Friday 22 November 2019

वस्तुसंग्रहालय नेमकं असतं कुठे ? (इतिहासात डोकावताना)

वस्तुसंग्रहालय किंवा म्युझिअम म्हटलं की बरेच जण नाकं मुरडतात. मोठ्यांचीच ही तऱ्हा तिथे लहान मुलं काय वेगळा विचार करणार? महाराष्ट्र बोर्डाचा इतिहासाचा अभ्यासक्रम मात्र वेगळा विचार मांडतो. इतिहास आणि इतिहासाच्या विविध संकल्पना समजून घेण्यासाठी वस्तुसंग्रहालयांना भेटी देणं अतिशय महत्त्वाचं आहे असं ह्या अभ्यासक्रमामध्ये म्हटलं आहे. 
वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवलेल्या अनेक वस्तू मुलांसमोर पाठयपुस्तकांमध्ये शिकत असलेला काळ उभा करू शकतात. वेगवेगळ्या काळामधील भांडी, कपडे, खेळणी, युद्ध सामग्री, चित्रं, शिल्पं, कलाकुसरीच्या वस्तू, दागिने... किती गोष्टी सांगाव्यात! गेली काही वर्ष भारतामधील जवळ जवळ सगळीच संग्रहालयं अनेक शैक्षणिक उपक्रम चालवतात. त्याचा फायदा देखील मुलांना होऊ शकतो. आता हे सगळंच अगदी आदर्शवत वाटावं असं आहे. संग्रहालयांना भेटी हा अभ्यासक्रमाचा भाग आहे. अभ्यासक्रमामधील मुद्द्यांचा विचार करून संग्रहालयं देखील विविध उपक्रमांचं नियोजन करत आहेत. परंतु, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतंय ते देखील बघणं अतिशय गरजेचं आहे. 
म्हणूनच मग प्रश्नावलीमध्ये एक प्रश्न हा वस्तुसंग्रहालयांबद्दल होता. प्रश्न असा होता की, 'तुम्हाला वस्तुसंग्रहालयामध्ये जायला आवडतं का ते करणासकट सांगा'. ह्या प्रश्नाचं उत्तर बहुतांश विद्यार्थी नाही असं देणार हे गृहीत धरलेलं होतं; परंतु त्याची कारणं नेमकी कोणकोणती आहेत हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होते. आणि विद्यार्थ्यांनी जी उत्तरं दिली त्यामुळे ह्या प्रश्नाकडे बघायचा माझा पूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला. 
ग्रामीण भागामधून जो डेटा गोळा केला, त्यामध्ये जवळपास ८०% विद्यार्थ्यांना म्युझिअम किंवा वस्तुसंग्रहालय हे शब्दच कळले नाहीत. हे शब्दच त्यांनी पहिल्यांदा ऐकले होते. ग्रामीण विद्यार्थ्यांचा डेटा गोळा करण्यासाठी जी गावं आणि शाळा निवडल्या होत्या त्यातील एक शाळा ही वेरूळ गावात होती. वेरूळ हे जागतिक दर्जाचं वारसास्थळ आहे आणि असं असूनदेखील त्या गावामधील विद्यार्थ्यांना वस्तुसंग्रहालय ही संकल्पनाच माहित नसावी ही खेदाची बाब आहे. हा डेटा गोळा केल्यानंतर मी अनेक ग्रामीण भागामधील शिक्षकांशी चर्चा केल्या. ह्या परिस्थिती मागची कारणं जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मुख्य कारण असं की, बहुतांश संग्रहालयं ही शहरी भागांमध्ये आहेत. त्यांना भेटी देणं हे ह्या भागामधील विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारं नाहीये. ह्या दुर्गम किंवा ग्रामीण भागामधील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे हे असे उपक्रम राबवायला पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध नाही. आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे शहरी भागातील संग्रहालयामध्ये ग्रामीण विद्यार्थी बुजून जातात. शाळेत ते ज्या मराठी भाषेमधून शिकतात ती प्रमाण भाषा देखील त्यांना लांबची वाटते. त्यामुळे संग्रहालयाची भाषा समजून आणि उमजून घेता येणं हे तर आणखी लांबचं वाटतं. 
आता ह्या पार्श्वभूमीवर शहरी भागामधील डेटा थोडासा वेगळा मिळेल असं वाटत होतं. परंतु तिथं देखील चित्र फारसं काही वेगळं नाही. पुण्यामधील एका शाळेतील विद्यार्थ्याने संग्रहालयामध्ये जायला आवडतं असं लिहिलं आहे. त्याचं कारण म्हणून त्याने "तिकडे छान छान सिनेमे बघायला मिळतात" असं लिहून सिटी प्राईड कोथरूड असं त्याच्या आवडत्या संग्रहालयाचं नाव लिहिलं आहे. बऱ्याच जणांनी "संग्रहालयं बोर असतात" असं लिहिलं आहे. एका विद्यार्थिनीने लिहिलंय "तिकडच्या वस्तू उंचावर असतात, त्या दिसतच नाहीत". 
ही सगळीच कारणं खरं तर ग्राह्य आहेत. परंतु मला सगळ्यात महत्त्वाचं कारण वाटतं ते म्हणजे एकूणच आपल्या शिक्षणात 'बघणे' या गोष्टीचा असलेला अभाव. त्यामुळे मग आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करणं, बघितलेल्या गोष्टींची चिकित्सा करणं, आजूबाजूच्या गोष्टींचा वस्तुनिष्ठ विचार करणं हे सगळंच बाजूला पडून जातं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढील काही प्रयोगांमध्ये दृश्यकलेचा अंतर्भाव केला होता. इतिहास आणि दृश्यकला यांचा संबंध विद्यार्थ्यांमार्फत पोहचवताना आपसूकच त्यांच्या मानसिकतेचादेखील उलगडा होत गेला. त्या प्रयोगांविषयी वाचूया पुढच्या भागात! ll4ll

- डॉ. अनघा भट

No comments:

Post a Comment