Friday 22 November 2019

ती सगळं डोळ्यांत टिपून घेते. मला तिच्यात लहानपणीच मी दिसते (पहिली पावलं)

आयुष्यात एक काळ असा होता की काही करुन आई व्हायचं होतं. मग एक काळ असा आला की काही करुन दुस-यांदा आई व्हायचं होतं. आता असा काळ आहे, की आपण आई होणं किंवा न होणं हे सर्वोच्च महत्त्वाचं नाही हे जाणवायला लागलं आहे आणि जर झालो आहोतच तर या आईपणातून सुटका नाही हे पक्क कळलं आहे. हे आईपण जितकं आनंद देणारं आहे, तितकाच वैताग आणणारंही आहे. पण आपल्या मुलांच्या डोळ्यांत आपल्याबद्दलचा गाढ विश्वास आणि प्रेम बघितल्यावर ते खूप जबाबदारीचं आहे हे जाणवून देणारं आहे.
मूल जन्माला येण्यापूर्वीपासूनच (म्हणजे ते तुमच्या पोटचं मूल असो किंवा तुम्ही मायेने आपलंसं केलेलं, दत्तक मूल असो) तुमच्यांत एक बंध तयार झालेला असतो. ते जन्माला आल्यानंतर किंवा त्यानं तुमच्या घरात प्रवेश केल्यानंतर हा बंध घट्ट व्हायला सुरूवात होते. सुरूवातीचा काळ संगोपनातच जात असल्यामुळे मुलांना शिस्त लावणे, संस्कार करणे वगैरेचा प्रश्नच नसतो असं वाटेल, पण ते तितकं खरं नाही. जन्मापासून मुलं आपल्याला शिस्त लावतात, संस्कार करतात. आई, लवकर उठ, लवकर झोप, तेलकट खाऊ नकोस, मला पचणार नाही, वगैरे वगैरे. मोठ्या लेकाने सुरूवातीचे दोन दिवस झोपू दिलं नाही पण नंतर काही शिस्त लावली नाही. पण लेकीने पुरेपूर शिकवलं. अजून शिकवते. दोन अत्यंत वेगळ्या स्वभावाच्या मुलांमुळे त्यांना मोठं करत असताना आलेले अनुभवही खूप वेगळे होते.
निस्सीम, माझा मोठा मुलगा जन्मल्यापासून फार शांत होता, अजून आहे. तो लहान असताना मी नोकरी करत असे. त्याला सांभाळायला एक फार चांगल्या मावशी होत्या. त्या संध्याकाळपर्यंत घरी थांबत. दिवसभर एकटं राहणं त्याला पसंत नसावं पण स्वतःहून काही बोलून दाखवणं किंवा सुचवणं त्याच्या स्वभावात नाही आणि तेंव्हा तर तो बाळ होता. एकदा माझे आई बाबा आम्ही नसतांना घरी आले आणि त्यांची निघायची वेळ झाली तेंव्हा त्याने आईचा पदर धरला. त्याच्या डोळ्यांत तिला दिसले, त्याला एकटं वाटत होतं.
पुढे आम्ही मुलूंडला बस्तान हलवलं. निस्सीमचं एकटेपण आणि मला काम करताना आलेले वैफल्य यामुळे मी नोकरी सोडली. मूळातच निस्सीमचा आनंदी स्वभाव. आता आम्हांला एकमेकांबरोबर खूप काळ घालवता येऊ लागला. खरे सांगायचे म्हणजे निस्सीमसाठी मी वेगळं असं काही केलं नाही. (या विधानाला घरातल्या अनेकांचा आक्षेप असेल). पण त्याला जे हवं आहे, हे समजून घेतलं. तीन वर्षांचा निस्सीम वाचायला लागला, त्याच्या हुशारीमुळे पण सहा आठ महिन्याचा असल्यापासून त्याने पुस्तक हातात धरलं ते आम्ही दिल्यामुळे. त्याला गाड्यांची खूप आवड होती, मग दिडेक वर्षांचा असल्यापासून देशी विदेशी बनावटीच्या गाड्या ओळखण्याचा त्याला नाद लागला. मग त्याला याच विषयांची पुस्तकं आणली. इतकंच नाही तर त्याच्या बाबानं इंग्रजी मुळाक्षरं - ए टू झेड पण गाड्यांच्या मॉडेल्सवरून शिकवली. सव्वा वर्षांचा झाल्यावर तो प्ले स्कूलला जायला लागला. त्यामुळे पुढे तो शाळेत लवकर गेला. आमचा हा निर्णय अत्यंत चुकीचा होता असं आज वाटतं, पण त्यावेळी जो सल्ला मिळाला, त्यानुसार आम्ही निर्णय घेतले.
शरयूच्या वेळी ही चूक केली नाही. तिला थोडं उशिरा शाळेत घातलं. अर्थात तोपर्यंत मी वेगळी आहे आणि माझी निस्सीमबरोबर तुलना करु नका हे तिने आम्हांला जन्मापासून ठणकावलं होतं. लहानपणी खाण्यापिण्याची फार काळजी घेण्याची गरज नसते, सकस आणि सहज उपलब्ध होणारे पदार्थ लहानांना द्यावेत हे शरयू झाल्यावर लक्षात आलं. त्यामुळे निस्सीमचा आहार जितक्या काळजीपूर्वक ठरवला होता, तितक्याच सहजतेने शरयूला खिमट, सूप वगैरे न देता वरण, मऊ भात द्यावा असं ठरवलं. त्याला बराच काळ भरवलं, पण तिने स्वतः जेवणं पसंत केलं. खरी गोची माझी तेंव्हा झाली, जेंव्हा तिने पुस्तकं वाचायला फार उत्सुकता दाखवली नाही. शरयूला रंगांनी खुणावले, मग ते कागदावरचे असोत वा बागेतले. तिला फार लहानपणापासून रंग, कागद, पेन्सिली, पेन अशा वस्तू मुबलक प्रमाणात दिल्या. पण एक नियम दोघांनाही होता, भिंती खराब करायच्या नाहीत.
मला मुलांना घराबाहेर फिरायला घेऊन जाणं फार आवडत नाही, आणि त्याचं मला फार वाईट वाटत नाही. तो विभाग त्यांच्या बाबाचा आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. शरयू अगदी लहान असताना मी तिला प्रॅममध्ये घालून नेत असे, पण ते फक्त तिला घरी ठेवता येत नाही म्हणून. मुंबईत फिरायला फार मोकळ्या जागा नाहीत. असल्या तर पोचणं सहज शक्य नाही. त्यात खरेदीला जायचं म्हणजे मॉलमध्ये मग तिकडे अगदी लहान मुलांना नेणं मला मान्यही नव्हतं आणि फार कटकटीचं वाटे. मोठ्याला कधीच कुठंच बाहेर यायचं नव्हतं. पण धाकटीला सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असतो. तो तिला मी जेंव्हा आमच्या विकेंड होमला घेऊन जाते तेंव्हा मिळतो. वेगवेगळी झाडं, पानं, फुलं, फळं, किटक, बेडूक, फुलपाखरं, पक्षी... ती सगळं डोळ्यांत टिपून घेते. मला तिच्यात लहानपणीची मी दिसते. 
- भक्ती चपळगांवकर, औरंगाबाद

No comments:

Post a Comment