Friday 22 November 2019

शहराचं पोर्ट्रेट (इतिहासात डोकावताना)

इतिहास म्हणजे नेमकं काय? मला स्वतःला नेहमी असं वाटत आलंय की इतिहास म्हणजे अनादी काळापासून होत असलेल्या बदलांचं विविध प्रकारे निरीक्षण करणं, त्यांचा अभ्यास करणं. त्या बदलांना शांतपणे स्वीकारणं आणि त्या बदलांमागचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संदर्भ लक्षात घेणं. अर्थातच हे सगळं शहाणपण पुरातत्त्वशास्त्रात अनेक वर्ष घालवल्यावर आलेलं शहाणपण आहे. 
पीएचडीचं काम करताना मात्र असं लक्षात येत गेलं की शालेय वयात मुलांना मात्र काळ ही संकल्पना आणि त्यात होत गेलेले किंवा होत असलेले बदल कळणं थोडंसं अवघड जातं. विशेषतः सहावी सातवीतल्या मुलांना. त्यांची काळ ही संकल्पना फारफार तर ३०० वर्ष मागे जाते, तीसुद्धा इतिहासाच्या पुस्तकांमधील तारखा पाठ केलेल्या असतात म्हणूनच. काळ ही संकल्पना मुलांना सोपी करून सांगता येईल का हे बघण्यासाठी मग मी एक प्रयोग करून बघायचं ठरवलं. ह्यामध्ये दोन गोष्टी फार कटाक्षाने टाळल्या होत्या. ह्या प्रयोगामध्ये जो काळ वापरला जाणार होता तो ह्या मुलांपासून फार लांब नव्हता. प्रयोग करायच्या दिवसापासून फक्त २० वर्ष मागं जायचं हे ठरलं होतं. दुसरं महत्वाचं म्हणजे ह्या प्रयोगात जे ठिकाण वापरणार होते ते देखील लांबचं नव्हतं. ज्या गावातल्या शाळेमध्ये हा प्रयोग करणार होतो त्या बांद्र्याचाच वापर ह्या प्रयोगामध्ये होणार होता.
तर, प्रयोग असा होता: मुलांनी आपल्या आई, वडील, आजी, आजोबा, काकू, काका, मामी, मामा यांना आपल्या शहरामध्ये गेल्या २० वर्षात कायकाय बदल झाले ह्याबद्दल प्रश्न विचारायचे होते. सहज गप्पा मारायच्या होत्या. आणि जी माहिती मिळेल त्या माहितीवरून बांद्रा हे गाव २० वर्षांपूर्वी साधारण कसं दिसत असेल अशी कल्पना करायची होती. आणि त्या कल्पनेवर बेतलेलं शहराचं पोर्ट्रेट तयार करायचं होतं.
असा हा प्रयोग दोन भागात विभागलेला होता. एक दिवस शाळेत जाऊन मी या मुलांशी गप्पा मारल्या. काळ म्हणजे काय, इतिहास म्हणजे काय, तो कसा तुमचा आमचा, शाळेचा, गावाचा थोडक्यात प्रत्येकाचा असतो. इतिहासात फक्तच युद्ध होत नाहीत तर इतर अनेक गोष्टी कशा घडत असतात आणि त्या किती रंजक असतात ह्या सगळ्यावर मस्त चर्चा रंगली होती. मग मुलांना आम्ही करणार असलेल्या प्रयोगाविषयी सांगितलं. आई बाबांकडून माहिती कशी गोळा करायची, काय प्रश्न विचारायचे, कसे विचारायचे ह्याची काही उदाहरणं दिली. ह्या मुलाखतींची रंगीत तालीम झाली. आणि मग एका आठ्वड्यानंतर भेटायचं ठरवून मी तिकडून निघाले. आठवड्याभराने परत शाळेत गेल्यावर जमा केलेल्या माहितीचा गठ्ठा माझ्या स्वागताला मुलांबरोबर हजर होता. अतिशय मस्त गोष्टी जमल्या होत्या. काही वेळ त्या गोष्टींची देवाणघेवाण झाली. मुलाखती घेताना आलेले अनुभव सांगून झाले. आणि मग लागलो आम्ही सगळे कामाला. शहराचं पोर्ट्रेट करायला.
मुलांचे ४-५ गट तयार केले. जमलेल्या माहितीच्या आधारे प्रत्येक गटाने साधारण २० वर्षांपूर्वी बांद्रा कसं दिसत असेल ह्याच्या नोंदी काढायला सुरवात केली. त्या नोंदीवरून एक छोटासा रिपोर्ट तयार केला आणि मग शहराचं पोर्ट्रेट बनवायला सुरवात केली. मुलं ह्या सगळ्या कल्पनाविलासमध्ये पूर्ण रमून गेली होती. प्रत्येक गटाचं शहर वेगळं दिसत होतं. आणि असं असूनही प्रत्येक गटाचं शहरं खरं होतं. त्यात चूक किंवा बरोबर असं काही नव्हतं. २-३ तासांनंतर मुलांचं काम संपलं. मग अतिशय उत्साहात फोटो काढायचा कार्यक्रम पार पडला. आणि जाता जाता ह्या सगळ्या प्रयोगामुळे काय काय गोष्टी मुलांना जाणवल्या त्याबद्दल एक बहारदार चर्चा झाली. इतिहास एकच नसतो. तो फक्तच राजकीय नसतो. इतिहास फक्तच राजा राण्यांचा नसतो. इतिहास आपल्या शहराचा, आपल्या आजूबाजूच्या दुकानांचा, रस्त्याचा, शाळेचा, आजीचा, आजोबांचा आणि अशा अनेक इतर माणसांचा, प्राण्यांचा, झाडांचा आणि वस्तूंचा असतो. आणि अशा इतिहासाचं चित्रं काढायला मिळालं की अजूनच मजा येते. मग अशाच आणखी इतर गोष्टींचा इतिहास समजून घेण्यासाठी भेटायचं ठरवून मी त्या दिवशी मुलांचा निरोप घेतला. ll6ll

- डॉ.अनघा भट

No comments:

Post a Comment