Saturday 7 July 2018

डिलिव्हरी इथेच व्हायला हवी...

“बाहेर खाजगी हॉस्पिटलला सिझेरियन शस्त्रक्रियेला ५०-६० हजार रुपये खर्च येतो आणि इथं मात्र कित्येकदा नॉर्मल प्रसूती होते. हे आता लोकांना कळलं आहे. त्यामुळे लोक विश्वासाने इथं येतात.” डॉक्टर सांगत होते, “कित्येकदा नॉर्मल प्रसूती होण्यातही अडचणी येतात तेव्हा पेशंटला तसं सांगावं लागतं. पण पेशंट हट्ट करतात की, डिलिव्हरी इथेच व्हायला हवी, आमच्या जबाबदारीवर आम्ही इथं दाखल होतो. अशा वेळी, आम्हांला त्यांना समजावून सांगावं लागतं. आणि पुढे ससूनला पेशंट पाठवला जातो.” पेशंट्सचा इतका विश्वास कमावलेल्या, महाराष्ट्रात रोल मॉडेल ठरलेल्या एका प्राथमिक आरोग्य केंद्राची ही गोष्ट. 



डॉक्टर सांगतात, “एक पेशंट इथं प्रसूतीसाठी आली होती. बाळ पायाळू होतं. इथं तिची नॉर्मल प्रसूती झाली. कुटुंबाला आनंद झाला. आणि त्यांनीच, डॉक्टर, तुम्हांला काय बक्षीस द्यायचं, असं विचारलं”. डॉक्टर म्हणाले, “तुम्ही पुन्हा इथं आलात, तर तुम्हांला स्मरण राहावं असं काही तुम्ही या केंद्रासाठी करा. मग त्या कुटुंबाने दवाखान्याची बाहेरची जागा नीट करून दिली.” सीसीटीव्ही कॅमेरा, फर्निचर, इथली मशिनरी हे सगळं गावकऱ्यांनी भेट दिलेलं आहे. 
पुणे जिल्ह्यातलं लोणी काळभोर. पुण्याहून जेमतेम ११ किलोमीटरवरचं गाव. लोकसंख्या २२ हजाराच्या आसपास. इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रवेश करताच डाव्या हाताला छान रेखीव बाग. आजूबाजूला स्वच्छता. दवाखाना पेशंट्सनी भरलेला. तरीही गडबड, गोंधळ नाही. सर्व काम शिस्तीत सुरु. दवाखान्यात शिरल्यावर जागोजागी माहिती देणारे फलक. औषधं कोणती, किती शिल्लक आहेत, त्याची एक्सपायरी डेट काय आहे याचाही बोर्ड दिसतो. इथले आरोग्यअधिकारी डॉ डी.जे. जाधव समरसून सांगत होते, “मला इथं येऊन आता सहा वर्ष झाली. आधी इथं ७० ते ८० पेशंट्सची ओपीडी असायची. माझ्या काळात २५० ते २६० ओपीडी व्हायला लागली. दर महिन्याला ८०-९० प्रसूती होतात. तर वर्षभरात ७० हजाराच्या आसपास पेशंटवर उपचार केले जातात. चांगली वागणूक, योग्य सेवा, २४ तास डॉक्टरांची उपलब्धता. 
हे सगळं घडलं कसं? 



लोकांचा सहभाग आणि त्यांची वस्तुरूपी मदत, यामुळे या केंद्राचा कायापालट घडला. केंद्रात प्रवेश करताच डावीकडे दिसणारी छोटेखानी बाग इथल्या लोकांमुळे उभी राहिली आहे. एकेका पेशंटनी आणून दिलेली झाडं आणि दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन डॉक्टरांनी बाग उभी केली आहे. इथं गरोदर मातेची नोंद १२ आठवड्यांच्या आत केली जाते. त्यामुळे सुरुवातीपासूनच तिला योग्य मार्गदर्शन केलं जातं. प्रत्येक आठवड्याला गर्भवतींसाठी शिबीर घेतलं जातं. त्यावेळी प्रत्येक मातेला डॉक्टरांचा, अब्म्युलन्सचा आणि इथल्या सिस्टरचा फोन नंबर दिलेला असतो. कधीही काहीही त्रास वाटला तर गरोदर माता फोन करून विचारू, मदत घेऊ शकते. अति जोखमीच्या मातेची स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करून घेतली जाते. त्यांची नऊ महिन्यांच्या काळात योग्य काळजी घेऊन नॉर्मल प्रसूती होणार असेल तर या केंद्रात, एरवी, त्यांना ससून हॉस्पिटलला पाठवलं जातं. 
डॉक्टर सांगतात, गर्भवतींना प्रसूतीसाठी आणणं, प्रसुतीनंतर घरी सोडणं, मातेला सकस आहार, आई-बाळासाठी कपडे, स्वच्छतेची साधनं यासह कमी वजनाच्या बाळासाठी रेडिएन्ट वॉर्मर सुविधा इथं आहे. एकूण बारा प्रकारच्या रक्ततपासणीसाठी अद्यावत प्रयोगशाळा, नेत्र तपासणी कक्ष, मधुमेह आणि ऊच्च रक्तदाब तपासणी, ट्रॅक्शन सुविधा ते अगदी कुष्ठरोग, क्षयरोग, मलेरीया, डेग्यू, चिकनगुनिया, टायफॉइड इत्यादी आजार असलेल्या रूग्णांवरही येथे उपचार केले जातात. २०१६ साली या प्राथमिक आरोग्य केंद्राची नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर (NABH) या राष्ट्रीय नामांकनासाठी निवड झाली आहे. 

No comments:

Post a Comment