीमुलांसाठी दरवर्षी ‘फॅशन शो’ घेण्यात येतो. युवकांमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून देत त्याविषयी जनजागृती करत असल्याचं जगदीश सांगतो. ग्राहकांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करतांना पत्रके देत काही उपक्रम हाती घेत पाणीबचत, वृक्षसंवर्धन, प्रदूषण, शेतकरी आत्महत्या या मुद्दांवरही सध्या त्यांचं काम सुरू आहे. या बरोबर गंगाघाट परिसरातील व रस्त्यावरील बेघर अनाथ मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी या मुलांना एकत्र करत जवळच्या महापालिकेच्या शाळांमध्ये त्यांचा प्रवेश घेऊन देण्यापासून त्यांना शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यापर्यंत सर्व लढाई ही मंडळी नेटाने लढतात.
गोपाळकाल्याच्या दिवशी तरूणाईच्या उत्साहाला उधाण आलेलं असतांना वृध्दाश्रमातील मंडळींसोबत हा ग्रुप दहिहंडीचा आनंद लुटतो. व्हॅलेन्टाईन डेचं सेलिब्रेशनही वृध्दाश्रम आणि अनाथआश्रमात ठरलेलं असतंच. 

- प्राची उन्मेष.

Monday, 16 July 2018

‘दशावतारी’ मुली

२० मे २०१८. मसुरे शाळा नंबर १ मधल्या विद्यार्थिनींच्या ‘भक्तीमहिमा’ या नाटकाचा २९ वा प्रयोग रंगला होता. ही शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातली. आणि हे नाटक दशावतारी. तेही ११ ते १४ वयोगटातल्या मुलींनी केलेलं.शंकराची भक्ती करून पाताळकेतू अमरत्वाचं वरदान मिळवतो. पुढे, अमरत्वाचा गर्व होऊन प्रजेवर अत्याचार करतो. प्रजारक्षणासाठी राजा चंद्रसेन आणि युवराज सत्यव्रत पाताळकेतूबरोबर युद्ध करतात. पाताळकेतू त्यांचा पराभव करतो. शेवटी राजाला नारदमुनी सांगतात की, पाताळकेतूचं मरण आदिमायेच्या हातूनच होईल. अखेरीस, आदिमाया प्रसन्न होते आणि पाताळकेतूचा नाश करते. हे या नाटकाचं कथानक. लेखक दत्तप्रसाद पेडणेकर. दिग्दर्शक विनोद कदम. निर्माता बाळासाहेब गोसावी.या नाटकाने बरेच विक्रम केले. दशावतार हा सिंधुदुर्गातला लोकप्रिय लोककला प्रकार. प्रत्येक गावी, ग्रामदेवतेच्या जत्रेत विविध दशावतारी मंडळं आपआपली कला सादर करतात. आजवर पुरूष कलावंतांनी जपलेला जिल्ह्याचा हा सांस्कृतिक वारसा आता या मुलींनी पुढे नेणं, हे खासच.
या नाटकाच्या २७ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या पहिल्या प्रयोगाला मुलींना तब्बल ६५ हजाराची रोख बक्षिसं प्रेक्षकांकडून मिळाली. या रकमेतून शाळेतल्या गरीब मुलांचा शैक्षणिक आणि आरोग्यविषयक खर्च करायचा, त्यांचे वाढदिवसही साजरे करायचे, असं ठरवून नाट्यसंचाने आजवर २९ नाट्यप्रयोग केले.
नारदाची भूमिका करणार्‍या वैभवीने स्वतःला मिळालेल्या पंचवीस हजाराच्या बक्षिसाच्या रक्कमेत घरचे पाच हजार घालून शाळेतल्या रंगमंच उभारणीला हातभार लावला. चिंतनी या विद्यार्थिनीने स्वतःला मिळालेल्या बक्षिसातून शाळेला समई भेट म्हणून दिली. एकत्रित मिळालेल्या रकमेतून शाळेतल्या मुलांना पंचवीस हजाराच्या वह्यांचं वाटप केलं. सर्व खर्च भागून शिल्लक राहिलेल्या एक लाख रुपयांतून शाळेतल्या होतकरू मुलांना मदत करायची, असंही कलाकार मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी ठरवलं आहे.
नाटकात काम करणार्‍या संचिताने तिला मिळालेली ५ हजाराची रक्कम आपल्या वडिलांकडे दिली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण, एवढी मोठी एकत्रित रक्कम त्यांनी कधी पाहिलीच नव्हती. आपल्या मुलीने अभिनयाच्या जोरावर मिळवलेले ५ हजार त्या कुटुंबासाठी लाख मोलाचे होते .
मसुरे केंद्रशाळेने श्रेया शिंगरे ,निकिता बागवे, कोमल गोलतकर, रिया गिरकर, संचिता जाधव, समृद्धी शेडगे, स्नेहल बागवे, वैभवी पेडणेकर, चिंतनी पेडणेकर, वैष्णवी दळवी, निशा सोलकर या ‘दशावतारी’ विद्यार्थिनींचा सत्कारही केला. या मुलींनी नाट्यकला सादर केली म्हणून त्यांचं कौतुकच. आणि मिळालेली बक्षिसाची सगळी रक्कम त्यांनी शाळेला, शाळेतल्या गरजू मुलामुलींना देऊ केली यासाठी खूप खूप कौतुक.

- विजय पालकर.

Tuesday, 10 July 2018

दोन्हीही हात नाहीत, पण पायाने पेपर लिहून मिळवालेे 75 टक्के

पालघर जिल्ह्यातल्या कल्लाळे इथला कल्पेश विलास दौडा. जन्मतःच दोन्हीही हात नाहीत. मात्र त्याचा कुठेही बाऊ नाही. शिकायची जात्याच आवड. जिद्दीनं तो अक्षरं गिरवायला शिकला. संपूर्ण लिखाण तो पायानेच करतो. पायानेच गोलंदाजी करत क्रिकेटचीही आवड त्यानं जोपासली आहे . बोईसरजवळच्या बेटेगाव इथं आदिवासी विकास प्रकल्पाची त्याची आश्रमशाळा. शाळा तीन किलोमीटरवर. जायला रस्ता नाही. दररोजची सहा किलोमीटर ये-जा. पावसाळ्यात तर चिखल तुडवत शाळा गाठायची.
घर कुडाचं. घरात आई-वडील दोन बहिणी. कमावणारे वडील एकटेच. बोईसरमधल्या कारखान्यात १२ तास ड्युटी. दारिद्र्यरेषेखालच्या यादीत त्यांचं नाव नाही. सरकारी योजना अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. मात्र, परिस्थितीचा त्याच्याकडून, कुटुंबाकडून कोणताही बाऊ नाही. परिस्थितीवर मात करून कल्पेशनं यंदा दहावीच्या परीक्षेत ७५. ४० टक्के घवघवीत यश मिळवलं आहे. आता तरी त्याला त्याच्या हक्काची मदत मिळावी, असे प्रयत्न करायला हवेत. 
- सचिन भोईर.

मातामृत्यू दर कमी करण्यात देशात केरळपाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक. राज्याचा दिल्लीत गौरव.मातामृत्यू दर कमी करण्यात देशात केरळपाठोपाठ महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यात मातामृत्यूचं प्रमाण ६८ वरून ६१ वर आलं आहे. गेल्या तीन वर्षात हे प्रमाण १०. ६ टक्क्यानं कमी झालं आहे. राज्यातील आरोग्ययंत्रणेच्या याच कामगिरीचा गौरव केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केला आहे. केरळमध्ये हजार गर्भावती स्त्रियांमागे ४६ मातांचा मृत्यू होतो तर महाराष्ट्रात हे प्रमाण ६१वर आहे. हेच प्रमाण देशात १०३ आहे. मातामृत्यूचं प्रमाण लक्षणीय कमी केल्यामुळे युनिसेफनेसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं महाराष्ट्राची दखल घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला वर्ष 2030 पर्यंत प्रत्येकी 1000 गर्भवती महिलांमागे 70 पर्यंत मृत्यूदर कमी करण्याचं लक्ष्य दिलं आहे.
या कामगिरीबाबत महाराष्ट्राचा नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्य सरकार गर्भावती महिलांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करत असून या सुविधा सक्षम करण्यावर भर असल्याचं आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी दिल्लीतल्या सत्कार सोहळ्यात सांगितलं. 

-प्रशांत परदेशी 

गेल्या ११ वर्षात सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेच्या मार्गदर्शनाचा फायदा. तीन हजारांहून अधिक तरुणांना २१व्या वर्षीच नोकरी

2013-14 चा सुमार. एम.एड पूर्ण झालं होतं. नेट-सेट पास झालो होतो. तरी नोकरी मिळत नव्हती. घरची गरिबी. वडील लहानपणीच वारले होते. घरात आई, 3 भाऊ न बहीण. खूप निराश होतो, पण शांतपणे विचार करत गेलो न मार्ग सापडला. त्यावेळी वाटलं, वेळीच कोणाचं तरी मार्गदर्शन मिळालं असतं तर.... आजूबाजूला माझ्यासारखे अनेक होते. सोलापूर विद्यापीठात एमएड करत असताना प्रमोद कारंडे यांच्याशी मैत्री झाली होती. प्रमोदच्या घरची स्थितीही माझ्यासारखीच. दिवसभर काम आणि रात्री शिक्षण. वर्ष २००६ मध्ये छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात प्रवेश. स्वतः अनंत अडचणी भोगल्यामुळे त्यांनाही बरोबरीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणीचीही जाणीव.
साधा स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा, तो कुठे जमा करायचा, हेही काही विद्यार्थ्यांना समजायचं नाही. वर्षभराची स्कॉलरशिप जायची. त्यामुळे दरिद्रयात आणखीनच भर. कॉलेज सोडावं लागायचं. प्रमोद यांनी या विदयार्थ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आम्ही समविचारी मित्र एकत्र आलोे. डिसेंबर 2006 मध्ये श्री साईनाथ बहुउद्देशीय संस्थेची स्थापना झाली. गेल्या ११ वर्षात सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेच्या मार्गदर्शनाचा फायदा, तीन हजारांहून अधिक तरुणांना २१व्या वर्षीच नोकरी, हे घडलं. मीही या संस्थेबरोबर काम करू लागलो. शैक्षणिक सवलती मिळवून देणं, शिकत असताना काम करून पैसे कमावण्याची सवय लावणं, त्यांचं मनोधैर्य वाढवून शिक्षणाची जिद्द निर्माण करणं ... हे काम आता फक्त रात्र महाविद्यालयातल्या मुलांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. वंचित, अपंग, गरीब मुलांसाठी १०-१२वी परीक्षांसाठी मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन, स्पर्धापरीक्षा प्रोत्साहन मार्गदर्शन, रेल्वे भर्ती, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी यासाठी मोफत मार्गदर्शन. स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनातून ५० हून अधिक मुलांना विविध खात्यात नोकरी मिळाली.
प्रमोद कारंडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी पेशानं शिक्षक. कारंडे सर सध्या बालकामगार प्रकल्प इथं बालकामगार मुलांना शिकवतात. त्याचबरोबर विडी कामगार, वीट कामगार, घरकाम करणार्‍या महिलांना त्यांच्यासाठीच्या सरकारी योजनांची माहिती देतात. गणेश माने, श्रीकांत सायबोळ, शिवाजी नलवडे, अतुल यादव, अतुल सोनके, रवी चव्हाण, दिनेश बंडगर संस्थेचे खंदे सदस्य. कार्याचा खर्च सदस्य स्वतःच्या मिळकतीतूनच करतात. संस्थेचं काम पाहून अनेक नागरिकांनी संस्थेला साहाय्य दिलं आहे. पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करण्याची पद्धतही आगळी. गेल्या वर्षी सचिव गणेश माने यांच्या वाढदिवसानिमित पोतराजाची दोन मुलं दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च संस्थेनं उचलला. खरंच, उत्तीर्ण मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद लाखो रुपयांपेक्षा जास्त मोलाचा वाटतो.
- तय्यब शेख.

रानभाज्या खा, आरोग्य सुधारा


खरंतर आमचं कोकण म्हणजे आंबा- काजू- फणस अशा घनदाट झाडांचं आगरच. पण गेल्या काही वर्षांपासून शहरीकरणाच्या नादात कोकणातही बेसुमार वृक्षतोडीचं पेव फुटलं आहे. याच वेगानं झाडं तोडली जाऊ लागली तर एकेकाळचं समृद्ध कोकण दुष्काळग्रस्त व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून झाडं तोडणाऱ्याला शक्य तितका विरोध करा, पण ते शक्य नसेल तर वैयक्तिक पातळीवर घराच्या आवारात किमान दोन तरी मोठी झाडं लावा, असं आवाहन मी विद्यार्थ्यांना केलं. त्यानुसार अनेक
 विद्यार्थ्यांनी आपल्या घरी नारळ, पोफळी, आंबा, फणस, काजू, साग इ. वृक्षांची रोपं लावली आहेत. या शिवाय आम्ही बीजबँकेचा एक उपक्रमही केलेला आहे. त्यात उन्हाळ्याच्या सुटीत मुलांनी गोळा केलेल्या आंबा, फणस, जांभूळ, बोर, लिंबू यांच्या बिया पाऊस सुरू झाला की गावाला जाताना एसटीतून रस्त्याच्या कडेला मुलं बिया फेकतात.
निसर्गात रमणं कोणाला आवडत नाही?! विद्यार्थ्यांनाही निसर्गपर्यटनाची गोडी लावण्यासाठी आमच्या शाळेतर्फे दरवर्षी वर्षा सहलीचं आयोजन केलं जातं. आमच्या वरवडे गावाजवळच जानवली आणि गड या नद्यांचा संगम आहे. संगमाकडे जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता आहे, पण आम्ही मुद्दाम झाडाझुडूपांमधून पायवाटेने नेतो. गावाच्या जवळच 2-3 किमीवर हा संगम आहे. या वर्षासहलीत गावातले जुने जाणते, वृद्ध लोकही सोबत घेतो. जंगल म्हणावं इतकी दाट झाडी या वाटेवर आहे. जंगलातून जाताना साग, हिरडा, बेहडा, मोह अशा नानाविध झाडांची आणि भारद्वाज, वेडा राघू, कोतवाल, नाचण, धनेश अशा पक्ष्यांची ओळख आम्ही मुलांना करून देतो. सगळ्यात शेवटी संगमावर जाऊन शिक्षकांच्या देखरेखीखाली मुले पाण्यात मनसोक्त खेळतात आणि घरून आणलेला डबा खाऊन सहलीची सांगता होते.


पर्यावरण संवर्धनाचा आमचा आणखी एक अनोखा उपक्रम म्हणजे रानभाज्यांची ओळख. कोकणात पावसाळ्यात वेगवेगळ्या रानभाज्या उगवतात. आरोग्यासाठी त्या त्याच मोसमात खायलाही हव्यात, पण नव्या पिढीला त्यांची नावेही माहिती नाहीत. आमच्या शाळेजवळच्या रस्त्यावर घाडीआज्जी दर पावसाळ्यात या बहुमोलाच्या रानभाज्या विकतात. त्यांना मी एकदा शाळेत यायचं निमंत्रण दिलं आणि त्यांचा सन्मान करून मुलांना रानभाज्या, त्यांची नावं आणि उपयोग यांची माहिती द्यायला लावली. घाडी आज्जींनी भारंगी, टाकळा, कुर्डू या रानभाज्यांची तसेच कुडाच्या शेंगा, शेवग्याचा पाला यांच्या औषधी उपयोगाची ओळख करून दिली. वेगवेगळ्या व्याधींवर या भाज्या कशा उपयोगी आहेत हे सांगितलं. प्रत्येक ऋतुनुसार खानपान ठेवले आणि पुरेशी मेहनत केली तर आरोग्य चांगले राहते, हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणावरून पटविलं.
- ऋजुता चव्हाण.

Saturday, 7 July 2018

डिलिव्हरी इथेच व्हायला हवी...

“बाहेर खाजगी हॉस्पिटलला सिझेरियन शस्त्रक्रियेला ५०-६० हजार रुपये खर्च येतो आणि इथं मात्र कित्येकदा नॉर्मल प्रसूती होते. हे आता लोकांना कळलं आहे. त्यामुळे लोक विश्वासाने इथं येतात.” डॉक्टर सांगत होते, “कित्येकदा नॉर्मल प्रसूती होण्यातही अडचणी येतात तेव्हा पेशंटला तसं सांगावं लागतं. पण पेशंट हट्ट करतात की, डिलिव्हरी इथेच व्हायला हवी, आमच्या जबाबदारीवर आम्ही इथं दाखल होतो. अशा वेळी, आम्हांला त्यांना समजावून सांगावं लागतं. आणि पुढे ससूनला पेशंट पाठवला जातो.” पेशंट्सचा इतका विश्वास कमावलेल्या, महाराष्ट्रात रोल मॉडेल ठरलेल्या एका प्राथमिक आरोग्य केंद्राची ही गोष्ट. डॉक्टर सांगतात, “एक पेशंट इथं प्रसूतीसाठी आली होती. बाळ पायाळू होतं. इथं तिची नॉर्मल प्रसूती झाली. कुटुंबाला आनंद झाला. आणि त्यांनीच, डॉक्टर, तुम्हांला काय बक्षीस द्यायचं, असं विचारलं”. डॉक्टर म्हणाले, “तुम्ही पुन्हा इथं आलात, तर तुम्हांला स्मरण राहावं असं काही तुम्ही या केंद्रासाठी करा. मग त्या कुटुंबाने दवाखान्याची बाहेरची जागा नीट करून दिली.” सीसीटीव्ही कॅमेरा, फर्निचर, इथली मशिनरी हे सगळं गावकऱ्यांनी भेट दिलेलं आहे. 
पुणे जिल्ह्यातलं लोणी काळभोर. पुण्याहून जेमतेम ११ किलोमीटरवरचं गाव. लोकसंख्या २२ हजाराच्या आसपास. इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रवेश करताच डाव्या हाताला छान रेखीव बाग. आजूबाजूला स्वच्छता. दवाखाना पेशंट्सनी भरलेला. तरीही गडबड, गोंधळ नाही. सर्व काम शिस्तीत सुरु. दवाखान्यात शिरल्यावर जागोजागी माहिती देणारे फलक. औषधं कोणती, किती शिल्लक आहेत, त्याची एक्सपायरी डेट काय आहे याचाही बोर्ड दिसतो. इथले आरोग्यअधिकारी डॉ डी.जे. जाधव समरसून सांगत होते, “मला इथं येऊन आता सहा वर्ष झाली. आधी इथं ७० ते ८० पेशंट्सची ओपीडी असायची. माझ्या काळात २५० ते २६० ओपीडी व्हायला लागली. दर महिन्याला ८०-९० प्रसूती होतात. तर वर्षभरात ७० हजाराच्या आसपास पेशंटवर उपचार केले जातात. चांगली वागणूक, योग्य सेवा, २४ तास डॉक्टरांची उपलब्धता. 
हे सगळं घडलं कसं? लोकांचा सहभाग आणि त्यांची वस्तुरूपी मदत, यामुळे या केंद्राचा कायापालट घडला. केंद्रात प्रवेश करताच डावीकडे दिसणारी छोटेखानी बाग इथल्या लोकांमुळे उभी राहिली आहे. एकेका पेशंटनी आणून दिलेली झाडं आणि दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन डॉक्टरांनी बाग उभी केली आहे. इथं गरोदर मातेची नोंद १२ आठवड्यांच्या आत केली जाते. त्यामुळे सुरुवातीपासूनच तिला योग्य मार्गदर्शन केलं जातं. प्रत्येक आठवड्याला गर्भवतींसाठी शिबीर घेतलं जातं. त्यावेळी प्रत्येक मातेला डॉक्टरांचा, अब्म्युलन्सचा आणि इथल्या सिस्टरचा फोन नंबर दिलेला असतो. कधीही काहीही त्रास वाटला तर गरोदर माता फोन करून विचारू, मदत घेऊ शकते. अति जोखमीच्या मातेची स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करून घेतली जाते. त्यांची नऊ महिन्यांच्या काळात योग्य काळजी घेऊन नॉर्मल प्रसूती होणार असेल तर या केंद्रात, एरवी, त्यांना ससून हॉस्पिटलला पाठवलं जातं. 
डॉक्टर सांगतात, गर्भवतींना प्रसूतीसाठी आणणं, प्रसुतीनंतर घरी सोडणं, मातेला सकस आहार, आई-बाळासाठी कपडे, स्वच्छतेची साधनं यासह कमी वजनाच्या बाळासाठी रेडिएन्ट वॉर्मर सुविधा इथं आहे. एकूण बारा प्रकारच्या रक्ततपासणीसाठी अद्यावत प्रयोगशाळा, नेत्र तपासणी कक्ष, मधुमेह आणि ऊच्च रक्तदाब तपासणी, ट्रॅक्शन सुविधा ते अगदी कुष्ठरोग, क्षयरोग, मलेरीया, डेग्यू, चिकनगुनिया, टायफॉइड इत्यादी आजार असलेल्या रूग्णांवरही येथे उपचार केले जातात. २०१६ साली या प्राथमिक आरोग्य केंद्राची नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर (NABH) या राष्ट्रीय नामांकनासाठी निवड झाली आहे. 

मराठवाड्याची हिमकन्या

''गेल्या वर्षी जिथून माघारी फिरावं लागलं होतं, तिथंच ऑक्सिजन सिलेंडरचा रेग्युलेटर बिघडला. दुरुस्त करता करता एका गिर्यारोहकाचा धक्का लागून तो पडलाच. तो पुन्हा मिळणं शक्य नव्हतं. हिलरी स्टेप- एव्हरेस्ट मोहिमेतला शेवटचा टप्पा. तिथून १७० मीटर अंतरावर होतं, गेल्या १० वर्षांपासून पाहत असलेलं स्वप्न. शेर्पानं सांगितलं , रेग्युलेटरसाठी माघारी परतावं लागेल. यंदा मात्र माघारी जायचं नव्हतं. अजून दोन तास लागणार होते. शेवटी शेर्पाचा ऑक्सिजन मास्क दोघांमध्ये अर्धा अर्धा तास वापरत शिखर गाठलं. तारीख होती २१ मे , वेळ सकाळचे ८ वाजून १० मिनिटं. आयुष्यातला अत्युच्य आनंदक्षण.'' जगातलं सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करणारी मराठवाड्यातली पहिली महिला गिर्यारोहक मनीषा वाघमारे सांगत होती.
मनीषा मूळची परभणीची. गांधी विद्यालयात १० वी तर ज्ञानोपासक महाविद्यालयात १२ वी पर्यंतचं शिक्षण. आई-वडील, चार बहिणी, एक भाऊ. वडील जयकिशनराव चतुर्थ श्रेणी कर्मचारी. ते आणि मनीषा दोघेही व्हॉलीबॉलपटू. शिवछत्रपती पुरस्काराची ती मानकरी. मनीषा सध्या औरंगाबादमधल्या इंदिरा पाठक महिला महाविद्यालयात क्रीडा विभागप्रमुख.
इंडियन कॅडेट फोर्सच्या शिबिरादरम्यान २००५ च्या सुमाराला गिर्यारोहणाचा ध्यास निर्माण झाला. नोव्हेंबर २०१४ पासून 'मिशन गो फॉर सेव्हन समिट एक्सपेडिशन' अंतर्गत सात खंडांमधल्या सात सर्वोच्च शिखरांवर राष्ट्रध्वज फडकावण्याची तयारी सुरू. मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एव्हरेस्टखेरीज माऊंट किलीमांजारो, माउंट एलबर्स आणि ऑस्ट्रेलियातील माऊंट कोर्सिस्को व ऑसी 10 ही शिखरं पादाक्रांत. माउंट कोर्सिस्को व ऑसी 10 सर करणाऱ्या पहिल्या भारतीय टीममध्ये मनीषा होती. एशियन अ‍ॅडव्हेन्चर कंपनीतर्फे मग एव्हरेस्टसाठी निवड. १३ महिन्यांचं खडतर प्रशिक्षण. गेल्या वर्षी हिमवादळामुळे स्वप्न अपुरं राहिलं. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे फुप्फुसांचा संसर्ग, रुग्णालयातले उपचार. या साऱ्यातून ती १५ एप्रिलला पुन्हा जिद्दीनं मोहिमेसाठी रवाना झाली. ५६ दिवसांच्या मोहिमेमध्ये ४० दिवस रोटेशन्स. १७ मेच्या मध्यरात्रीपासून बेस कॅम्पवरून चढाईला सुरुवात केली. ६२ दिवसांची मोहीम अवघ्या ५१ दिवसात पूर्ण. शेर्पा दावत शेरींगच्या मदतीमुळेच मोहीम फत्ते झाल्याचं मनीषा सांगते. त्याचबरोबर आजवरच्या संपूर्ण वाटचालीत मामा भीमराव खाडे यांचा मोठा वाटा असल्याचं ती आवर्जून सांगते. गेल्या वर्षी मोहिमेसाठी कर्ज घेतलं होतं. यंदा या मोहिमेसाठी औरंगाबादमधल्या महात्मा गांधी मिशननं १५ लाख रुपये तर कॉलेजनं ४ लाख रुपये दिले. इतरही काही सामाजिक संस्था, व्यक्तींनी मदत केली.मनीषाचं पुढलं लक्ष्य आहे उत्‍तर अमेरिकेतील डेनाली शिखर.
(एव्हरेस्टवीर मनीषा वाघमारे- संपर्क क्रमांक-9923249815)

गौताळा आज मोकळा श्वास घेत आहे....

औरंगाबाद शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर वसलेलं गौताळा अभयारण्य. सातमाळ्याचे उंच डोंगर, दऱ्या ,आकाशाला भिडणारी असंख्य झाडं, नाले, झरे आणि तळ्यांनी औरंगाबाद - जळगाव सीमेवरचं हे समृद्ध जंगल. 54 प्रजातींचे प्राणी तर 230 प्रजातींचे पक्षी. नीलगायी, बिबट्या, अस्वल, हरीण, तरस, लांडगे, रानडुक्कर या जंगलाचं वैशिष्ठय. आणखी एक विशेष म्हणजे हे जंगल पूर्णपणे प्लॅस्टिकमुक्त आहे. 
याचं श्रेय वनाधिकारी रत्नाकर नागपूरकर यांना. राज्यात प्लॅस्टिकमुक्तीची घोषणा होताच नागपूरकर यांनीही जंगलात तातडीनं अंमलबजावणी सुरू केली. प्लॅस्टिक जंगलात न्यायला पूर्णपणे बंदी. पाण्याच्या बाटल्यांसाठी 10 रुपये डिपॉझिट. आत जाताना वॉचमनला बाटल्या दाखवायच्या, कुपन घ्यायचं. परत आल्यावर नेलेल्या सगळ्या बाटल्या परत आणून दाखवायच्या आणि डिपॉझिट परत घ्यायचं. यामुळे प्लॅस्टिकचा नवीन कचरा थांबला.जंगलात आधीचा कचरा वेचण्यासाठी नागपूरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जंगल अक्षरशः पिंजून काढलं. या मोहिमेत प्लॅस्टिकच्या तब्बल 15 हजार बाटल्या जमा झाल्या. त्या प्लॅस्टिक कचरावेचकांकडे देण्यात येत आहे. त्यातून त्यांचंही अर्थार्जन होत आहे.
जंगलाची नीट पाखरण करणारे वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे गौताळा आज मोकळा श्वास घेत आहे. असं करणं शक्य आहे, बघा. 

प्लीज, आमच्या शाळेत तंबाखू खाऊ नका....

“ एकदा असं झालं, शाळेत आलेल्या पाहुण्यांनी चहापाणी झाल्यावर हळूच गायछापची पुडी काढून तंबाखू मळायला सुरुवात केली. तेव्हा स्वागत करणार्‍या विद्यार्थी प्रतिनिधीने पुढे येऊन ‘सर, शाळेत तंबाखूवर बंदी आहे, प्लीज, इथे तंबाखू खाऊ नका. हवंच असेल, तर तुम्ही बाहेर जाऊन खाऊ शकता.’ असं स्पष्ट शब्दांत सुनावलं. हे ऐकून तो पाहुणाही वरमला.” बीडच्या गेवराई तालुक्यातल्या पंचाळेश्वर जिल्हा परिषद शाळेतला हा किस्सा. मुख्याध्यापक नामदेव चौधार यांनी सांगितला. त्यांनी सांगितलं, “आमच्या शाळेत तर कुठल्याही व्यसनावर बंदी आहेच पण विद्यार्थी घरीसुद्धा पालकांना व्यसन करू नका, असं विनवतात. यामुळे अनेक पालकांनी व्यसन सोडलं आहे. पालकांनी जरी पैसे देऊन गुटखा किंवा बिडी/ सिगारेट आणायला सांगितली, तर विद्यार्थी त्याच पैशाचे गोळ्या- चॉकलेट घेऊन शाळेत आणतात.’ शाळेतल्या व्यसनबंदीचं भान विद्यार्थ्यांना किती आहे, हे यातून कळतं. या शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम इतक्या चांगल्या प्रकारे पटवून दिले आहेत, की विद्यार्थी आपल्या पालकांना कसलंच व्यसन करू देत नाहीत, त्यामुळे पंचाळेश्वर गावही जवळपास तंबाखूमुक्त झालं आहे. अशा जागरूक विद्यार्थ्यांमुळेच पंचाळेश्वर शाळेला 2017 साली ‘तंबाखूमुक्त शाळा’ पुरस्कारही मिळाला आहे. 
पंचाळेश्वर शाळेत सध्या विद्यार्थी आहेत 90. शिक्षक मात्र दोनच. त्यामुळे एका वेळी दोन- तीन वर्गांना शिकवावं लागतं. या अडचणीतूनही त्यांनी मार्ग काढला आहे. ज्ञानरचनावादी कार्डस् आणि खेळांचा शिक्षक शिताफीने वापर करून घेतात. शाळेत मराठी, इंग्रजी, गणित इ विषयांसाठी सुमारे 90 रचनावादी ट्रेज आहेत. त्यात प्रत्येक इयत्तेला अनुसरून त्या- त्या विषयाचे साहित्य उदा. शब्दपट्ट्या, अंक ठोकळे, दशकमण्यांच्या माळा, रंगीबेरंगी चित्रे असलेली कार्ड, जिगसॉ पझल्स असं भरपूर शैक्षणिक साहित्य आहे. आणि हे साहित्य नामदेव चौधार सर, भरत पोपळे सर आणि आधी या शाळेत कार्यरत असणाऱ्या सचिन खिल्लारे सरांनी स्वहस्ते बनविलेलं आहे, हे विशेष. शाळेतल्या संगणकावर टायपिंग करून, प्रिंट काढून, शाळेतल्या लॅमिनेशन मशीनवर ते लॅमिनेट करण्यात ये्तं. त्यामुळे शिक्षक जर एखाद्या वर्गाला शिकवीत असतील तर दुसरा वर्ग या शैक्षणिक साहित्याच्या मदतीने स्वयंअध्ययन करू शकतो. अशी ही पंचाळेश्वरची स्वयंपूर्ण शाळा! अनुकरणीयदेखील.
चौधर सरांचा नंबर- +91 94042 50586

एक धागा सुखाचा

बीड तालुक्यातील पाली गावाजवळचा डोंगर. इथला आंनदवन प्रकल्प. एचआयव्हीसह जगणाऱ्या मुला-मुलींचा दत्ता आणि संध्या बारगजे हे जोडपं अकरा वर्षांपासून सांभाळ करत आहे. सध्या इथं ६५ मुलं असून त्यात ३७ मुली आहेत. दत्ता बारगजे म्हणतात, “शिक्षणासोबत आनंदवनातील मुलं स्वत:च्या पायावर उभी राहावीत, यासाठी शिक्षण,पालनपोषण यासोबत. त्यांना शिलाई प्रशिक्षण द्यायचं सुचलं.” मुंबईतले सामाजिक सल्लागार टी.एन.व्ही अय्यर यांनी चार वर्षापूर्वी ६० हजार रूपये किंमतीच्या १२ शिलाई मशीन खरेदी करून आंनदवनला मोफत भेट दिल्या. मुलांनी शिक्षण सांभाळून शिवणकामाचे धडे घ्यायला सुरूवात केली. फिरोजा, आसमा, पूजा, अर्चना, कोमल, तुषार, निखील, अभिजीत ही मुलं आता शिवणकामात तरबेज झाली आहेत. त्यातून मुलं सध्या बंडी, झबलं, पॅन्ट, शर्ट, पेटीकोट, कापडी पिशव्या, उशाच्या खोळी तयार करू लागली आहेत. आजूबाजूच्या परिसरातील शेतकरीही आता या मुलांकडून विजार, खमीस, कोपरी, कानटोपी शिवून घेतात. 
आंनदवनात लाकूड आणि कपड्यात विणलेले झोकेही तयार केले जातात. जुन्या साड्यांपासून विणलेली पायपुसणी प्रकल्प पाहायला आलेल्या पाहुण्याला भेट दिल्या जातात. औषधं, गोळ्या ठेवण्यासाठी कागदी पॉकेटही मुलं तयार करत आहेत.
एचआयव्हीबाबत जनजागृती करण्यासाठी ते ग्रिटींग कार्ड तयार करतात. दरवर्षी जागतिक एड्स दिनी बीडच्या बसस्थानकात त्यांच्या ग्रिटींग कार्ड्सचं प्रदर्शन भरवण्यात येतं. धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जा-ये करणारे ट्रकचालक, क्लिनर्स यांचं आनंदवनकडून एडसबाबत समुपदेशन केलं जातं. 
आता ही मुलं मार्गी लागत आहेत. तुषार प्लंबिंगचं, अभिजीत बांधकाम व्यवसायाचं आणि निखील काॅम्प्युटरचं प्रशिक्षण बी्डमधल्या शासकीय आयटीआयमध्ये घेत आहे. ज्योतीने अकरावी सायन्सची परिक्षा दिली आहे. नितीन, निलेश, चतुरा, अर्चना, कोमल, सोनी यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. ही मुलं आज स्वत:च्या पायावर उभी राहत असल्याने, आनंद वाटत असल्याचं बारगजे बोलून दाखवतात. एचआयव्हीने या मुलांच्या आयुष्यात दुःख आणलं असलं तरी आनंदवनाने त्यात एक धागा सुखाचा गुंफला आहे.
दत्ता बारगजे संपर्क क्र. - 9422693585