Friday, 22 November 2019

कवितांचे यंत्र (आखुडबुद्धी बहुशिंगी)

(सदर नोंद ब्रह्मेपीडीयाच्या १९०५ सालच्या पहिल्या आवृत्तीतून घेतली आहे.)
प्रस्तुत यंत्र रा०रा० श्री० कृ० कोल्हटकर (व्यवसाय- वकीली, राहणार जळगाव जामोद) नामक मनुष्याने बनवले असे ऐकिवात आहे. कोल्हटकरांना खगोलज्योतिषात रूची असल्याने त्यांनी आपल्या यंत्रज्ञानाचा वापर करत हे यंत्र बनविले. या यंत्राची खासियत अशी की यांतून कोणत्याही वृत्तात रचना करण्यात येते. उसाचा रस काढण्याच्या गुऱ्हाळातील यंत्रावर याची रचना बेतलेली होती. या यंत्राच्या चरकात इष्ट रस मात्रेनुसार घालून आणि हवेसे काही मोजके शब्द पेरून यंत्राचा दांडा गरगरा फिरवला की दुसऱ्या बाजूने कवितेचे भेंडोळे बाहेर येते. परंतु, सतत कविता केल्याने मनुष्याच्या मेंदूवर जसा परिणाम होतो तद्वत अविरत कविता केल्याने यंत्रात बिघाड होऊन कालांतराने भलतेच उत्पादन होऊ लागले. जेथे वीररस हवा तेथे कारुण्यरस उत्पन्न होऊ लागला, शृंगारकाव्य अपेक्षित असताना त्याजागी हास्यरस येऊ लागला, बीभत्सरसाची निर्मिती करायला जावे तर शांतरस निर्माण होऊ लागला. यंत्राच्या या अशा घोड्याएवढाल्या थोरल्या चुका पाहून यंत्रकर्त्यांनी दुरुस्तीसाठी जे यंत्र खोलले ते कार्यव्यापामुळे त्यांस पुन्हा जोडणी करणे शक्य झाले नाही. मध्यंतरीच्या काळात यंत्राचा फिरवायचा दांडा एका काव्यप्रेमी माणसाने कवींना धोपटून काढण्यास म्हणून नेला तो वापस आणून दिला नाही. या महत्त्वाच्या भागाअभावी हे यंत्र अद्याप अपुरे राहिले आहे.
काही काळाने रा० ग० गडकरी या मनुष्याने कोल्हटकरांच्या या यंत्रापासून प्रेरणा घेत कविता करण्यापेक्षा थेट कवीच बनवावे असा विचार पुढे आणित कवींचा कारखाना काढला होता. परंतु भावी लोकक्षोभाची भीती वाटून सरकारने तो बंद करावयास लावला. नागपूर इलाक्यात सावनेर गांवी आजही 'धी बाळकराम पोयेट फ्याक्तुरी'ची भग्न इमारत दाखवली जाते. या कारखान्यातून दिवसाला किमान दोनशे कवी निघावेत अशी योजना होती. तत्कालीन यंत्रसामुग्रीचा आवाका पाहता इंग्लंदमधल्या सर्वात मोठ्या कारखान्यातही एका दिवसांस दीडशे बाँबगोळे बनविणे शक्य नव्हते. अशा काळात लोकांत इतकी दहशत पसरवणारी प्रचंड उत्पादने करणे हे धाडसाचेच काम होते.
कारखान्याचा प्रयोग अयशस्वी झाल्याने काही धाडसी रविकिरण मंडळ या नावाने सामुहिक कविता करण्याचा प्रयत्न केला. केशवकुमार नावाच्या एका हरहुन्नरी माणसाने याच्या नकलून प्रती बाजारात आणल्याने कवितांच्या खपावर परीणाम होत हे मंडळ बंद पडले. यानंतर अनेकांनी यंत्राने नसल्या तरी यंत्रवत कविता पाडणे चालू ठेवले. कोल्हटकरांचे मूळ यंत्र विस्मरणात गेले.
कोल्हटकरांचे हे यंत्र सध्या पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या ताब्यात आहे. संतप्त लोक त्याची मोडतोड करतील या भीतीने हे यंत्र विशेष संरक्षणात ठेवलेले आहे असे समजते. एक विशेष विभाग स्थापन करून या यंत्राची दुरुस्ती करावी आणि युद्धकाळात या कविता शत्रूप्रदेशात बाँबसोबत टाकून दहशत माजवता येईल असा विचार पुढे येत आहे.
या यंत्राचा सबंध यांत्रिक आराखडा जरी उपलब्ध नसला तरी त्याचे संकल्पचित्र कोल्हटकरांच्या वंशजांच्या संग्रहात उपलब्ध आहे. बिघडण्यापूर्वी यंत्रातून आलेली शेवटची कविताही आहे. ती अशी-
सखे गं, प्रिये गं, गाढव चरे अंगणी।
डोळ्यांत गीत तुझ्या, मर्कट आननी।
वेडावे जीवास माझ्या, सुरवंट विंझणी।
मेणबत्ती विझली वाऱ्याने, ग साजणी।
अर्थात, वीररसातील कविता अपेक्षित असताना हास्य, बीभत्स आणि श्रुंगाररसाची निष्पत्ती होऊ लागली त्याअर्थी हे यंत्र बिघडले हे बरेच झाले. असे म्हटले जाते की यंत्रातून मिळालेल्या काही अर्धवट कवितांची भेंडोळी पुढे नवकवींच्या हाती लागली. मुक्तछंदी कवितेचा जन्म त्यातूनच झाला असावा.

- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment