Friday, 22 November 2019

एका हाताचं बळ

धुळ्यातल्या प्रियांका पाटील. जन्मतः एकच हात. त्यामुळे पुढे कसा निभाव लागणार याची चिंता कुटुंबियांना होती. एका हाताने सर्व कामं करत प्रियांका अभ्यासातही पुढेच राहिली. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर म्हसदी येथील दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले शालिकराव पाटील यांच्याशी दहा वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं. एका हाताने अपंग पत्नी आणि दोन्ही डोळ्यांनी अंध पती. असं हे जोडपं. 
‘आयुष्यभर तुलाच सांभाळ करावा लागणार’ अशी टोचणी मैत्रिणींकडून कायम मिळायची. गावातील एका अंध शाळेत पती तासिका तत्त्वावर नोकरीला लागले. दरम्यान एक मुलगाही झाला. सर्व काही सुरळीत असताना अचानक पतीचा पगार बंद झाला. थोडे दिवस आई - वडीलांनी हातभार लावला. याच काळात प्रियांकाचं पितृछत्र हरवलं. थोडे दिवस दागिने विकून उदरनिर्वाह चालला. मात्र जगण्याचं संकट होतंच. कुठं काम शोधायला गेलं तर एका हाताने कसं काम करणार म्हणून हिणवायचे. त्यामुळे नोकरी मिळणं अशक्य वाटलं.
हार मानण्यापेक्षा लहान - मोठा उद्योग उभारायचा विचार आता प्रियांकाने सुरू केला. मात्र आर्थिक प्रश्न होताच. एकदा मैत्रिणींशी गप्पांमध्ये महिला बचत गटांचा विषय निघाला. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव केल्यानंतर पहिल्या टप्यात व्यवसायासाठी 20 हजार रुपयांचे कर्ज मिळालं. त्यातून पत्रावळ्या, द्रोण तयार करण्याचं मशीन, कच्चा माल खरेदी केला. आवश्यक प्रशिक्षण आधी घेतलं होतंच. मग मंगल कार्यालये, केटरर्स येथे स्वतः फिरुन त्यांनी मार्केटिंग केलं. उत्पादनाचा दर्जा पाहून लोक विश्वास ठेवू लागले. हळूहळू त्याच व्यावसायिकांकडून उचल घेऊन प्रियांकाताईंनी उद्योग वाढवला.
आता धुळ्यातच नव्हे; तर आजूबाजूच्या शहरांमध्येही त्यांच्या मालाला मागणी वाढते आहे. लग्नसराई किंवा लहानमोठे कार्यक्रम यातून वर्षभर त्यांना ऑर्डर मिळते. ज्या हाताचं अपंगत्व पाहून त्यांना काम नाकारलं जात होतं त्याच हातांनी प्रियांकाताई अनेक महिलांच्या हातांना आज काम देत आहेत. दररोज एक ते दीड हजार पत्रावळ्या त्यांच्याकडे तयार होतात. बचत गटातून काढलेल्या कर्जाचा उपयोग करत प्रियांकाताईंनी आपला व्यवसाय आणखी वाढवला. आता त्यांच्या गटाचे बँकेत शेअर्सही आहेत.
प्रियांकाताई सांगतात, “आयुष्यात प्रतिकूल परिस्थिती येणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला आंतरिक कौशल्यांची ओळख होते. शारीरिक अपंगत्वाचा बाऊ न करता परिस्थितीशी संघर्ष केला. पण आज अनेक हातांना काम देत असल्याचं समाधान वाटतं.”
- चेतना चौधरी, धुळे

No comments:

Post a Comment