Friday 22 November 2019

आणि कोमलचा पहिला वाढदिवस साजरा झाला...

निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांच्या घरी गोड बातमी समजली. सुजाताने प्रसूतीवेदना सहन करत 22 ऑक्टोबर, 2017 रोजी ‘कोमल’ला जन्म दिला. वजन अवघं 900 ग्रॅम. आता संघर्ष होता तो जगण्यासाठी. या लढाईत सुजाता हरली. आईच्या पश्चात कुटुंबियांनी कोमलकडे पाठ फिरवली. इथं मात्र अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घेतला. त्यांनी तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. ११ दिवस ती जिल्हा रुग्णालयात दाखल होती. याकाळात आजी लीलाबाई गायकवाड, अंगणवाडी सेविका प्रमिला साळी, मदतनीस वृषाली शिरसाठ यांनी तिची काळजी घेतली. आईचा मृत्यू झाल्यामुळे कोमलची वाताहत पाहता अंगणवाडी सेविका दररोज तिच्या घरी जाऊन तिच्या प्रकृतीची चौकशी करत होत्या. शक्य तेवढी काळजी घेत होत्या. 
अंगणवाडी पर्यवेक्षिका वंदना खांदवे यांनीही तिच्या घरी भेट देऊन तिच्या कुटुंबाला मार्गदर्शन केलं. तिचं कमी वजन असल्याने कोमलला जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र यासाठी तिचे पालक तयार होत नव्हते. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे डॉ. विशाल जाधव, डॉ शुभांगी भारती यांनी यासाठी पुढाकार घेतला. अखेर सर्वांच्या प्रयत्नाने कुटुंबाचं मत परिवर्तन करण्यात यश आलं. आणि 5 महिन्याची कोमल जिल्हा रूग्णालयातील शिशु पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल झाली. तेव्हा तिचं वजन होतं 3 किलो 300 ग्रॅम.
आता ती चोवीस तास डॉक्टरांच्या निगराणीत होती. त्यामुळे योग्य आहार मिळून 15 दिवसांतच तिचं वजन 4 किलो 700 ग्रॅम पर्यंत वाढलं. केंद्रात डॉ. जाधव, डॉ. भारती यांनी तिची देखभाल केली. घरी सोडल्यानंतरही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. गावले यांनी तिच्या घरी भेटी देणं सुरूच ठेवलं. नियमित तपासणी केली. अंगणवाडी सेविका आणि त्यांची मदतनीस यांनी दररोज पाठपुरावा करून तिला पोषण आहार देऊन तिची काळजी घेतली. सर्वांच्या प्रयत्नांमुळे कोमलने तिचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे.
- प्राची उन्मेष, नाशिक
#पहिलीपावलं 2 

No comments:

Post a Comment