Friday 22 November 2019

थर्ड संडे

रोजचं ऑफिस, घर, जेवणखाण, झोप यापलीकडे काहीच नाही का? शिरीष केणी, अभिजित नेहरकर, आकाश गोडबोले, उदय गोडबोले गप्पा मारत होते. दोन वर्षांपूर्वीची ही गोष्ट. फ्रेंडशिपडेच्या निमित्तानं ठाणे परिसरातले हे मित्र भेटले होते. सोबत आणखी ११ जण. आपण समाजाचं देणं लागतो, ही जाणीव स्वस्थ बसू देत नव्हती. जिथे गरज आहे तिथे पोहचून गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी भेटायचं ठरलं. ग्रुपचं नाव झालं थर्ड संडे. २० ऑगस्ट २०१७ ला कामाची सुरुवात. पहिली भेट बदलापूरमधल्या प्रगती अंध विद्यालयाला. इथल्या मुलांशी गप्पा मारून आवश्यक त्या वस्तू ग्रुपने दिल्या. नेरळजवळच्या खंडास गावातल्या शाळेत मुलांसाठी शौचालय बांधलं. ठाणे, नवी मुंबई, रायगड परिसरात रक्तदान शिबीर,गावातील शाळेत करिअर गाईड्न्स, वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, वृद्धाश्रम भेट, आदिवासी गावांमध्ये मेडिकल कॅम्प, स्वच्छता अभियान, मतिमंद मुलांच्या शाळेत भेटी, अनाथालयभेटी असे २५ उपक्रम संस्थेनं केले आहेत. 
ग्रुपमध्ये आता १५० जण जोडले गेले आहेत. यंदा १८ ऑगस्टला संस्थेनं दुसरा वर्धापनदिन साजरा केला. शेलू इथं झालेल्या या कार्यक्रमात लक्ष्य फाउंडेशन आणि भारत के वीर या संस्थांना मदतनिधी दिला. शहीद जवानांच्या कुटुंबाला उभारी देण्याचं काम या संस्था करतात. या कार्यक्रमाला कर्जतचे नायब तहसीलदार रवींद्र चव्हाण, कर्जत रेल्वे स्थानकाचे पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे, कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक उमेश गायकवाड उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment