Friday 22 November 2019

मंजिलसे बेहतर लगने लगे है ये रास्ते! पहिली पावलं ८

‘मुलं किती?’
या प्रश्नाला ‘तीन’ हे उत्तर दिलं की विचारणाऱ्याचं तोंड आंबट झालेलं सहज दिसतं मला. आजकालच्या जगात तीन मुलं असणं जणू गुन्हाच, त्यात डाॅक्टरांना तीन मुले व्हावी हे महापाप.
‘धाकटा मुलगा का?’ हे विचारताना ‘मुलगा होईपर्यॅत मुलं होऊ दिली असणार’ हा विचार अगदी वाचता येताे.
पण ‘नाही हो, सगळ्यात मोठा मुलगा, मग दोन मुली’ हे ऐकल्यावर ‘काय एकेक विचित्र लोक’ असा स्पष्ट भाव विचारणाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतो.
मला मात्र लहानपणीपासून आमची आई ‘पाव डझन मुले आहेत मला’ हे सांगायची , ते फार आवडायचं. आपणही पुढेमागे हेच ठसक्यात सांगायचं, हे लहानपणीच ठरवलं होतं. तशी पाव डझन मुले झालीही !
मुलं होण्यापूर्वी मुलांना मी असं वाढवेन, तसं वाढवेन अशा माझ्या फार कल्पना होत्या. पण मुले वाढवताना हे लक्षात आलं की कुठलेच काही अपरिवर्तनीय नियम नसतात. त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे लवचिक व्हावं लागतं. अगदी एका आईवडिलांची लागोपाठची दोन मुलेही एकदम वेगळ्या पद्धतीने वाढू शकतात आणि त्यांच्या वागण्यातही त्यामुळे जमीन अस्मानाचा फरक पडतो.
आमचंच पहा. आमचा मोठा यश. लग्नानंतर चार पाच वर्षानी अगदी वाट पाहून झालेला. पण तरीही त्याच्यावेळी आम्ही अगदीच नवखे पालक होतो. त्यात दोघांची प्रॅक्टिस, नोकऱ्या यांची धावपळ.
त्याला सांभाळायला एक आया होत्या मेरीअम्मा नावाच्या. दिवसभर तो त्यांच्याकडे असे आणि त्या इतर काही काम करत असतील तेव्हा शेजारच्या आंटींकडे.
त्याला बोलता येतंच नाही असा लहानपणी आमचा समज होता. कारण आमच्या कानडी- मराठी -हिॅदी घरात भाषांची इतकी खिचडी की लेकाला कुठली भाषा निवडावी तेच कळत नव्हतं.
याला आता स्पिच थेरपिस्टला दाखवावं का, अशा विचारात असताना एकदा पाहिलं की हा शेजारी मस्त तुळू भाषेत गप्पा मारतोय.
मुलांना खेळवताना, आंजार- गोंजारताना, त्यांच्याशी गप्पाही मारायच्या असतात हा एक शोधच आम्हाला यशमुळे लागला. मात्र त्याच्याशी लहान मुलांच्या लडिवाळ भाषेत कधीच न बोलल्याने तो जेव्हा बोलला, तेव्हा सगळं स्पष्ट, शुद्ध बोलायला लागला. एकही बोबडा बोल तो कधी बोलला नाही. तीन साडेतीन वर्षांचा होईपर्यॅत कार्टून नेटवर्क पहात त्याने स्वत:ची भाषा ‘हिॅदी’ बनवून टाकली. आजही तो मराठी, इंग्रजीग आणि कानडीही बोलत असला तरी विचार हिंदीतून करतो.
दुसरी मुलगी सई. ही झाली तेव्हा सुरूवातीस फारच नाजूक आणि रडवी होती. त्यात नेमकं काही घरगुती अडचणींमुळे सुरूवातीचे काही दिवस सोडल्यास कोणी घरचे मदतीला नव्हते. मग आम्हीच आळीपाळीने दोघे ओपीडी बुडवून तिच्यासोबत रहायचो. नंतर अचानक दोन मदतनीस मिळाल्या. एक कस्तुरी नावाची आया आणि आमच्या मुलांची चुलत आत्या शिवलीला.
त्यावेळेपर्यंत माझं स्वत:चं हाॅस्पिटलही चालू झालं. मी नोकरी सोडली होती.
माझा कितीतरी वेळ घराबाहेरच असायचा. लेक इकडे घरात दुसऱ्या बायकांकडे. या बायका तिचे अतिशय लाड करायच्या, बोबडं बोबडं बोलत रहायच्या सतत तिच्याशी. तर ही मुलगी एक नंबरची बोबडकांदा झाली. अजूनही तिला ळ म्हणता येत नाही. मात्र ती अगदी दीड दोन वर्षांची असतानाच तीनही भाषा बोबड्या का होईना आरामात बोलू लागली, रंग आेळखू लागली, गाणी म्हणू लागली. घरातल्या दोन्ही बायका एकदम व्यवस्थित आणि नीटनेटक्या असल्याने ही सुद्धा एकदम टापटीप झालीय. कस्तुरीची मुलगी अंकिता ही चांगली चित्र काढत असल्याने ही सुद्धा चित्र काढायला शिकली.
आता ही चित्र आणि शब्दांच्या माध्यामातून ही छान व्यक्त होऊ शकते. तिच्या चित्रांचं आणि गोष्टींचं एक पेजच मी फेसबुकावर काढलंय. ती मोठी होईल तेव्हा हे पाहताना तिलाच खूप गंमत वाटेल हे नक्की!
आमचं शेंडेफळ, ईशा अगदीच बारकुसं आहे. आत्ताशी फक्त पावणेदोन वर्षांची आहे. हिला सांभाळायला माझी लहान बहिण हौसेने एक वर्षभर घरी आली होती.
बोल्ड आणि हुशार मावशीबरोबर राहून ईशाही अतिशय बोल्ड आणि हुशार झालीय. आमचे बाबा म्हणायचे, ‘मोठ्या वयात झालेली मुलं मंद निपजतात हा गैरसमज आहे, खरेतर जितक्या उशीरा मुले होतात तितकी ती अधिक हुशार असतात’. याकरता ते आठव्या क्रमांकाला जन्मलेला कृष्ण किंवा भावंडांत चौदावे असलेले आंबेडकर यांच्या बुद्धीची उदाहरणे द्यायचे.
मला अर्थातच वैज्ञानिक दृष्ट्या हे खरं नाही हे माहित आहे. तरीही ईशा अतिशय हुशार आहे, हे खरं आहे.
कधीकधी मी विचार करते की जन्मत:च तिन्ही मुलांना पहिले दोन तीन महिने सांभाळलं माझ्या आईने, नंतर त्यांचं सगळं केलं कामाला, मदतीला असलेल्या बायकांनी किंवा नातेवाईकांनी. मग आपण मुलांची हौस म्हणून नेमकं काय केलं? 
पण हे ही अगदीच खरं नाही. मुलं दिवसभर कुणाकडेही असोत रात्री आपल्या कुशीत आली की आपलीच होऊन जातात. दिवसभराचा कुणाचाही प्रभाव असो, आपल्याबरोबरचे काही तास त्यांना आपले गुणदोष बरोबर देऊन जातात.
हल्ली तर मी संध्याकाळी सहापर्यंत सगळे काम आटोपून घरी येते. मुलांसोबत तीन तास घालवते. मुलांसोबत अभ्यास करते. रात्री साडनऊ दहाला मुले झोपेला आली की मग एखाद तास हाॅस्पिटलला जाऊन रात्रीचा राऊंड्स वगैरे कामे करते.
आपली अाई, मला मुले खरेतर आयु म्हणतात; केवळ आपली आयु नसून एक डाॅक्टर आहे हे मुलांना चांगलेच ठाऊक आहे. तिचे मुख्य काम हाॅस्पिटलचे आहे हेही.
कुठल्या पेशंटचा फोन आला तर मला तत्काळ जाऊ द्यायला मुले तयार असतात. रात्री अपरात्री मदतनीस बाईंवर मुले टाकून जायला लागले तरी वैतागत नाहीत.
रविवारी मुलांना घेऊन बागेत, हाॅटेलात गेले की नेमका एखाद्या ईमर्जन्सीला अटेंड करायचा फोन येतो. त्यावेळी ज्याचा पेशंट असेल तसा आई किंवा बाबा एकजण निघून जाणार आणि मुलांना दुसऱ्याबरोबर थांबावं लागणार हे ही मुलांनी मान्य केलेलंच आहे.
वर्षातून केवळ एक दोन वेळाच मुलांना घेऊन बाहेरगावी जाता येतं, त्यावेळी मात्र पूर्णवेळ त्यांना देतो. आमचं गाव लहानसं आहे, हाॅटेलिंग, शाॅपिंग, सिनेमे अशा फार सोयी नाहीत. मोठ्या सुट्टीत मुलांना हे सगळे अनुभव दुसऱ्या शहरांत, देशांत देण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
सुटयांमध्ये मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिविटी क्लासेसना न घालता दोन्ही आजी आजोबांकडे जाऊ देतो.
कोंकणात महिनाभर पाठवतो. तिकडे माझी आई त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवते. झाडांवर चढणे, पोहणे, भाज्या लावणे , नारळ सोलणे अशी कामे मुले सुट्टीभर करतात.
आमच्या दोघांच्या धार्मिक श्रद्धा वेगवेगळ्या आहेत, मात्र कोणत्याही प्रकारचे अवडंबर आमच्याकडे नाही. आस्तिकतेचेही आणि नास्तिकतेचेही. सणांतील धार्मिक भाग सोडून साजरे करण्याचा प्रयत्न असतो. मुलांवर आपली धार्मिक मते न लादण्याचा प्रयत्न असतो. मुले मोठी झाली की स्वत:हून ठरवतील त्यांना काय करायचंय ते.
सामाजिक, राजकीय, पर्यावरणविषयक अशा सर्वच बाबींसंबंधी आम्ही मुलांशी सतत बोलत असतो. आर्थिक बाबींविषयीही. कोणताही वायफळ खर्च टाळण्याकरता अमुक गोष्टीइतके पैसे कमावण्याकरता मला किती पेशंट बघावे लागतात हे एकदा मोठ्या दोघांना समजावलं होतं. आता कुठल्याही गोष्टीची मागणी करण्याआधी मुले मनातच हिशोब करून ती मागणी करावी की नाही ते ठरवतात. शक्यतो हट्ट करतच नाहीत.
अभ्यासाबाबत मात्र आई फारच कडक आहे हे त्यांना माहित आहे. त्या एकाच बाबतीत मी अत्यंत पारंपारिक पालक आहे. मोठ्याने अभ्यासात टाळाटाळ केल्यास क्वचित मारही खाल्ला आहे. मार्क्स मिळाले नाही तरी चालतील, वर्गात नंबर आला नाही तरी चालेल पण एखादी गोष्ट तुम्हाला कळत नाही , जमत नाही म्हणून सोडायची नाही हे त्यांना सांगून ठेवलं आहे.
तुमचा अभ्यासक्रम हा तुमच्या वयाच्या सामान्य बुद्धिमत्तेच्या मुलांना डोळ्यांसमोर ठेवून बनवलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो आलाच पाहिजे हे त्यांच्या मनावर ठसवलेलं आहे. कदाचित असं सांगणं आणि असा अभ्यास त्यांच्यावर लादणं चुकीचंही असेल, पण सध्यातरी मला हे आवश्यक वाटतं. मुले जसजशी वरच्या इयत्तेत जातील तसतसा अभ्यासक्रमातील सगळं आलंच पाहिजे याबाबतचा माझा आग्रह कमी होईल असं वाटतं. बघू.
एकंदर डोळसपणे चालू केलेला तिघांचा पालकत्वाचा
प्रवास, आता अध्येमध्ये अगदीच अनपेक्षित वळणं घेत, कधी अगदीच वेगळ्या वाटेने असा चाललाय.
पुढे काय होईल ते माहित नाही. पण माझ्या आवडत्या गाण्यातल्या एका ओळीप्रमाणे ‘मंजिलसे बेहतर लगने लगे है ये रास्ते’!
हा प्रवास मला खूप आवडतोय आणि मुलांबरोबर वाढण्याचा हा प्रवास मी अत्यंत समरसतेने करत्येय हेच खरं!

- साती स्वाती
#पहिलीपावलं 8

No comments:

Post a Comment