Friday 22 November 2019

संगोपन केलं ह्यापेक्षा आम्ही नातं, कुटुंब जोपासलं - चिन्मयी सुमीत (पहिली पावलं)

माझा पहिला मुलगा मी सत्तावीस वर्षे पूर्ण केली आणि झाला. म्हणजे, मी तशी जाणती होते. आई मानसशास्त्रज्ञ असल्याने गरोदरपणातच बालसंगोपनाची बरीच चांगली पुस्तकं वाचली होती. थिअरी माहित असली तरी, बरेच प्रॅक्टीकल बदल प्रत्यक्ष मुलं जन्माला आलं की करावेच लागतात. हातखंडं पालकत्व असं काही नसतंच. प्रत्येक मुलाचा पिंड निराळा, गरजा निराळ्या. हे, खरं तर दुसरी मुलगी आयुष्यात आल्यावर जास्त कळलं.
मुलांच्या सुरुवातीच्या वाढण्याच्या काळात मी आसपास असणं, ही माझी वैयक्तिक गरज होती, मुलांच्या विकासापेक्षा तेव्हा माझा आनंदाचा भाग जास्त होता. मी सतत मुलांशी संवाद ठेवला. म्हणजे अगदी इंजेक्शनसाठी डॉक्टरांकडे जायचं असेल तरी हळू, मृदु आवाजात मी बाळाच्या कानात आपण डॉक्टरांकडे चाललो आहोत, थोडं दुखणार आहे, हे सांगायचे. तिथपासूनच कदाचित प्रत्येक गोष्टीसाठी मुलांना तयार करावं, फसवून काही करू नये हे सुरू झालं. मुलांसाठी रंगीबेरंगी भरपूर पुस्तकं आणली. नातेवाईकांनाही आवर्जून पुस्तकंच आणायला सांगितली. रंगीत ठोकळे,चेंडू ही खेळणी जास्त आणली. फार आवाज करणारी खेळणी, लाईटसची खेळणी थोडी कमीच... मनोरंजन खेळण्यांवर अवलंबून ठेवलं नाही. नीरद, दीया नॅपकिन आणि रुमालांत पण रमत. घड्या घालायच्या, मोडायच्या हाही खेळ असायचा. मुलं मोकळ्या जागेत खेळतील, मित्र जमवतील हेही पाहिलं. सुमीत शूटिंगमध्ये व्यग्र होता त्यामुळे घरात सतत एखादी 'मदतनीस' ताई असायची, ती ताई हा परिवाराचा घटक आहे, हे मुलांना आमच्या वागणुकीवरून कळायचं. मुलांनी मदतनीसांना त्यांच्या नावाने हाक मारू नये, म्हणून आम्हीही त्यांना ताईच म्हणायचो. आम्ही कांदिवलीत रहात असलो तरी दर शनिवार, रविवारी कुर्ल्याला सुमीतच्या आईवडिलांकडे जायचो. त्यामुळे तिथेही मुलांची मित्रमंडळी झाली. येता - जाता गाडीत गाणी आणि गप्पा चालायच्या. शक्तिमान, सोनपरी ह्या मुलांच्या आवडत्या मालिका, पण टीव्ही बघत किंवा कार्टून्स बघत जेवणं ना आम्ही केलं ना मुलांना करायला प्रोत्साहन दिलं. शाळेत जाण्याआधीच मुलांनी तीस-चाळीस कविता पाठ केल्या होत्या. ( त्यात हिंदी, गुजरातीही होत्या) मुलांचे हट्ट पुरवायचो, म्हणजे अगदी 'अंडे का फंडा' गाण्यासाठी नीरदने तो चित्रपट आम्हाला पाहायला लावला, ते केलं. पण काही गोष्टींना ठामपणे नाहीसुद्धा म्हणालो. दरवेळी नकाराची कारणं पटवूनही दिली. 'मी सांगतेय ना/ सांगतोय ना मग ऐकलंच पाहिजे' हा खाक्या कधीच वापरला नाही. दीया तर औषध पितांनाही,' तू मला कन्व्हिन्स कर ना' म्हणायची... मराठी, इंग्लिश, हिंदी सगळ्या भाषा कानावर पडायच्या, त्यांचा गोंधळ व्हायचा, बोलतांना सरमिसळ व्हायची पण आम्ही त्यांना हसलो नाही. हातून काही तुटलं, फुटलं तर तर नीरद दचकायचा, मी 'म्हणायचे अरे, फुटलं होय, नेव्हर माईंड' पण मदतनीस ताईकडून काही फुटलं की माझी काही निराळी प्रतिक्रिया येते आहे असं बघताच तोच म्हणाला, 'नेव्हर माईंड'. मुलांसमोर दुटप्पी वागून चालत नाही. नीरदने हा मला दिलेला धडा होता.
मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्याने सर्व स्तरातल्या विद्यार्थ्यांबरोबर शिकली, मिसळली, रमली. त्यामुळे त्यांना समाजभान यावं म्हणून वेगळं काही करावं लागलं नाही. अम्युझमेंट पार्कला मुलांना नेलं पण त्याहून जास्त जंगलांमध्ये, सागरकिनारी नेलं. मुलं क्रुझवरही गेली आणि दांडेलीच्या कॅम्पमध्येही आनंदात राहिली. आमच्या कामाच्या ठिकाणी मुलांना आम्ही बऱ्याचदा घेऊन गेलो. त्यामुळे आम्ही नेमकं काय करतो आणि आमच्यासह अनेकजण किती कष्ट करतात ते त्यांनी जवळून पाहिलं. दोन्ही मुलांची आम्ही कधीच तुलना केली नाही. मुलगा-मुलगी ही सवलत किंवा सक्तीही नाही. पूर्वी आम्ही एकत्र फिरायचो. आता एखादी सुट्टी ते दोघे स्वतंत्रपणे आखतात. बॅकपॅकिंग करुन निघतात. परगावी रहाणाऱ्या नातेवाईकांना आम्ही मागे न लागता स्वतःच्या मनाने जाऊन भेटतात. आपली मुलं ही आपलीच आवृत्ती असणार असं गृहित न धरता, आम्ही त्यांना त्या स्वतंत्र व्यक्ति आहेत, काही काळ आपल्या सहचर आणि नंतर आपले मित्र असणार ह्याची जाणीव मनात सतत तेवत ठेवून आम्ही त्यांच्याबरोबर वावरत आहोत. त्यामुळे आम्ही संगोपन केलं, ह्यापेक्षा आम्ही नातं, कुटुंब जोपासलं हे म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल.
#पहिलीपावलं 9

No comments:

Post a Comment