Friday, 22 November 2019

मूर्तिकार स्नेहल आणि निवेदिता -

गणपतीची मूर्ती घडवणं, रंग देणं यात बहुतांश करून पुरुष कलाकार. पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या पालीमध्ये मात्र दोन मुली हे काम करत आहे. 
अंगभूत कलेची आवड जोपासत वासुदेव ठाकरे यांनी पालीमध्ये ३० वर्षांपूर्वी स्नेहल कला केंद्र सुरू केलं. पालघरसह, ठाणे, मुंबई, नाशिकमधून चांगली मागणी असते. गेल्या वर्षी हजारच्या वर ऑर्डर होती. मूर्त्यांच्या रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात होतं. काम सुरू असताना अचानक ठाकरे यांना विजेचा धक्का लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मागे पत्नी आणि दोघी उच्चशिक्षित मुली स्नेहल आणि निवेदिता. स्नेहल डॉक्टर तर निवेदिता कमर्शिअल आर्टिस्ट.
उत्सव जवळ आला होता. ऑर्डर पूर्ण करायच्या होत्या. वासुदेव यांच्या निधनाचं दुःख बाजूला सारत स्नेहल आणि निवेदिता कामाला लागल्या. आईची साथ होतीच. ग्राहकांचा वडिलांवरचा विश्वास तिघींनी कायम ठेवला. ऑर्डर पूर्ण झाली. वासुदेव यांचा व्यवसाय पुढेही सुरू ठेवण्याचं तिघींनी ठरवलं. ''वडिलांसाठी हा नुसता व्यवसाय नाही तर स्वप्न होतं. मेहनतीनं त्यांनी हा व्यवसाय उभा केला होता.'' स्नेहल सांगत होती. ''वडिलांच्या अचानक जाण्यानं आमच्यावर मोठं संकट कोसळलं. पण संकटांचा बाऊ करण्यात अर्थ नसतो. त्यावर मात करून उभं राहावंच लागतं. '' व्यवसायाच्या आर्थिक बाबी स्नेहल बघते. तर निवेदिता मूर्ती घडवण्यापासून रंगकामापर्यंत सर्व गोष्टी बघते. '' व्यवसाय अधिक चांगला करण्यासाठी मी कमर्शिअल आर्टिस्ट व्हावं, ही वडिलांची इच्छा होती. त्यांचा व्यवसाय आम्ही नक्कीच मोठा करू.'' असा विश्वास निवेदिता व्यक्त करते. 
सचिन भोईर, पालघर

No comments:

Post a Comment