Friday 22 November 2019

शब्दांपलीकडची भाषा आणि लिपीपलीकडचा इतिहास (इतिहासात डोकावताना)

इतिहास आणि दृश्यकलेचा तसा काय बरं संबंध, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तो तसा पडण्यामध्ये आपल्या शिक्षणव्यवस्थेचा मोठा हात आहे. एकतर, सगळ्याच विषयांमध्ये इतकी दरी आहे; इतिहास तर फक्त तारखा पाठ करण्यापुरता मर्यादित आहे. अशा वेळेस मग इतिहासासारखा विषय फक्त गतकाळाची उजळणी करणे, एवढाच मर्यादित न ठेवता हा विषय मुलांमधील तार्किक क्षमता वाढवण्याकरिता वापरला तर? यामध्ये दुहेरी हेतू साध्य होऊ शकतो. यामुळे कदाचित इतिहासाकडे 'बघण्याची' प्रक्रिया चालू होऊ शकते. हाच विचार करून मी मुलांबरोबर एक प्रयोग करायचं ठरवलं. इतिहासाकडे 'बघण्यासाठी' मग काळ देखील असा निवडला जेव्हा, कदाचित माणसाला कोणतीही बोलीभाषा अवगत नव्हती, आणि आपले विचार, संदेश एकमेकांपर्यंत पोहचवण्यासाठी चित्रभाषेचा उपयोग होत असावा. प्रयोगाचं नाव होतं शब्दांपलीकडची भाषा आणि लिपीपलीकडील इतिहास.
कार्यशाळेच्या सुरवातीला मी थोडावेळ मुलांशी गुहाचित्रं या विषयावर गप्पा मारल्या. माणसाने गुहेत चित्रं का काढली असावीत, कशी काढली असावीत, ह्या चित्रांचे विषय कोणकोणते होते,काळानुसार ह्या चित्रांमध्ये कायकाय बदल होत गेले, चित्रांवरून तेव्हाच्या माणसांची जीवनपद्धती कशी कळते, अशा अनेक मुद्द्यांवर मुलं छान गप्पा मारत होती, आणि मुख्य म्हणजे अनेक प्रश्नदेखील विचारत होती. गप्पा मारून झाल्यानंतर जगभरातील अनेक गुहाचित्रं दाखवली. काही वेळानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला दोन चित्रं दिली. ती त्यांनी 'वाचणं' आणि त्यावर नंतर एक गोष्ट लिहिणं अपेक्षित होतं. सुरवातीला मुलं थोडी बावचळली होती. परंतु थोड्या वेळात सगळॆजण चित्र वाचण्यात आणि गोष्ट लिहिण्यात गुंगून गेले. जरा वेळाने ज्या गोष्टी जमा झाल्या, त्या कमालीच्या विलक्षण होत्या.
चैतन्य लिहितो "ही एक होडी वाटत आहे. ह्या होडीवरची लोकं म्हणजे राजा, राणी, सेवक, राजकुमार वाटतायत" "हा ह्यांचा कोणीतरी देव असेल. आणि खाली होडी किंवा त्याचे कोणतेतरी वाहन असेल. उदा - बदक "
अश्विनी लिहिते "एक लिंगो नावाचा माणूस होता. तो एक दिवस जंगलात फिरत होता. त्याला खूप भूक लागली. तो गुहेत गेला. त्याने त्याच्या बायकोला मांस मागितलं. पण घरात मांस नव्हतं. मग तो एक भाला आणि बुमरँग घेऊन शिकारीला निघतो. थोड्या वेळाने त्याला हरणं दिसतात. तो त्यांचा पाठलाग करू लागला. मग त्याने एकावर बुमरँग फेकलं. ते त्याला लागलं व ते हरीण पडलं, तर दुसरं पळून गेलं. तो आनंदाने घरी परतला".
रोहित लिहितो "हे चित्र बघून असे वाटते की एका टोळीने शिकार केली आहे. आणि दोन टोळ्या त्या शिकारीवरून भांडत आहेत. म्हणजे अक्षरशः युद्ध करत आहेत. बहुतेक डाव्या बाजूच्या टोळीने शिकार केली आहे व उजवीकडची टोळी चोरायला आली आहे".
मुक्ता लिहिते "ही नाचणारी माणसं आहेत असं वाटतंय. त्या सगळ्यांची तोंडं एकाच बाजूला असल्याने ते गायकाकडे बघून नाचतायत असं वाटतंय. तिन्ही आकृतीचा डावा पाय पुसट आहे/नाहीच आहे. मग कदाचित त्यांनी एक पाय वर उचलला असेल. हे चित्र छान आणि मजेशीर आहे."
नीरजा लिहिते "हे त्यांचे देव असतील. किंवा भुतं पण असू शकतात. किंवा काहीकाही वर्षांनी बदलत गेलेल्या देवांची चित्रं एकत्र करून हे चित्र बनवलं असेल."
ह्या सगळ्याच गोष्टींकडे एक नजर टाकली तर लक्षात येईल की मुलं अजिबात एककल्ली आणि एकांडा विचार करीत नाही आहेत. भूतकाळाकडे त्यांना अत्यंत तार्किक आणि खुल्या मनाने बघता येत आहे. त्यांनी वापरलेल्या भाषेकडे नजर टाकली की लक्षात येतं, मुलं ठोस विधानं करत नाही आहेत. 'असं असू शकतं', 'तसं झालं असेल' अशा भाषेत ह्या गोष्टी लिहिल्या आहेत. एकच चित्र काहीजणांनी दोन ते तीन प्रकारे वाचायचा प्रयत्न केला आहे. हे असं 'बघता' येणंच तर महत्वाचं आहे. एखाद्या घटनेकडे किती प्रकारे बघता येऊ शकतं, एखाद्या गोष्टीला जास्तीत जास्त किती संदर्भ जोडता येऊ शकतात, अनुमानाच्या किती शक्यता तयार होऊ शकतात आणि त्या शक्यतांच्या खोलात जाऊन आणखी नवे प्रश्न तयार होत राहणं म्हणजेच इतिहास शिकणं आहे. ह्या प्रयोगामुळे पुढच्या प्रयोगांना खूपच चालना मिळाली त्या प्रयोगांविषयी लवकरच... ll5ll
डॉ.अनघा भट

No comments:

Post a Comment