Friday 22 November 2019

पोरीचा बाप असणं ही खरंच 'बाप' गोष्ट आहे...!

हाच सप्टेंबर महिना होता. 16 तारीख. मी बार्शीला गेलेलो. पल्लवीचा सकाळी सकाळी झोपेत असतानाच फोन आला. व्हाट्स अप पाहा म्हणाली. अर्ध्या झोपेतच, मी बघितलं तर प्रेगान्यूजचं पिंक लाईन झालेलं किट दिसलं. झोपतून ताडकन जागा झालो. माघारी फोन केला. 'तुम्ही बाप होणार आहात, रिझल्ट पॉझिटिव्ह' एवढंच ती बोलली. मला अक्षरशः उड्या माराव्या वाटायल्या. काही सुचेनाच बोलायला. रडायला लागलो. 
कुणाला इतक्यात सांगायला नको असं ठरलं. कधी एकदा तिला भेटतोय असं झालेलं. रात्री लगेच मुंबईसाठी बसलो. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात. जेजेचे स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक आनंद सरांकडे हिची ट्रीटमेंट होती. जेजेला गेलं की डॉ. रेवत सरांची बहीण म्हणून अजूनच चांगली ट्रीटमेंट भेटायची. म्हणजे दर महिन्याला तिला हॉस्पिटलला जावं लागायचं. काही वेळा मला जायला जमायचं नाही. पण तिचा हा समर्थ भाऊ असल्यानं मला चिंता नसायची.
तर हं, कन्फर्मेशन झालं. मग आयुष्यात खऱ्या अर्थाने अच्छे दिन आल्यासारखं वाटू लागलं. तिची काळजी घेणं. तिचं डायट, औषधं वगैरे. तिची काळजी घ्यायला घरी मी आणि रामच. ती या काळात मस्त ऍक्टिव्ह झालेली. तिचं पोट वाढलेलं पाहून सगळेच म्हणायचे मुलगा होईल. आम्हाला मात्र मुलगीच व्हावी, असं पहिल्यापासून वाटायचं. सगळे जरी मुलाची आस लावून बसले असले तरी आम्ही मात्र मुलीवर ठाम होतो. मात्र तिच्या पोटातल्या हालचाली, लाथा मारण्याची पद्धत बघून पल्लवी म्हणायची हे पोरगं आहे. 
तारीख जवळ येण्याच्या 20 दिवस आधी हिला बार्शीला शिफ्ट केलं. तिकडं गेल्यावर गावाकडच्या प्रत्येक बाईचा रपाटा हाच, की मुलगाच होणार. एवढ्या काळात व्यवस्थित ट्रीटमेंट आणि डायटमुळे पल्लवी एकदम नॉर्मल होती. म्हणजे प्रेग्नेंसीमध्ये कुठलीही गुंतागुंत नव्हती. ती कॉन्फिडेंटली सांगायची की नॉर्मल डिलिव्हरी होणार. पण तिचा नाजूकपणा बघून मला ही शक्यता फार कमी वाटायची. 
29 तारखेपासून हिच्या पाठीतून कळा यायला लागल्या. तिला वाटलं पाणी काढताना लचक भरली असेल. रात्रभर तिनं ह्या कळा सोसल्या. सकाळी तिच्या मैत्रिणीला तिनं फोन केला, तर ती म्हणाली अगं ह्या प्रेग्नेंसीच्या कळा आहेत. मला पल्लवीचा फोन आला. मी मॉर्निंग ड्युटीला आलेलो. लगेच मित्राची गाडी पाठवली आणि थेट दवाखाना. तारीख दहा दिवस पुढं असल्यानं मी काहीसा निश्चिंत होतो. मात्र 10 वाजता फोन आला, की आजच डिलिव्हरी होईल. मग मात्र मला खालचं-वरचं काही समजेना. ऑफिसमधून थेट निघालो, गावाकडं निघायला ट्रेन पकडली. थोड्याथोड्या वेळाने अपडेट घेत होतो. ट्रेन सुसाट धावत होती पण मला मात्र तिचा स्पीड बैलगाडीच्या स्पीडहून कमी वाटत होता. 
मी कल्पनेत गुंग होतो की, कसं असेल आमचं बाळ. प्रचंड एक्साईट झालेलो. बरोबर 3.40 ला वगैरे रामचा फोन आला. 'दाजी, मुलगी झाली' बस एवढंच ऐकलं. हे तीन शब्द सरर्कन मेंदूतून सर्वांगात घुसले. काय बोलावं काहीच सुचेना. इतके दिवस पाहिलेलं एक गोड स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. डोळ्यातून आपोआप आनंदाच्या धारा सुरू झाल्या. लोणावळ्यात ट्रेनमध्ये शेजारी बसलेल्या एका मावशींनी विचारलं, काय झालं बाळा रडायला अचानक? त्यांना सांगितलं. लोणावळ्यात घेतलेली चिक्की पुरेस्तोवर डब्यात वाटली. 
साधारण वीसेक मिनिटांनी माझ्या लक्षात आलं की आपण बाकीचं काहीच विचारलेलं नाहीये. पुन्हा रामला फोन केला. सगळं नॉर्मल झालंय असं कळलं. आई बोलली, मला हुंदका आवरेना. तिच्याशी बोलताना तिचा, आमचा सगळा संघर्ष पोरीच्या येण्याने अश्रूंच्या धारांनी पुसून निघाल्यागत वाटलं. 
आता तर ट्रेन पळत असून थांबल्यासारखं फील व्हायलं. रात्री 9 वाजता दवाखान्यात पोहोचलो. पल्लवीला घट्ट मिठी मारली. पिहूचा चेहरा पाहिला. म्हटलं भावा, तुझा संघर्ष इथं संपलाय. पोरीच्या येण्यानं आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आलंय. आता आठवतो म्हटलं तरी, मागचा संघर्ष आठवत नाहीये. पोरीच्या एका एका फ्रेमने सगळया संघर्षावर पांघरूण घातलंय. तिची इवलीशी पावलं हातात घेऊन कित्येक वेळा बसलो. 
आता आठवडा, पंधरा दिवसाला गावाकडं पळतोय. आई, मित्र म्हणताहेत, आता कसं गाव दिसायलय सारखं सारखं. म्हटलं माणूस स्वार्थी असतो यार, सुख सापडलं की होत असं माणसाचं. 
सध्या ती आईजवळ जास्त आहे. दोघींमधला संवाद जबरदस्त असतो. मस्त हसते, तिला बोलायचंही असतं. रोज काही ना काही बदल बायको सांगते. हे सगळं मी प्रचंड मिस करतोय. 
बाप असणं आणि त्यात पोरीचा बाप असणं ही खरंच 'बाप' गोष्ट आहे. आयुष्यभर ही बाप गोष्ट एन्जॉय करणारय, हीच सुखाची व्याख्याय.
बाळा, लव्ह अँड मिस यु.
आज #DaughterDay वगैरे आहे. माझ्यासाठी एकच दिवस स्पेशल का? असं म्हणत माझ्याकडं बघायलीय, बघा कशी रागारागाने. 
(भाग 1)
- निलेश झाल्टे 

No comments:

Post a Comment