Monday 21 January 2019

जालन्याची घेवर

जालना शहर हे विविध परंपरांनी नटलेले शहर. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून संक्रांतीच्या काळात घेवर या पदार्थांनी जालनेकरांच्या मेजवानीत आपले स्थान पक्के केले आहे.
सुरुवातीला फुलबाजार परिसरात घेवर बनविले जाई. परंतु या राजस्थानी पदार्थाची मागणी वाढू लागली. आणि आतातर संक्रांतीच्या साधारण महिनाभर आधी जालना शहरातील बडी सडक भागात घेवर बनवण्याची दुकानं थाटली जातात. मैदा, साखर आणि तुपापासून बनवल्या जाणाऱ्या मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या कुरकुरीत केशरी गोड घेवर आता जालनेकरांच्या मेजवानीचा अविभाज्य घटक बनला आहे.

मैदा घोटून घोटून एका विशिष्ट सपाट कढई मध्ये उकळत्या तुपात साच्यामधे थोडा थोडा टाकला जातो. उकळत्या तुपात पडताच त्याचा थर बनत जातो, एकावर एक थर जमा होत मधमाशीच्या पोळ्यासारखे बनत जाते. त्यामुळे त्यात एक विशिष्ट कुरकुरीतपणा येत जातो.साधी घेवर आणि बदाम, पिस्ता, मावा असलेली घेवर पण विकली जाते. ती महाग असते. जास्त मागणी असते ती साध्या घेवरला. २०० ते ४०० रुपये प्रतिकिलो या भावाने घेवर विकली जाते.
गोड न खाणाऱ्यांसाठी साखर नसलेल्या घेवरही बनवल्या जातात. या सध्या घेवरवर पिस्ते, बदाम, मावा यांचे मिश्रण टाकून त्याचा स्वाद वाढवला जातो. तो मात्र महागड्या भावाने विकला जातो.
येणाऱ्या जाणाऱ्यांची लक्ष वेधून घेणाऱ्या या घेवरचा खप मोठ्या प्रमाणात होतोय. मराठवाड्यात प्रामुख्याने जालन्यातच मोठ्या प्रमाणात बनणाऱ्या केशरी रंगाच्या या घेवरची चव आजूबाजूच्या जिल्ह्यातही पोहचली आहे. आता इथं बनणारी घेवर बाहेर गावी देखील पाठवली जाते.  या घेवर सोबतच शेवयांसारख्या दिसणाऱ्या फेणीला सुद्धा मोठी मागणी असते. केशरफेणी, सांबारफेणी अशा प्रकारची साधी आणि गोड फेणी लोक मोठ्या आवडीने खातात. गरम दुधात फेणी टाकून खाण्याला खवय्ये पसंती देतात. त्यामुळे संक्रांत येऊ लागली की खवैय्यांचे पाय घेवर, फेणीच्या दुकानाकडे वळू लागतात.
- अनंत साळी, जालना



विधवांची संक्रांत

काकडहिरा (ता. बीड) येथील सासर असलेल्या मनिषा जायभाये यांचे पती रामकिसन भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. सन २००६ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. एक मुलगा, एक मुलगी असा परिवार. सर्व काही सुरळीत असताना सन २००९ मध्ये रामकिसन यांचे अपघाती निधन झाले आणि सगळे चित्रच क्षणात पालटून गेले.
मनीषा म्हणतात, “शिक्षिका असूनही वैधव्यामुळे समाजातील मंगल कार्यांतून टाळण्यात आल्याचे अनुभव मला आले. आतापर्यंत सन्मानाने बोलवणारे लोक वैधव्यानंतर मात्र टाळताना दिसून आले. हा अनुभव मनाला लागला.”
 


  खरंतर, मकरसंक्रांत हा तिळगुळ देत एकमेकांना गोड बोलण्याचा संदेश देणारा सण. या दिवशी एकमेकींना वाण देत, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांचे आयोजन करुन सुवासिनी संक्रांत साजरी करतात. मात्र, नियतीच्या आघाताने वैधव्याचे दु:ख सोसणाऱ्या महिलांना अशा सणांमध्ये टाळले जाते.

मनीषा सांगत होत्या, “यातूनच मग गतवर्षी माझ्या गावातील काकडहिरा येथील विधवा महिलांना संक्रांतीला साडीचोळीचे वाण देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा 85 महिलांना साडीचोळी देण्यात आली. त्यावेळी मी लिंबारुई येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होते. त्याच वेळी लिंबारुईतही हा उपक्रम राबवण्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान, माझी बदली पालवण येथे झाली. 
तरीही यंदा लिंबारुईत ६५ महिलांना कालच म्हणजे १४ जानेवारी रोजी साडीचोळी देण्यात आली. यातून समाजात विधवांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.”  या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सविता गोल्हार, जिल्हा परिषद सदस्य रेखा क्षीरसागर, माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यभामा बांगर यांचीही उपस्थिती होती.
मनीषा यांचे सासऱ्यांचेही निधन झाले आहे. त्यांची मुलगी प्रियंका दंतरोग तज्ज्ञ म्हणून सध्या शिक्षण घेत आहे. तर मुलगा प्रतिक यंदा बारावीत आहे दोन्ही मुलांचे या उपक्रमाला प्रोत्साहन आहे, असं मनीषा सांगतात.

- अमोल मुळे, बीड

पार्वती आजींची डोळस सेवा


 ''इथे एवढी चांगली सेवा मिळते, नर्स प्रत्येकाची काळजी घेतात. चहा, नाश्ता , जेवण सगळं काही वेळच्यावेळी. तरी लोकांमध्ये गैरसमज का?'' रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर पार्वती आजींना प्रश्न पडला आणि त्यांनी यावर कामही सुरू केलं.
पार्वती हिराजी गिझम ६७ वर्षांच्या. मूळच्या लांजा बेनीच्या. १०-१२ वर्ष त्यांनी मुंबईत घरकाम केलं. नातीसाठी त्या पुन्हा रत्नागिरीत आल्या. गिझम कुटुंब मोलमजुरी करणारं. मोतीबिंदूचा त्रास जाणवू लागल्यावर त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभागात उपचार घेतले. याच शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात हजारो रुपये खर्च होतात. इथं मात्र संपूर्ण सेवा मोफत आहे. याबाबतची माहिती पार्वती आजींनी गावातल्या लोकांना द्यायला सुरुवात केली. शस्त्रक्रिया झाल्यावर आवश्यकता भासल्यास रुग्णाला सोबत म्हणून राहण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. रुग्णांची नातेवाईक असल्याचं त्या इथल्या परिचारिकांना सांगतात.
आजींची तळमळ, विश्वासाचे बोल यामुळे रुग्णालयात जाताना आजी सोबत असाव्यात असं रुग्णांनाही वाटतं. आपली कामं सोडून त्या रुग्णाच्या मदतीला धावून जातात. गेल्या दोन वर्षात लांज्यातल्या १९ रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आणणं, त्यांचा केसपेपर काढणं, तपासण्या करून घेणं, शस्त्रक्रियेसाठी तारीख घेणं, ही सर्व कामं आजी करतात. यासाठी एक पैसाही आपणहून त्या कोणाकडे मागत नाहीत. रुग्णांचे नातेवाईकच स्वतःहून त्यांना चहापाण्यासाठी शंभर-दोनशे रुपये देतात.
''पैशांपेक्षा माणुसकी महत्त्वाची. अडीअडचणीला धावून येणारी माणसं ही संपत्तीच.'' असं सांगणाऱ्या पार्वती आजींच्या मदतीला धावून येणारी अनेक माणसं गावात आहेत. 


-जान्हवी पाटील, रत्नागिरी

तीन हजार पिंपळांनी उजाड शिवाराचं पालटलं रूप

बीड तालुक्यातल्या लोणी घाट गावापासून तीन किलोमीटर अंतरावरचा उजाड परिसर. परिसरात झाडं नसल्यामुळे वाटसरू, पशुपक्ष्यांची दैना होत असे. पाच वर्षांपूर्वी हरिश्चन्द्र भागा ट्रस्टचा आश्रम इथं उभा राहिला आणि चित्र पालटू लागलं.
आज आश्रम परिसरात आणि लोणी पाचंग्री मार्गावर दुतर्फा १० फुटांहून अधिक उंचीचे थोडेथोडके नव्हेत तर तीन हजार घनगर्द पिंपळ वृक्ष आपल्या स्वागताला सज्ज आहेत. माऊली कदम महाराजांनी गेल्या साडेतीन वर्षांपासून अथक मेहनत घेत उजाड शिवाराचं नंदनवन केलं आहे. पिंपळासह लिंबोणी आणि आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड महाराजांनी केली आहे. दुष्काळात ठिबकद्वारे पाणी दिलं, झाडांची वेळोवेळी निगा राखली.

‘’पिंपळाचं झाड दीर्घकाळ टिकणारं आणि प्राणवायू देणारं. औषधी उपयोगही अनेक. पिंपळावरच्या पुष्पशयामुळे पाखरांचीही भूक भागते.’’माऊली कदम महाराज सांगतात.
हृषिकेश, काशी इथं धर्म अध्ययन आणि हिमालय परिसरात आयुर्वेदाचं अध्ययन महाराजांनी केलं. समाजाचं ऋण फेडता यावं यासाठी, आपल्या पालकांच्या स्मरणार्थ महाराजांनी आश्रम उभारला. ‘’वृक्ष असतील तरच जीवसृष्टी बहरेल. वृक्ष नाहीत तर पाऊस, प्राणवायू नाहीं, पशुपक्षी , माणूस जगणार नाहीत. इतकं साधं गणित आहे. ते आपण विसरता कामा नये,’’असं महाराज सांगतात.
- अनंत वैद्य, बीड

भान आरोग्याचे: उत्कर्ष किशोरींचा





जसे कळीचे फुलात रूपांतर होते, तसे निसर्गनियमाप्रमाणे मुले-मुलीही वयात येतात. पण फुलात रूपांतर होण्याची प्रक्रिया जशी सहज-सुलभ, सुंदर असते, तितके हे वयात येणे सुलभ नसते. मुलगा वयात आला की तो मोठा झालाय, हे घर-दार स्वीकारते, पण मुलींच्या वयात येण्याच्या प्रक्रियेने त्यांच्यावर ‘सातच्या आत घरात’ सारखी बंधने येण्यास सुरूवात होते. तिचे मैदानी खेळ कमी होतात, कपडे कोणते घालावेत, कसे घालावेत, मुलग्यांशी कितपत मैत्री ठेवावी याचे कडक नियम बनविले जातात.
हे सगळे पाहून नुकतीच मासिक पाळी सुरू झालेल्या मुली आधीच ‘पाळी’ म्हणजे काय, हे नीटसं ठाऊक नसल्याने भांबावलेल्या असतात. शिवाय वागणुकीवर टाकल्या जाणाऱ्या बंधनाने त्या अधिकच अंतर्मुख होतात. या काळात गरज असते, एका समजूतदार मैत्रीच्या हाताची. तोच मैत्रीचा हात देण्याचा प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ‘उत्कर्षा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून करीत आहे. ‘उत्कर्ष किशोरींचा, विकास सिंधुदुर्गचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन सप्टेंबर २०१६ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा कार्यक्रम सुरू आहे.


सिंधुदुर्गमधील सर्व शाळांतील सहावी ते बाराची मुलींना हे मासिक पाळी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिलं जातं. ग्रामीण भागात मुलींच्या आई- आजीचेच मुळात पाळीबाबत अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा असतात. त्यामुळे किशोरी तसेच त्यांच्या माता पालकांशी संवाद साधून मासिक पाळी या शरीरधर्माची शास्त्रीय माहिती पुरविणे, पाळी म्हणजे कसलीही नकोशी घटना नाही, विटाळ किंवा लपवून ठेवण्याजोगी गोष्ट नाही, तर पाळी ही मानववंशाचे सातत्य ठेवण्यासाठी मदत करणारी सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे, असा सकारात्मक दृष्टिकोन मुली आणि त्यांच्या पालकांमध्ये रुजविणे, पाळीच्या काळात काय काळजी घ्यावी, कसा आहार- विहार असावा याचे मार्गदर्शन करणे, हाच ‘उत्कर्षा’ सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.  
   

याकरिता २०१६ मध्ये युनिसेफच्या राज्य समन्वयक भारती ताहिलियानी यांनी शिक्षिका, आरोग्य सहायिका इ.८३७ जणींना मासिक पाळी व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. पहिल्यांदा या शिक्षिका सुद्धा मासिक पाळीबाबत बोलायला लाजत होत्या. पण भारती ताहिलियानी यांनी गप्पा मारत, वेगवेगळे खेळ घेत महिलांना बोलते केले. या प्रशिक्षणामुळे शिक्षिकांमध्ये सकारात्मक बदल घडून आले. ताहिलियानी यांनी मासिक पाळीची शास्त्रोक्त माहिती दिली, उपस्थितांचे गैरसमज आणि अंधश्रद्धा कशा निराधार आहेत, ते सोदाहरण स्पष्ट केले.
या प्रशिक्षणार्थी आता शाळाशाळातून विद्यार्थिनी तसेच त्यांच्या मातांची जनजागृती करतात. या प्रशिक्षणामुळे घडलेल्या ठळक बदलांची उदाहरणे:

• कणकवलीमधील घोणसरी नं.१ शाळेतील एका विद्यार्थिनीने मासिक पाळीच्या वेळी पाळण्यात येणाऱ्या पारंपारिक रूढीवर बंड करून आईचं मतपरिवर्तन केलं.
• दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे सरगवे पुर्नवसन झरे शाळेतील एका विद्यार्थिनीची मासिक पाळी सुरू असताना शाळेतील शिक्षिकांनी तिला सरस्वती पूजनाच्या वेळी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं.
• वेंगुर्ल्यातील मोचेमाड नं.१ शाळेच्या समोर मंदिर असल्याने बऱ्याच मुली पूर्वीपासून पाळी आली की चार दिवस शाळेत गैरहजर असायच्या. ‘उत्कर्षा’ उपक्रमातील मासिक पाळीविषयक सत्रांमुळे त्यांना पाळी म्हणजे काहीही अशुभ नसते याची जाणीव झाली आणि त्यांची शाळेतील उपस्थिती नियमित झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या उत्कर्षा उपक्रमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/…/utkarsha-initiative-adolescent-gir…/


- मृणाल आरोसकर, सिंधुदुर्ग  #तेपाचदिवसतिलापरतमिळवूनदेऊया


कर्तव्यदक्ष अधिकार्‍याला साश्रू नयनांनी दिला निरोप

३१ डिसेंबरचा दिवस. सजलेला मंडप, पाहुण्यांची वर्दळ, डोळ्यांमध्ये अभिमान आणि पाणी. माजलगाव
 ग्रामीण पोलीस वसाहतीमध्ये पोलीस निरीक्षक मिर्झा बेग यांचा निरोपसमारंभ सुरू होता. बेग, कर्तव्यदक्ष अधिकारी. परळीतल्या स्त्रीभ्रूण हत्येतील मुख्य आरोपी डॉ सुदाम मुंडे यांना बेड्या ठोकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे.
दोन दिवसांपासून त्यांच्या निरोपसमारंभाची तयारी सुरू होती. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून जवळपास ५७ हजार रुपयांची वर्गणी गोळा केली होती. प्रमुख पाहुण्या म्हणून माजलगाव विभागाच्या उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार ,तहसिलदार एन.जी.झंपलवार ,माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बापूसाहेब महाजन, निरीक्षक रवींद्र शिंदे, उपनिरीक्षक विकास दांडे. बेग दाम्पत्याचं स्वागत. सेवेत दाखल झाल्यापासून पोलीस निरीक्षकापर्यंतच्या प्रवासाची फोटो फ्रेम भेट. मिर्झा यांच्याबद्दलच्या भावना आणि आठवणी, असा सगळा हृद्य कार्यक्रम.

मुख्य कार्यक्रमानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी फुलांनी सजवलेली उघडी जीप तयार ठेवण्यात आली होती. त्यामध्ये बेग यांच्यासह नवे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत. पोलीस वसाहतीतून निघालेली वाजतगाजत मिरवणूक थेट पोलीस ठाण्यात पोहचली. त्यानंतर सुरेश बुधवंत यांनी पदभार स्वीकारला.
बेग मूळचे नांदेडचे. पोलीस खात्यात ३४ वर्षांची सेवा. सहकारी आणि नागरिकांसोबत त्यांचा उत्तम संवाद. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत सामाजिक सलोखा जपणारे लोकप्रिय अधिकारी. बीड जिल्ह्यात सलग १२ वर्ष त्यांनी पोलीस दलाचं मान उंचावणारे काम केलं . गेल्या वर्षी ते १९ जानेवारीला माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात रूजू झाले. माजलगाव पोलीस ठाणे ऑनलाईन करून दुसरा क्रमांक त्यांनी पटकावला.
‘’काम करताना अडीअडचणी येतातच. पण प्रत्येक अडचणीवर साहेबांकडे तोडगा असे.’’ माजलगाव ग्रामीणचे पोलीस नाईक राजेंद्र ससाणे सांगत होते. ‘’ठाण्यातील पोलिसांशी ते मित्र म्हणून वागले .त्यांच्याबरेाबर काम करताना कधीच भीती वाटली नाही, आदरयुक्त धाक त्यांच्याबद्दल वाटे.
- दिनेश लिंबेकर, बीड

माळेगावची जत्रा...

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगांव. गावाची लोकसंख्या अडीच तीन हजार. नांदेड-लातूर महामार्गावरच्या या गावाचं अस्तित्व एरवी कुणालाही ओळखू येणार नाही. पण मार्गशीर्ष महिन्यात या गावात लाखो लोक येतात. वद्य एकादशीपासून सुरू होते, दक्षिण भारतातील सर्वांत मोठी माळेगावची जत्रा.
यावर्षी ३ ते ८ जानेवारी दरम्यान ही जत्रा भरली होती. देशभरातून व्यापारी या ठिकाणी आपली उत्पादने घेऊन येतात. घोडे, गायी-बैल, उंट, गाढव, म्हशी, कुत्रे, अशा विविध पाळीव प्राण्यांचा बाजार दरवर्षी येथे भरतो.
पूर्वी खेड्यातील लोकांच्या अनेक गरजा भागविण्याचं, संवाद, गाठीभेटी, संस्कृतिक देवाण-घेवाण करण्याचं महत्त्वाचं केंद्र म्हणून, अशा जत्रा भारतीय संस्कृतीत खूप उपयोगी असायच्या. आता काळ बदलला. माळेगांवच्या जत्रेचं महत्त्व मात्र आज शेतीसाठी उपयोगी वस्तूंच्या खरेदीविक्रीसाठी आहे. लहानात लहान औजारापासून, कपडे, गालीचे ते उंट, घोडे, गाढव, बैल-गाईंपर्यत सर्व गोष्टी इथं विक्रीसाठी उपलब्ध असतात.
   खाण्यापिण्याची विविध दुकानं हे या जत्रेचं खास वैशिष्ट्य. पेढे, बत्तासे, जिलेबी, तांदळाची खिचडी, भजे या सारख्या पदार्थांबरोबरचं मराठमोळ्या चवीचे झुणका भाकर, चिकन, मटणाचे विविध पदार्थ या जत्रेत खवय्यांना स्वस्त दरात उपलब्ध असतात. या सर्व व्यवहारात करोडो रूपयांची उलाढाल दरवर्षी माळेगावच्या जत्रेत होते. ११ व्या शतकात प्रतिष्ठापना झालेल्या खंडोबा देवस्थानाचा हा वार्षिक उत्सव. त्या निमित्ताने ही जत्रा गेल्या अनेक शतकांपासून भरत आहे. खंडोबाची पत्नी बाणाई खंडोबावर रूसून आजचे बनवस (बनवस याचा अर्थ वनवास असाही होतो.) या गाव आली, तिचा शोध घेत श्री खंडेराया माळेगाव येथे आले व गुप्त रूपात तेथेच राहिले. ११ व्या शतकात उदगीर येथील तांदळाचे व्यापारी माळेगाव येथून प्रवास करीत असताना त्यांना दृष्टांत झाला, तेव्हा त्यांच्या जवळील तांदुळाच्या पोत्यांमध्ये खंडोबाचा तांदळा असल्याचं आढळलं.
 मग याच व्यापार्‍याने खंडेरायाच्या तांदळ्याची प्रतिष्ठापना केली. आणि दरवर्षी उत्सव व जत्रेचं आयोजन केलं असा इतिहास येथील लोक सांगतात. आज महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, गुजरात अशा अनेक राज्यातून या ठिकाणी भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. व्यापारीही येतात. १७ व्या शतकात मराठे आणि निजाम यांच्यात झालेल्या उदगीरच्या लढाईच्या वेळी या जत्रेतून मराठ्यांनी चार हजार घोडे खरेदी केल्याचा किस्सा आजही येथील लोक अभिमानाने सांगतात.
अठरा पगड जाती आणि बारा बलूतेदार या जुन्या भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब म्हणजे माळेगांवची जत्रा. या जत्रेत गोसावी, गारूडी, घिसडी, जोशी, कोल्हाटी, मसनजोगी, पांगुळ, वासुदेव, वैद्य अशा विविध भटक्या विमुक्त समाजाच्या जातपंचायती भरतात.

खंडोबाच्या साक्षीने त्यांचे न्यायनिवाडे, तंटे, विवाह आदी विविध सामाजिक विषयावर चर्चा होऊन अनेक निर्णय घेतले जातात.
देशातील विविध भागातून लोककलाकार या ठिकाणी येऊन आपली कला सादर करतात. त्यांना धन, रसिक श्रोत्यांची वाहवा लाभते. शेकडो एकरात ही जत्रा भरते. सर्वत्र पालं, राहूटया, रोशनाई याने सर्व परिसर भरून जातो.
नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने या जत्रेचं, आज आयोजन केलं जातं. नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या ठिकाणी भव्य असं कृषी प्रदर्शन यावर्षी भरवलं आहे. कृषी क्षेत्रातील विविध कंपन्या, मसाले, पिके, भाजीपाला उत्पादक यांनी या कृषी प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. खंडेरायाची शासकीय पूजा, पालखी, कृषि प्रदर्शन, पशु, अश्‍व, कुक्कुट व श्‍वान प्रदर्शन व कुस्ती स्पर्धा, लावणी महोत्सव व पशु प्रदर्शनातील विजेत्यांना बक्षीस वितरण, अश्‍व प्रदर्शन व चाल स्पर्धा, पारंपारिक कला महोत्सव अशा विविध गोष्टींनी ही जत्रा सजते.

- उन्मेष गौरकर, नांदेड




Saturday 12 January 2019

पेठमधल्या ६०० महिलांचा उत्पादक गट, महिन्याभरात भात गिरणी सुरू करणार

नाशिक जिल्ह्यातला पेठ तालुका. १५० गावं. ग्रामपंचायती ७४. लोकसंख्या एक लाख ३० हजार. तालुका आदिवासीबहुल.लोकांची चार महिने पावसाच्या पाण्यावर शेती आणि नंतर आठ महिने रोजगारासाठी भटकंती. आता मात्र हे चित्र बदलत आहे. 'मानव अधिकार संवर्धन संगठन' च्या प्रयत्नातून. गेली चार वर्ष संस्था इथे काम करत आहे. ''या भागात आरोग्य आणि शिक्षणावर काम करत असताना वेगवेगळ्या प्रश्नांचा गुंता समोर येत होता. पोटापाण्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा असल्याचं लक्षात आलं.'' संस्थेच्या सचिव श्यामला चव्हाण सांगत होत्या. संस्थेनं महिलांना हाताशी धरलं. वर्षभरापासून संस्था उत्पादक गट संकल्पनेवर काम करत आहे. स्थलांतराऐवजी आदिवासींना गावातच रोजगाराचं काय साधन उपलब्ध होईल? यावर विचार 
झाला. भात पिकावर काम करण्याचं ठरलं. भाताचं उत्पादन घेण्यासाठी कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा अवलंब केला नाही. तर सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत जमिनीची उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला. या प्रयत्नात ६००हून अधिक महिला सक्रिय झाल्या. त्यांचे ४१ उत्पादक गट. त्यांना वेगवेगळ्या सामाजिक संस्था, कृषी विभागाच्या मदतीनं प्रक्रिया उद्याोगाची माहिती देण्यात आली.ब्राऊन राईस-व्हाईट राईस याचं प्रशिक्षण दिलं. महिलांनी तयार केलेल्या भाताला बाजारपेठ मिळावी यासाठी संस्थेनं नवमाध्यमांवर, वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिध्दी करत या मालाची विक्री केली आहे. नाशिक, मुंबई, पुणे या ठिकाणीही विक्री झाली. यातून सध्या खूप आर्थिक उत्पन्न मिळालं नसलं तरी खर्च निघाला. महत्त्वाचं म्हणजे महिलांना व्यवहार समजायला लागला असल्याचं श्यामलाताई सांगतात. या महिलांचं जीवनमान बदलू लागलं आहे. सध्या घरगुती स्वरूपात होणारं काम आता गिरणीत होणार आहे. इंडिगो आणि 'अफार्म' सामाजिक संस्थेच्या मदतीनं महिन्याभरात या कामाला सुरुवात होणार आहे. पेठ तालुक्यातील उत्पादक गट ‘भात गिरणी’ सुरू करणार आहेत.

-प्राची उन्मेष , नाशिक

Friday 11 January 2019

दुष्काळाची दाहकता तरीही रानशिवारात ‘वेळा अमावास्येचा’ उत्साह


शनिवारचा दिवस. मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या. रस्त्यावर शुकशुकाट, बाजारपेठा बंद, शहरात अघोषित संचारबंदी. शहरातले आबालवृद्ध सकाळीच शेतावर रवाना झाले. ज्यांच्याकडे शेती नाही त्यांना शेतकऱ्यांकडून आग्रहाचं निमंत्रण. निमित्त होतं ‘वेळा अमावास्येचं’. मराठवाड्यात, विशेषतः लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मार्गशीर्ष अमावस्या ‘वेळा अमावस्या’ म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे.
रानशिवारं गर्दीनं फुलून गेली होती. कुणी कारमधून, कुणी हौसेनं बैलगाडीतून शेताच्या बांधावरून फेरफटका मारत होते. सध्या मोजक्या भागातच रब्बीची पिकं डोलत आहेत,दुष्काळाच्या झळामुळे शेतकऱ्यांचे चेहरे कळवंडले आहेत, पण वेळा अमावस्येला काळ्या आईची ओटी भरून पूजा करताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि नव्या आशाआकांक्षेची लकेर दिसत होती.या दिवशी शहरी, ग्रामीण भागातलं प्रत्येक कुटुंब वनभोजनाचा आस्वाद घेतं.

आलेल्या प्रत्येकाचं आदरातिथ्य. बाजरीचे उंडे,ताकापासून बनवलेले आंबील, हिरव्या मिरचीचा ठेचा,वांग्याचे भरीत,विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांची एकत्रित बनविलेली स्वादिष्ट भाजी,बाजरी आणि ज्वारीच्या भाकरी. बच्चे कंपनीसाठी खास बोरं, हरभऱ्याचे डहाळे, वाटाण्याच्या शेंगा यांची मेजवानी.
आंबेजवळगे इथले शेतकरी बाळासाहेब देशमुख यांच्याकडून या परंपरेविषयी माहिती घेतली. ‘’पूर्वापार चालत आलेली ही परंपरा. काळ्या आईची पूजा करून तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठीचा प्रयत्न.

शेतात पाच पांडव किंवा पंचमहाभूतं म्हणून पाच दगड मांडले जातात. त्यांना चुन्यानं रंगवून सहकुटुंब पूजा करतात. त्यानंतर एकत्र बसून वनभोजनाचा आस्वाद. परंपरा का , कधी सुरू झाली माहीत नाही, पण मित्रमंडळी, नातेवाईक एकत्र यायला चांगलं निमित्त मिळतं. ‘’ काही बुजुर्ग मंडळींच्या मते ही मूळची कर्नाटकची परंपरा. लगतचे जिल्हे असल्यानं लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात ती रूढ झाली. या उत्सवाच्या निमित्तानं शहरी नागरिकांना एक दिवस ग्रामीण जीवनाचा आनंद लुटता येतो. मुलांना शेतीची तोंडओळख होते. कायम दुर्लक्षित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे खरंतर उत्सवाच्या निमित्तानं लक्ष वेधलं जाऊ शकतं.
- चंद्रसेन देशमुख, उस्मानाबाद

आम्हाला लहाने नावाचा मोठा माणूस बघायचा आहे !


गंगाराम, वय ५०. पाच वर्षांचे असताना त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसणं बंद झालं. तपासणीनंतर त्यांच्या डोळ्यांमधील बाहुली उलटी असल्याने ते कायमचे अंध झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. गेली ४५ वर्षे गंगाराम अंध म्हणून जगत होते. २१ डिसेंबरची सकाळ त्यांच्यासाठी प्रकाश घेऊन आली. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील मोख येथील गंगाराम पवारच नव्हे तर, त्यांच्यासारख्या दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्या तब्बल १५० अंधांना अशी नवी दृष्टी मिळाली.
१९ ते २४ डिसेंबरपर्यंत यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे नेत्र शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं. शासनाच्या अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी हे शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिरात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी चार दिवसात तब्बल ८११ नेत्रशस्त्रक्रिया केल्या.
शिबिरात, मोतीबिंदू झालेले व पूर्ण आंधळे असणारे परंतु शस्त्रक्रियेनंतर ज्यांना दृष्टी येऊ शकते अशा दीड हजार रूग्णांची निवड करण्यात आली. लहाने यांना जे. जे. रूग्णालय मुंबई येथील नेत्र विभाग प्रमुख डॉ. रागिनी पारेख व त्यांच्या ४० नेत्रतज्ज्ञांच्या चमूने सहकार्य केलं. या शिबिरात डॉ. तात्याराव लहाने यांनी १ लाख ६५ हजार नेत्रशस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा टप्पा गाठला. तर डॉ. रागिनी पारेख यांनी ८५ हजार नेत्रशस्त्रक्रिया करण्याचा पल्ला गाठला. या शिबिराबाबत महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले, “डॉ. लहाने यांच्या हातून नेत्रशस्त्रक्रिया व्हावी, अशी प्रत्येक रूग्णाची इच्छा असते. पंरतु, गरीब रूग्ण मुंबईला जाऊन शस्त्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे डॉ. तात्याराव लहाने यांनीच यवतमाळ येथे येऊन ही सेवा द्यावी, अशी विनंती आम्ही केली. तीन वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर डॉ. लहाने यांची वेळ मिळाली.” रुग्णांची ने-आण करणे, त्यांच्या भोजन, निवासासह औषधं, काळे गॉगल, नंबरचे चष्मे ही सर्व जबाबदारी त्यांनी घेतली.                                                              

दारव्हा तालुक्यातील प्रियंका ही नववीतील विद्यार्थिनी दोन वर्षांपूर्वी डोळ्यात तार खुपसली गेल्याने दृष्टीहीन झाली होती. शिबिरात प्रियंकाची शस्त्रक्रिया झाली. अधू झालेल्या डोळ्याने तिला चक्क दिसायला लागलं. याविषयी लहाने म्हणाले, “अंधांना समाजात सन्मान मिळावा या हेतूने व्रत म्हणून आपण नेत्रशस्त्रक्रिया करतो. वृद्ध, गरीब रूग्णांकडे पैसे नसतात. त्यामुळे ते मोतीबिंदू किंवा डोळ्यांना काही इजा झाल्यानंतर उपचार महागडे असतील म्हणून दवाखान्यात जात नाहीत. यामुळे ग्रामीण भागात मोतीबिंदूरूग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. अशा वेळी एक नेत्रतज्ज्ञ म्हणून त्यांच्यावर मोफत उपचार, नेत्रशस्त्रक्रिया करणं ही आमची जबाबदारी आहे. समाजातील प्रत्येक डोळस माणसाने नेत्रदानाचा संकल्प केला तर भारतात एकही अंध शिल्लक राहणार नाही.”

“अशा शिबिरात बहुतांश शेतकरी, शेतमजूर, भूमीहीन, गरीब रूग्ण येतात. त्यांची तपासणी करून त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांची खरी अडचण कळते. त्यामुळे या रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर मनस्वी समाधान मिळते. मोतीबिंदू हा साधारण वृद्धापकाळात होतो. याच वयात वृद्धांना आधाराची खरी गरज असते. अशा शस्त्रक्रिया शिबिरातून तो आधार देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची निष्काम भावनेने सेवा करून त्यांचा सन्मान जपावा, असा उपदेशही डॉ.लहाने शिबिरादरम्यान रूग्ण व उपस्थित नातेवाईकांना आवर्जून करतात.
शस्त्रक्रियेनंतर दृष्टी आलेल्या रूग्णांना डॉक्टर विचारतात, “सर्वांत पहिलं काय पहायचं आहे? किंवा कोणाला बघायचं आहे? या प्रश्नाला प्रत्येक रूग्णाच्या मुखातून एकच नाव निघतं, ‘आम्हाला लहाने नावाचा मोठा माणूस बघायचा आहे!’
- नितीन पखाले, यवतमाळ

पालावरची शाळा

ऊसतोडणी कामगार आणि स्थलांतरित मजूर हे पश्चिम महाराष्ट्रात सातत्याने दिसणारे चित्र. दिवाळीनंतर ऊसतोडणी कामगारांची पाले पडायला सुरूवात होते. 2017 मध्येही बार्शीच्या कासारवाडी परिसरातील शिवारात अशीच ऊसतोडणी कामगारांची मोठी टोळी आलेली होती.
ही सगळी कुटुंबे विदर्भातील हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील असल्याचे समजलं. या ऊसतोडणी कामगारांसोबत 24 लहानगी मुलंही आहेत हे आम्हांला सर्वेक्षणातून समजलं. या मुलांचं शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही त्या पालावरच मांडी ठोकून बसलो आणि मुलांशी गप्पा मारू लागलो, त्यांना आणलेला खाऊ दिला. ‘शाळेत पुन्हा यायला आवडेल का?’ हे विचारलं.


सगळी बच्चेकंपनी आनंदाने तयार झाली. मग आम्ही त्यांच्या पालकांना भेटून शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं. “तुम्ही तुमच्या पोटापाण्यासाठी गाव सोडून इकडे आलात, पण बरोबर मुलांनाही घेऊन आलात. यामुळे त्यांची शाळा बुडते आहे. शिक्षणाशिवाय चांगलं भविष्य नाही, तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवा” अशी विनंती आम्ही करत होतो. या मुलांना जवळच्या जिल्हा परिषद शाळा कासारवाडी इथं दाखल करावं, असंही आम्ही सुचविलं. पण, त्यांच्या वस्तीपासून शाळा चार किमी दूर असल्याने रहदारीच्या रस्त्यावरून मुलांना एकटे पाठविण्यास नकार देत पालक शाळेत पाठविण्यास विरोध दर्शवित होते.शेवटी यावर पर्याय ठरला- पालावरच्या शाळेचा!! या शिवारात पालांसमोरच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही ही पालावरची शाळा सुरू करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेसातला आम्ही आलो तेव्हा 24 मुलांपैकी फक्त तीनच मुले या अनौपचारिक शाळेत हजर होती. बाकीची मुलं पाणी भरत होती किंवा भाकऱ्या थापत होती. आम्ही पुन्हा त्यांच्या पालकांशी बोललो आणि मुलांना शाळेत पाठविण्याचा आग्रह केला.  
शेवटी पालकांनी एकदाची मुलं आमच्याकडे सुपुर्त केली. मळलेल्या कपड्यात, नखं वाढलेली, आणि आंघोळ न केलेली पारोशी मुलं. म्हणूनच या शाळेच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवातच झाली ती स्वच्छ आंघोळीने, नेलकटरने नखं कापून आणि तेल लावून छान भांग पाडून!! शाळा अशी पण असते, हे मुलांना आणि त्यांच्या ऊस तोडणाऱ्या पालकांना माहितीच नव्हतं. मॅडम आणि सर छान आंघोळ घालतात, स्वच्छतेचं महत्त्व समजावून सांगत नखं काढून देतात, स्वच्छ कपडे घालायला लावतात, हे सगळं मुलं खूप उत्साहाने अनुभवत होते आणि त्यांच्या पाल्यांप्रति असलेले आमचे प्रेम पाहून पालकांचा विश्वास जिंकून घ्यायला आम्ही सुरूवात करीत होतो.
मग त्या दिवशीनंतर थेट अभ्यास सुरू करण्यापेक्षा कुणाला गाणी, गोष्टी, नाच येतो का, याची चाचपणी करीत आम्ही मुलांना कला सादर करायला प्रवृत्त केलं. मग हळूहळू जमिनीवरच्या मातीत रेघोट्या मारून मुलांना अक्षरओळख करून दिली, त्यांचं नाव लिहायला लावलं. दगडं, उसाच्या कांड्या, पानं- फुलं, काड्या, भाकऱ्या वापरून अंकओळख आणि बेरीज- वजाबाक्या शिकवल्या. मुलं या अनोख्या अभ्यासात खूपच रमायला लागली. मग आम्ही मोबाईल अॅप्सचा वापर करून मुलांना विविध विषयांची तोंडओळख करून देऊ लागलो. हे रंगीत, हलत्या- बोलत्या व्हिडिओंचं जग तर मुलांना फारच आवडलं.
बार्शीतील पालावरच्या शाळेबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/mr/school-inside-tent-settlement/
- लक्ष्मी तोरड आणि अविनाश मोरे, बार्शी, सोलापूर
#नवीउमेद Snehal Bansode Sheludkar






Friday 4 January 2019

मनकर्णाबाईंना मिळालं हक्काचं घर


परभणी तालुक्यातील ठोळा गावातील ही गोष्ट. मनकर्णाबाई माधवराव लोढे या शेतमजूर बाईच्या पतीचं 2013 साली निधन झालं. दोन मुली, एक मुलगा यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी एकट्या मनकर्णाबाईंवर आली. घर कसंबसं चालू लागलं. पण... नववीत शिकणाऱ्या मुलाला कावीळ झाली. आणि दवाखान्यात न्यायलाही हाती पैसे नसल्यानं उपचाराअभावी मुलाचा मृत्यू झाला. त्यातच, 


मुलगीही लग्नाला आलेली. यावेळी मात्र गावकरी पुढे आले. त्यांनी लग्न लावून दिलं. 
धाकटी मुलगी सहावीत. आता तिच्या सोबत मनकर्णाबाई तुटक्या फुटक्या, पत्र्याच्या दहा बाय दहाच्या मातीच्या घरात राहत होत्या. घरात सामानसुमान काय? एक पिठाची थैली, दहा-बारा प्लास्टिकच्या बरण्या आणि एक मातीची चूल. घरात वीजही नाही. सगळं घर आणि आयुष्यही अंधःकारमय. नृसिंह पोखर्णी येथील शिक्षक राजू वाघ, कुलदीप उंडाळकर, बालाजी वाघ, बाबा शेख, शिक्षक लक्ष्मीकांत जोगेवार, कल्याण देशमुख, गोविंद एलकेवाड, सौरभ वडसकर, प्रकाश एडके यांनी हे सगळं बघितलं. संकल्प फाऊंडेशनद्वारे मनकर्णाबाईंना घर बांधून द्यायचा त्यांनी निर्धार केला.
राज्य सरकारच्या घरकुल योजनेतून हक्काचा निवारा मिळेल, अशी त्यांना आशा होती, मात्र अद्याप त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक यांच्यासह गावातील लोकांनी त्यांना सहकार्य करायचं ठरवलं. बांधकामास सुरूवात होताच गावातील अनेकांनी आर्थिक मदतीसाठी हातभार लावला.
राजू वाघ यांनी अनेक दानशुरांची भेट घेत सोशल मिडियावरूनही मदतीचं आवाहन केलं. त्यानुसार मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. सर्वांच्या योगदानातून अखेर मनकर्णाबाई यांना निवारा मिळाला. या कामात सहकार्य करणार्‍या सर्व तरुणांचा विविध मान्यवरांच्या हस्ते मनकर्णाबाई यांच्या उपस्थितीतच सत्कार करण्यात आला.


- बाळासाहेब काळे.

Thursday 3 January 2019

दगडांना बोलती करणारी ऋतिका


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ माणगाव येथील ऋतिका‌ विजय पालकर. शिक्षण बीएससी आयटी असलं तरी तिला आवड व्हीडिओ/फोटो एडिटिंगची. वडिलांच्या न्यूज एडिटिंग क्षेत्रात मदत करताना तिला स्टोन आर्टचा छंद लागला. मुळातच वडिलांकडून कलेची नजर लाभलेली ऋतिका दगडांमध्ये वेगवेगळे आकार निरखू लागली. वडील १९९८ पासून काष्ठशिल्प तयार करतात. त्यामुळे लहानपणापासून काष्ठशिल्प शोधण्यासाठी कोकणातील नदी किनारी, समुद्र किनारी, जंगलांमध्ये फेरफटका ठरलेलाच. त्यातूनच तिला ए
खाद्या टाकाऊ लाकडामध्ये सुद्धा वेगवेगळे आकार शोधण्याची नजर मिळाली. वडील काष्ठशिल्प घडवत असताना तिने नदी पात्रातील, समुद्र किनाऱ्यावरील दगडांना आपल्या कलाकृतींचे माध्यम म्हणून निवडलं. लहान-मोठया, वेगवेगळ्या रंगांच्या दगडांमध्ये तिला अनेक आकृती खुणावू लागल्या. याच छंदातून बनवलेली तिची पहिली कलाकृती एका दर्दी व्यक्तीने विकत घेतल्याने या‌ कलेला व्यावसायिक स्वरूप देण्याचं ऋतिकाने ठरवलं.



घरच्या लोकांचा पाठिंबा आणि निसर्गाकडून प्रेरणा घेत तिने विठ्ठल, गणपती, कृष्ण, कोकणी ग्रामीण जीवनावर आधारित व्यक्तिरेखा अशा कलाकृतींची निर्मिती केली. अनेक लहान मोठ्या दगडांपासून विशिष्ट रचनेतून शिवरायांची व्यक्तिरेखा, मेंढपाळ, प्रेमी युगुल, पशू-पक्षी, फुले अशा अनेक कलाकृतींची निर्मिती तिने केली आहे.ऋतिका आपली कलाकृती घडवताना दगडांना कोणताही आकार देत नाही किंवा रंग देत नाही. निसर्गाने जे बनवलं आहे ते जसंच्या तसं वापरून विशिष्ट प्रकारे मांडणी करून 
त्यातून विविध कलाकृती लोकांसमोर मांडते.
तिची प्रत्येक कलाकृती ही युनिक आहे. कारण निसर्गही एक दगड जशास तसा पुन्हा बनवत नसेल. त्यामुळे ऋतिकाने बनवलेली एखादी कलाकृती जर तुमच्याजवळ असेल तर तशीच दुसरी कलाकृती इतर कोणाकडेही असणार नाही. ऋतिकाची प्रत्येक कलाकृती वेगळी आहे आणि हेच या कलेचे वैशिष्ट्य आहे.
या कलाकृती घडवत असताना तिला ९ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०१८ मध्ये दिल्ली येथील‌ ऑल इंडिया फाईन आर्ट ॲन्ड क्राफ्ट सोसायटी या ख्यातनाम आर्ट गॅलरीमध्ये कला प्रदर्शनाचा योग आला. दिल्ली येथील प्रदर्शनामध्ये ऋतिकाच्या नैसर्गिक दगडी कलाकृतींना योग्य न्याय मिळाला. प्रदर्शन काळात स्टॅचू ऑफ युनिटीचे निर्माते राम सुतार यांच्याकडून तिच्या कलेचे कौतुक झाले. राम सुतार सरांची भेट आणि त्यांचे आशीर्वाद हे खूप मोठे भाग्य असल्याचे ऋतिका सांगते. प्रदर्शनाचे उद्घाटक ख्यातनाम अर्थतज्ञ खासदार नरेंद्र जाधव यांनी ऋतिकाच्या 'आईने कडेवर घेतलेले मूल' या कलाकृतीमध्ये आपल्याला त्या बाळाच्या चेहऱ्यावरील हावभावही दिसतात अशा शब्दांत कौतुक केले व‌ ती कलाकृती विकत घेऊन आपल्या अभ्यासिकेत तिला स्थान दिले आहे. दिल्ली येथील प्रदर्शनामध्ये ऋतिकाच्या अनेक कलाकृतींची विक्री झाली.
आपण बनवलेली कलाकृती इतरांच्याही मनापर्यंत पोहचत आहे हेच आपलं खरं यश आहे असं ती म्हणते. सरावानेच दगडातील आकार लक्षात येतात व वेगवेगळ्या थीम सुचत जातात असा आपला अनुभव असल्याचे ऋतिका सांगते. भविष्यामध्ये आपण आपल्या कलेच्या माध्यमातून कोकणातील निसर्ग व संस्कृती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ती सांगते.


- प्रतिनिधी

शस्त्र नाही,यंत्र

तुरुंगातून सुटका झाल्यावर समाज आपल्याला स्वीकारेल का? आपलं पुढलं भविष्य काय? असे अनेक प्रश्न कैद्यांच्या मनात असतात. सुटका झाल्यावर अनेकदा काही मार्ग सापडत नाही आणि मग व्यक्ती पुन्हा गुन्ह्यांच्या चक्रव्यूहात अडकते. बीड जिल्हा कारागृह प्रशासनाने कैद्यांना यावर मार्ग दाखवला. रागाच्या भरात कधी काळी शस्त्र हाती घेतलेले हात इथे आता कौशल्यविकासाचे धडे गिरवत आहेत. त्यासाठी पुढाकार घेतला जनशिक्षण संस्थानने. केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयांतर्गत, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागांतर्गत ही संस्था येते. निरक्षर, नवसाक्षर, शालेय शिक्षण अर्धवट राहिलेल्या व्यक्ती यांच्यातील कौशल्य ओळखून त्याप्रमाणे व्यावसायिक शिक्षण त्यांना ही संस्था देते.
250 पेक्षा अधिक न्यायाधिन बंदी सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यापैकी सुमारे 40 पुरुष आणि 25 महिला कैद्यांचं ऑक्टोबर महिन्यापासून प्रशिक्षण सुरू करण्यात आलं. पुुरुष कैद्यांना इलेक्ट्रिक उपकरणांच्या दुरुस्तीचं तर महिला कैद्यांना शिवणकामाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. दोन ते चार महिने कालावधीचे हे दोन्ही कोर्स आहेत.
संस्थेचे संचालक गंगाधर देशमुख सांगतात, " कौशल्यविकासातून कैद्यांना समाजात प्रतिष्ठेनं जगण्याचा मार्ग दाखवण्यात येत आहे. मिळालेल्या प्रशिक्षणातून कैद्यांनी आपले व्यवसाय सुरू करावेत आणि गुन्हेगारीचा मार्ग सोडावा हा यामागचा हेतू आहे." संस्थेचे दशरथ कांबळे आणि कीर्ती कुलकर्णी हे प्रशिक्षण देत आहेत. कारागृह अधीक्षक महादेव पवार, वरिष्ठ तुरुंग अधिकारी संजय कांबळे हे यासाठी मेहनत घेत आहेत.
वरिष्ठ तुरुंंग अधिकारी संजय कांबळे म्हणाले, "कारागृहातून सुटल्यानंतर कैद्यांनी गुन्हेगारी सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावं, कष्ट करून जीवन जगावं यासाठी कारागृह प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. जनशिक्षणसारख्या संस्थांची मदत यात मोलाची ठरते." 
-अमोल मुळे.

शाळा बदलली बाई अन् गावही बदलले बाई!

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा. गावात 2018 च्या जून महिन्यात तीन- चार दिवस चूलच पेटली नव्हती, बाया- बापड्यांच्या डोळ्यातले अश्रूच थांबायला तयार नव्हते. मुलं सुद्धा खेळण्याचे विसरून भेदरलेली होती. तुम्हांला वाटत असेल असे कोणते संकट या गावावर ओढवले आहे? या गावातील लोकांवर सुतककळा आली होती, ती या गावच्या गुरूजींच्या म्हणजेच उत्तमराव वानखेडे यांच्या झालेल्या बदलीमुळे. गेली बारा वर्षे वानखेडे सर गढाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावीत होते, नुकतीच त्यांची लाखगाव या गावी बदली झाली, पण वानखेडे सर ग्रामस्थांसाठी फक्त शिक्षक नव्हते तर ते लेकरांचे जणू मायबापच होते!

2006 सालच्या जून महिन्यात वानखेडे सर या गढाळा प्राथमिक शाळेत रूजू झाले. शाळेत येण्यास विद्यार्थी फारसे उत्सुक नसतात, याची जाणीव सरांना झाली. सातेकशे लोकसंख्या असलेल्या या गावातील निम्म्याहून जास्त लोक दिवाळीनंतर ऊसतोडणीला पश्चिम महाराष्ट्रात जायचे आणि मग शाळेची मुळातच कमी असलेली उपस्थिती दिवाळीनंतर तर अगदीच घटायची. ही मुले थेट पुढच्या शैक्षणिक वर्षातच शाळेत यायची. वानखेडे सरांना ही परिस्थिती बघवत नव्हती. त्यांनी पालकांशी संवाद साधण्यास सुरूवात
केली, त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शिक्षण घेतले तरच मुलांचा भविष्यकाळ उज्ज्वल ठरू शकतो, नाहीतर विळा- कोयता आणि ऊसतोडीच्या कष्टांशिवाय मुलांना भविष्य नाही हे पटविण्यास सुरूवात केली.
“मुलांना तुमच्यासोबत ऊसतोडणीला नेल्याने त्यांची शाळा बुडते आणि शैक्षणिक नुकसान होते, त्यामुळे त्यांना गावातच ठेवा”, असे सरांचे सांगणे होते. 2008 साली पाच मुलांना गावातच ठेवायला काही पालक तयार झाले. सरांनी त्या मुलांची संपूर्ण जबाबदारी घेतली, फक्त रात्रीचे जेवण मुले आपल्या नातेवाईकांच्या घरी घेत. पालकांनी दिलेली अंथरूणे – पांघरूणे टाकून शाळेतच मुले झोपी जायची. वानखेडे सर स्वत: त्यांच्यासोबत शाळेत मुक्कामी राहत. मुलांचे काहीही दुखले- खुपले किंवा ती आजारी पडली तरी वानखेडे सर स्वत: त्यांना डॉक्टरांकडे नेऊन, प्रसंगी घरचे जेवण खाऊ घालून पोटच्या मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेत. शिवाय मुले शाळेत मुक्कामीच असल्याने त्यांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावणे, त्यांच्या अभ्यासावर विशेष मेहनत घेणे आणि एकूणच त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होईल, याकडे सरांनी विशेष लक्ष पुरविले.
याचा परिणाम असा झाला की, ऊसतोडणीवरून जेव्हा पालक परत आले, तेव्हा त्यांना मुलांच्या वागण्या- बोलण्यात आणि अभ्यासातही खूप सकारात्मक बदल जाणवला. त्यामुळे त्याच्या पुढच्या वर्षी अनेक पालकांनी आपली मुले गावातच शिक्षणासाठी ठेवण्याचा निश्चय केला. पाचेक मुलांचे तर गावातं कोणीच नातेवाईक नव्हते, तेव्हा त्या मुलांची जबाबदारी शाळेत पोषण आहार शिजविणाऱ्या चतुराबाई बंदुके मावशींनी घेतली. या मुलांच्या जेवणाचा, औषधांचा पूर्ण खर्च मावशींनी आणि त्यांच्या यजमानांनी आनंदाने केला.
अशा प्रकारे वानखेडे सरांनी गढाळा गावचे स्थलांतर 100 टक्के थांबविलेले आहे. पूर्वीची 40-42 ची पटसंख्या आता 82 वर गेली आहे. या शाळेतील बरीच मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेली आहेत, तर आठ मुलांची नवोदय शाळेसाठी निवड झालेली आहे.
वानखेडे सरांनी गढाळा येथील शाळेत आणखी काय काय बदल घडविले ते जाणून घेण्यासाठी क्लीक करा: http://samata.shiksha/mr/new-change-new-beginning-gadhala/

- स्नेहल बनसोडे-शेलुडकर