Friday, 22 November 2019

काम मिळालं आणि स्थैर्यही

छत्तीसगड राज्यातील रायपूरमधील अभानपूर परिसरात मोहित साहू राहतात. त्यांचे वडील बांधकाम मजूर म्हणून काम करतात. आई गृहिणी आहे. मोहित धरून पाच भावंडे आहेत. त्यांच्या वडिलांना महिन्याला जेमतेम दहा रुपये उत्पन्न मिळतं. या तुटपुंज्या मिळकतीत एवढ्या मोठ्या कुटुंबाचा गाडा चालवणं केवळ अशक्य आहे. मोहितचे मोठे दोन भाऊ ऑफिसबॉय म्हणून कामाला लागले. मोहितने या परिस्थितीतही बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पण पुढचं शिक्षण घेणं त्याच्याकरता केवळ अशक्य होतं. त्यामुळे त्याने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. 
पण फक्त बारावीच्या आधारावर नोकरी मिळणं कठीण होतं. मग त्याने काही प्रशिक्षण घेऊन त्याआधारे नोकरी मिळवण्याचं ठरवलं. त्याला रायपूरमधील प्रथम प्लबिंग प्रशिक्षण सेंटरबाबत समजलं. या सेंटरला कोटक इंव्हेस्टमेंटकडून सहाय्य मिळतं. इंडियन प्लबिंग स्किल काऊन्सिल (आयपीएससी) यांची मान्यता या केंद्राला आहे. मोहितनं या सेंटरच्या दुसऱ्या बॅचमध्ये प्रवेश घेतला. 15 जानेवारी 2019 ते 15 मार्च 2019 या कालावधीत ही बॅच होती. आपल्या दोन महिन्याच्या प्रशिक्षणादरम्यान मोहितला प्लबिंगचे विविध स्तर आणि त्यात करावयाची कामं याबाबत सविस्तरपणे शिकवण्यात आलं. प्लबिंग क्षेत्राची सविस्तर माहिती, प्लबिंग क्षेत्राचा विकास आणि त्यातील नोकरी व व्यवसायाच्या संधी या सर्व गोष्टींची माहितीही मोहितला यावेळी सांगण्यात आली.
प्रशिक्षण वर्ग पूर्ण केल्यावर मोहितला रायपूरमधील मा वैष्णव टेक्निकल सर्व्हिसेस या कंपनीत सहाय्यक प्लंबर पदासाठी मुलाखतीकरता बोलावण्यात आले. त्याची निवड झाली. सध्या, मोहित या कंपनीत दरमहा साडेसात हजार मासिक वेतनावर काम करत आहे. त्याला कंपनीतर्फे निवासी व्यवस्थाही पुरवण्यात आली आहे.
प्रथम प्लम्बिंग कार्यक्रम प्रमुख शिवाजी कदम यांचा संपर्क क्र.- 99205 53319
- शिवाजी कदम, साधना तिप्पनाकाजे

शहराचं पोर्ट्रेट (इतिहासात डोकावताना)

इतिहास म्हणजे नेमकं काय? मला स्वतःला नेहमी असं वाटत आलंय की इतिहास म्हणजे अनादी काळापासून होत असलेल्या बदलांचं विविध प्रकारे निरीक्षण करणं, त्यांचा अभ्यास करणं. त्या बदलांना शांतपणे स्वीकारणं आणि त्या बदलांमागचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संदर्भ लक्षात घेणं. अर्थातच हे सगळं शहाणपण पुरातत्त्वशास्त्रात अनेक वर्ष घालवल्यावर आलेलं शहाणपण आहे. 
पीएचडीचं काम करताना मात्र असं लक्षात येत गेलं की शालेय वयात मुलांना मात्र काळ ही संकल्पना आणि त्यात होत गेलेले किंवा होत असलेले बदल कळणं थोडंसं अवघड जातं. विशेषतः सहावी सातवीतल्या मुलांना. त्यांची काळ ही संकल्पना फारफार तर ३०० वर्ष मागे जाते, तीसुद्धा इतिहासाच्या पुस्तकांमधील तारखा पाठ केलेल्या असतात म्हणूनच. काळ ही संकल्पना मुलांना सोपी करून सांगता येईल का हे बघण्यासाठी मग मी एक प्रयोग करून बघायचं ठरवलं. ह्यामध्ये दोन गोष्टी फार कटाक्षाने टाळल्या होत्या. ह्या प्रयोगामध्ये जो काळ वापरला जाणार होता तो ह्या मुलांपासून फार लांब नव्हता. प्रयोग करायच्या दिवसापासून फक्त २० वर्ष मागं जायचं हे ठरलं होतं. दुसरं महत्वाचं म्हणजे ह्या प्रयोगात जे ठिकाण वापरणार होते ते देखील लांबचं नव्हतं. ज्या गावातल्या शाळेमध्ये हा प्रयोग करणार होतो त्या बांद्र्याचाच वापर ह्या प्रयोगामध्ये होणार होता.
तर, प्रयोग असा होता: मुलांनी आपल्या आई, वडील, आजी, आजोबा, काकू, काका, मामी, मामा यांना आपल्या शहरामध्ये गेल्या २० वर्षात कायकाय बदल झाले ह्याबद्दल प्रश्न विचारायचे होते. सहज गप्पा मारायच्या होत्या. आणि जी माहिती मिळेल त्या माहितीवरून बांद्रा हे गाव २० वर्षांपूर्वी साधारण कसं दिसत असेल अशी कल्पना करायची होती. आणि त्या कल्पनेवर बेतलेलं शहराचं पोर्ट्रेट तयार करायचं होतं.
असा हा प्रयोग दोन भागात विभागलेला होता. एक दिवस शाळेत जाऊन मी या मुलांशी गप्पा मारल्या. काळ म्हणजे काय, इतिहास म्हणजे काय, तो कसा तुमचा आमचा, शाळेचा, गावाचा थोडक्यात प्रत्येकाचा असतो. इतिहासात फक्तच युद्ध होत नाहीत तर इतर अनेक गोष्टी कशा घडत असतात आणि त्या किती रंजक असतात ह्या सगळ्यावर मस्त चर्चा रंगली होती. मग मुलांना आम्ही करणार असलेल्या प्रयोगाविषयी सांगितलं. आई बाबांकडून माहिती कशी गोळा करायची, काय प्रश्न विचारायचे, कसे विचारायचे ह्याची काही उदाहरणं दिली. ह्या मुलाखतींची रंगीत तालीम झाली. आणि मग एका आठ्वड्यानंतर भेटायचं ठरवून मी तिकडून निघाले. आठवड्याभराने परत शाळेत गेल्यावर जमा केलेल्या माहितीचा गठ्ठा माझ्या स्वागताला मुलांबरोबर हजर होता. अतिशय मस्त गोष्टी जमल्या होत्या. काही वेळ त्या गोष्टींची देवाणघेवाण झाली. मुलाखती घेताना आलेले अनुभव सांगून झाले. आणि मग लागलो आम्ही सगळे कामाला. शहराचं पोर्ट्रेट करायला.
मुलांचे ४-५ गट तयार केले. जमलेल्या माहितीच्या आधारे प्रत्येक गटाने साधारण २० वर्षांपूर्वी बांद्रा कसं दिसत असेल ह्याच्या नोंदी काढायला सुरवात केली. त्या नोंदीवरून एक छोटासा रिपोर्ट तयार केला आणि मग शहराचं पोर्ट्रेट बनवायला सुरवात केली. मुलं ह्या सगळ्या कल्पनाविलासमध्ये पूर्ण रमून गेली होती. प्रत्येक गटाचं शहर वेगळं दिसत होतं. आणि असं असूनही प्रत्येक गटाचं शहरं खरं होतं. त्यात चूक किंवा बरोबर असं काही नव्हतं. २-३ तासांनंतर मुलांचं काम संपलं. मग अतिशय उत्साहात फोटो काढायचा कार्यक्रम पार पडला. आणि जाता जाता ह्या सगळ्या प्रयोगामुळे काय काय गोष्टी मुलांना जाणवल्या त्याबद्दल एक बहारदार चर्चा झाली. इतिहास एकच नसतो. तो फक्तच राजकीय नसतो. इतिहास फक्तच राजा राण्यांचा नसतो. इतिहास आपल्या शहराचा, आपल्या आजूबाजूच्या दुकानांचा, रस्त्याचा, शाळेचा, आजीचा, आजोबांचा आणि अशा अनेक इतर माणसांचा, प्राण्यांचा, झाडांचा आणि वस्तूंचा असतो. आणि अशा इतिहासाचं चित्रं काढायला मिळालं की अजूनच मजा येते. मग अशाच आणखी इतर गोष्टींचा इतिहास समजून घेण्यासाठी भेटायचं ठरवून मी त्या दिवशी मुलांचा निरोप घेतला. ll6ll

- डॉ.अनघा भट

तुमची मुलं निरोगी आहेत? (बातम्या : तुमच्या आमच्या मुलांच्या)

समाज निरोगी असावा यात कोणाचंच दुमत नाही. निरोगी समाज म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीचं शरीर आणि मनही निरोगी असणं. शरीर स्वस्थ तर मनही स्वस्थ राहण्यास मदत होते. महत्त्वाचं काय, तर शारीरिक आरोग्य. समाजाचा एक महत्त्वाचा घटक विद्यार्थी, तेच जर आरोग्याच्या विविध समस्यांनी ग्रासलेले असतील तर समाज सशक्त कसा काय घडेल? आणि जर ते विद्यार्थी पालिका शाळेतील असतील तर आणखीनच अवघड. कारण या विद्यार्थ्यांची जबाबदारी पालिकेची असते.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा वार्षिक अहवाल जाहीर केला. पालिकेच्या सगळ्या १,१८७ शाळांमधील सव्वा दोन लाख मुलांच्या आरोग्याची तपासणी वर्षभरात करून हा अहवाल तयार करण्यात आला. या मुलांपैकी ३४ हजार मुलांना दीर्घकाळ उपचारांची गरज आहे हे लक्षात आलं. पालिका शाळेत येणारी मुलं ही गरीब वस्त्यांमधून येतात. या मुलांना पोषण आहारात खिचडी दिली जाते. जीवनसत्त्वांची औषधंही दिली जातात. मुलांची दरवर्षी आरोग्यतपासणी केली जाते. तरीही ३४ हजार मुलं दीर्घकाळच्या आजारांना बळी पडतात. यातून स्पष्ट होतं की वार्षिक आरोग्य तपासणी गांभीर्याने घेतली जात नाही.
पालिका शाळांतील विद्यार्थ्यांपैकी तब्ब्ल सव्वा लाख विद्यार्थ्यांना दातांच्या समस्या असून सुमारे सात हजार मुलं कमी वजनाची आहेत. इतर आजार म्हणजे त्वचेच्या समस्या, नाक-कान घशाच्या तक्रारी, दृष्टिदोष अश्या विविध समस्या विद्यार्थ्यांना असल्याचं अहवालातून पुढं आलं. अशा आजारांमध्ये ही मुलं अभ्यास कसा करत असतील? त्यांचे पालक किती स्वस्थ असतील, हे प्रश्न मनात येतातच. कारण या मुलांचे पालक कुठे ना कुठे तरी कष्टाची कामं करत असतात. त्यांची मुलं आजारी असतील, तर ते आपल्या कामात योग्य योगदान देऊ शकतील का? समाज हा अनेक व्यक्तींचा, अनेक कुटुंबांचा आणि समाजातील अनेक घटकांचा मिळून बनलेला असतो. त्यातील एक जरी घटक दुबळा असेल तर समाजस्वास्थ्य कसं बरं टिकेल? पालिका शाळांमधून शिकून आलेल्या मुलांचं म्हणणं आहे की ही थातुरमातूर तपासणी असते. तपासताना भराभर तपासलं जातं. काहीही चौकशी न करता पुढच्या मुलाला तपासायला घेतलं जातं. अमन नावाच्या मुलाने मुलाखतीद्वारा हे माध्यमांसमोर सांगितलं. भविष्यात हेच विद्यार्थी सर्वांगाने सशक्त नागरिक होणार असतात. त्यांचं योग्य पालनपोषण होणं समाजाच्या दृष्टीने चांगलंच ठरेल. 
- लता परब

दत्तक मैत्रीण

नाशिकमधली महानगरपालिकेची शाळा क्रमांक 18. तिथल्या शिक्षिका कुंदा बच्छाव. गेल्याच महिन्यात मनुष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. झिरो इन्व्हेस्टमेंट इनोव्हेशन फॉर एज्युकेशन इनिशिएटिव्ह या संस्थेच्या वतीनं. 
कुठलीही आर्थिक गुंतवणूक न करता माध्यमिक गटातल्या विद्यार्थ्यांची गळती कुंदा मॅडमनी कमी करून दाखवली. " महानगरपालिकेतल्या मुलांनाही अभ्यासाची गोडी असते. " कुंदा मॅडम सांगतात. "सभोवताली घडणाऱ्या घटनांबद्दल त्यांनाही कुतूहल असतं. गरज असते योग्य मार्गदर्शनाची. वर्गात शिकवत असताना लक्षात येत होतं की, काही मोजकेच विद्यार्थी पटापट उत्तरं देतात आणि काही खूप मागे पडत होते. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करता येत नव्हता. त्यावेळी 'दत्तक मैत्रीण' हा उपक्रम सुचला. "
दत्तक मैत्रीण उपक्रम दोन वर्षांपूर्वी सुरू झाला. एखाद्या मुलीचं गणित कच्च असेल तर तिला तिच्याच वर्गातली गणित उत्तम असलेली मुलगी दत्तक घेते. गणित उत्तम असलेली मुलगी दुसऱ्या मुलीकडून गणिताच्या संकल्पना पक्क्या करून घेते. वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून गणित कसं सोडवता येईल ते शिकवते. वेगवेगळ्या विषयांच्या बाबतीत हा प्रयोग केला. बऱ्याचदा मुलं शिक्षकांना घाबरतात, त्यांना संकोच वाटतो. पण समवयस्क मैत्रिणीकडून शिकताना भीती, संकोच आपोआप गळून पडतात. जिथे अडते तिथे थेट संवाद होतो. वर्गात मिळणाऱ्या रिकाम्या वेळेचा यासाठी उपयोग केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला, अभ्यासाची गोडी लागली आणि शाळा मध्येच सोडून देण्याचं प्रमाणही कमी झालं.
या शाळेत आता स्पर्धा परीक्षांसाठीही आता मुलांची तयारी करून घेतली जात आहे. याखेरीज शुक्रवारी एखादा विषय सुचवला जातो. त्यावर विद्यार्थी शनिवारी कविता, नाटक सादर करतात. चित्रं काढतात. विविध संकल्पना सहजपणे त्यांना समजाव्यात, हा त्यामागचा हेतू असल्याचं कुंदा मॅडम सांगतात. 
-प्राची उन्मेष, नाशिक

शिपाई ते अधिकारी

सोलापूर शहरातल्या विडी घरकुलात राहणारे साईनाथ वंगारी. वय ३३. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि नुकतीच त्यांची महिला आणि बालविकास अधिकारी (' ब ' गट ) म्हणून निवड झाली आहे. 
साईनाथ यांचं बालपण हलाखीत गेलं . घरी शिक्षणाचे कोणतेही वारे नसतानाही ते स्वतः शिकले. त्यांची आई विडी कामगार. साईनाथ लहानपणी कारखान्यात कामाला जाऊन घरी मदत करायचे. मेडिकलमध्ये स्टोअर्समध्ये स्टोअर बॉय म्हणून काम करत ते दहावी आणि बारावी पास झाले. खासगी कामात काही राम वाटत नव्हता. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न सुरू झाले.
२००८ साली सरळ सेवा परीक्षा देऊन शिपाई. नोकरी करताकरता अर्थशास्त्रात एम.ए. दररोजच्या सहवासातून अधिकाऱ्यांपासून प्रेरणा मिळत होती. साईनाथ यांच्यासमोर आता स्वप्न होतं अधिकारी होण्याचं. नोकरी आणि प्रपंच सांभाळत २०१५ मध्ये पुन्हा अभ्यास सुरू केला. कन्ना चौक इथल्या पूर्व भाग सार्वजनिक वाचनालयाच्या अभ्यासिकेत रोज सहा तास. अभ्यासानंतर काही वेळ मित्रांसोबत वेगवेगळ्या विषयांवर गटचर्चा. रात्र अभ्यासिकेचाही आधार. तरीही सुरुवात अपयशानं झाली. नोव्हेंबर २०१७ मध्ये पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत अवघ्या दोन गुणांनी हुलकावणी. त्यानंतर करनिर्धारण अधिकारी, केंद्रीय पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेतही यश थोडक्यात हुकले. तरीही साईनाथ यांनी जिद्द आणि मेहनत सोडली नाही. अखेर २०१९ मध्ये यश मिळालंच.
''कोणतंही यश मिळवायचं असेल तर कठीण परिश्रमाशिवाय पर्याय नाही.'' साईनाथ सांगतात. ''अपयशानं खचून जायचं नसतं. संयम, जिद्द आणि चिकाटीनं परिस्थितीवर मात करायची असते.''
आपल्या यशात कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचं ते सांगतात.
 
- अमोल सीताफळे, सोलापूर

पोरीचा बाप असणं ही खरंच 'बाप' गोष्ट आहे...!

हाच सप्टेंबर महिना होता. 16 तारीख. मी बार्शीला गेलेलो. पल्लवीचा सकाळी सकाळी झोपेत असतानाच फोन आला. व्हाट्स अप पाहा म्हणाली. अर्ध्या झोपेतच, मी बघितलं तर प्रेगान्यूजचं पिंक लाईन झालेलं किट दिसलं. झोपतून ताडकन जागा झालो. माघारी फोन केला. 'तुम्ही बाप होणार आहात, रिझल्ट पॉझिटिव्ह' एवढंच ती बोलली. मला अक्षरशः उड्या माराव्या वाटायल्या. काही सुचेनाच बोलायला. रडायला लागलो. 
कुणाला इतक्यात सांगायला नको असं ठरलं. कधी एकदा तिला भेटतोय असं झालेलं. रात्री लगेच मुंबईसाठी बसलो. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात. जेजेचे स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक आनंद सरांकडे हिची ट्रीटमेंट होती. जेजेला गेलं की डॉ. रेवत सरांची बहीण म्हणून अजूनच चांगली ट्रीटमेंट भेटायची. म्हणजे दर महिन्याला तिला हॉस्पिटलला जावं लागायचं. काही वेळा मला जायला जमायचं नाही. पण तिचा हा समर्थ भाऊ असल्यानं मला चिंता नसायची.
तर हं, कन्फर्मेशन झालं. मग आयुष्यात खऱ्या अर्थाने अच्छे दिन आल्यासारखं वाटू लागलं. तिची काळजी घेणं. तिचं डायट, औषधं वगैरे. तिची काळजी घ्यायला घरी मी आणि रामच. ती या काळात मस्त ऍक्टिव्ह झालेली. तिचं पोट वाढलेलं पाहून सगळेच म्हणायचे मुलगा होईल. आम्हाला मात्र मुलगीच व्हावी, असं पहिल्यापासून वाटायचं. सगळे जरी मुलाची आस लावून बसले असले तरी आम्ही मात्र मुलीवर ठाम होतो. मात्र तिच्या पोटातल्या हालचाली, लाथा मारण्याची पद्धत बघून पल्लवी म्हणायची हे पोरगं आहे. 
तारीख जवळ येण्याच्या 20 दिवस आधी हिला बार्शीला शिफ्ट केलं. तिकडं गेल्यावर गावाकडच्या प्रत्येक बाईचा रपाटा हाच, की मुलगाच होणार. एवढ्या काळात व्यवस्थित ट्रीटमेंट आणि डायटमुळे पल्लवी एकदम नॉर्मल होती. म्हणजे प्रेग्नेंसीमध्ये कुठलीही गुंतागुंत नव्हती. ती कॉन्फिडेंटली सांगायची की नॉर्मल डिलिव्हरी होणार. पण तिचा नाजूकपणा बघून मला ही शक्यता फार कमी वाटायची. 
29 तारखेपासून हिच्या पाठीतून कळा यायला लागल्या. तिला वाटलं पाणी काढताना लचक भरली असेल. रात्रभर तिनं ह्या कळा सोसल्या. सकाळी तिच्या मैत्रिणीला तिनं फोन केला, तर ती म्हणाली अगं ह्या प्रेग्नेंसीच्या कळा आहेत. मला पल्लवीचा फोन आला. मी मॉर्निंग ड्युटीला आलेलो. लगेच मित्राची गाडी पाठवली आणि थेट दवाखाना. तारीख दहा दिवस पुढं असल्यानं मी काहीसा निश्चिंत होतो. मात्र 10 वाजता फोन आला, की आजच डिलिव्हरी होईल. मग मात्र मला खालचं-वरचं काही समजेना. ऑफिसमधून थेट निघालो, गावाकडं निघायला ट्रेन पकडली. थोड्याथोड्या वेळाने अपडेट घेत होतो. ट्रेन सुसाट धावत होती पण मला मात्र तिचा स्पीड बैलगाडीच्या स्पीडहून कमी वाटत होता. 
मी कल्पनेत गुंग होतो की, कसं असेल आमचं बाळ. प्रचंड एक्साईट झालेलो. बरोबर 3.40 ला वगैरे रामचा फोन आला. 'दाजी, मुलगी झाली' बस एवढंच ऐकलं. हे तीन शब्द सरर्कन मेंदूतून सर्वांगात घुसले. काय बोलावं काहीच सुचेना. इतके दिवस पाहिलेलं एक गोड स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. डोळ्यातून आपोआप आनंदाच्या धारा सुरू झाल्या. लोणावळ्यात ट्रेनमध्ये शेजारी बसलेल्या एका मावशींनी विचारलं, काय झालं बाळा रडायला अचानक? त्यांना सांगितलं. लोणावळ्यात घेतलेली चिक्की पुरेस्तोवर डब्यात वाटली. 
साधारण वीसेक मिनिटांनी माझ्या लक्षात आलं की आपण बाकीचं काहीच विचारलेलं नाहीये. पुन्हा रामला फोन केला. सगळं नॉर्मल झालंय असं कळलं. आई बोलली, मला हुंदका आवरेना. तिच्याशी बोलताना तिचा, आमचा सगळा संघर्ष पोरीच्या येण्याने अश्रूंच्या धारांनी पुसून निघाल्यागत वाटलं. 
आता तर ट्रेन पळत असून थांबल्यासारखं फील व्हायलं. रात्री 9 वाजता दवाखान्यात पोहोचलो. पल्लवीला घट्ट मिठी मारली. पिहूचा चेहरा पाहिला. म्हटलं भावा, तुझा संघर्ष इथं संपलाय. पोरीच्या येण्यानं आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आलंय. आता आठवतो म्हटलं तरी, मागचा संघर्ष आठवत नाहीये. पोरीच्या एका एका फ्रेमने सगळया संघर्षावर पांघरूण घातलंय. तिची इवलीशी पावलं हातात घेऊन कित्येक वेळा बसलो. 
आता आठवडा, पंधरा दिवसाला गावाकडं पळतोय. आई, मित्र म्हणताहेत, आता कसं गाव दिसायलय सारखं सारखं. म्हटलं माणूस स्वार्थी असतो यार, सुख सापडलं की होत असं माणसाचं. 
सध्या ती आईजवळ जास्त आहे. दोघींमधला संवाद जबरदस्त असतो. मस्त हसते, तिला बोलायचंही असतं. रोज काही ना काही बदल बायको सांगते. हे सगळं मी प्रचंड मिस करतोय. 
बाप असणं आणि त्यात पोरीचा बाप असणं ही खरंच 'बाप' गोष्ट आहे. आयुष्यभर ही बाप गोष्ट एन्जॉय करणारय, हीच सुखाची व्याख्याय.
बाळा, लव्ह अँड मिस यु.
आज #DaughterDay वगैरे आहे. माझ्यासाठी एकच दिवस स्पेशल का? असं म्हणत माझ्याकडं बघायलीय, बघा कशी रागारागाने. 
(भाग 1)
- निलेश झाल्टे 

बॅडव्हेंचर ऑफ शेरलॉक होम्स (आखुडबुद्धी बहुशिंगी)

"इन्स्पेक्टर लेस्ट्रेड, खुनाच्या जागी काही धागेदोरे मिळालेत?"
"नाही श्रीयुत होम्स, पण एक दोरखंड मिळालाय. कदाचित त्याला बांधून-"
"तो आपण नंतर बघू. पहिल्यांदा आपण काही छोट्या, नजरेतून सुटणाऱ्या पण महत्त्वाच्या गोष्टी बघू, जसे… आह! हा बुटाचा ठसा. वॉटसन, या ठशावरून तू काय सांगू शकतोस?"
"हेच की होम्स, खुन्यानं बूट घातला असावा."
"जवळपास बरोबर वॉटसन. पण कदाचित हा सुगावा आपल्याला गुंगारा देण्यासाठीही इथं सोडला असावा. याचा अर्थ खुनी भलताच हुशार, किमान सहा फूट उंच, सिगारेट न ओढणारा-"
"होम्स, हे कशावरून?"
"वॉटसन, या बूटाच्या मापावरून माणसाच्या उंचीचा अंदाज बांधता येतो. या बूटाचा मालक पाच फूटापेक्षा अधिक उंच नसणार. अर्थात, तो सहा फूट उंचीचा आहे हीच एक शक्यता उरते."
"आणि सिगारेट न ओढणारा कशावरून?"
"कारण, खुनाच्या जागी सिगारेटचं एकही थोटुक सापडलं नाही."
"आणि हे आपल्याला फसवण्यासाठी केलं असेल हे कशावरून?"
"कारण, माझ्या प्रिय लेस्ट्रेड, काही मिनिटांपूर्वी आपण या खोलीत प्रवेश केला तेव्हा हा ठसा इथं नव्हता. याचा अर्थ, खुन्यानं नंतर येऊन हा ठसा उमटवलाय."
"किती सोपं आहे हे! पण होम्स, हा तर लेस्ट्रेडच्या बूटाचा ठसा आहे!"
"याचा अर्थ-"
"वेडपटपणा करू नकोस वॉटसन. इन्स्पेक्टर लेस्ट्रेडनी नक्कीच हा खून केला नाही."
"धन्यवाद होम्स. पण हे कशावरून?"
"कारण तुमची उंची फक्त सव्वापाच फूट आहे, शिवाय तुम्ही पाईप ओढता. हुशारीबद्दल बोलायलाच नको. चला, आपण उगाच या चुकीच्या सुगाव्याच्या नादी लागून भरकटलो. आता तुम्ही दोघं शांतपणे-"
"कोचावर बसू?"
"अजिबात नको! कदाचित कोचावर काही सुगावे असतील. आठवतंय वॉटसन, तीन विद्यार्थ्यांच्या प्रकरणात सगळ्यात मोठा पुरावा कोचावरच होता."
"हो हो, आठवलं. आम्ही इथंच उभे राहतो. तू शोध घे."
"अहा! हे बघ मला काय सापडलं!"
"काय?"
"काही नाही. माझीच किल्ली पडली होती खिशातून. माझ्या कोटाच्या खिशाला भोक पडलंय बहुतेक. अरेच्चा! पण हे काय?"
"आता काय सापडलं?"
"काहीच नाही सापडलं. म्हणूनच वैतागून म्हणालो."
"होम्स, फायरप्लेसमध्ये काही सापडू शकेल का?"
"नाही वॉटसन. मला नाही वाटत खुनी फायरप्लेसमध्ये लपून बसला असेल. पाच फूटी माणसालाही तिथं अवघडून बसावं लागेल. आपला खुनीतर सहा फूट उंच आहे."
"होम्स, मला एक कोडं पडलंय की खुनी खोलीत कसा आला असेल?"
"सोप्पंय लेस्ट्रेड. तो दरवाज्यानं आत आला. त्यानं खून केला आणि दरवाज्यानंच परत गेला."
"कशावरून होम्स?"
"कारण या खोलीला एकच दरवाजा आहे. एकही खिडकी नाही. अर्थात, तो दरवाजातून आला हे उघड आहे."
"होम्स, कॉन्स्टेबलच्या म्हणण्यानुसार दरवाजाला आतून कडी घातलेली होती. तू याचं कसं स्पष्टीकरण देशील?"
"खुनी गेल्यावर मृतानं आपला कुणी खून करू नये म्हणून कडी लावली असावी. किंवा कदाचित-"
"दुसरी शक्यता काय आहे?"
"मृत माणसानंच खुन्याचा खून केला असावा आणि मृत माणूस लपून बसला असावा."
"पण यावरून खुन्याला शोधायचं कसं होम्स?"
"मी कशाला आहे मग? खुनी व्यक्ती पुरूष किंवा स्त्री आहे-"
"बरोबर. मलाही हेच सुचलेलं. आणि किमान सहा फूट उंच?"
"अगदी बरोबर. त्याला सिगारेटचं व्यसन नाही. डाव्या भुवईखाली तीळ नाही."
"कशावरून?"
"मला आहे. आणि मी खुनी नाही, त्यावरून. शिवाय त्याला लांब झुपकेदार शेपूट आहे."
"आं?"
"मला कोचाच्या पायापाशी हा केसांचा पुंजका सापडला. याचा अर्थ खोलीत फिरताना त्याची शेपूट इथं अडकली असावी."
"वाहवा होम्स! मी आताच अशा वर्णनाच्या लोकांच्या शोधाला लागतो. हॅलो, आपणच श्रीमती मॅकब्राहम्स का?"
"अच्छा! म्हणजे खुन्याची पत्नी आहेत त्या याच का? मिसेस मॅकब्राहम्स, मला तुम्हांला काही प्रश्न विचारायचे आहेत."
"मी श्रीमती मॅकब्राहम्स नाही. आणि मला तुम्हांला एकच प्रश्न विचारायचा आहे- तुम्ही माझ्या घरात काय करताय?"
"काय म्हणजे? खुनाचा तपास करतोय! तुमच्या नवऱ्याचा काल रात्री खून झाला हे विसरलात का?"
"माफ करा, पण माझा नवरा वारून अडीच वर्षं झालीत."
"अच्छा! म्हणजे-"
"म्हणजे होम्स, आपण चुकीच्या घरात तपास करतोय."
"पण श्रीमती मॅकब्राहम्स, आता आम्ही आलोच आहोत तर आम्हांला थोडा तपास करू द्या ना. भविष्यात कधी तुमचा खून झालाच तर हा तपास उपयोगी पडेल."
"अजिबात नाही! जिमीऽ ए जिमीऽ…"
हाक ऐकून म्हशीच्या छोट्या रेडकाइतक्या उंचीचा एक केसाळ कुत्रा दात विचकत आतून पळत आला आणि आमचा तपास अर्धवटच राहिला. होम्सला एका कुशीवर आत्ता कुठं वळता येऊ लागलंय.
#नवीउमेद 
- ज्युनिअर ब्रह्मे

नवी उमेदचे वाचक अशोक निनाळे यांनी लिहून पाठवलेला अनुभव -

निलंगा इथल्या डी के इंग्लिश स्कुलमध्ये अशोक निनाळे शिक्षक आहेत. त्यांच्या शाळेतली ही गोष्ट त्यांच्याच शब्दांत -
काल घडलेला एक प्रसंग तुमच्या सोबत शेयर करतो आहे.
हा प्रसंग माझ्यासारख्या प्रत्येक शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी आहे.
काल आमच्या शाळेत घटक चाचणी परीक्षेबाबत पालक मेळावा ठेवण्यात आला होता, अश्या पालक मेळाव्याचे प्रत्येक घटक चाचणीनंतर आमच्या शाळेत आयोजन केलं जातं. पालक मेळाव्यातून खूप काही अनुभव येतात. पालकांच्या विचारांच्या खूप जवळ जाता येत. पालकांची त्यांच्या पाल्याप्रति असलेली तळमळ पाहायला मिळते, फक्त तळमळच नाही तर त्यांनी सुद्धा त्यांच्या पाल्याला जास्तीत जास्त गुण मिळण्यासाठी केलेला प्रयत्न सुद्धा दिसून येतात.
आशिष बिराजदार तिसरीच्या वर्गात शिकतो आणि या वर्गाचा मी या वर्गाचा शिक्षक आहे आणि त्यांना गणित विषय शिकवतो. 15 दिवसांपूर्वी घटक चाचणीच्या धरतीवर मी एक क्लास टेस्ट घेतली आणि आशिषला क्लास टेस्ट मध्ये 20 पैकी फक्त 2 गुण मिळाले. मिळालेल्या 2 गुणांचं मला आश्चर्य वाटलं नव्हतं कारण आशिषचे आमच्या शाळेत याच वर्षी ऍडमिशन झालं आहे आणि तो असातसाच अभ्यास करायचा. तो नवीन असल्यामुळे तो माझ्याशी बोलायलाही घाबरायचा. या सर्व कारणांमुळे मला त्याची गुणवत्ता कमीच वाटत होती आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे थोडसं दुर्लक्ष ही व्हायच.
क्लास टेस्टचे गुण जेव्हा मी माझ्या वर्गाच्या व्हॅटसप ग्रुपवर टाकले. आणि अगदी 10 मिनिटांत आशिषच्या वडिलांचा फोन आला. त्यांनी मला विचारलं की आशिष बिराजदारच नाव गुणांच्या यादीत दिसत नाहीये. यावर मी त्यांना समजावून सांगितलं, की आशिषला कमी गुण मिळाले असतील आणि गुणांची यादी फक्त पहिल्या क्रमांकापासून ते तिसऱ्या क्रमांकापर्यंतचीच आहे. त्यांनी बरं असं म्हणून फोन ठेवला.
त्यांनी फोन ठेवला. पण त्यांना त्यांच्या पाल्यामधील कमतरता जाणवली आणि आशिष सोबत तेही अभ्यासाला बसले. आशिषची आई त्याचा अभ्यास घेऊ लागली. क्लास टेस्टमध्ये घेतलेल्या कमी गुणांची खंत आशिषच्या पालकांना शांत बसू देत नव्हती. आशिषचा जेवढा अभ्यास शाळेत होत होता तेवढाच अभ्यास यांनी घरीही घ्यायला सुरुवात केली.
पालक मेळाव्याच्या दिवशी आशिषची आई सांगत होती, आशिष शाळेतून घरी आल्या आल्या मी लगेच आशिषला त्याचा होमवर्क विचारत होते. आणि पहिल्या घटक चाचणीच्या आदल्या दिवशी
अक्षरशः पूर्ण रविवार त्यांनी अभ्यास घेतला. त्या सांगत होत्या, की 3 ते 4 प्रश्न पत्रिका त्यांनी स्वतः तयार करून आशिषकडून सोडवून घेतल्या. आशिषची पहिली घटक चाचणी संपली आणि आता त्याचे पालक घटक चाचणीच्या निकालाची वाट पाहू लागले.
आणि काल ती वेळ आली. पण दिवसभर लागून असलेला पाऊस आणि जास्तीत जास्त पालक ग्रामीण भागातले असल्या कारणाने कमी जण येतील असा अंदाज आम्ही बाळगत होतो. पण सर्व अडचणींना तोंड देत बघता बघता जवळपास सर्वच पालकांची हजेरी लावली. त्यात आशिषचे पालकही आले. माझे आशिषच्या पालकांचे बोलणे झाले. मी एक एक विषयांचे गुण आशिषच्या पालकांना दाखवण्यास सुरुवात केली. आताचे हे गुण मला आश्चर्यचकित करणारे होते. त्यातल्या त्यात माझ्या विषयामध्ये ज्या आशिषने क्लास टेस्ट मध्ये 20 पैकी फक्त 2 गुण घेतले होते त्यातच आता प्रथम घटक चाचणीत 25 पैकी 22 गुण घेऊन दाखवले होते. यावर मी त्याला प्रश्नही विचारले. त्याची अचूक उत्तरंही आली. यावरून त्यांनी कसलीही कॉपी केली नाही हेही आढळून आलं.
खरंतर आशिषच्या आई पालक मेळाव्याला नाही तर आशिषचे गुण बघायला आल्या होत्या. त्याच्या आईने त्याच्या प्रगतीबद्दल ठरवलं आणि करूनही दाखवलं.
या त्याच्या सुधारणेवरून माझ्या लक्षात आलं, की शिक्षक विद्यार्थ्यांसाठी वर्गात जेवढे कष्ट घेतात तेवढेच कष्ट पालकांनाही घरी आपल्या पाल्याबद्दल घ्यावे लागतील तेव्हाच कुठे तरी आपला पाल्य प्रगतिपथावर दिसून येईल.
"जो पर्यंत आपल्या विद्यार्थ्यांची परीक्षा म्हणजे शिक्षकाला स्वतःची परीक्षा वाटणार नाही, जो पर्यंत आपल्या पाल्याची परीक्षा म्हणजे पालकाला स्वतःची परीक्षा वाटणार नाही तो पर्यंत
पालकांचा पाल्य आणि शिक्षकांचा विद्यार्थी उत्कृष्ट घडणार नाही."
- अशोक डी निनाळे

शब्दांपलीकडची भाषा आणि लिपीपलीकडचा इतिहास (इतिहासात डोकावताना)

इतिहास आणि दृश्यकलेचा तसा काय बरं संबंध, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तो तसा पडण्यामध्ये आपल्या शिक्षणव्यवस्थेचा मोठा हात आहे. एकतर, सगळ्याच विषयांमध्ये इतकी दरी आहे; इतिहास तर फक्त तारखा पाठ करण्यापुरता मर्यादित आहे. अशा वेळेस मग इतिहासासारखा विषय फक्त गतकाळाची उजळणी करणे, एवढाच मर्यादित न ठेवता हा विषय मुलांमधील तार्किक क्षमता वाढवण्याकरिता वापरला तर? यामध्ये दुहेरी हेतू साध्य होऊ शकतो. यामुळे कदाचित इतिहासाकडे 'बघण्याची' प्रक्रिया चालू होऊ शकते. हाच विचार करून मी मुलांबरोबर एक प्रयोग करायचं ठरवलं. इतिहासाकडे 'बघण्यासाठी' मग काळ देखील असा निवडला जेव्हा, कदाचित माणसाला कोणतीही बोलीभाषा अवगत नव्हती, आणि आपले विचार, संदेश एकमेकांपर्यंत पोहचवण्यासाठी चित्रभाषेचा उपयोग होत असावा. प्रयोगाचं नाव होतं शब्दांपलीकडची भाषा आणि लिपीपलीकडील इतिहास.
कार्यशाळेच्या सुरवातीला मी थोडावेळ मुलांशी गुहाचित्रं या विषयावर गप्पा मारल्या. माणसाने गुहेत चित्रं का काढली असावीत, कशी काढली असावीत, ह्या चित्रांचे विषय कोणकोणते होते,काळानुसार ह्या चित्रांमध्ये कायकाय बदल होत गेले, चित्रांवरून तेव्हाच्या माणसांची जीवनपद्धती कशी कळते, अशा अनेक मुद्द्यांवर मुलं छान गप्पा मारत होती, आणि मुख्य म्हणजे अनेक प्रश्नदेखील विचारत होती. गप्पा मारून झाल्यानंतर जगभरातील अनेक गुहाचित्रं दाखवली. काही वेळानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला दोन चित्रं दिली. ती त्यांनी 'वाचणं' आणि त्यावर नंतर एक गोष्ट लिहिणं अपेक्षित होतं. सुरवातीला मुलं थोडी बावचळली होती. परंतु थोड्या वेळात सगळॆजण चित्र वाचण्यात आणि गोष्ट लिहिण्यात गुंगून गेले. जरा वेळाने ज्या गोष्टी जमा झाल्या, त्या कमालीच्या विलक्षण होत्या.
चैतन्य लिहितो "ही एक होडी वाटत आहे. ह्या होडीवरची लोकं म्हणजे राजा, राणी, सेवक, राजकुमार वाटतायत" "हा ह्यांचा कोणीतरी देव असेल. आणि खाली होडी किंवा त्याचे कोणतेतरी वाहन असेल. उदा - बदक "
अश्विनी लिहिते "एक लिंगो नावाचा माणूस होता. तो एक दिवस जंगलात फिरत होता. त्याला खूप भूक लागली. तो गुहेत गेला. त्याने त्याच्या बायकोला मांस मागितलं. पण घरात मांस नव्हतं. मग तो एक भाला आणि बुमरँग घेऊन शिकारीला निघतो. थोड्या वेळाने त्याला हरणं दिसतात. तो त्यांचा पाठलाग करू लागला. मग त्याने एकावर बुमरँग फेकलं. ते त्याला लागलं व ते हरीण पडलं, तर दुसरं पळून गेलं. तो आनंदाने घरी परतला".
रोहित लिहितो "हे चित्र बघून असे वाटते की एका टोळीने शिकार केली आहे. आणि दोन टोळ्या त्या शिकारीवरून भांडत आहेत. म्हणजे अक्षरशः युद्ध करत आहेत. बहुतेक डाव्या बाजूच्या टोळीने शिकार केली आहे व उजवीकडची टोळी चोरायला आली आहे".
मुक्ता लिहिते "ही नाचणारी माणसं आहेत असं वाटतंय. त्या सगळ्यांची तोंडं एकाच बाजूला असल्याने ते गायकाकडे बघून नाचतायत असं वाटतंय. तिन्ही आकृतीचा डावा पाय पुसट आहे/नाहीच आहे. मग कदाचित त्यांनी एक पाय वर उचलला असेल. हे चित्र छान आणि मजेशीर आहे."
नीरजा लिहिते "हे त्यांचे देव असतील. किंवा भुतं पण असू शकतात. किंवा काहीकाही वर्षांनी बदलत गेलेल्या देवांची चित्रं एकत्र करून हे चित्र बनवलं असेल."
ह्या सगळ्याच गोष्टींकडे एक नजर टाकली तर लक्षात येईल की मुलं अजिबात एककल्ली आणि एकांडा विचार करीत नाही आहेत. भूतकाळाकडे त्यांना अत्यंत तार्किक आणि खुल्या मनाने बघता येत आहे. त्यांनी वापरलेल्या भाषेकडे नजर टाकली की लक्षात येतं, मुलं ठोस विधानं करत नाही आहेत. 'असं असू शकतं', 'तसं झालं असेल' अशा भाषेत ह्या गोष्टी लिहिल्या आहेत. एकच चित्र काहीजणांनी दोन ते तीन प्रकारे वाचायचा प्रयत्न केला आहे. हे असं 'बघता' येणंच तर महत्वाचं आहे. एखाद्या घटनेकडे किती प्रकारे बघता येऊ शकतं, एखाद्या गोष्टीला जास्तीत जास्त किती संदर्भ जोडता येऊ शकतात, अनुमानाच्या किती शक्यता तयार होऊ शकतात आणि त्या शक्यतांच्या खोलात जाऊन आणखी नवे प्रश्न तयार होत राहणं म्हणजेच इतिहास शिकणं आहे. ह्या प्रयोगामुळे पुढच्या प्रयोगांना खूपच चालना मिळाली त्या प्रयोगांविषयी लवकरच... ll5ll
डॉ.अनघा भट

देवराम प्लंबिंगचं काम शिकला, नोकरीही मिळाली.

पालघरमधील मोखाडा भागातल्या आदिवासी समाजातल्या देवराम जोशीची ही गोष्ट. घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे त्याला कसंबसं दहावीपर्यंत शिकता आलं. त्यानंतर घरी आर्थिक हातभार लावण्याकरता त्याने काम करण्याचा निर्णय घेतला. एका स्थानिक प्लंबरकडे देवराम प्लबिंगचं काम शिकला आणि त्यांचा सहाय्यक म्हणून काम करू लागला. यातून दरमहा दहा ते बारा हजार रुपये उत्पन्न मिळू लागलं. 
दरम्यान, देवरामचं लग्नही झालं, दोन मुलं झाली. घरात आई-वडील, शिकणारी बहिण, पत्नी, दोन मुलं अशी सदस्यसंख्या वाढत होती. आता मात्र मिळणारं उत्पन्न अपुरं पडत होतं. चार वर्षांचा अनुभव होता पण या कामाचं रीतसर प्रशिक्षण घेतलं नसल्यानं, कोणतंही प्रमाणपत्र नव्हतं. त्यामुळे चार वर्ष होऊनही या कामात त्यांची पुढे प्रगती होत नव्हती आणि आर्थिक भार वाढत होता. याच काळात देवरामला पनवेलमधील प्रथम प्लबिंग ट्रेनिंग सेंटर बाबत कळलं. त्यांनी तिथे भेट देऊन चौकशी केली. यावेळी देवरामला आपल्या उज्ज्वल भविष्याकरता या प्रशिक्षणाचा नक्कीच उपयोग होईल हे जाणवलं. त्यांनी घरातल्या सदस्यांनाही याबाबत माहिती दिली. लगेचच देवरामने दोन महिन्यांच्या प्रशिक्षणवर्गात प्रवेश घेतला. प्रशिक्षणाची ही अकरावी बॅच 1 नोव्हेंबर 2018 ते 1 डिसेंबर 2019 दरम्यान होती.
व्होल्टास कंपनीच्या सहाय्याने पनवेलमध्ये प्रथम प्लबिंग ट्रेनिंग सेंटर सुरू आहे. इंडियन प्लबिंग स्किल काऊन्सिल (आयपीएससी) यांची मान्यता या केंद्राला आहे. आपल्या प्रशिक्षणादरम्यान देवरामला प्लबिंगचे विविध स्तर आणि त्यात करावयाची कामं याबाबत सविस्तरपणे शिकवण्यात आलं. प्लबिंग क्षेत्राची सविस्तर माहिती, प्लबिंग क्षेत्राचा विकास आणि त्यातील नोकरीच्या संधी या सर्व गोष्टींची माहितीही यावेळी सांगण्यात आली.
प्रशिक्षण वर्ग पूर्ण केल्यावर देवरामला एमएस हायड्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्लंबर पदासाठी मुलाखतीकरता बोलावण्यात आलं. त्यांची निवडही झाली. सध्या, त्याला या कंपनीत दरमहा साडेसोळा हजार मासिक वेतन अधिक निवासी व्यवस्था अधिक पीएफ आणि वैद्यकीय सुविधाही मिळतात.
प्रथम संस्थेच्या या केंद्रात अशी प्रशिक्षणसुविधा तर आहेच. आणि देवरामसारख्यांना कायमचा रोजगार देण्यातही मदत केली जाते. प्रथम प्लम्बिंग कार्यक्रम प्रमुख शिवाजी कदम यांचा संपर्क क्र.- 99205 53319

- शिवाजी कदम, साधना तिप्पनाकजे

संगोपन केलं ह्यापेक्षा आम्ही नातं, कुटुंब जोपासलं - चिन्मयी सुमीत (पहिली पावलं)

माझा पहिला मुलगा मी सत्तावीस वर्षे पूर्ण केली आणि झाला. म्हणजे, मी तशी जाणती होते. आई मानसशास्त्रज्ञ असल्याने गरोदरपणातच बालसंगोपनाची बरीच चांगली पुस्तकं वाचली होती. थिअरी माहित असली तरी, बरेच प्रॅक्टीकल बदल प्रत्यक्ष मुलं जन्माला आलं की करावेच लागतात. हातखंडं पालकत्व असं काही नसतंच. प्रत्येक मुलाचा पिंड निराळा, गरजा निराळ्या. हे, खरं तर दुसरी मुलगी आयुष्यात आल्यावर जास्त कळलं.
मुलांच्या सुरुवातीच्या वाढण्याच्या काळात मी आसपास असणं, ही माझी वैयक्तिक गरज होती, मुलांच्या विकासापेक्षा तेव्हा माझा आनंदाचा भाग जास्त होता. मी सतत मुलांशी संवाद ठेवला. म्हणजे अगदी इंजेक्शनसाठी डॉक्टरांकडे जायचं असेल तरी हळू, मृदु आवाजात मी बाळाच्या कानात आपण डॉक्टरांकडे चाललो आहोत, थोडं दुखणार आहे, हे सांगायचे. तिथपासूनच कदाचित प्रत्येक गोष्टीसाठी मुलांना तयार करावं, फसवून काही करू नये हे सुरू झालं. मुलांसाठी रंगीबेरंगी भरपूर पुस्तकं आणली. नातेवाईकांनाही आवर्जून पुस्तकंच आणायला सांगितली. रंगीत ठोकळे,चेंडू ही खेळणी जास्त आणली. फार आवाज करणारी खेळणी, लाईटसची खेळणी थोडी कमीच... मनोरंजन खेळण्यांवर अवलंबून ठेवलं नाही. नीरद, दीया नॅपकिन आणि रुमालांत पण रमत. घड्या घालायच्या, मोडायच्या हाही खेळ असायचा. मुलं मोकळ्या जागेत खेळतील, मित्र जमवतील हेही पाहिलं. सुमीत शूटिंगमध्ये व्यग्र होता त्यामुळे घरात सतत एखादी 'मदतनीस' ताई असायची, ती ताई हा परिवाराचा घटक आहे, हे मुलांना आमच्या वागणुकीवरून कळायचं. मुलांनी मदतनीसांना त्यांच्या नावाने हाक मारू नये, म्हणून आम्हीही त्यांना ताईच म्हणायचो. आम्ही कांदिवलीत रहात असलो तरी दर शनिवार, रविवारी कुर्ल्याला सुमीतच्या आईवडिलांकडे जायचो. त्यामुळे तिथेही मुलांची मित्रमंडळी झाली. येता - जाता गाडीत गाणी आणि गप्पा चालायच्या. शक्तिमान, सोनपरी ह्या मुलांच्या आवडत्या मालिका, पण टीव्ही बघत किंवा कार्टून्स बघत जेवणं ना आम्ही केलं ना मुलांना करायला प्रोत्साहन दिलं. शाळेत जाण्याआधीच मुलांनी तीस-चाळीस कविता पाठ केल्या होत्या. ( त्यात हिंदी, गुजरातीही होत्या) मुलांचे हट्ट पुरवायचो, म्हणजे अगदी 'अंडे का फंडा' गाण्यासाठी नीरदने तो चित्रपट आम्हाला पाहायला लावला, ते केलं. पण काही गोष्टींना ठामपणे नाहीसुद्धा म्हणालो. दरवेळी नकाराची कारणं पटवूनही दिली. 'मी सांगतेय ना/ सांगतोय ना मग ऐकलंच पाहिजे' हा खाक्या कधीच वापरला नाही. दीया तर औषध पितांनाही,' तू मला कन्व्हिन्स कर ना' म्हणायची... मराठी, इंग्लिश, हिंदी सगळ्या भाषा कानावर पडायच्या, त्यांचा गोंधळ व्हायचा, बोलतांना सरमिसळ व्हायची पण आम्ही त्यांना हसलो नाही. हातून काही तुटलं, फुटलं तर तर नीरद दचकायचा, मी 'म्हणायचे अरे, फुटलं होय, नेव्हर माईंड' पण मदतनीस ताईकडून काही फुटलं की माझी काही निराळी प्रतिक्रिया येते आहे असं बघताच तोच म्हणाला, 'नेव्हर माईंड'. मुलांसमोर दुटप्पी वागून चालत नाही. नीरदने हा मला दिलेला धडा होता.
मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्याने सर्व स्तरातल्या विद्यार्थ्यांबरोबर शिकली, मिसळली, रमली. त्यामुळे त्यांना समाजभान यावं म्हणून वेगळं काही करावं लागलं नाही. अम्युझमेंट पार्कला मुलांना नेलं पण त्याहून जास्त जंगलांमध्ये, सागरकिनारी नेलं. मुलं क्रुझवरही गेली आणि दांडेलीच्या कॅम्पमध्येही आनंदात राहिली. आमच्या कामाच्या ठिकाणी मुलांना आम्ही बऱ्याचदा घेऊन गेलो. त्यामुळे आम्ही नेमकं काय करतो आणि आमच्यासह अनेकजण किती कष्ट करतात ते त्यांनी जवळून पाहिलं. दोन्ही मुलांची आम्ही कधीच तुलना केली नाही. मुलगा-मुलगी ही सवलत किंवा सक्तीही नाही. पूर्वी आम्ही एकत्र फिरायचो. आता एखादी सुट्टी ते दोघे स्वतंत्रपणे आखतात. बॅकपॅकिंग करुन निघतात. परगावी रहाणाऱ्या नातेवाईकांना आम्ही मागे न लागता स्वतःच्या मनाने जाऊन भेटतात. आपली मुलं ही आपलीच आवृत्ती असणार असं गृहित न धरता, आम्ही त्यांना त्या स्वतंत्र व्यक्ति आहेत, काही काळ आपल्या सहचर आणि नंतर आपले मित्र असणार ह्याची जाणीव मनात सतत तेवत ठेवून आम्ही त्यांच्याबरोबर वावरत आहोत. त्यामुळे आम्ही संगोपन केलं, ह्यापेक्षा आम्ही नातं, कुटुंब जोपासलं हे म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल.
#पहिलीपावलं 9

शेतीला हलक्या अवजारांची देणगी

दादा वाडेकर. वय ७९ वर्षे. जन्म ता.वाडा,पालघर. लोहारकामाचा आणि शेतीचा परंपरागत वारसा. कष्टाने उभा केलेला फॉरजीन अर्थात मोटारीचे विविध सुटे भाग तयार करण्याचा कारखाना लहान भावांच्या स्वाधीन करून सन 2000 मध्ये ते निवृत्त झाले.
अचानक हृदयविकाराचं निदान झालं. त्यात शुद्ध हवापाणी, आहार, शेती, निसर्ग यात रस निर्माण झाला.
कोकणात भातशेती मोठ्या प्रमाणात. शेतीला मजूर मिळणं अवघड. तोडगा म्हणून दादांनी भाताच्या बीचे गोळे करून त्याची थेट पेरणी करायला सुरुवात केली. शेण,गोमूत्र,राख,माती एकत्र करून त्यात भाताचे बी असे गोळे केले. स्वतः च्या फोर्जिंग कारखान्यात यासाठी मशीन तयार केलं. चिंच,जांभूळ,आंबा ही झाडं मोठी होऊन फळ येण्यास वेळ लागतो. त्यावर उपाय म्हणून एक फूट खोल खड्डा खोदून त्यात शेण, पालापाचोळा, गोमूत्र,लाकडं अस टाकून एक महिना कुजून देऊन त्यात झाड लावल्यास तिसऱ्या वर्षीच झाडांना फळ देतो. असा दादांचा अनुभव आहे.
शेतीत वापरली जाणारी अवजारे जसे खुरपे, विळा, कुऱ्हाड,कोळपा बरीच जड . तसेच उत्पादकही कमी असल्याचे दादांना जाणवले. जवळजवळ 15 वर्षे अनेक ठिकाणी फिरून,संशोधन करून दादांनी शेतकऱयांसाठी सुमारे 40 प्रकारची अवजारे तयार केली. त्यात जय विळा,हात कोळपे,काठी विळा, दोन धारी कोयता,दुधी विळा,भेंडी काढणी विळा,दोनधारी खुरपी,नारळ सोली अशी अनेक लहान, स्वस्त, किफायतशीर अवजारे आहेत. जुना विळा 250 ग्रॅमचा आहे,दादांनी बनवलेला विळा फक्त 110ग्रॅमचा. शिवाय तो स्प्रिंग स्टीलचा बनला आहे,त्यामुळे तो वाकला तरी तुटत नाही,प्लास्टिकची मूठ बसवून त्याची पकड घट्ट केली. एवढ्या वर्षांची मेहनत,संशोधन ह्याचे पैसे अवजारात न आकारता दादांनी अवजारे शेतकऱ्यांना खुप कमी दरात उपलब्ध करून दिली आहेत. विदर्भ तसेच वाडा परिसरातले शेतकरी ही अवजारं विकत घेतात.शेतीतील पारंपरिक अवजारांपेक्षा ही अवजारे जास्त उत्पादक्षम आहेत असा त्यांचा अनुभव आहे. केशवसृष्टी ह्या संस्थेसोबत ग्रामविकासात त्यांनी अनेक वर्षे काम केलं.

-संतोष बोबडे

मंजिलसे बेहतर लगने लगे है ये रास्ते! पहिली पावलं ८

‘मुलं किती?’
या प्रश्नाला ‘तीन’ हे उत्तर दिलं की विचारणाऱ्याचं तोंड आंबट झालेलं सहज दिसतं मला. आजकालच्या जगात तीन मुलं असणं जणू गुन्हाच, त्यात डाॅक्टरांना तीन मुले व्हावी हे महापाप.
‘धाकटा मुलगा का?’ हे विचारताना ‘मुलगा होईपर्यॅत मुलं होऊ दिली असणार’ हा विचार अगदी वाचता येताे.
पण ‘नाही हो, सगळ्यात मोठा मुलगा, मग दोन मुली’ हे ऐकल्यावर ‘काय एकेक विचित्र लोक’ असा स्पष्ट भाव विचारणाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतो.
मला मात्र लहानपणीपासून आमची आई ‘पाव डझन मुले आहेत मला’ हे सांगायची , ते फार आवडायचं. आपणही पुढेमागे हेच ठसक्यात सांगायचं, हे लहानपणीच ठरवलं होतं. तशी पाव डझन मुले झालीही !
मुलं होण्यापूर्वी मुलांना मी असं वाढवेन, तसं वाढवेन अशा माझ्या फार कल्पना होत्या. पण मुले वाढवताना हे लक्षात आलं की कुठलेच काही अपरिवर्तनीय नियम नसतात. त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे लवचिक व्हावं लागतं. अगदी एका आईवडिलांची लागोपाठची दोन मुलेही एकदम वेगळ्या पद्धतीने वाढू शकतात आणि त्यांच्या वागण्यातही त्यामुळे जमीन अस्मानाचा फरक पडतो.
आमचंच पहा. आमचा मोठा यश. लग्नानंतर चार पाच वर्षानी अगदी वाट पाहून झालेला. पण तरीही त्याच्यावेळी आम्ही अगदीच नवखे पालक होतो. त्यात दोघांची प्रॅक्टिस, नोकऱ्या यांची धावपळ.
त्याला सांभाळायला एक आया होत्या मेरीअम्मा नावाच्या. दिवसभर तो त्यांच्याकडे असे आणि त्या इतर काही काम करत असतील तेव्हा शेजारच्या आंटींकडे.
त्याला बोलता येतंच नाही असा लहानपणी आमचा समज होता. कारण आमच्या कानडी- मराठी -हिॅदी घरात भाषांची इतकी खिचडी की लेकाला कुठली भाषा निवडावी तेच कळत नव्हतं.
याला आता स्पिच थेरपिस्टला दाखवावं का, अशा विचारात असताना एकदा पाहिलं की हा शेजारी मस्त तुळू भाषेत गप्पा मारतोय.
मुलांना खेळवताना, आंजार- गोंजारताना, त्यांच्याशी गप्पाही मारायच्या असतात हा एक शोधच आम्हाला यशमुळे लागला. मात्र त्याच्याशी लहान मुलांच्या लडिवाळ भाषेत कधीच न बोलल्याने तो जेव्हा बोलला, तेव्हा सगळं स्पष्ट, शुद्ध बोलायला लागला. एकही बोबडा बोल तो कधी बोलला नाही. तीन साडेतीन वर्षांचा होईपर्यॅत कार्टून नेटवर्क पहात त्याने स्वत:ची भाषा ‘हिॅदी’ बनवून टाकली. आजही तो मराठी, इंग्रजीग आणि कानडीही बोलत असला तरी विचार हिंदीतून करतो.
दुसरी मुलगी सई. ही झाली तेव्हा सुरूवातीस फारच नाजूक आणि रडवी होती. त्यात नेमकं काही घरगुती अडचणींमुळे सुरूवातीचे काही दिवस सोडल्यास कोणी घरचे मदतीला नव्हते. मग आम्हीच आळीपाळीने दोघे ओपीडी बुडवून तिच्यासोबत रहायचो. नंतर अचानक दोन मदतनीस मिळाल्या. एक कस्तुरी नावाची आया आणि आमच्या मुलांची चुलत आत्या शिवलीला.
त्यावेळेपर्यंत माझं स्वत:चं हाॅस्पिटलही चालू झालं. मी नोकरी सोडली होती.
माझा कितीतरी वेळ घराबाहेरच असायचा. लेक इकडे घरात दुसऱ्या बायकांकडे. या बायका तिचे अतिशय लाड करायच्या, बोबडं बोबडं बोलत रहायच्या सतत तिच्याशी. तर ही मुलगी एक नंबरची बोबडकांदा झाली. अजूनही तिला ळ म्हणता येत नाही. मात्र ती अगदी दीड दोन वर्षांची असतानाच तीनही भाषा बोबड्या का होईना आरामात बोलू लागली, रंग आेळखू लागली, गाणी म्हणू लागली. घरातल्या दोन्ही बायका एकदम व्यवस्थित आणि नीटनेटक्या असल्याने ही सुद्धा एकदम टापटीप झालीय. कस्तुरीची मुलगी अंकिता ही चांगली चित्र काढत असल्याने ही सुद्धा चित्र काढायला शिकली.
आता ही चित्र आणि शब्दांच्या माध्यामातून ही छान व्यक्त होऊ शकते. तिच्या चित्रांचं आणि गोष्टींचं एक पेजच मी फेसबुकावर काढलंय. ती मोठी होईल तेव्हा हे पाहताना तिलाच खूप गंमत वाटेल हे नक्की!
आमचं शेंडेफळ, ईशा अगदीच बारकुसं आहे. आत्ताशी फक्त पावणेदोन वर्षांची आहे. हिला सांभाळायला माझी लहान बहिण हौसेने एक वर्षभर घरी आली होती.
बोल्ड आणि हुशार मावशीबरोबर राहून ईशाही अतिशय बोल्ड आणि हुशार झालीय. आमचे बाबा म्हणायचे, ‘मोठ्या वयात झालेली मुलं मंद निपजतात हा गैरसमज आहे, खरेतर जितक्या उशीरा मुले होतात तितकी ती अधिक हुशार असतात’. याकरता ते आठव्या क्रमांकाला जन्मलेला कृष्ण किंवा भावंडांत चौदावे असलेले आंबेडकर यांच्या बुद्धीची उदाहरणे द्यायचे.
मला अर्थातच वैज्ञानिक दृष्ट्या हे खरं नाही हे माहित आहे. तरीही ईशा अतिशय हुशार आहे, हे खरं आहे.
कधीकधी मी विचार करते की जन्मत:च तिन्ही मुलांना पहिले दोन तीन महिने सांभाळलं माझ्या आईने, नंतर त्यांचं सगळं केलं कामाला, मदतीला असलेल्या बायकांनी किंवा नातेवाईकांनी. मग आपण मुलांची हौस म्हणून नेमकं काय केलं? 
पण हे ही अगदीच खरं नाही. मुलं दिवसभर कुणाकडेही असोत रात्री आपल्या कुशीत आली की आपलीच होऊन जातात. दिवसभराचा कुणाचाही प्रभाव असो, आपल्याबरोबरचे काही तास त्यांना आपले गुणदोष बरोबर देऊन जातात.
हल्ली तर मी संध्याकाळी सहापर्यंत सगळे काम आटोपून घरी येते. मुलांसोबत तीन तास घालवते. मुलांसोबत अभ्यास करते. रात्री साडनऊ दहाला मुले झोपेला आली की मग एखाद तास हाॅस्पिटलला जाऊन रात्रीचा राऊंड्स वगैरे कामे करते.
आपली अाई, मला मुले खरेतर आयु म्हणतात; केवळ आपली आयु नसून एक डाॅक्टर आहे हे मुलांना चांगलेच ठाऊक आहे. तिचे मुख्य काम हाॅस्पिटलचे आहे हेही.
कुठल्या पेशंटचा फोन आला तर मला तत्काळ जाऊ द्यायला मुले तयार असतात. रात्री अपरात्री मदतनीस बाईंवर मुले टाकून जायला लागले तरी वैतागत नाहीत.
रविवारी मुलांना घेऊन बागेत, हाॅटेलात गेले की नेमका एखाद्या ईमर्जन्सीला अटेंड करायचा फोन येतो. त्यावेळी ज्याचा पेशंट असेल तसा आई किंवा बाबा एकजण निघून जाणार आणि मुलांना दुसऱ्याबरोबर थांबावं लागणार हे ही मुलांनी मान्य केलेलंच आहे.
वर्षातून केवळ एक दोन वेळाच मुलांना घेऊन बाहेरगावी जाता येतं, त्यावेळी मात्र पूर्णवेळ त्यांना देतो. आमचं गाव लहानसं आहे, हाॅटेलिंग, शाॅपिंग, सिनेमे अशा फार सोयी नाहीत. मोठ्या सुट्टीत मुलांना हे सगळे अनुभव दुसऱ्या शहरांत, देशांत देण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
सुटयांमध्ये मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिविटी क्लासेसना न घालता दोन्ही आजी आजोबांकडे जाऊ देतो.
कोंकणात महिनाभर पाठवतो. तिकडे माझी आई त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवते. झाडांवर चढणे, पोहणे, भाज्या लावणे , नारळ सोलणे अशी कामे मुले सुट्टीभर करतात.
आमच्या दोघांच्या धार्मिक श्रद्धा वेगवेगळ्या आहेत, मात्र कोणत्याही प्रकारचे अवडंबर आमच्याकडे नाही. आस्तिकतेचेही आणि नास्तिकतेचेही. सणांतील धार्मिक भाग सोडून साजरे करण्याचा प्रयत्न असतो. मुलांवर आपली धार्मिक मते न लादण्याचा प्रयत्न असतो. मुले मोठी झाली की स्वत:हून ठरवतील त्यांना काय करायचंय ते.
सामाजिक, राजकीय, पर्यावरणविषयक अशा सर्वच बाबींसंबंधी आम्ही मुलांशी सतत बोलत असतो. आर्थिक बाबींविषयीही. कोणताही वायफळ खर्च टाळण्याकरता अमुक गोष्टीइतके पैसे कमावण्याकरता मला किती पेशंट बघावे लागतात हे एकदा मोठ्या दोघांना समजावलं होतं. आता कुठल्याही गोष्टीची मागणी करण्याआधी मुले मनातच हिशोब करून ती मागणी करावी की नाही ते ठरवतात. शक्यतो हट्ट करतच नाहीत.
अभ्यासाबाबत मात्र आई फारच कडक आहे हे त्यांना माहित आहे. त्या एकाच बाबतीत मी अत्यंत पारंपारिक पालक आहे. मोठ्याने अभ्यासात टाळाटाळ केल्यास क्वचित मारही खाल्ला आहे. मार्क्स मिळाले नाही तरी चालतील, वर्गात नंबर आला नाही तरी चालेल पण एखादी गोष्ट तुम्हाला कळत नाही , जमत नाही म्हणून सोडायची नाही हे त्यांना सांगून ठेवलं आहे.
तुमचा अभ्यासक्रम हा तुमच्या वयाच्या सामान्य बुद्धिमत्तेच्या मुलांना डोळ्यांसमोर ठेवून बनवलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो आलाच पाहिजे हे त्यांच्या मनावर ठसवलेलं आहे. कदाचित असं सांगणं आणि असा अभ्यास त्यांच्यावर लादणं चुकीचंही असेल, पण सध्यातरी मला हे आवश्यक वाटतं. मुले जसजशी वरच्या इयत्तेत जातील तसतसा अभ्यासक्रमातील सगळं आलंच पाहिजे याबाबतचा माझा आग्रह कमी होईल असं वाटतं. बघू.
एकंदर डोळसपणे चालू केलेला तिघांचा पालकत्वाचा
प्रवास, आता अध्येमध्ये अगदीच अनपेक्षित वळणं घेत, कधी अगदीच वेगळ्या वाटेने असा चाललाय.
पुढे काय होईल ते माहित नाही. पण माझ्या आवडत्या गाण्यातल्या एका ओळीप्रमाणे ‘मंजिलसे बेहतर लगने लगे है ये रास्ते’!
हा प्रवास मला खूप आवडतोय आणि मुलांबरोबर वाढण्याचा हा प्रवास मी अत्यंत समरसतेने करत्येय हेच खरं!

- साती स्वाती
#पहिलीपावलं 8

जलपुनर्भरण, जलसंवर्धनाबाबत जनजागृती

बुलडाणा जिल्ह्यातले संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव आणि नांदुरा हे चार तालुके. आवश्यकतेपेक्षा जास्त पाण्याचा उपसा झालेले. त्यामुळे पाणीपातळी अतिशय खालावलेली. इथे मिळणारं पाणी क्षारयुक्त. तब्बल १२४ गावातली परिस्थिती गंभीर. मूत्रपिंडाच्या आजारानं अनेक जण ग्रासलेलं. 
गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांची निवड जलशक्ती अभियानातंर्गत करण्यात आली आहे. जलपुनर्भरण , जलसंवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी हे अभियान. जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी या अभियानात विद्यार्थ्यांची मदत घेतली आहे. संग्रामपूर तालुक्यातल्या वानखेड गावातल्या शिवशंकर विद्या मंदिर शाळेतले ३०० विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले. त्यांना जलसंवर्धनाचं महत्त्व समजावलं. त्यासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात शाळेत नाट्य, वक्तृत्व,रांगोळी स्पर्धा झाल्या. स्वतःच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांनी रांगोळ्या काढल्या. त्यातून जलसंवर्धनाचा संदेश दिला. मुलांनी प्रभात फेरी काढली. आसपासच्या गावांमध्ये घरोघरी जाऊन पावसाचं पाणी संचयित करण्याची माहिती मुलांनी दिली.
''बऱ्याचदा मजूर, कष्टकरी घरगाडग्याच्या रोजच्या चिंतेत असतात. त्यामुळे संध्याकाळ होताच विषयाचं गांभीर्य मागे पडलेलं असतं.'' डॉ निरुपमा सांगत होत्या. ''मात्र लहान वयात काही गोष्टी मनावर बिंबल्या तर त्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. जलसंवर्धनाबाबतही जनजागृती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली तर ती त्यांच्या घरापर्यंत पोहोचेल. ती अधिक प्रभावी, चिरंतन ठरेल, असं वाटलं.''
संग्रामपूरचे तहसीलदार महेश पवार, एसडीओ वैशाली देवकर, गट शिक्षण अधिकारी खरात, माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीराम पानझाडे या प्रयत्नात सहभागी झाले होते. 

ती सगळं डोळ्यांत टिपून घेते. मला तिच्यात लहानपणीच मी दिसते (पहिली पावलं)

आयुष्यात एक काळ असा होता की काही करुन आई व्हायचं होतं. मग एक काळ असा आला की काही करुन दुस-यांदा आई व्हायचं होतं. आता असा काळ आहे, की आपण आई होणं किंवा न होणं हे सर्वोच्च महत्त्वाचं नाही हे जाणवायला लागलं आहे आणि जर झालो आहोतच तर या आईपणातून सुटका नाही हे पक्क कळलं आहे. हे आईपण जितकं आनंद देणारं आहे, तितकाच वैताग आणणारंही आहे. पण आपल्या मुलांच्या डोळ्यांत आपल्याबद्दलचा गाढ विश्वास आणि प्रेम बघितल्यावर ते खूप जबाबदारीचं आहे हे जाणवून देणारं आहे.
मूल जन्माला येण्यापूर्वीपासूनच (म्हणजे ते तुमच्या पोटचं मूल असो किंवा तुम्ही मायेने आपलंसं केलेलं, दत्तक मूल असो) तुमच्यांत एक बंध तयार झालेला असतो. ते जन्माला आल्यानंतर किंवा त्यानं तुमच्या घरात प्रवेश केल्यानंतर हा बंध घट्ट व्हायला सुरूवात होते. सुरूवातीचा काळ संगोपनातच जात असल्यामुळे मुलांना शिस्त लावणे, संस्कार करणे वगैरेचा प्रश्नच नसतो असं वाटेल, पण ते तितकं खरं नाही. जन्मापासून मुलं आपल्याला शिस्त लावतात, संस्कार करतात. आई, लवकर उठ, लवकर झोप, तेलकट खाऊ नकोस, मला पचणार नाही, वगैरे वगैरे. मोठ्या लेकाने सुरूवातीचे दोन दिवस झोपू दिलं नाही पण नंतर काही शिस्त लावली नाही. पण लेकीने पुरेपूर शिकवलं. अजून शिकवते. दोन अत्यंत वेगळ्या स्वभावाच्या मुलांमुळे त्यांना मोठं करत असताना आलेले अनुभवही खूप वेगळे होते.
निस्सीम, माझा मोठा मुलगा जन्मल्यापासून फार शांत होता, अजून आहे. तो लहान असताना मी नोकरी करत असे. त्याला सांभाळायला एक फार चांगल्या मावशी होत्या. त्या संध्याकाळपर्यंत घरी थांबत. दिवसभर एकटं राहणं त्याला पसंत नसावं पण स्वतःहून काही बोलून दाखवणं किंवा सुचवणं त्याच्या स्वभावात नाही आणि तेंव्हा तर तो बाळ होता. एकदा माझे आई बाबा आम्ही नसतांना घरी आले आणि त्यांची निघायची वेळ झाली तेंव्हा त्याने आईचा पदर धरला. त्याच्या डोळ्यांत तिला दिसले, त्याला एकटं वाटत होतं.
पुढे आम्ही मुलूंडला बस्तान हलवलं. निस्सीमचं एकटेपण आणि मला काम करताना आलेले वैफल्य यामुळे मी नोकरी सोडली. मूळातच निस्सीमचा आनंदी स्वभाव. आता आम्हांला एकमेकांबरोबर खूप काळ घालवता येऊ लागला. खरे सांगायचे म्हणजे निस्सीमसाठी मी वेगळं असं काही केलं नाही. (या विधानाला घरातल्या अनेकांचा आक्षेप असेल). पण त्याला जे हवं आहे, हे समजून घेतलं. तीन वर्षांचा निस्सीम वाचायला लागला, त्याच्या हुशारीमुळे पण सहा आठ महिन्याचा असल्यापासून त्याने पुस्तक हातात धरलं ते आम्ही दिल्यामुळे. त्याला गाड्यांची खूप आवड होती, मग दिडेक वर्षांचा असल्यापासून देशी विदेशी बनावटीच्या गाड्या ओळखण्याचा त्याला नाद लागला. मग त्याला याच विषयांची पुस्तकं आणली. इतकंच नाही तर त्याच्या बाबानं इंग्रजी मुळाक्षरं - ए टू झेड पण गाड्यांच्या मॉडेल्सवरून शिकवली. सव्वा वर्षांचा झाल्यावर तो प्ले स्कूलला जायला लागला. त्यामुळे पुढे तो शाळेत लवकर गेला. आमचा हा निर्णय अत्यंत चुकीचा होता असं आज वाटतं, पण त्यावेळी जो सल्ला मिळाला, त्यानुसार आम्ही निर्णय घेतले.
शरयूच्या वेळी ही चूक केली नाही. तिला थोडं उशिरा शाळेत घातलं. अर्थात तोपर्यंत मी वेगळी आहे आणि माझी निस्सीमबरोबर तुलना करु नका हे तिने आम्हांला जन्मापासून ठणकावलं होतं. लहानपणी खाण्यापिण्याची फार काळजी घेण्याची गरज नसते, सकस आणि सहज उपलब्ध होणारे पदार्थ लहानांना द्यावेत हे शरयू झाल्यावर लक्षात आलं. त्यामुळे निस्सीमचा आहार जितक्या काळजीपूर्वक ठरवला होता, तितक्याच सहजतेने शरयूला खिमट, सूप वगैरे न देता वरण, मऊ भात द्यावा असं ठरवलं. त्याला बराच काळ भरवलं, पण तिने स्वतः जेवणं पसंत केलं. खरी गोची माझी तेंव्हा झाली, जेंव्हा तिने पुस्तकं वाचायला फार उत्सुकता दाखवली नाही. शरयूला रंगांनी खुणावले, मग ते कागदावरचे असोत वा बागेतले. तिला फार लहानपणापासून रंग, कागद, पेन्सिली, पेन अशा वस्तू मुबलक प्रमाणात दिल्या. पण एक नियम दोघांनाही होता, भिंती खराब करायच्या नाहीत.
मला मुलांना घराबाहेर फिरायला घेऊन जाणं फार आवडत नाही, आणि त्याचं मला फार वाईट वाटत नाही. तो विभाग त्यांच्या बाबाचा आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. शरयू अगदी लहान असताना मी तिला प्रॅममध्ये घालून नेत असे, पण ते फक्त तिला घरी ठेवता येत नाही म्हणून. मुंबईत फिरायला फार मोकळ्या जागा नाहीत. असल्या तर पोचणं सहज शक्य नाही. त्यात खरेदीला जायचं म्हणजे मॉलमध्ये मग तिकडे अगदी लहान मुलांना नेणं मला मान्यही नव्हतं आणि फार कटकटीचं वाटे. मोठ्याला कधीच कुठंच बाहेर यायचं नव्हतं. पण धाकटीला सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असतो. तो तिला मी जेंव्हा आमच्या विकेंड होमला घेऊन जाते तेंव्हा मिळतो. वेगवेगळी झाडं, पानं, फुलं, फळं, किटक, बेडूक, फुलपाखरं, पक्षी... ती सगळं डोळ्यांत टिपून घेते. मला तिच्यात लहानपणीची मी दिसते. 
- भक्ती चपळगांवकर, औरंगाबाद

पहिली पावलं. सचिन चौधरी, बाभूळगाव

पहिल्या फोटोत आहेत बाभुळगाव, यवतमाळचे सचिन चौधरी. मुलगा कृष्णा याच्यासोबत खेळात ते मग्न आहेत. ते म्हणतात, वाट्या, भांडी, चमचे असं काहीही घेऊन मी कृष्णासोबत खेळतो. त्यातून वेगवेगळे प्रकार तयार करून मी तो अधिकाधिक खेळेल असं बघतो.
दुसऱ्या फोटोत दिसणाऱ्या मीरा म्हणतात, अमित केवळ 37 दिवसांचा आहे. तरीही मी त्याच्याशी खेळते.'

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=518968932186608

अनाथ मुलांची शाळा झाली ‘आयएसओ’

अहमदनगरच्या शाळेची ही आगळीवेगळी गोष्ट. इथलं मुला-मुलींच्या निरीक्षण गृह. या गृहाची लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय ही शाळा आहे. या शाळेत अनाथ, निराधार, आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलं ज्ञानाचे धडे गिरवतात.
नगर शहरातील सीना नदीकाठची ही शाळा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात नगर शहरात स्थापन झालेल्या या शाळेचं 1980 च्या दशकात त्यांच्या वसतिगृहातच स्थलांतर झालं. नगर महापालिकेतर्फे सुरू असलेल्या या शाळेत सध्या सातवीपर्यतचे वर्ग असून साधारण 70 अनाथ, निराधार, संघर्षग्रस्त मुलं इथं शिकतात.
शाळेतून प्रत्येक मुलांना हक्काचं शिक्षण मिळावं यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. अशा शाळांकडे फारसे गांभिर्याने पाहिले जात नाही. मात्र अन्य शाळांप्रमाणे येथेही सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी शाळेतील मुख्याध्यापक शशिकांत वाघूलकर यांच्यासह ज्योती गहिले, मनिषा बारगळ, दिपाली शेवाळे, अमोल बोठे यांनी पुढाकार घेतला. स्वखर्चातून शाळेत सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू केल्यावर लोकांकडूनही प्रतिसाद मिळू लागला. त्यातून सुमारे अडीच लाख रुपये जमा झाले. त्यातून मुलांसाठी पिण्याचं शुद्ध पाणी, डिजिटल स्कूल, ई - लर्निंग, परसबाग, बोलक्‍या भिंती, चाइल्ड फ्रेंडली स्कूल, दप्तर मुक्त शाळा, बालकेंद्रित अध्यापन पद्धती अशी कामं झाली.
अनाथ मुलांच्या सुविधा पाहून प्रशासनातील अधिकारीही अवाक झाले. महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त सुनील पवार, पोलीस उपअधीक्षक संदीपजी मिटके, आयएसओ लीड ऑडिटर व मोटिवेशनल ट्रेनर अनिल येवले, आयएसओ ऑडिटर योगेश जोशी यांच्या हस्ते मुख्याध्यापक शशिकांत वाघुलकर यांच्या शाळेला आयएसओ प्रमाणपत्र देऊन शाळेचा गौरव केला. अनाथ मुलांच्या शाळेला राज्यात सर्वप्रथम आयएसओ मानांकन मिळवण्याचा मानही या शाळेने मिळवला आहे. लोकसहभागातून शाळा आणि परिसराचा विकास झाला आणि शाळेचा नावलौकीकही वाढू लागला आहे. ठरवलं तर कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही हे शिक्षकांनी दाखवून दिलं आहे. शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही इथं येऊन शिक्षकांचं कौतुक केलं आहे.
- सूर्यकांत नेटके, नगर

पहिली पावलं भाग पाच

कांदिवली पूर्वच्या आकुर्ली मराठी महापालिका शाळा क्रमांक 1 मधील हा व्हिडीओ. शाळा मुख्याध्यापिका शोभा महाले, लायन्स क्लबच्या माधुरी शहा, शारीरिक शिक्षण शिक्षिका मनीषा वर्तक या तिघीही मुलांच्या सर्वांगिक वाढीसाठी प्रयत्न करतात. त्याचंच फळ म्हणजे या मुलांना विविध स्पर्धात यश मिळालेलं आहे.
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=727219321024108

घरोघरीच्या अंगणी आंबा, चिंच, पेरू! बाळांबरोबर रोपंही वाढवू!!

देवळा, सटाणा अशी नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावात आता झाडं दिसून येत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाचा 'एक जन्म - एक वृक्ष' उपक्रम. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत हाती घेतलेला. आशा सेविका हा उपक्रम राबवतात. नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून ३ हजार ५१४ आशा सेविका यासाठी मेहनत घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ५० हजारांहून अधिक वृक्षांची लागवड झाली. 
आशा सेविका गरोदर मातेकडे गृहभेटीला जातात . तेव्हा एक जन्म एक वृक्ष उपक्रमाबाबत माहिती देतात. पुढच्या पिढीला पर्यावरणाचं महत्त्व समजायला हवं. ती जाणीव रुजण्याचा एक भाग म्हणून, बाळाच्या जन्मासोबतची आठवण म्हणून वृक्षलागवड,
कुटुंबातल्या सदस्यांना झाडाची निगराणी ठेवणं शक्य आहे तिथे आवारात, शेतात, बांधावर किंवा इतर मोकळ्या ठिकाणी झाडं लावली जातात. यात आंबा, चिंच, पेरू, वड, पिंपळ, कडुनिंब, कडुनिंब अशी वेगवेगळी झाडं आहेत. परिसरात गेल्या वर्षी एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षात ५० हजारांहून अधिक बालकांचा जन्म झाला . आशा सेविका गृहभेटीत झाडांची वाढ, निगराणी याबाबत माहिती संकलित करतात. बाळाच्या पहिल्या वाढदिवशी झाडाचा वाढदिवस उत्साहात साजरा केला जातो.
लावलेल्या झाडांपैकी पाण्याअभावी काही झाडं जळली. यंदाच्या आर्थिक वर्षात सहा हजारांहून अधिक झाडं लावण्यात आल्याचं शरद नागरे सांगतात. नागरे, जिल्हा आशा समन्वयक गट समूह अधिकारी आहेत. उपक्रमात बाळाच्या कुटुंबासोबत परिसरातले नागरिकही सहभागी होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात हरित पट्टा वाढेल असा विश्वास नागरे व्यक्त करतात.
- प्राची उन्मेष , नाशिक

नकळतपणे आम्ही एकमेकींना काही देत घेत रहातो (पहिली पावलं)

नुकतंच पाचवं वर्ष पूर्ण झालेली नात आहे माझी. २०१२ साली माझ्या यजमानांच्या दुर्दैवी निधनानंतर ‌एक उदास छाया माझ्या घरादारावर दाटून राहिलेली होती. २०१४ला माझी मुलगी मानसी बाळंतपणासाठी मुंबईला आली नंतर १० जुलै १४ला तीला मुलगी झाली. मी व‌ माझी मोठी कन्या दिप्ती आनंदाने भरुन पावलो.
हीच‌ माझी नात मिष्टी‌ म्हणजे कस्तुरी जिच्या बाललिलांनी एवढा आनंद दिला की दु:खाची छाया धूसर झाली. तिच्या दुसऱ्या आजी-आजोबांनीही या नातीच जंगी स्वागत केलं.
मिष्टी नावाप्रमाणेच गोड, हुशार आहे. तिची शाळा, अभ्यास यामुळे तिच्याबरोबर फारसा वेळ आता मिळत नाही पण जेव्हा मिळतो तेव्हा आजी व नातीची छान गट्टी जमते. कधी एकत्र बसून चित्र काढणं, रंगवण‌ यात आम्ही दोघीही रंगतो.
तिला न संपणारी लांब गोष्ट जेव्हा रचवून सांगावी लागते. तेव्हा माझ्या मुलींच बालपण आठवतं. मग वेळ कसा, कुठे गेला कळत नाही. सुट्टीत तिच्याबरोबर पत्ते, सापशिडी वगैरेचे डाव पुन्हा पुन्हा न थकता खेळताना एक नवी उर्जाच मिळत असते. तिला माऊ खूप आवडते मग बाहेर कुठेही माऊ दिसली की तिला दूध द्यायचा तिचा गोड हट्ट असतोच.
आज्जी म्हणून तिच्यासाठी गोष्टींची पुस्तकं आणणं किंवा तिनं काही आणायला सांगितलं आणि आठवणीने आणलं की ती खूष असते. मुलांना वाढवताना आजच्या पालकांपुढे अनेक आव्हानं आहेत. मुख्य म्हणजे त्यांना वेळ देणं व त्यांना समजून घेत कधी प्रेमाने तर प्रसंगी कठोर होत त्यांना घडवणं हे तिचे आई- बाबा करताना मी पहात असते. मोबाईल, टीव्ही वरचे कार्टून वगैरेचा कधीही अतिरेक होऊ देत नाहीत. ती तशी अजून लहानच आहे पण पुढे पुढे आव्हानं कठिण आहेत यात दुमत नाही. मुलांचं निरागस बाल्य जपतच त्यांना घडवणं जमलं पाहिजे. आता एकत्र कुटुंबं राहिली नाहीत, वाढत्या मुलांना कुटुंबात निःसंकोचपणे आधार वाटला पाहिजे. एकमेकांविषयी मैत्र भावना निर्माण व्हावी.
मिष्टीबरोबरची एक सुंदर आठवण मला सांगाविशी वाटते ती अशी की माझ्या छोट्याशा बाल्कनी गार्डन मधलं सुंदर रबर प्लॅन्ट एकदा माकडांनी तोडून विद्रुप केलं ते पाहून मला व तिलाही खूप वाईट वाटलं. नंतर ते झाड वाढता वाढेनां. मी तसंच त्याला न चुकता पाणी देत राहिले. पुढे मी एकदा मुंबईला बरेच दिवसांसाठी गेले होते व परतल्यानंतर ती मला बाल्कनीत घेऊन गेली आणि झाडाला नविन पालवी फुटलेली दाखवली मला हे फार लोभस वाटलं. नकळतपणे आम्ही एकमेकींना काही देत घेत रहातो.
मुलांचं जग झपाट्याने बदलतंय. त्यांच अवकाश विस्तारतंय. नात्यांचे हे रेशमी बंध दृढ व्हावे याकरिता प्रेमाचं, मायेचं शिंपण करत रहायचं.
- अनुराधा खरूडे

एका हाताचं बळ

धुळ्यातल्या प्रियांका पाटील. जन्मतः एकच हात. त्यामुळे पुढे कसा निभाव लागणार याची चिंता कुटुंबियांना होती. एका हाताने सर्व कामं करत प्रियांका अभ्यासातही पुढेच राहिली. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर म्हसदी येथील दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले शालिकराव पाटील यांच्याशी दहा वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं. एका हाताने अपंग पत्नी आणि दोन्ही डोळ्यांनी अंध पती. असं हे जोडपं. 
‘आयुष्यभर तुलाच सांभाळ करावा लागणार’ अशी टोचणी मैत्रिणींकडून कायम मिळायची. गावातील एका अंध शाळेत पती तासिका तत्त्वावर नोकरीला लागले. दरम्यान एक मुलगाही झाला. सर्व काही सुरळीत असताना अचानक पतीचा पगार बंद झाला. थोडे दिवस आई - वडीलांनी हातभार लावला. याच काळात प्रियांकाचं पितृछत्र हरवलं. थोडे दिवस दागिने विकून उदरनिर्वाह चालला. मात्र जगण्याचं संकट होतंच. कुठं काम शोधायला गेलं तर एका हाताने कसं काम करणार म्हणून हिणवायचे. त्यामुळे नोकरी मिळणं अशक्य वाटलं.
हार मानण्यापेक्षा लहान - मोठा उद्योग उभारायचा विचार आता प्रियांकाने सुरू केला. मात्र आर्थिक प्रश्न होताच. एकदा मैत्रिणींशी गप्पांमध्ये महिला बचत गटांचा विषय निघाला. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव केल्यानंतर पहिल्या टप्यात व्यवसायासाठी 20 हजार रुपयांचे कर्ज मिळालं. त्यातून पत्रावळ्या, द्रोण तयार करण्याचं मशीन, कच्चा माल खरेदी केला. आवश्यक प्रशिक्षण आधी घेतलं होतंच. मग मंगल कार्यालये, केटरर्स येथे स्वतः फिरुन त्यांनी मार्केटिंग केलं. उत्पादनाचा दर्जा पाहून लोक विश्वास ठेवू लागले. हळूहळू त्याच व्यावसायिकांकडून उचल घेऊन प्रियांकाताईंनी उद्योग वाढवला.
आता धुळ्यातच नव्हे; तर आजूबाजूच्या शहरांमध्येही त्यांच्या मालाला मागणी वाढते आहे. लग्नसराई किंवा लहानमोठे कार्यक्रम यातून वर्षभर त्यांना ऑर्डर मिळते. ज्या हाताचं अपंगत्व पाहून त्यांना काम नाकारलं जात होतं त्याच हातांनी प्रियांकाताई अनेक महिलांच्या हातांना आज काम देत आहेत. दररोज एक ते दीड हजार पत्रावळ्या त्यांच्याकडे तयार होतात. बचत गटातून काढलेल्या कर्जाचा उपयोग करत प्रियांकाताईंनी आपला व्यवसाय आणखी वाढवला. आता त्यांच्या गटाचे बँकेत शेअर्सही आहेत.
प्रियांकाताई सांगतात, “आयुष्यात प्रतिकूल परिस्थिती येणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला आंतरिक कौशल्यांची ओळख होते. शारीरिक अपंगत्वाचा बाऊ न करता परिस्थितीशी संघर्ष केला. पण आज अनेक हातांना काम देत असल्याचं समाधान वाटतं.”
- चेतना चौधरी, धुळे