Friday, 22 November 2019

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांचे नंदनवन

आज आकाश सावळे अभियांत्रिकीचं,हृषिकेश देवकर विज्ञान शाखेचं, पुरुषोत्तम झरेकर कला शाखेचं शिक्षण घेत आहेत. हे शक्य झालं आहे केवळ नंदनवनमुळे. नंदनवन प्रकल्प बुलडाणा जिल्ह्यातल्या साखळी बुद्रुक इथल्या अजय आणि लक्ष्मी दराखे यांचा. 9 वर्षांपूर्वी सुरू झालेला.
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 10 वर्षात 1,247 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्ता पुरुष गेल्यावर मुलांचं शिक्षण कसं सुरू ठेवणार असा अनेक कुटुंबांपुढचा प्रश्न. तेव्हा अजय आणि लक्ष्मी पुढे सरसावले. ८ ते १० मुलांपासून सुरू झालेल्या नंदनवनात आज ६० मुलं आहेत. बुलडाणा,अकोला, वाशिम, जालना, औरंगाबाद, जळगाव अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची ही मुलं. ६ ते १६ वयोगटातली. राहणंखाणं, शिक्षण, संपूर्ण संगोपन इथेच. त्यासाठीची रक्कम स्वतःच्या व्यवसायातून उभारलेली. अजय यांचं कापडाचं दुकान आणि प्रवासी कंपनी. त्यातून मिळणारी सर्व मिळकत नंदनवनसाठी. सुरुवातीला घरातल्या पाच आणि नंदनवनातल्या १० मुलांचा स्वयंपाक लक्ष्मी एकट्याच करायच्या.
''आपण समाजाचे काही देणं लागतो.'' अजय सांगत होते. ''स्नेहालय चालवणारे गिरीश कुलकर्णी माझे मित्र. त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली आणि कार्य यशस्वी करू शकतो हा विश्वास लक्ष्मीने दिला.''
अजय आणि लक्ष्मी यांनी काबाडकष्ट करून मुलांच्या गरजा पूर्ण केल्या आहेत.

-दिनेश मुडे, बुलडाणा

No comments:

Post a Comment