Friday, 22 November 2019

बॉडी बिल्डर’ कोंकण कन्या

बॉडी बिल्डिंग! पुरुषांची मक्तेदारी असलेलं क्षेत्र! असं असलं तरी महिला बॉडी बिल्डरही आहेत, पण विदेशातील महिलांमध्ये याची अधिक क्रेझ आहे. भारतात १०० जणींमध्ये ५ ते १० इतकं याचं प्रमाण कमी आहे. दोन कोकणकन्यांनी ‘बॉडीबिल्डींग’मध्ये गरुडझेप घेतली आहे! या दोघी आहेत हर्षदा पवार आणि ऋतुजा हेगशेट्ये.
हर्षदा संतोष पवार. वय फक्त 25. रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील खडीओझरे गावातील सामान्य कुटुंबातील मुलगी. सध्या ती मुंबई-भांडूप येथे वास्तव्यास आहे. वाणिज्य शाखेची पदवीधर. हर्षदाच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडील संतोष पवार वाहन चालक, आई सविता पवार हार विक्री करतात. तर भाऊ निलेश खासगी कंपनीत नोकरी करतो. बॉडीबिल्डींग हे महागडं क्षेत्र. या क्षेत्रात उतरण्याचं निश्चित केल्यावर आपल्याला घरातून बाहेर पडावं लागेल, असं तिला वाटलं होतं. कारण इतक्या महागडया खेळाचा बोजा वडिलांवर आणि एकंदरच सर्वसामान्य कुटुंबावर येणार होता आणि घरातून यासाठी परवानगी मिळेल अशी तिला आशाही नव्हती. मात्र झालं उलटं, संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं. तिची चुलत बहिण श्वेताही तिच्या डायटबाबत जागरूक राहून मोलाचे सहकार्य करत आहे.
हर्षदाने शालेय स्तरावर खो-खो स्पर्धेत विविध बक्षिसं मिळविली आहेत. महाविद्यालयाच्या तृतीय वर्षात तिने फिटनेससाठी व्यायामशाळेत प्रवेश घेतला. आणि इथूनच बॉडीबिल्डींग क्षेत्र तिला खुणावू लागलं. क्रीडा क्षेत्राची आवड होतीच. त्या मुळे हर्षदाला याच क्षेत्रात करियर करायचं होतं. तिला हेविलिफ्टिंग वगैरे इतर क्रीडाप्रकार अनेकांनी सुचविलेही, मात्र तिला बल्की व्हायचं नव्हतं. 
दरम्यान जिम पार्टनर निनाद पवारने बॉडी बिल्डींगविषयी तिला सुचवलं. तसंच या क्रीडाप्रकाराची उत्तम जाण असणाऱ्या प्रशिक्षक विजेंद्र ठसाळे यांच्याशी संपर्क साधून दिला. ठसाळे यांनी बॉडीबिल्डींग या क्रीडाप्रकाराविषयी संपूर्ण माहिती दिली. आणि हर्षदाला निर्णय घ्यायला सांगितलं. हा क्रीडाप्रकार तिला भावला आणि तिने २०१८ मध्ये यात स्वत:ला झोकून दिलं. “मी शून्य होते, मला संपूर्ण घडवलं ते प्रशिक्षक विजेंद्र ठसाळे यांनी,” हर्षदा आवर्जून सांगते. तसेच ती ज्या जिममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करते त्या भांडूप येथील परफेक्ट जिमच्या ट्रेनर्सनीही तिला खूप पाठिंबा दिल्याचं ती नमूद करते. 
अत्यंत कमी कालावधीत तिने उत्तम पीळदार शरीर कमवत "मिस मुंबई, मिस महाराष्ट्र, मिस इंडिया" या किताबांवर आपलं नाव कोरलं आहे. चीनमध्ये होणाऱ्या ‘मिस एशिया’ स्पर्धेत किताब जिंकण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिची ही स्पर्धा हुकली. आता नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय डायमंड चषक स्पर्धेची तयारी तिने सुरू केली आहे. २५ वर्षीय हर्षदा राष्ट्रीय स्तरानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘बॉडीबिल्डींग’ मधली दुसरी कोकणकन्या म्हणजे ऋतुजा हेगशेट्ये. रत्नागिरीची ऋतुजा आर्किटेक्चरची विद्यार्थिनी. मात्र तिचं मन यामध्ये रमत नव्हतं. लहानपणापासून खेळाची आवड असणाऱ्या ऋतुजालाही क्रीडाक्षेत्रातच काही वेगळं करण्याचा ध्यास होता. हर्षदाप्रमाणे ऋतुजानेही फिटनेससाठी जिम सुरू केली आणि तिला तिच्या करियरचा मार्ग सापडला. याचबरोबर ती एकदा बॉडीबिल्डींग शो बघायला गेली होती, तिथं तिला वाटलं की आपणही यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि तिचे प्रयत्न यशस्वी झाले.
ऋतुजाचे वडील अभिजीत हेगशेट्ये हे प्रसिध्द लेखक, पत्रकार, तसेच रत्नागिरीतील नवनिर्माण महाविद्यालयाचे चेअरमन आहेत. वडील अभिजीत व आई सीमा दोघांनाही मुलीने निवडलेलं क्षेत्र रुचलं नाही. त्यावेळी ऋतुजाच्या या निर्णयामागे भक्कमपणे उभा राहिला तो तिचा मोठा भाऊ असीम! त्याने वाढदिवसाची भेट म्हणून ऋतुजाच्या जीमची फी भरली. असीमने आर्थिकच नव्हे तर मानसिकही आधार दिला. मुलीची या क्षेत्रातील डेडीकेशन, हार्डवर्क आणि प्रगती पाहून आता आई-वडिलांनीही ऋतुजाच्या निर्णयाचं स्वागत करत पाठिंबा दिला आहे.
ऋतुजाने २०१८ मध्ये ‘शेरू क्लासिक’ स्पर्धा जिंकली. त्यात तिला एक लाखांचं बक्षीस व युएसची सैर करायला मिळाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये ‘आयएफबीबी प्रो’ हा किताब तिने पटकावला. आता वर्ल्ड लार्जेस्ट बॉडीबिल्डींग शो ‘मिस ऑलंपिया’ पटकावण्याचं ऋतुजाचं स्वप्न आहे. त्यासाठी ती जोमाने तयारी करत आहे. २०१६ साली या क्षेत्रात पदार्पण करणारी ऋतुजा केवळ २४ वर्षांची आहे. इतक्या कमी वयात तिने मिळविलेलं यश निश्चितच उल्लेखनीय आहे. ऋतुजा दररोज ३ तासाहून अधिक काळ वर्क आऊट करते. सध्या ती मुंबईत राहत असून पुढील ४ वर्षात आपले ध्येय गाठण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील आहे.
ऋतुजा सांगते, “आता या क्षेत्रात मुली बहुसंख्येने येऊ लागल्या आहेत. तिने या क्षेत्राला सुरुवात केली तेव्हा स्पर्धेत केवळ ४-५ मुलीच होत्या. पण गेल्या ४ वर्षांत याकडे अधिक प्रमाणात मुली वळत आहेत. आता स्पर्धेला ५० च्या आसपास मुली असतात. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या मुलींसाठी बॉडी बिल्डींग फेडरेशनने प्रत्येक शोला प्राईज मनी ठेवावा. तसंच ऐथलिस्टना सन्मानजनक वागणूक मिळावी”. तर हर्षदा म्हणते, या क्षेत्रात अनेक मुली येऊ इच्छितात, पण आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम नसल्याने येऊ शकत नाहीत. त्यामुळे शासनस्तरावर महिला बॉडी बिल्डींग खेळाला प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे. यासाठी आर्थिक तरतूद करावी, असं आवाहन हर्षदाने शासनाला केलं आहे. 
- अभिजीत नांदगावकर

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/sampark.net.in/videos/2357606671025382/?__xts__[0]=68.ARAx9by7N1Q8Zbl4m7K9a5Q97RweQPvLmEFSqXZHUACUoxAJG1CIf3ZSkcnTOUakAaZyWxnS9kSJbAJXsBLQqsGaFMRpsJd-x0bc3ZxJB2a9yMl0FThGGK-t6_viPKut9PBqJ0BahuQ_Mi4u_BDwxYbXwHsMDW8aHUrgTJFRmBc3EtVzT8EPjK3X2vhMBkCwiC0yMy9taOZYUhRVBT8NeqA-2Ba4CCepvWUv0DRIlET6v30PQMO6FgOxyxUC5pMrqwgMAeeMURjpc2H_AqON1iJqNl8U4-y41QLqAs6DcZWI6CwCY1UzyfL2z7WkP7MIuO3qXTzvIYHN0r0TRfzLrwYwAMF2BxiRjzy4XRWs&__tn__=K-R

No comments:

Post a Comment