Monday, 26 June 2017

न्यायाधीशांचं अनोखं दान
 20 जूनची दुपार. रत्नागिरीच्या सत्र न्यायालयात, दोन विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना हजर राहायला सांगितलं होतं. खेड कुरवळ जावळीच्या न्यू इंग्लीश स्कूलमधला शुभम संजय लाड आणि राजापूर उत्कर्ष विद्यामंदिर, शिवणेखुर्दची मिनल हातणकर हे त्यांच्या आई-वडिलांसह तिथे हजर होते. सर्वसामान्यांना कोर्टात जायची भीती वाटते तशीच त्यांनाही वाटत होती. त्यांना बोलावण्याचं नेमकं कारण तरी काय होतं? ते त्यांना न्यायालयात गेल्यावरच कळलं.
रत्नागिरी जिल्हय़ातल्या 30 न्यायाधीशांच्या एका गटाने दोन गरीब, गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारायचं ठरवल्यानंतर आयोजलेला तो कार्यक्रम होता.
शुभम लाडने अपंगत्वावर मात करत 10 वीत 76 % गुण मिळवले. शुभमला स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाही. एका डोळय़ाने दिसत नाही. अस्थिव्यंगही आहे. त्याही स्थितीत त्याने परीक्षा दिली. पालकांनी त्याच्या उपचाराकरिता दिवस-रात्र एक करूनही शुभम बरा झालेला नाही. राजारापूरमधील मिनल शंकर हातणकरने अतिशय गरीब परिस्थितीचा सामना करत दहावीत 84.20 % मिळवले.
या दोघांच्या यशाची गाथा वाचून जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश शिवराम डिगे यांनी जिल्हय़ातील 30 न्यायाधीशांशी चर्चा करून या दोन्ही विद्यार्थ्यांना संपूर्ण मदत करण्याचा निर्णय घेतला. 20 जूनला शुभमला 40 हजार तर मीनलला 60 हजार रूपये सुरूवातीला शैक्षणिक खर्चासाठी दिले. तसंच दोघांच्याही संपूर्ण उच्च शिक्षणाचीही जबाबदारी न्यायाधीशांच्या या गटाने घेतल्याचं जाहीर केलं. शुभमच्या उपचारांची जबाबदारीही न्यायाधीशांनी स्वीकारली. लवकरच त्याला उपचाराकरिता पुण्यातील एका नामांकित हॉस्पीटलमध्ये नेण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा न्यायाधीश 1 जे.पी.झपाटे, जिल्हा सत्र न्यायाधीश एम.व्ही.दीक्षित, एस.एस.गायकवाड, बी.डी. शेळके, जिल्हा न्यायाधीश के. ए. बागी आदी उपस्थित होते.
न्यायाधीशांना समाजाच्या अनेक उपक्रमांपासून लांब राहून कायद्याचं पालन करावं लागतं. कायद्याद्वारे न्यायालयात ते न्यायदान करतच असतात. मात्र त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारण्याची ही घटना अनोखी ठरते. या घटनेमुळे शुभम आणि मीनल यांच्या जीवनाला दिशा मिळणार आहे. भीतीच्या भावनेने न्यायालयात आलेल्या या मुलांच्या पालकांनी घरी परत जाताना न्यायाधीशांच्या माणुसकीला सलाम ठोकला.
 जान्हवी पाटील.

शाळेतच तयार होतोय बायोगॅस!


अहमदनगर जिल्ह्यातील धांदरफळ खुर्द गावातील जिल्हा परिषद शाळेत मी शिकवितो. इतर जि प शाळांप्रमाणे आमच्या शाळेतही ‘शालेय पोषण आहार’ योजना राबवली जाते. आम्ही दररोज जवळजवळ ११० मुलांसाठी जेवण बनवतो. स्वयंपाकासाठी अर्थातच एलपीजी गॅस वापरला जायचा. अनेकदा वर्ग चालू असताना गॅस सिलेंडर संपायचा. अशावेळी नवीन सिलेंडर आणण्यासाठी आम्हा शिक्षकांना धावपळ ठरलेलीच. शेवटी चुलीवरही जेवण बनवून बघितले, पण त्यासाठी लागतात लाकडे. म्हणजे वृक्ष तोड आली. शिवाय धुरामुळे प्रदूषण तर व्हायचेच, शिवाय स्वयंपाक करणाऱ्या महिलांनाही खूप त्रास व्हायचा.हे सगळं पाहूनच आम्ही शिक्षकांनी ठरवलं, की पारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या टंचाईची समस्या आता सोडवायलाच हवी. या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही शालेय व्यवस्थापन समितीसोबत बैठक घेतली. त्यांच्यासमोर बायोगॅसचा प्रस्ताव मांडला. स्वयंपाकघरातले उरलेले अन्न, शाळेतले आणि ग्रामपंचायतीतले मलमूत्र आणि इतर कचरा एकत्र करून बायोगॅस बनवला तर दुर्गंधी आणि अस्वच्छता हे दोन्ही प्रश्न सुटणार होते. महत्वाचे म्हणजे जेवण बनवण्यासाठी हे इंधन म्हणून वापरता येणार होते. बायोगॅस प्रकल्पाची कल्पना सर्वांनी उचलून धरली. त्यासाठी शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी दहा हजार रुपये जमविले, तर ग्रामपंचायतीनेही दहा हजार रुपये दिले. 


 तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम बायोगॅसची टाकी आणि कचरापट्टी टाकण्यासाठी इनलेट हौद बांधला. मग जमिनीत छिद्र पाडून आउटलेट बसवला. ग्रामपंचायत आणि शाळेचं शौचालय यांच्यात जमा होणारं मलमूत्र एकत्रितपणे बायोगॅसला जोडण्यासाठी पाईप बसवून घेतले. बायोगॅस संयंत्र तयार झाले. आता ते कसे चालते ते बघण्याची उत्सुकता होती. गावात बहुतेक सर्वांची शेती. त्यामुळे जमा झालेले जनावरांचे शेण, पालापाचोळा आणि शाळेत शिल्लक राहिलेले अन्न इनलेटमधून आत टाकले. आणि आठवड्याभरात बायोगॅस संयंत्राला पाईप जोडून तो शाळेतील स्वयंपाकघराच्या चुलीला जोडला. आमची शेगडी मस्त चालू लागली.
२०१३ साली सुरु केलेला बायोगॅस उपक्रम आजही अतिशय उत्तमरित्या चालतो आहे. पूर्वी १८ ते २० दिवसातून सिलेंडर आणावा लागत असे. आता एलपीजीसोबत बायोगॅसही वापरात असल्यानं तीन महिने तरी नवा सिलेंडर आणावा लागत नाही. यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात नाही. शौचालयातील मलमूत्र बंद पाईपमधून थेट संयंत्रात जात असल्याने, दुर्गंधी नाही आणि गटारेही उघडी राहत नाहीत. यामुळे गावातील रोगराईचे प्रमाणही कमी झाले. सिलेंडरचे वाचलेले पैसे आता आम्ही मुलांना अधिक उत्तम पोषण आहार पुरविण्यासाठी खर्च करतो.
बायोगॅस प्रकल्पाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा- http://samata.shiksha/…/the-many-benefits-of-a-biogas-plant/ किंवा फोन करा- मच्छिंद्र पावसे- 7588606092
सुजाण शिक्षक जाणत्या शाळा 
- मच्छिंद्र पावसे,

माझं कामच मला सन्मान देतं !

“एकदा एका बचतगटाचं खातं एका बँकेच्या मॅनेजरने उघडण्यास नकार दिला. त्या महिलांनी मला तसं कळवताच मी मॅनेजरना फोन केला, “तुम्ही बचतगटाची खाती उघडत नाही, असं लिहून द्या.. मग मी पाहते पुढे काय करायचं ते...” असं म्हणताच, ते लागलीच दबकून बोलू लागले. खातं उघडण्यास तयार झाले. शुभांगी हिवाळे अशी कृतीतूनच महिलांना आपल्या हक्कांची जाणीव करून देत असते.
स्त्रीसक्षमीकरणाचा एक प्रयोग मुंबईच्या कांदिवली पूर्व मतदारसंघातल्या (कांदिवली,पोयसर, मालाड) वस्त्यांत बचतगटांची मेढ उभारुन शुभांगीने चालवला आहे. ‘निर्मला निकेतन’मधून समाजसेवेचा पॅरा प्रोफेशनल कोर्स करून तिने २००८ पासून अतुल भातखळकर, जे आता आमदार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास सुरवात केली. कामात सातत्य ठेवून तिने स्त्रियांचे 94 बचतगट तयार केले. त्यातून 1,200 महिलांपर्यंत पोचणं शक्य झालं. कौशल्य विकास वर्गांतून वेगवेगळ्या कोर्सेसचा लाभ 3,000 महिला घेत आहेत. अशा चार हजारांहून अधिक महिलांचे उपक्रम शुभांगी हाताळते. हे ती कसं सांभाळते? ती सांगते की प्रत्येक गटाच्या अध्यक्ष महिलांची ती महिन्यातून एकदा मिटिंग घेते. त्या आपापल्या कामाचं रिपोर्टिंग करतात. अडचणी सांगतात. शुभांगी त्यांना सूचना देते. आणि अधनंमधनं थेट गटांना भेटीही देते. यामुळे गट कार्यरत ठेवणं सोपं जातं. शुभांगीच्या कामाची काटेकोर आखणी पाहता ती उत्तम व्यवस्थापक असल्याचं जाणवतं.
शुभांगी सात बहिणींमधली पाचवी मुलगी. ती सांगते, “गरीब, गरजू महिलांसोबत काम करताना बरंच शिकले. त्यांच्या अडचणी काय असतात, हे स्वतःच्या लग्नानंतर आणखी चांगलं समजू लागलं. लग्नानंतर कमी पगारावर काम करण्याची काही गरज नाही, या सासरच्या लोकांच्या तगाद्याला छेद देऊन मी काम चालूच ठेवलं. पुढे माझ्या मुलीच्या जन्मानंतर काम सोडण्यासाठी घरातून पुन्हा टोचणी सुरु झाली. कामाचा व्याप वाढला असताना मी काम सोडणं मला किंवा आमच्या 'स्पंदन सामाजिक प्रतिष्ठान’ संस्थेला परवडणारं नव्हतं. शेवटी सासरचं घर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. नवर्‍याने साथ दिल्याने कामाच्या ठिकाणाजवळ भाड्याने घर घेऊन आता आम्ही आमच्या मुलीसह राहातो. असा स्वतंत्र निर्णय घेणारी धाडसी शुभांगी केवळ सत्तावीस वर्षाची आहे. तिच्याच म्हणण्यानुसार, काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतंच. 
“सुरवातीला पुरुष कार्यकर्त्यांमध्ये काम करताना संकोच वाटत असे. आधी फारसं महत्व न देणारेही पुढे माझ्या कामाचा आदर करू लागले. सपोर्ट करू लागले. त्यामुळे इतर लोकांकडूनही मला आदर मिळू लागला. मी आणखी जोमाने काम करू लागले.” 
अतुल भातखळकर हे भाजपचे आमदार आहेत. शुभांगी सांगते की तिने पक्षाकडे पाहून नाही, तर सामाजिक काम म्हणून सुरूवात केली. त्यामुळे ती इतर पक्षांच्या महिलांची कामंदेखील सहज करून देते. आणि तसा व्यापक विचार तिच्या सरांमुळे म्हणजेच आमदार अतुल भातखळकर यांच्याच शिकवणुकीमुळे करत असल्याचं ती सांगते. त्यांनी विश्वास टाकला आणि निर्णयस्वातंत्र्यही दिल्यानेच काम उभं करू शकल्याचं तिचं म्हणणं आहे.
 लहान वयात मोठी समज आणि मोठं काम करणारी शुभांगी हिवाळे. तिच्या शब्दाशब्दातून तिची कामावरची श्रद्धा दिसून येते. शुभांगी म्हणते, “माझं कामच मला सन्मान देतं.”
- लता परब

सराव सोपा कुठे!

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी : 
तशी मी नुकतीच नव्या जागेत नि नव्या उपनगरात राहायला आलेय. यापूर्वी जिथं होते ती शिवाजी पेठ. मोकळीढाकळी. मी लिहितेबिहिते नि कायम कामात असते म्हणून सहसा मला कोणी डिस्टर्ब करायला यायचं नाही. एरवी पेठेला स्वत:च्या घरापेक्षा कुणाकडे कोण किती वेळा आलं याचे हिशेब पाठ. त्यामुळं म्हटलं तर तिथं एकांत नि म्हटलं तर सतत नको होईल इतका लोकांतही. लोकांमध्ये असूनही वेगळं राहाता येणं नि त्यांच्या प्रेमाअगत्याचा आपण अपमान करत नाही आहोत असं त्यांना पटवून देता येणं मोठ्या कौशल्याचं काम. ते कौशल्य दहा वर्षांपूर्वी पेठेत राहायला आले होते तेव्हा अवगत नसल्यामुळं फार मजा व्हायची. 
मी उदयकाकांबरोबर रोज संध्याकाळी फिरण्यासाठी अर्थातच व्हीलचेअर घेऊन बाहेर पडायचे. फिरंगाई मंदिर किंवा गांधी मैदानापर्यंत जायचा अवकाश, एरियातलेच कुणी रिक्षा दादा हाक मारून थांबवायचे नि म्हणायचे, ‘‘ओ ताई, घराकडंच चाललोय. पैशे नकोयेत. चला घरी सोडतो.’’ त्यांच्या स्वरातलं आर्जव ऐकून फिरायला बाहेर पडलेलो आम्ही त्यांना बरं वाटावं म्हणून रिक्षात बसून घराकडं परत यायचो.
माझ्यासारखी व्हीलचेअरवर असणारी व्यक्ती स्वत:चं काही काम करते नि इतरांप्रमाणे, रोज ‘चाकं मोकळी’ करायला जाऊ शकते याचा सराव जसा मला नव्हता तसा मला पाहणाऱ्या आसपासच्यांनाही. अशा वेगळ्या स्थितीत दिसणार्‍या माणसाशी नॉर्मल कसं वागायचं याचा गोंधळ उडालेला दिसायचा. मुळात स्वच्छ आवरून, किंचितसं प्रसाधन करून व्हीलचेअरवरून त्यांच्या समोरून झुळ्कन जाणार्‍या मला स्वीकारायला त्यांना वेळ लागला. कदाचित मी थोडी मलूल, थोडी नजर चोरणारी, विस्कटलेली असते तर तसा तितका वेळ लागला नसता. त्यामुळं अशा टापटिपीत मी त्यांच्याकडं हसून पाहायचे नि जुजबी बोलायचे तेव्हा आसपासच्यांची गडबड उडायची. एखाद्या परिस्थितीतला माणूस कसा दिसावा याचीही पठडी होऊन गेलेली असते, त्यामुळं त्यांचं बिचकणं असेल! पुढे एक विशिष्ट काळ गेला तेव्हा त्यांनी मग ड्रेसचा रंग छानंय वगैरे सांगायला सुरुवात केली नि सहजपणा येत गेला.
कोल्हापुरातल्या ‘हॅपनिंग’ महाद्वाररोडवरून फिरताना माझ्या आतबाहेर ताज्या ताज्या स्वातंत्र्याचा वास तरंगत असायचा... महाद्वाररोडलाही माझ्यासारख्यांचं फिरायला येणं अगदी नवं. भर गर्दीच्या रस्त्यात रोज चार-सहा जण तरी म्हणायचेच, ‘‘अहो, आमच्यासारख्यांना बाहेर पडावं वाटंना या गर्दीत. तुम्ही कशाला येता? कुठं काही कमीजास्त झालं म्हणजे? गपगुमानं घरात शान बसावं की!’’ - मग मी कधी म्हणायचे, ‘फिरायला आलेय. तुमच्यासारखीच’. कधी म्हणायचे, ‘‘खरेदी करायचीय नीट बघूनसवरून’’, तर कधी ‘‘तुम्ही जशी ‘हिरवळ’ पाहून सुखावता तसंच काही मलापण करायचंय.’’ - उत्तरं खूप! मात्र मी येणार, रोज येणार, खरेदी करणार, फिरणार, गप्पा मारणार अशी हळूहळू महाद्वार रोडला सवय होत गेली. लोकांच्या काळजीच्या किंवा अन्य हेतूंच्या प्रश्‍नांनी कोषात न जाता आपल्या अस्तित्वाची व प्रश्नांची सवय करून देणं व्हायलाच हवं होतं... नाहीतर आपल्या साध्यासुध्या गरजांची दखल घेणं आपणही बंद करून टाकतो हे लक्षात येत गेलं.
तर चांगली भाजी घेता येणं ही ही गरजच की माझ्या नव्या संसाराची. पहिल्यांदा स्वत:साठी भाजी मार्केटमध्ये गेले नि सगळीकडं भाज्यांचे ताजे, रंगीबेरंगी ढीगच ढीग पाहून कोण आनंद झाला. भाजीवालीही नवलानं पाहत होती नव्याच स्थितीतल्या गिर्‍हाईकाकडं. मी कोथिंबीर हातात घेतली. किती? असं विचारताना मला लाजायलाच झालं कारण नवंच होतं हे सगळं माझ्याकरता. तिनं सांगितले पैसे नि म्हणाली, ‘‘ताई, ती नको, ही जुडी घ्या. तिला पाक फुल्लं आल्यात.!!’’
सोनाली नवांगुळ

Wednesday, 21 June 2017

एपिलेप्सीग्रस्तांचं पालकत्व अनोखं


स्वतःच्या मुलांचं पालकत्व सगळेच करतात. यशोदा वाकणकर करत असलेलं एपिलेप्सीग्रस्तांचं पालकत्व अनोखं आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून 23 वर्ष एपिलेप्सीचा आजार घेऊन जगलेल्या यशोदाला तिचे आई-बाप अनिल आणि सुनंदा अवचट यांनी सर्वसामान्य मुलीसारखंच वागवलं. तेच सूत्र यशोदाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या कामाचं आहे. ब्रेन सर्जरीनंतर तिचा आजार बरा झाला. पण एकदा फिट येणार्‍या दोन जुळ्या मुलांच्या वडिलांना पैशाअभावी औषधं न घेता परत जाताना यशोदाने पाहिलं. संवेदना फौंडेशन, पुणे या Epilepsy अर्थात फेफरे, फिट्स, अपस्मार, मिरगी या नावाने प्रचलित असणाऱ्या आजाराच्या उपचारार्थ काम करणार्‍या संस्थेच्या जन्माचं हे कारण ठरलं. सुरवातीला वृत्तपत्रात एक निवेदन प्रसिद्ध करून सुरू केलेलं हे काम आता फेसबुकद्वारे सर्वदूर पसरत आहे.
Epilepsy म्हणजे काय? मेंदूद्वारे चालणार्‍या संदेशवहनात येणारा तात्कालिक किंवा दीर्घ अडथळा वा बिघाड. हा आजार औषधं, पथ्य, नियमित उपचाराने नियंत्रणात राहतो, बराही होतो. भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 1% एवढं प्रमाण असणाऱ्या या आजाराचं नेमकं कारण अजून स्पष्ट नाही. जगभरातले वैद्यकीय तज्ञ, मेंदूतज्ञ, सरकारं, आरोग्य विभाग त्याचा शोध घेत आहेत.
एपिलेप्सी झालेल्या व्यक्तीला औषधोपचारासोबत प्रेमळ संवाद, मायेचा स्पर्श, सोबत याचीही गरज असते. एपिलेप्सीबाबत बरेच अपसमज आहेत. ते दूर करण्यासाठी ‘संवेदना’ सपोर्ट ग्रुप तयार करत आहे. पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद इथे हे काम सुरू आहे. एपिलेप्सीग्रस्तांना उपचारखर्च, शिक्षण, नोकरी मिळावी यासाठी ‘संवेदना’द्वारे जागृती केली जाते. अनेक मेंदूतज्ञही यासाठी गावोगावी प्रयत्नशील आहेत. त्यांच्यामार्फत आजारी व्यक्तींना ‘संवेदना’ची हेल्पलाइनही मिळते.
मोहन फाटक यांच्या मुलाला मिरगीचा बारीकसा आजार होता. मुलासाठी वधुसंशोधन करताना त्यांना हे लपवायचं नव्हतं. या अनुभवातूनच एपिलेप्सी आजार झालेल्यांचं वधू-वर मंडळ सुरू करण्याची कल्पना निघाली. यशोदाचं म्हणणं असं की, मतिमंद म्हणून फिट्स येत असतील अशांच्या लग्नाचा विचार करू नये. पण एरवी नॉर्मल आणि क्वचित फिट येणार्‍यांना, त्यांच्या पालकांना अशा समुपदेशनाने आधार मिळवून देता येतो. वैद्यकीय सल्ल्याने आजारग्रस्तांच्या सर्व अवस्था नीट पार पाडता येतात. 2008 साली ‘संवेदना’ने भरवलेला एपिलेप्सी वधू-वर मेळावा भारतातला पहिलाच ठरला. त्यानंतर आयोजलेल्या चारही वधू-वर मेळाव्यांना भारतभरातून प्रतिसाद मिळाला. संस्थेने आजवर असे २५ विवाह जमवले. ती जोडपी सुखाने संसार करत आहेत आणि त्यांना नॉर्मल बाळंसुद्धा आहेत. “एकमेकांना समजून घेत उभे राहिलेले यांचे संसार बघण्यात मोठं समाधान आहे,” यशोदा सांगते.
राधिका देशपांडे यांच्या मुलीला हा आजार तीव्र स्वरूपात होता. मुलगी बरी झाल्यावर त्यांनी ‘संवेदना’सोबत कामाला वाहून घेतलं. मोहन फाटकांसह रवींद्र बापट, सुवर्णा मोडक, रामकृष्ण बोकील हेही झोकून देऊन काम करतात. यशोदाचे बाबा अनिल अवचट, पती पराग वाकणकर हे दोघं कामामागे भक्कमपणे उभे आहेत.
‘संवेदना’च्या शेअरिंग मिटिंग्ज महत्वाच्या असतात. लोक स्वतःबद्दल, स्वतःच्या आजाराबद्दल बोलून खूप मोकळे होतात. त्यांचा ताण, न्यूनगंड कमी होतो.
दर बुधवारी संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान निवारा वृद्धाश्रम, नवी पेठ, पुणे इथे एपिलेप्सी समुपदेशन, एपिलेप्सी वधू-वर नोंदणी, आणि एपिलेप्सीसाह जगणाऱ्या गरजू व्यक्तींसाठी ‘संवेदना’ची औषध मदत योजना सेवा उपलब्ध आहे.
अधिक माहिती व संपर्कासाठी - 9822008035, 9850887644
प्रवास पालकत्वाचा – यशोदा वाकणकर
www.snavedana.org
- गीतांजली रणशूर, पुणे

गोष्ट सत्यभामाचीमाजलगाव तालुक्यातील सादोळा. इथल्या सत्यभामा भुजंगराव सौंदरमलची ही गोष्ट. तिला चार बहिणी, एक भाऊ. वडिल मुंबईत मजुरीला. बायको-मुलांना वाऱ्यावर सोडून त्यांनी तिथंच दुसरं लग्न केलं. आई मुलांसह माहेरी परतली. 1983-84 चा हा काळ. मुली अडाणी राहू नयेत, त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये, म्हणून आई-आजीनं मुलांना शाळेत घातलं. 
99 साली सत्यभामानं दहावीची परीक्षा दिली. सुट्टीत आई, आजीसोबत शेतात मोलमजुरीचं काम करू लागली. वयात आलेल्या सत्यभामावर गावातल्या टवाळखोरांची नजर पडली. या धनदांडग्यांना तिनं कडाडून विरोध केला. परिणाम म्हणून चोरीचा आळ घेऊन आजी-नातीला त्यांनी पोलिसांच्या हवाली केलं. सत्यभामा तीन दिवस कोठडीत राहिली. बालमनावर दहशत पसरली. दलित–सवर्ण वादाला तोंड फुटलं. तिथं मानवी हक्क अभियानाचे ॲड. एकनाथराव आवाड, बाबूराव पोटभरे आल्यानं थोडं पाठबळ मिळालं. सुटका झाल्यानंतर सत्यभामा पेटून उठली. ॲड. आवाड (जिजा) यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन तिनं काम सुरू केलं. विरोध झालाच. यातूनच ती सावरत, धीट होत गेली. 
सत्यभामा सांगतात, ‘‘लहानपणापासूनच आई, आजी यांचं एकाकी जीवन पाहत होते. कर्त्या पुरूषाचा आधार नव्हता. त्यामुळे शिक्षण घेऊन फौजदार व्हायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. त्यामुळे अगोदर लहान बहिणीचं लग्न केलं. दहावीनंतर पाच वर्षे माजलगावला समाजकल्याण खात्याच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेतलं. लहानपणीच आघात झाल्यानं धीटपणा वाढवला.परंतू, बाहेर पडण्याला बंधनं आली. यातच आई, आजींनी लग्न उरकून टाकण्याची घाई केली.’’ नात्यातीलच स्थळ बघितलं. पहिलं लग्न झालेल्या, वयाने मोठ्या पुरुषाशी लग्न ठरलं. ठामपणानं सत्यभामानं या लग्नाला नकार दिला. आणि लहान बहिणीचा दीर नारायण डावरे याच्याशी 2004 साली लग्न केलं. मात्र अन्याय, अत्याचारा विरूद्ध लढण्याची वृत्ती तिला गप्प बसू देत नव्हती. त्यामुळे सासरी भाऊबंदांच्या दडपणाखाली येऊन नवऱ्यानं विरोध केला.
2006 मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीनं गोदावरीला महापूर आला. गावागावांत पाणी शिरलं. सरकारनं सोय केली आणि गाव स्थलांतरीत झाला. तिथंही सत्यभामा मदतीला पुढं झाली. आता भावकीतील लोकांनी साथ दिली. या कामामुळे तिचा आत्मविश्वास दुणावला. इथूनच तिनं ॲड. एकनाथ आवाड यांच्या मानवी हक्क अभियानाचं पूर्णवेळ काम सुरू केलं. स्त्री-पुरूष समानता प्रकल्पावर काम केलं. स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीविरोधात लढा सुरू केला. पती-पत्नींमधील वादाची कारणं ती शोधू लागली. सत्यभामा सांगते, ‘‘घरगुती हिंसाचारात दारू मुख्य कारण असल्याचं जाणवलं. म्हणून दारूबंदीचा लढा सूरू केला. 2016 मध्ये माजलगावला दारूबंदीसाठी समुपदेशन केंद्र सुरू केलं. पोलिस विभागाच्या महिला दक्षता समितीचं सदस्यत्व मिळालं. त्यामुळे अधिक अभ्यास करता आला.’’
लऊळ गावातील महिला दारूबंदीसाठी पुढे झाल्या. सत्यभामा सांगतात, ‘‘गावभर पाटीलकी करत फिरणारे ‘नवरोबा’ काबाडकष्ट करणाऱ्या बायकोला कशी मारझोड करतात’’ हे इथं प्रत्यक्ष पाहिलं. हा अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी त्या महिलांचीच मोट बांधली. दारू जमिनीत गाडलेली, ती काढण्यासाठी हातपंप बसवलेले. संसाराची राखरांगोळी होत असलेल्या महिलांनीच साथ दिली. त्यामुळे पोलिसांना सोबत घेऊन आठ ते दहा वेळा लऊळला हातभट्टी, दारूचे हातपंप उद्ध्वस्त केले. त्यापाठोपाठ किट्टीआडगाव, वारोळा, पुरचुंडी, कवडगाव घोडा, कवडगाव हुडा या ठिकाणी दारूबंदी करण्यात यश मिळवलं. दारूवर महिलांनी वचक निर्माण केला. दारूबंदी समित्या नव्हत्या. यासाठी देशी, हातभट्टी दारूचे बॅरल घेऊन महिलांसह उपोषण केलं. परंतू, परिणाम झाला नाही. पोलिस ठाण्यासमोर दारूविक्रीची दुकानं थाटली. तत्कालिन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेतली. त्यांनी तालुकास्तरावर अवैध देशी, हातभट्टी दारूबंदी समित्या नियुक्त केल्या. कौटुंबिक छळाच्या सुमारे 70 ते 80 केसेस समुपदेशनाने मिटवल्या. सत्यभामाचं काम पाहून आता पती नारायण यांची मदत मिळू लागली आहे. आज निर्धार सामाजिक सेवाभावी संस्थेचं कार्यालय माजलगावच्या केसापुरी वसाहतीत सुरू केल्याचं सत्यभामा सौंदरमल सांगतात. 
- मुकुंद कुलकर्णी. 

..लोग मिलते गये, कारवाँ बनता गया!

अहमदनगर जिल्ह्यात सैन्याची छावणी आहे. लागूनच रेड लाईट एरिया. इथं राहणारी मुलंही गिरीशसोबत शाळेत शिकत. त्याला एकदा या मित्रांकडे वस्तीत जाण्याचा योग आला. गिरीश तेव्हा आठवीत. आपल्याच वयाच्या काही मुली आणि चाळीशीच्या स्त्रिया शरीरविक्रीचा व्यवसाय करताना दिसल्या. खेळण्याच्या वयातील या मुलींना असलं काम करताना पाहून “या देखील कुणाची तरी, बहिण असतील. मग हे काम यांना का करावं लागतंय? यांच्या जागी आपली बहिण असती तर आपण शांत बसलो असतो का? ” या प्रश्नांनी गिरीश हैराण झाले. या स्त्रियांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. त्यांच्या मुलांच्याही वाट्याला हे अमानवी जगणं आलेलं. मुलांचा प्रश्न गंभीर. गिरीश सांगतात, "अस्वस्थ वाटलं. यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. पण काय करावं? कळत नव्हतं. मला यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं पण मी ते करू शकलो नाही, ही अपराधी भावना घेऊन जगण्यापेक्षा आपण कामालाच सुरुवात केली पाहिजे, असा विचार मनात येत होता”.
गिरीश कुलकर्णी यांचं कुटुंब मध्यमवर्गीय. वडील शिक्षक. समाजसेवेचं तेही अशा प्रकारचं काम करायचं? अनेक आव्हानं समोर होती.
तरीही 1989 च्या जानेवारीत त्यांनी काम सुरू केलं. दोनच मुलांना घेऊन ‘स्नेहालय’ या संस्थेचा जन्म झाला. गिरीश म्हणतात, “तो माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. मला असे अनुभव येत गेले, की मी फक्त चालत गेलो, आणि लोक जोडत गेले. हे काम मी नसतं केलं तर आणखी कुणीतरी केलंच असतं.”
संस्था सुरू होऊन आता 27 वर्ष झाली आहेत. “एका रात्रीत कुणी बदलू शकत नाही. बदलाची प्रक्रिया सुरूच असते. आपण त्याच बदलाच्या प्रक्रियेचा भाग असतो” ते म्हणाले. स्वत:ला बदलायचा प्रयत्न केला तर जगातला एक माणूस नक्कीच बदलू शकतो. आणि तो अनेक चांगले, सकारात्मक बदल घडवायला इतरांना उद्युक्त करू शकतो, हे आपल्या कार्याने गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या ‘स्नेहालय’नं करून दाखवलं आहे.
स्नेहालयचे चार जिल्ह्यांमध्ये 17 प्रकल्प आहेत. या संस्थांमध्ये एचआयव्हीबाधित स्त्रिया-मुलं, अनाथ मुलं, कुमारी माता, परित्यक्त्यांसाठी काम केलं जातं. सध्या संस्थेत एकूण 400 अनाथ मुलं आहेत. एचआयव्हीबाधीत मुलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल आहे. इंग्लिश मीडियमच्या शाळेत आजुबाजूच्या झोपडपट्टीतील मुलांना गाडी करून आणलं जातं. 20 एकरांचं हिंमतग्राम, अॅडाप्शन सेंटर आहे. आजपर्यंत 300 कुमारी मातांचं पुनर्वसन केलेलं आहे. ‘स्नेहाधार’, ‘स्पर्श’ मतिमंदाची शाळा, डे केअर सेंटर आहे. पुण्यामध्ये कात्रज, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ आणि फोंडाघाटमध्येही संस्थेचे प्रकल्प आहेत. सांगण्यासारखं म्हणजे विश्वस्त मंडळामधल्या महिलांपैकी अनेकजणी देहविक्रयाच्या व्यवसायातून पूर्णपणे बाहेर पडून संस्थेच्या कामाला हातभार लावत आहेत. एका संवेदनशील तरुणानं मनात आणलं आणि अनेक उपेक्षितांना समाजात मानानं जगण्याची संधी मिळाली. अनेक एचआयव्हीबाधीत स्त्रिया व मुलं औषधं, खाण्यापिण्याची आबाळ न होता आपलं उर्वरित आयुष्य जगताहेत. गिरीश कुलकर्णींच्या बोलण्यातून जाणवतं, ‘अकेला ही चला था मगर... लोग मिलते गये, कारवाँ बनता गया!’
गिरीश कुलकर्णी संपर्क - 0241 2778353, 9011020180, 73

- मंगला घरडे, पुणे

किशोरींसाठी अक्षय्य 'उर्जा'

सुजाण शिक्षक, जाणत्या शाळा :
वय वर्षे 11 ते 19 – तारुण्याची सुरुवात. सळसळता उत्साह, कष्ट करण्याची तयारी हे सगळं याच वयात असतं. पण मुलींसाठी हेच वय ‘सोळावं वरीस धोक्याचं’ म्हणत बंधनं घालणारं आणि ‘सातच्या आत घरात’ यायला लावणारंही असतं. अनेक ठिकाणी “आता लहान आहेस का गं तू? काय पोरांसारखी फिदीफिदी हसते ? अंगभर कपडे घाल, आता मैदानात खेळायला जाऊ नको” असं बोलणंही मुलींच्याच वाट्याला येतं.
समाजातला मोठ्ठा हिस्सा आजही मुलींना त्यांच्या खेळण्या- बागडण्याच्या आणि आत्मनिर्भरतेच्या हक्कापासून वंचित ठेवतोय, हे वारंवार दिसून येतं. उस्मानाबादच्या तत्कालीन सीईओ सुमन रावत यांनीही हे हेरलं, आणि या उमलत्या कळ्यांसाठी ‘ऊर्जा’ उपक्रम सुरू केला. 2012 साली प्रारंभ झाला. 11 ते 19 वयोगटातल्या मुलींसाठी हा उपक्रम आहे. यातूनच ‘किशोरी उत्कर्ष मंच’ या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली.


या मंचातंर्गत वयात येणाऱ्या मुलींना डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिलं जातं. मासिक पाळीची शास्त्रीय माहिती, स्वच्छतेची आवश्यकता आणि लैंगिक शिक्षण दिलं जातं. व्यायाम आणि पोषक आहाराचं महत्त्व पटवून दिलं जातं. मुलींच्या घटत्या जन्मदराविषयीचं प्रबोधन करुन मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृतीचे प्रयत्न केले जातात. स्त्रियांना कायद्याने दिलेले हक्क, माणूस म्हणून त्यांचे असणारे हक्क, आरोग्यविषयक हक्क अश्या बाबींवर वेळोवेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं. प्रबोधनासाठी रुढी परंपरा आणि विविध विषयांवर गटचर्चा आयोजित केल्या जातात. निबंध, वक्तृत्त्व आणि वादविवाद स्पर्धाही घेतल्या जातात. माहितीपट, पथनाट्य, गाणी यांच्याद्वारे हा 'किशोरी उत्कर्ष मंच' सामाजिक जागृतीचे कामही करतो आहे.

शारीरिक विकासासाठी खेळ आवश्यक. त्यासाठी व्यायाम महत्त्वाचा. हे जाणून त्यांना ज्युडो- कराटेचं मोफत प्रशिक्षण देण्यात येतं. स्वसंरक्षणासाठी मुलींचा आत्मविश्वास वाढवला जातो. हिमोग्लोबिनची वेळोवेळी चाचणी केली जाते. शिवाय किशोरींसाठी एक हेल्पलाईनही सुरु केली आहे, ज्याद्वारे छेडछाड, लैंगिक छळ अथवा कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार मुली करु शकतात. 180023322688 हा हेल्पलाईन नंबर प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावं, असा आग्रह हा ‘ऊर्जा’ उपक्रम धरतो.
याशिवाय मुलींच्या कलागुणांना वाव मिळेल, अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मुलींना आवर्जून आडनावाऐवजी प्रथम नावानं हाक मारली जाते. आपल्या आयुष्याचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला आहे, याचं भान प्रत्येक मुलीला दिलं जातं. मुलींचा सामूहिक वाढदिवस साजरा होतो, त्यांना वेगवेगळ्या शासकीय संस्थांमध्ये आणि कारखान्यात नेऊन कामकाजाचे प्रत्यक्ष धडे दिले जातात. प्रत्येक शाळेत या ‘ऊर्जा ’ उपक्रमाची समन्वयक म्हणून एका शिक्षिकेची नेमणूक करण्यात आलेली आहे. सध्या जिल्ह्यातील सुमारे 180 शाळांमधील विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी आहेत. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम अतिशय उत्तमरीत्या चालू आहे. उस्मानाबादच्या सीईओ सुमन रावत यांची ठाण्याला बदली झाली तरी नंतर आलेले प्रशासकीय अधिकारी आणि उत्साही मुलींनी हा ‘ऊर्जा’ उपक्रम सुरु ठेवलेला आहे. 
संकलन सहाय्य- रमेश कांबळे, विषयसाधनव्यक्ती आणि शहनाझबानो औसेकर, उस्मानाबाद 
लेखन- स्नेहल बनसोडे- शेलुडकर, 

एकेक स्टिरिओटाईप्स ...

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी: 
मागल्या वेळी समुद्राचीच गोष्ट सांगितलीय तर जड डायपरच्या अनुभवासोबत आठवलेलं असंच काही शेअर करायलाच हवंय.
समुद्रात मस्ती करून आल्यावर आम्ही सगळेच अगदी शिस्तीत किनार्‍यावर बसलो. सूर्य आस्ताला येऊ लागला होता. खारं वारं अंगात किंचित शिरशिरी आणत होतं. दंगामस्ती करताना न जाणवलेली भूक पोटात ढुशा द्यायला लागली होती. बीचवर नेहमी येणारे लोक असतील, नव्यानं येणारे पर्यटक असतील... सगळेच वळूनवळून किंवा थांबून बघत होते. त्यांना कळत नव्हतं की हे चाललंय काय? हे इतके अपंग लोक एकगठ्ठा का जमलेत? - मुळात इतक्या वेगवेगळ्या तर्हेने अपंग असणारी माणसं पाहण्याची बर्‍याच लोकांची ती पहिलीच वेळ असेल.
आम्हा सगळ्यांच्या पोटात भुकेनं जाळ उठला होता... तितक्यात प्रत्येकाच्या हातात गुलाबीसर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर नि शेवेने सजलेली भेळ आली. भारीच! समुद्रात भरपूर खेळल्यामुळं, ओरडाआरड्यामुळं मन तणावरहित होतं. समोर अस्ताच्या सूर्याने माखलेले रंगच रंग आकाशात, समुद्रात. रूचकर भेळ. कोणी नुसतंच शांत बसलं होतं, कुणी गप्पा मारत होतं... इतक्यात एक ज्येष्ठ माणूस धीर करत जवळ आला. त्यातल्या त्यात नसीमादीदी मोठ्या वाटत असल्यामुळं तो त्यांच्याजवळ गेला. जवळ जात म्हणाला, ‘‘इधर कैसे आए?’’ - नसीमादीदी म्हणाल्या, ‘‘बसनं आलो. फिरायला. मुलांना मुंबई दाखवायला.’’ मग पुन्हा क्षणदोन क्षण थांबत, काळजीयुक्त नि सहानुभूतीच्या आवाजानं त्यानं पुढचा प्रश्ना विचारला, ‘‘ये, इतने सारे बच्चोंका ऐसा कैसा हो गया? ये व्हीलचेअर वगैरा....’’
मी दीदींच्या शेजारीच होते. त्यावेळी माझी पहिली प्रतिक्रिया फस्सकन हसण्याचीच होती. आज वाटतं, काय अगाध सामान्यज्ञान नि लॉजिक होतं त्या माणसाचं. असंच लॉजिक लावलेले पुढे कैकजण भेटले. मान्य आहे, की नसीमादीदींच्या शेजारी बारा-पंधरा व्हीलचेअरवाली लहानमोठी मुलं-मुली होती, पण म्हणजे व्हीलचेअर बाऊण्ड व्यक्तीला व्हीलचेअर बाऊण्ड मुलंच होतात हे कसं पोहोचलं नि पक्कं झालं असेल अनेकांच्या मनात? म्हणजे कुठलीही अपंग व्यक्ती असेल आणि तिनं लग्न केलं असेल, तर तिला होणारी मुलं हमखास अपंगच असणार, हे ही पक्कंच असेल बहुतेकांच्या मनात.
मी हॉस्पिटलमध्ये ऍडमीट असताना तीन-चार वेळा असंच काही घडलंय. माझी मदतनीस मंदा ही उंचीनं खूप कमी. ती सोबत थांबायची तेव्हा नर्सिंग स्टाफपैकी कुणी ना कुणी विचारायचं, बहीण काय तुमची? अहो, बहीण मानायला काही हरकत नाहीये. हरकत आहे ती असे सरसकट समज बाळगण्याला!
अनेक ठेंगू असणारे स्त्रीपुरुष किंवा मतिमंदत्वाचे विशिष्ट प्रकार असणारी माणसं चेहरेपट्टीनं एकसारखी दिसतात. ते का, असं समजून सांगणारे नि समजून घेणारे वाढायला पाहिजेत यार... नाही तर फार फार त्रास होतो. त्रास होतो म्हणताना, हे ही मान्य आहे की बरेचदा अज्ञानापोटी, निष्काळजीपणानं प्रतिक्रिया दिल्या जातात. मुद्दामच नाही काही. कारण काहीही असो, मन तयारीचं नसेल तर विचित्र भावना मनात घर करत जाते.
- सोनाली नवांगुळ

दुष्काळग्रस्त मुलांचं 'स्नेहवन'परभणी जिल्हा. मानवत तालुक्यातील मंगरूळ बु.येथील तरुण अशोक देशमाने. घरची परिस्थिती जेमतेम. पाच-सहा एकर शेती. वडील बाबाराव व आई सत्यभामा शेती, शिवणकाम करून घर चालवतात. याच परिस्थितीतून त्यांनी अशोकला अभियांत्रिकीचं शिक्षण दिलं. अशोकला पुण्यात आयटीत सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरीही मिळाली. नोकरी लागून पाच वर्ष होत आली आणि आई-वडिल सुखावले. अशोक सुट्टी मिळेल तसा गावीही येऊ-जाऊ लागला. या काळात गावातलं चित्र मात्र बदलत नव्हतं. २०१३ च्या दिवाळीतही अशोक गावीच होता. दुष्काळाची झळ दिसत होती. अशोक सांगतो,''गावातलं चित्र पाहून उद्विग्न अवस्थेत मी परत पुण्याला आलो आणि नोकरीवर रुजू झालो. मन लागत नव्हतं. या मुलांसाठी काहीतरी करावंसं वाटत होतं. पण, नेमकं काय हे समजत नव्हतं. स्वतःच्या भूतकाळात डोकावलो तेव्हा जाणवलं, की आपली परिस्थिती फक्त शिक्षणाने बदलली. दिशा मिळाली. ठरलं, आपण या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे. त्यांची संपूर्ण जबाबदारी घ्यायची. त्याच काळात प्रकाशभाऊ आमटे यांची भेट झाली, त्यांना मी माझा संकल्प बोलून दाखवला. त्यांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर मी नोकरी सोडून पूर्णवेळ स्नेहवन साठी काम करायचं ठरवलं. भोसरीत माझे कवीमित्र अनिल कोठे राहतात, ते व्यावसायिक आहेत सोबतच सामाजिक कामाची आवड जपतात. त्यांच्याशी बोललो. त्यांनी त्यांचं ५ खोल्यांचं भोसरीतलं घर विनाभाडेतत्वावर वापरायला दिलं, रात्री नोकरी करत मी त्या घराची आणि डागडुगी करून घेतली आणि स्नेहवनची सुरुवात झाली''.
त्यानंतर अशोकनं परभणी, हिंगोली, जालना, बीड, औरंगाबाद आणि वर्धा जिल्ह्यातील १७ मुलांना शिक्षण व संगोपनासाठी पुण्यात आणलं. ''मुलं आली. पण सुरुवातीला खूप अडचणी आल्या. गावात राहणारी मुलं, त्यामुळे मराठी भाषेतही थोडाफार बदल होता, त्यांना शहरी जीवनमान माहिती नव्हते. मग टॉयलेटमध्ये कसं बसायचं, ब्रश कसा करायचा इथंपासून शिकवावं लागलं. तेंव्हा मी नाईट शिफ्ट घेतली. सुरुवातीला ८ महिने असं काम केलं. नंतर नोकरी सोडली. रात्रभर नोकरी करून आल्यानंतर मुलांचे खूप सारे प्रॉब्लेम्स असायचे, कुणी रडायचं, कुणाचा अभ्यास बाकी असायचा, कुणाला घरची आठवण यायची, कुणी भांडण करायचं. दिवसभर झोपही मिळायची नाही. ऑफिसला जाताना प्रवासात २ तास झोपायचो, तेवढंच'', अशोक सांगत होता.
दरम्यान ‘स्नेहवन’ची माहिती अमेरिकेत स्थायिक असलेल्या चेन्नईच्या एका कुटुंबाच्या कानावर गेली. त्यांनी प्रत्यक्ष जाऊन काम बघितलं आणि तीन संगणक, एक लॅपटॉप संस्थेला भेट दिला. मित्रांकडून होणारी मदत आणि पाच वर्षांत नोकरीतून जमवलेले पैसे यातून सध्या संस्थेचं काम सुरू आहे. आता मुलांना तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याचा निर्णयही त्यानं घेतला आहे. आगामी वर्षात ४० मुलांना पालनपोषण व शिक्षणाकरिता दत्तक घ्यायचं असून, त्यासाठी समाजानेही मदतीचा हात पुढं करावा, अशी अपेक्षा अशोक व्यक्त करतो.
 अशोक देशमाने यांचा संपर्क क्र. - 8796400484

- बाळासाहेब काळे, परभणी

Sunday, 18 June 2017

दुष्काळग्रस्त मुलांचं 'स्नेहवन'परभणी जिल्हा. मानवत तालुक्यातील मंगरूळ बु.येथील तरुण अशोक देशमाने. घरची परिस्थिती जेमतेम. पाच-सहा एकर शेती. वडील बाबाराव व आई सत्यभामा शेती, शिवणकाम करून घर चालवतात. याच परिस्थितीतून त्यांनी अशोकला अभियांत्रिकीचं शिक्षण दिलं. अशोकला पुण्यात आयटीत सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरीही मिळाली. नोकरी लागून पाच वर्ष होत आली आणि आई-वडिल सुखावले. अशोक सुट्टी मिळेल तसा गावीही येऊ-जाऊ लागला. या काळात गावातलं चित्र मात्र बदलत नव्हतं. २०१३ च्या दिवाळीतही अशोक गावीच होता. दुष्काळाची झळ दिसत होती. अशोक सांगतो,''गावातलं चित्र पाहून उद्विग्न अवस्थेत मी परत पुण्याला आलो आणि नोकरीवर रुजू झालो. मन लागत नव्हतं. या मुलांसाठी काहीतरी करावंसं वाटत होतं. पण, नेमकं काय हे समजत नव्हतं. स्वतःच्या भूतकाळात डोकावलो तेव्हा जाणवलं, की आपली परिस्थिती फक्त शिक्षणाने बदलली. दिशा मिळाली. ठरलं, आपण या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे. त्यांची संपूर्ण जबाबदारी घ्यायची. त्याच काळात प्रकाशभाऊ आमटे यांची भेट झाली, त्यांना मी माझा संकल्प बोलून दाखवला. त्यांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर मी नोकरी सोडून पूर्णवेळ स्नेहवन साठी काम करायचं ठरवलं. भोसरीत माझे कवीमित्र अनिल कोठे राहतात, ते व्यावसायिक आहेत सोबतच सामाजिक कामाची आवड जपतात. त्यांच्याशी बोललो. त्यांनी त्यांचं ५ खोल्यांचं भोसरीतलं घर विनाभाडेतत्वावर वापरायला दिलं, रात्री नोकरी करत मी त्या घराची आणि डागडुगी करून घेतली आणि स्नेहवनची सुरुवात झाली''.
त्यानंतर अशोकनं परभणी, हिंगोली, जालना, बीड, औरंगाबाद आणि वर्धा जिल्ह्यातील १७ मुलांना शिक्षण व संगोपनासाठी पुण्यात आणलं. ''मुलं आली. पण सुरुवातीला खूप अडचणी आल्या. गावात राहणारी मुलं, त्यामुळे मराठी भाषेतही थोडाफार बदल होता, त्यांना शहरी जीवनमान माहिती नव्हते. मग टॉयलेटमध्ये कसं बसायचं, ब्रश कसा करायचा इथंपासून शिकवावं लागलं. तेंव्हा मी नाईट शिफ्ट घेतली. सुरुवातीला ८ महिने असं काम केलं. नंतर नोकरी सोडली. रात्रभर नोकरी करून आल्यानंतर मुलांचे खूप सारे प्रॉब्लेम्स असायचे, कुणी रडायचं, कुणाचा अभ्यास बाकी असायचा, कुणाला घरची आठवण यायची, कुणी भांडण करायचं. दिवसभर झोपही मिळायची नाही. ऑफिसला जाताना प्रवासात २ तास झोपायचो, तेवढंच'', अशोक सांगत होता.
दरम्यान ‘स्नेहवन’ची माहिती अमेरिकेत स्थायिक असलेल्या चेन्नईच्या एका कुटुंबाच्या कानावर गेली. त्यांनी प्रत्यक्ष जाऊन काम बघितलं आणि तीन संगणक, एक लॅपटॉप संस्थेला भेट दिला. मित्रांकडून होणारी मदत आणि पाच वर्षांत नोकरीतून जमवलेले पैसे यातून सध्या संस्थेचं काम सुरू आहे. आता मुलांना तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याचा निर्णयही त्यानं घेतला आहे. आगामी वर्षात ४० मुलांना पालनपोषण व शिक्षणाकरिता दत्तक घ्यायचं असून, त्यासाठी समाजानेही मदतीचा हात पुढं करावा, अशी अपेक्षा अशोक व्यक्त करतो.
 अशोक देशमाने यांचा संपर्क क्र. - 8796400484

- बाळासाहेब काळे.

आजची पिढी आशादायक वाटते

दुस-याचं मूल पाच मिनिटं घेऊन, कौतुक करून लग्गेच आईवडिलांकडे देता येतं. पण स्वतःच्या मुलाची जबाबदारी घ्यायची वेळ आल्यावर मनावर ताण आला होता. समीरनंतर पाच वर्षांनी परितोषचा जन्म झाला आणि मला माझ्या घरात स्वर्ग अवतरल्यासारखं वाटू लागलं. एका मुलाचं कसं जमेल अशी भीती वाटणारी मी चक्क दोन मुलांची आई बनले होते. ह्या दोघांना वाढवताना, नव्हे त्यांच्यासोबत वाढतानाच्या, पालकत्वाच्या प्रवासात मीही समृद्ध झाले.
‘अभ्यास करा’ म्हणून मुलांच्या मागे लागले नाही, तेही जाणीवपूर्वकच. कारण त्यांनी ‘रॅट रेस’मध्ये सामील व्हावं असं मला वाटत नव्हतं. पाचवी-सहावीत पहिल्या पाचात नंबर आला नाही तर काय मोठंसं आकाश कोसळतं? मी त्यांना यथेच्छ बागडू दिलं, खेळू दिलं. दुपारच्या वेळेस घरात क्रिकेटचा डाव मांडून त्यांनी भिंतीवर छान खड्डा करून ठेवला, मी हौसेनं आणलेल्या काचेच्या फुलदाणीचे पाच मिनिटांतच बॉल मारून तुकडे केले. मी सदैव त्यांच्या जागी लहानपणच्या ‘मला’ पाहिलं. माझी स्टेट बॅंकेत नोकरी असली तरी पतींनी नुकताच सुरू केलेला बिझिनेस होता. कधीकधी तर पैशांची बोंब असायची. तरीही बिनपैशांच्या किंवा कमी पैशांत होतील अशा पुष्कळ गोष्टी मुलांसाठी केल्या. पोहणं, सायकलिंग, क्रिकेट, त्यांना घेऊन जमेल तिथं फिरायला जाणं, लहान मुलांची नाटकं दाखवणं. आम्ही आईबाप म्हणजे दोन मोठी भावंडं आणि आमची दोन मुलं म्हणजे धाकटी भावंडं असंच आमच्या घरातलं वातावरण होतं.

२००७ साली माझ्या पतींचं कर्करोगामुळे निधन झालं. या मोठ्या दुःखाच्या प्रसंगातून आम्ही तिघं एकमेकांच्या साथीनं सावरलो. 
 आज समीर आणि परितोष दोघंही सीए आहेत. समीर सीएचा अभ्यास करतानाच जर्मन भाषा शिकला. जर्मन भाषा त्याची पॅशन असल्यामुळे त्यानं मोठ्या पगाराची नोकरी सोडून ठाणे येथे जर्मन आणि फ्रेंच शिकवणा-या संस्थेत भागीदारी स्वीकारली. हा निर्णय घेताना माझा त्याला पूर्ण पाठींबा होता. मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ द्यावेत. त्यामुळे मुलं अधिक जबाबदार बनतात. मुख्य म्हणजे अमुक करायला मिळालं नाही म्हणून पालकांना दोष देत नाहीत.
मला आजची पिढी आशादायक वाटते. कालचं उगाळत बसू नये, उगाचच १९८२ साली असं होतं आणि तसं होतं असं म्हणत बसू नये. मुलं नवी नवी गाणी इंटरनेटवरून शोधून लावतात. मला ती खूप आवडतात. खरोखरच, तरूणांच्या संगतीत राहायला मिळणं ह्यापरतं स्वतःही मनानं तरूण राहाण्यासाठी दुसरं काय हवं असतं?
प्रवास पालकत्वाचा - सविता दामले, अनुवादक

सर्पमित्र संजय


‘‘एकदा मित्राच्या गावावरून येत होतो. रस्त्याच्या कडेला लोकं जमलेले दिसले. हातात दगड, काठया. ते सगळे एका छोटया बिनविषारी सापाला दगडाने ठेचून मारण्याच्या तयारीत होते. तो बिचारा जिवाच्या आकांताने सरपटत होता. मी पटकन समोर गेलो आणि त्याला उचलून खिशात टाकलं. आणि जंगलात सोडलं’’, नांदेड येथील सर्पमित्र संजय नरसिंग अडगुलवार सांगत होते. हे सांगतानाही त्यांना भरून आलं. ते पुढं म्हणाले, ‘‘माझ्या जीवनातील हा अविस्मरणीय प्रसंग. त्या मुक्या प्राण्याची धडपड, सरपटत, दगड चुकवत पुढं जात राहणं आठवलं की माझा कंठ दाटून येतो. साप दिसला की लोक त्याच्या जीवावर उठतात. त्यांनाही संवेदना असतात. निसर्ग चक्रातील तो महत्त्वाचा घटक’’.
संजय यांना लहानपणापासून मुक्या प्राण्यांचं प्रेम. त्यातूनच त्यांनी सापांना वाचवणं सुरु केलं. घरातून विरोध झाला. नंतर मात्र सापांविषयीचं प्रेम, त्यांना वाचवण्याची तीव्र इच्छा बघून त्यांनी विरोध करणं सोडून दिलं.
नांदेड शहराच्या आसपास वस्तीत निघणार्यां सापाचा जीव वाचवून, वनविभागाच्या मदतीनं जंगलात सोडायचं काम संजय अनेक वर्षापासून करत आहेत. वर्षाकाठी साधारण 400-500 साप ते जंगलात नेऊन सोडतात. नांदेड येथील अबचलनगरात त्यांचं किराणा दुकान आणि घर. 1990 पासून ते सर्पमित्र म्हणून काम करू लागले. मित्रांसह त्यांनी ‘सर्पमित्र सेवा संस्था’ स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत ते सापांविषयीचे समज गैरसमज दूर करण्याचे, निसर्गातील त्यांचे महत्व लोकांना समजावून सांगतात. त्यांना संजना आणि मंथन अशी दोन मुले. मुलगी संजना लहानपणापासून वडिलांनी पकडलेल्या सापांना जंगलात सोडण्यापूर्वी त्यांची काळजी घेण्यात मदत करते.
साप पकडल्यानंतर 24 तासात त्याचे जंगलात पुनर्वसन करणं कायद्याने बंधनकारक आहे. हा नियम ते कटाक्षाने पाळतात. आजपर्यंत पकडलेल्या सापांची नोंदही त्यांनी ठेवली आहे. संजय म्हणतात, ‘‘साप पकडणं जिकिरीचं असतं. सापाच्या विषारी, निमविषारी आणि बिनविषारी जाती आढळतात. बिनविषारी साप चावला तरी तो उंदीर, बेडूक असं खाद्य खात असतो. त्यामुळे त्याच्या तोंडात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यासाठी औषधोपचार हवेतच’’.
या कामासाठी सरकारकडून कुठलीही मदत मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. संजय सांगतात, ‘‘2012 साली नांदेडमधल्या अजयसिंह बिसेन या नगरसेवकाच्या पुढाकाराने साप पकडण्यासाठी अवजारं मिळाली होती. नांदेड मनपाने सर्पमित्र म्हणून ओळखपत्र दिलं होतं. पण मानधन, मदत, विमा मिळत नाही. एका सर्पमित्राला, विषारी साप चावला. अनेक दिवस त्याला दवाखान्यात राहावं लागलं आणि उपचारही बराच काळ चालले. खूप खर्च झाला. मदतही मिळाली नाही. अशी बिकट परिस्थिती आमच्यावर कधीही येऊ शकते’’.
मनपाला मदत मागितली तर ते म्हणतात, तुम्हाला साप पकडायला आम्ही सांगितलं का? घरात साप निघाला की ते लोक संजय यांना बोलावतात. संजय म्हणतात, ‘‘आम्ही लोकांकडून मानधन, फी घेतली तर ते आम्हाला बोलावणार नाहीत. आणि सापाला मारून टाकतील. तेच नको आहे. ते पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यांना वाचवणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तीच जबाबदारी मी घेतली आहे’’.
सर्पमित्र संजय अडगुलवार संपर्क क्र. - 9763123485


- उन्मेष गौरकर.

पक्ष्यांची शाळा

आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ही खास पोस्ट.
उन्हाळ्याच्या दिवसांत पक्ष्यांचं स्थलांतर घडतं ते पाण्याच्या शोधात. नाशिक इथं नदीकाठी येणाऱ्या पक्ष्यांना पाहून ‘नेचर क्लब’च्या आनंद बोरा यांना पक्ष्यांच्या शाळेची कल्पना सुचली. माणसाचा फारसा वावर नसलेल्या जागा आणि पाणवठा बघूनच त्यांनी जागा निवडल्या. ही शाळा बच्चे कंपनीच्या उन्हाळी सुट्टीत भरते आणि पहिल्या पावसाच्या हजेरीने संपते. 
‘पक्ष्यांच्या शाळेचं’ हे तिसरं वर्ष. पक्ष्यांना दाणा पाणी मिळावं, विद्यार्थ्यांना पक्ष्यांची ओळख व्हावी, पक्षी संवर्धनासाठी काय करता येईल याचा अभ्यास यातून केला जातो.


अंबड येथील कर्णबधीर मुलांच्या शाळेत पहिल्यांदा या शाळेची बेल वाजली. यावर्षी संत गाडगे महाराज धर्मशाळेत हे वर्ग भरले आहेत. संस्थेचे कार्यकर्ते तीन महिन्यापासून शाळेच्या उभारणीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत तीस जातीच्या शेकडो पक्ष्यांचा किलबिलाट मुलांनी ऐकला आहे. ‘टाकाऊ तून टिकाऊ’ हे शाळेचं वैशिष्टय. त्यामुळे प्लास्टिक बाटल्यातून पाणी आणि खाद्य ठेवण्यासाठी उपकरणे संस्थेने तयार केली. योगेश कापसे, संपदा पाटील यांनी बाटल्या उपलब्ध करून दिल्या. खराब टायरपासून तळी बनविण्यात आली. नारळाच्या करवंटीचा उपयोग खाद्य देण्यासाठी झाला. तेलाच्या कॅनपासून फूडर तयार झाले. तसेच लाकडाची दहा घरटी देखील लावण्यात आली. 


या परिसरात बगळे, नाईट हेरॉन, कावळे, वटवाघळे, पान कावळे आदींच्या कॉलनी आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास यावेळी करण्यात आला. याशिवाय या पक्ष्याच्या लकबीचा अभ्यासही केला गेला. बोरा पक्षिमित्र. त्यामुळे पक्ष्यांच्या लकबी, सवयी याचा त्यांचा अभ्यासही दांडगा आहे. ते सांगत होते, “निरीक्षण करताना जाणवलं की पक्ष्यांनी प्लास्टिक, तारा वापरूनही घरटी बांधली आहेत. एकाच झाडावर पाच जातीचे पक्षी घरटी करतांना दिसून आले. तसंच देशी वृक्षावरच घरटी आढळून आली. जखमी पक्ष्यांवर उपचार करताना त्यांना नावं दिली होती”. प्रेम दिल्यावर प्रेम मिळतं याची अनुभूती आल्याचं बोरा म्हणाले. एरवी कावळा आणि बगळे यांची दुष्मनी बघतांना धमाल येत होती. पण, ‘छकुला बगळा’ आणि ‘काळू पान कावळा’ यांची चक्क मैत्री या शाळेत झाल्याचं त्यांनी सांगितलं.
पक्ष्यांचे काही किस्से तर बोरा सरांकडूनच ऐकण्यासारखे. ते सांगत होते, “तळ्याजवळ फरसाणमधील भावनगरी गाठी टाकल्यावर चिमण्याची गर्दी व्हायची. पण त्यातूनही ‘पिंकी’ नावाची एक साळुंकी चिमण्यांवर हुकुमत गाजवायची. ‘रामू’ खंड्या चक्क इतर पक्ष्यांनी आणलेल्या माश्यांवर ताव मारायचा. कावळ्यांच्या घरट्याजवळ कोकिळेची दादागिरी बघावयास मिळत होती. कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. स्वतः घरटी बांधत नाही त्यामुळे त्यांची पळापळ बघावयास मजा येत असे”.
सध्या शाळेत चिमण्या, बुलबुल, सनबर्ड, स्विफ्ट, हेरॉन, नाईट हेरॉन, साळुंक्या, दयाळ, शिंपी, धोबी, कावळे, भारद्वाज, कोकिळा, तांबट अशा अनेक पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. बऱ्याच पक्ष्यांना बाजरी, मका, ज्वारी तर काहींना अगदी फरसाणही आवडतो. सर्वांच्या मधल्या सुट्टीची वेळ वेगवेगळी. पण डबा खाण्याचा दंगा सारखाच असतो. शाळेत जाणाऱ्या मुलांसारखं इथंही एकमेकांच्या डब्यातील खाऊ पळविण्याची स्पर्धा सुरू राहते. 
शाळेच्या आवारात पक्ष्यांची सुंदर चित्रेदेखील साकारली आहे. पक्ष्यांची ही शाळा आज (पाच जून) जागतिक पर्यावरण दिनाला सर्वांसाठी खुली होणार आहे. यावेळी नागरिकांना टाकाऊतून टिकाऊ फुडर कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. शाळा चालविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा आनंद बोरा, भीमराव राजोळे, अप्पा कोरडे, सागर बनकर, आकाश जाधव, आशिष बनकर, धनंजय बागड, कुणाल देशमुख असे सगळे कार्यकर्ते एकत्र येतात.
- प्राची उन्मेष, नाशिक

'नकोशी' झाली हवीहवीशी!

एकेकाळी महाराष्ट्रात मुलांची नावं दगडू, कचरु अशी ठेवायची प्रथा होती. असं नाव ठेवल्यानं मुलं जगतात, अशी त्यामागची अंधश्रद्धा. अगदी 2011 पर्यंत सातारा जिल्ह्यातही दोन मुलींपाठोपाठ तिसरीही मुलगीच जन्माला आली तर तिचं नाव 'नकुशी' ठेवण्याची प्रथा होती, त्यानंतर मुलगा होतो ही भीषण अंधश्रद्धा!! मात्र 2011 मध्ये सातारा जिल्हा प्रशासनाच्या मदतीने साताऱ्यातील 265 चिमुरड्यांचे हे अवमानकारक नाव बदलण्यात आले. एका चिमुरडीचे आयुष्यही काही महिन्यांपूर्वी असेच बदलले. तिच्यावरचा 'नकुसा'चा शिक्का पुसला गेला आणि तिला नवं नाव मिळालं- सोनल. ही सत्यकथा आहे रत्नागिरी जि.प. शाळा नाचणे क्रमांक 1 मध्ये शिकणाऱ्या सोनलची. मोलमजुरी करणाऱ्या आईबापांचे सोनल हे चौथे अपत्य. त्यात तिच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या दोन बहिणी लहानवयातच अकाली गेल्या. सलग चौथी मुलगी झाल्याने समाजापुढे झुकत पालकांनी नाव ठेवले- नकुसा.

खरंतर आपली सोनल समंजस आणि हुशार आहे. दुसरीत शिकणाऱ्या सोनलला 'नकुसा' या नावाचा अर्थही उमगणे शक्य नाही. पण तिचं नाव 'नकुसा' असणं हा तिच्यावरचा अन्याय तर आहेच, शिवाय यामुळे एक अतिशय चुकीचं उदाहरण समाजासमोर ठेवलं जातंय, याची जाणीव एका अधिकाऱ्याला झाली आणि मग तिचं नाव बदललं. ते अधिकारी आहेत- रत्नागिरी जिल्हा शिक्षण आणि सातत्यपूर्ण विकास संस्थेचे प्राचार्य- डॉ. आय.सी.शेख.
'एक दिवस शाळेसाठी' या उपक्रमातंर्गत डॉ. शेख नाचणेच्या शाळेत आले होते. छोट्या मुलांसोबत गप्पा मारण्यात रमून गेले असताना त्यांनी सोनलला तिचं नाव काय हा प्रश्न विचारला आणि उत्तर आलं- नकुसा! तिचं उत्तर ऐकून डॉ. शेख क्षणभर थबकले, पण त्यांनी मुलांशी आणखी थोड्या गप्पा मारल्या. मग मात्र त्यांनी शिक्षकांकडे या नावाविषयी चौकशी केली आणि 'नकुसा' या नावामागची कहाणी जाणून घेतली. तिच्या पालकांशी बोलून हे अन्यायकारक नाव बदलण्याचा सरांनी निर्णय घेतला. सोनलच्या पालकांना शाळेत बोलावण्यात आलं. शेख सरांनी त्यांची भेट घेतली. आपण अगदी आपल्या आईबापांनाही नकोसे झालेले आहोत, असे सुचवणारे हे 'नकुसा' नाव किती अन्यायकारक आहे, ते त्यांनी पालकांना समजावले. त्यापेक्षा तिचं चांगलं नाव ठेवलं तर ते नाव तिला भविष्यात आत्मविश्वास देईल आणि आईबापांच्या प्रेमाचीही जाणीव करुन देईल, हेही सांगितले.
आनंदाची गोष्ट म्हणजे तिच्या आईवडिलांनीही या प्रस्तावाला विरोध केला नाही. उलट समाजाच्या दबावाला बळी पडत, लेकराच्या मनाचा विचार न करता चुकीचं नाव ठेवल्याचा पश्चाताप व्यक्त केला. आणि मग डॉ. शेख सरांच्या उपस्थितीत त्यांच्याच मांडीवर बसून 'नकुसा'चे नामकरण झालं - सोनल शिंदे. मित्र-मैत्रिणींच्या टाळ्यांनी आणि पालकांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी प्रसंगाची शोभा वाढवली. या लेखाच्या लेखिका अश्विनी काणे यांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सरकारी गॅझेटमध्ये सोनल शिंदे हेच नाव कायदेशीररीत्या बदलून घेतले आहे.

सुजाण शिक्षक, जाणत्या शाळा : 'नकोशी' झाली हवीहवीशी!
लेखन- अश्विनी काणे, विषयतज्ज्ञ आणि साधनव्यक्ती, रत्नागिरी

तनया

॥छोट्यांची गॅलरी॥
२२ एप्रिल २००३ - ‘ही जास्तीत जास्त आठ-दहा दिवस जगेल’, तनयाचा जन्म झाल्यावर डॉक्टर म्हणाले होते. तनया जन्मतःच अपंग होती. तिचा जबडा, मान, खांदे, कोपर, मनगट, गुडघे, कंबर, बोटे, शरीरातील ८० टक्के सांधे जखडलेले होते. पाठीचा कणा वाकलेला होता. मग दररोज सकाळी तिनं डोळे उघडले की तो दिवस तिचा शेवटचा दिवस समजून हेमांगी आणि जयंत जोपळे तिला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. दर महिन्याला तिचा वाढदिवस साजरा करू लागले. एक वर्ष उलटलं. आता तनयाला बोललेलं समजू लागलं, पण तोंडाची हालचाल करता येत नसे. मात्र हळूहळू तिला बोलणंदेखील जमू लागलं.
अडीच वर्षांची असताना ती कम्प्युटर चालवू लागली. कम्प्युटर, इंटरनेटवर ऑनलाइन व्हिडिओ, कार्टून पाहणे, गेम खेळणे या तिच्या अत्यंत आवडीच्या गोष्टी. 'फार्मविले'सारखे ऑनलाइन गेम खेळता यावेत म्हणून हट्ट करून तिनं स्वत:चं प्रोफाइलही काढून मागितलं.
चार वर्षांची झाल्यावर तिला प्रीस्कूलमध्ये घातलं. तिथे कमी बोलत असे, पण वर्गात बोललेलं तिच्या पूर्ण लक्षात राहात असे. तिची स्मरणशक्ती दांडगी होती. शाळेतल्या सर्व मुलांची नावं-आडनावं तिला पाठ होती. सात वर्षं पूर्ण झाल्यावर तिला प्राथमिक शाळेत घालण्याचं ठरवलं. अपंग असल्यामुळे जवळपासच्या शाळा प्रवेश देण्यास टाळाटाळ करत होत्या. अखेरीस कोठारी कन्या शाळा, जेलरोड नाशिकरोड येथे तिला पहिल्या इयत्तेत प्रवेश मिळाला. तिची अभ्यासातली प्रगती पाहून पंधराच दिवसांत त्यांनी तिला दुसर्‍या इयत्तेत बसवलं. जास्त वेळ बसल्यानं तिची पाठ-कंबर दुखत असल्यानं तिला मधल्या सुट्टीत दहा वाजता घरी आणावं लागत असे. तरीही तिनं पहिला नंबर कधी सोडला नाही.
दोन्ही हातांची बोटे वाकडी असल्याने तिला जास्त लिहिता येत नसे, पण ती चित्रं मात्र सुंदर काढत असे. 'दैनिक सकाळ' बालचित्रकला स्पर्धेत तिनं सर्वसामान्य गटात उत्तेजनार्थ परितोषिकही पटकावलं होतं.

बरोबरीची चुलत-मावस भावंडं, शाळेतली मुलं बाहेर मैदानात खेळत असताना ती स्वतःला रंग, रेषा, कागद, कातरी, हस्तकला वगैरेंच्या दुनियेत गुंतवून घेत असे. अनेकदा ती तिच्या चित्रांत एकच मुलगा किंवा मुलगी काढत असे. 'आणखी मुलं- मुली का काढत नाहीस?' असं विचारल्यावर म्हणायची, 'सगळे माझ्यासोबत थोडाच वेळ खेळतात, मग घराबाहेर खेळायला निघून जातात अन् मी एकटीच असते. मग मी एकटीचंच चित्र काढते.'
बदलत्या हवामानात तिची आधीच नाजूक असलेली प्रकृती आणखीच बिघडत असे. इयत्ता चौथीत असताना साधं सर्दी-पडश्याचं निमित्त झालं. केवळ दोन दिवसांच्या आजारपणात, हसत-खेळत असतानाच, अचानक प्रकृती खालावून तनयानं १० सप्टेंबर २०१२ रोजी जगाचा निरोप घेतला.
आज तनया नाही, पण तिनं काढलेली, तिच्या आईबाबांनी जतन करून ठेवलेली, चित्रं मात्र आहेत.
तनया(भूमी) जयंत जोपळे

अशीच ... चक्कर

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी: 
किती बरं वर्षांनी गावातून अशी मोकळेपणानं चक्कर मारली? १०? १५?
अशा मोजण्याला खरंच काही अर्थ नाही. मोकळेपणानं चक्कर मारली हे महत्त्वाचंय. मला त्यात खूप खुलं नि स्वत:बद्दल मस्त वाटलं हे महत्त्वाचंय. कुणी काय म्हणेल याचा विचार करत मी स्वत:चा मोकळेपणा घालवण्याची काहीच गरज नव्हती, खरं तर.
जाऊदे. वाया गेलेली वर्ष अक्कलखाती!
शिराळ्याला, तीन नंबर शाळेत जायचे. तेव्हा अपघात झाला नि चालता येणं बंद झालं. त्याबरोबर आणखीही काय काय झालं. त्या सगळ्या गप्पा मूड लागेल तशा मारत जाईन. पण तेव्हापासून, गावात जावं लागलंच काही कारणानं, तर कुणीतरी उचलून सायकलवर किंवा दुचाकीवर बसवायचं नि मग कुठं उतरायचं असेल तर पुन्हा कुणीतरी उचलायचंच. तेव्हा आजूबाजूला जे असतील ते बघायचे. मला कसंतरी व्हायचं. मग खूप वर्षांनी, स्वत:चं काही करता येईल का हे बघण्यासाठी गावाबाहेर पडले. व्हीलचेअर वापरायला सुरुवात केली. तेव्हा प्रथमच कोल्हापुरात गणेशोत्सवाचे देखावे पाहत हिंडले. माझ्याबरोबर त्यावेळी तसेच व्हीलचेअरवाले, कुबडी किंवा वॉकर वापरणारे असेही काही होते. लोक कुतूहलानं बघत होते. आणखी कुठल्या नजरेनं पाहत असतील, तर ते बघायला वेळच नव्हता. कारण पहिल्यांदाच गर्दीबिर्दीत शिरून - देखावे बघा नि प्रसाद घ्या - वगैरेत मी रमून गेले होते.
 मग नंतर कामासाठी खूप शहरं हिंडले. सगळं इतकं अंगवळणी पडत गेलं की आपण चलनवलनासाठी काही वेगळं साधन वापरतोय याचा आठव यायचा नाही.... किंवा असंही की ते साधन, म्हणजे व्हीलचेअर इतकी मनापासून आपलीशी झाली होती की इतरांच्या नजरेत काही दिसलं तरी त्यांच्या प्रश्नांेना बरेचदा खेळकरपणे... गंभीरपणेही उत्तरं देता यायला लागली.
तरी, बरंका, तरीही... मी जिथं खूप वर्ष राहिले नि माझं घरी बसून असणं ज्या गल्लीवाल्यांनी नि गाववाल्यांनी खूप वर्ष पाहिलं तिथं घ्या चेअर नि फिरा असं मी केलेलं नव्हतं. मी माझ्या जोडलेल्या माणसांबरोबर त्यांच्या कारमधून जायचे नि गाडी कोपर्यािला लावल्यावर घराजवळ नेणारी एक चिंचोळी गल्ली तेवढी व्हीलचेअरवरून पार करायचे.
त्या खेपेस मात्र ठरवलं की गावात फिरून माझी गल्ली, शाळेचा परिसर, नागपंचमीच्या वेळेस जायचो, तो अंबाबाई देवळाचा परिसर असा सगळा व्हीलचेअरवरुन चालत पार करायचा. मित्र राहूल नि माझा मानसबाप उदय बरोबर होता. घराच्या मागच्या दारानं बाहेर पडल्यावर पहिल्यांदा स्वागत केलं डवरीणबाईंनी. त्यांनी मला पाहिलं नि ‘ए सोनालीऽऽऽ’ अशी सणसणीत आरोळी ठोकली. टिपिकल हिरवी नऊवारी साडी नेसणार्याा नि ठसठशीत कुंकू लावणार्याल डवरीणबाई रोज ओढ्याला म्हशी घेऊन जायच्या, तेव्हा मला अशीच हाक मारायच्या. माझ्या घरी एकटी असतानाच्या काळात विशिष्ट वेळेची सोबत करायच्या. मधे खूप काळ गेला होता. वयाच्या खुणा उमटल्या होत्या त्यांच्या देहावर. पण मला पाहताना त्यांना झालेला आनंद तोच जुना पण आणि ताजादेखील! लगबग करत आल्या नि गळ्यात पडल्या. त्यांचे खरखरीत हात गालावरून, गालावरूनच काय, माझ्या अख्ख्या अंगावरून फिरवत म्हणाल्या, चांगली दिसतीस गं बाई. कवा आलीस? इलुसा चा करते, चल आत. किती दिवस लावलेस गं यायला? - डवरीणबाईं कडाकडा बोटं मोडत माझी माया करत राहिल्या.
का लावले मी इतके दिवस मोकळेपणानं फिरायला?
- सोनाली नवांगुळ

विद्यार्थ्यांसोबतचा पालकत्वाचा दीर्घ प्रवास

“त्यावेळी मुंबईत फेरीवाल्यांना हटवण्याचा विषय सुरु होता.वर्गात आमची त्यावर हिरीरीने चर्चा सुरु होती. फेरीवाल्याचं कसं रॅकेट असत, त्यांना हटवलंच पाहिजे वगैरे. मुलं बोलत होती. एक मुलगा मात्र एकदम गप्प होता. त्याला बोलतं केलं, तेव्हा कळलं की, तो स्वतः फेरीवाला आहे. रात्री तो अंड्यांची गाडी लावायचा. आपल्या वर्गमित्राचं वास्तव ऎकून वर्ग स्तब्ध झाला. त्याच्याकडून आम्हाला बऱ्याच गोष्टी उमजल्या. मुलांचं या प्रश्नावरचं मत बदललं. असं विविध समाजघटकांचं भान विद्यार्थांकडून मिळालं”, अरूणा मॅडम सांगत होत्या. 
अध्यापन क्षेत्रात ४० वर्ष कार्यरत राहून मुंबई विद्यापीठातून अलीकडेच निवृत्त झालेल्या राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका अरुणा पेंडसे यांचा विद्यार्थ्यांसोबतचा पालकत्वाचा दीर्घ प्रवास जाणून घेतला.
कॉलेजचे दिवस भविष्याला दिशा देण्याचे, निर्णय घेण्याचे. घराबाहेरच्या जगाचं आकर्षण वाटू लागण्याचे. कॉलेजमधल्या प्राध्यापकांचा कमी-अधिक प्रभाव या काळात प्रत्येकावर असतो. प्राध्यापकाच्या नजरेतून कसं असतं हे नातं? विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत ते कोणती भूमिका बजावतात? 

"मी एम ए झाले, तेव्हापासूनच माझा हा प्रवास सुरू झाला. तेव्हा मी आणि माझे विद्यार्थी यांच्यात वयाचं अंतर कमी असल्यामुळे नातं पालकत्वापेक्षा मैत्रीचं होतं. हळूहळू ते पालकत्वाकडे झुकू लागलं”, अरुणा पेंडसे म्हणाल्या. दादरमधल्या कीर्ती महाविद्यालयातल्या 20 वर्षांच्या अध्यापन कारकिर्दीत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलं. त्या सांगतात, “तेव्हा कीर्तीमध्ये येणारी अनेक मुलं विशिष्ट पक्षाशी, विचारसरणीशी जोडलेली असायची. त्यावेळी वर्गात चर्चेदरम्यान मी काही टीकात्मक भाष्य केलं, तर मुलांना आश्चर्य वाटायचं. तुम्ही टीका कशी काय करता, असं विचारायची मुलं. राजकारणाकडे त्रयस्थपणे पाहता येतं, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याचा माझा प्रयत्न असायचा. त्यामुळे अनेक मुलं स्वतःची भूमिका तपासून वेगळा विचार करूही लागली."

करियर,लग्न, मैत्री, प्रेमभंग यावरही मुलं बोलतात. अडचणीच्या काळात विद्यार्थी प्राध्यापकांकडेच विश्वासाने येतात. शिक्षक आपल्या प्रश्नाकडे तटस्थपणे पाहू शकतात असे मुलांना वाटतं. पालकांकडून एखाद्या बाबतीत मदत होणार नाही, असं जाणवतं, तेव्हा ती शिक्षकांकडे येतात - अरुणा मॅडम सांगतात. लैंगिक शोषणासारख्या बाबतीत आज मुली आईवडिलांकडे बोलतात पण त्या विरोधात काय पावले उचलायची, याबाबत मार्गदर्शन हवं असतं. शिक्षकांचा त्यांना आधार वाटतो. मुलांच्या वैयक्तिक आयुष्यात आपणहून डोकावू नये. पण जेव्हा विद्यार्थी या संदर्भात मदत मागतात, तेव्हा केलीच पाहिजे, असं अरुणा मॅडमचं मत आहे. अनेक मुलामुलींना त्यांनी आंतरप्रांतीय, आंतरजातीय लग्न करण्यासाठी हिम्मत दिली आहे. आज ही सगळी मुलं सुखात नांदत असल्याचं त्या आनंदाने सांगतात. 
एक आठवण त्यांनी सांगितली, ''वर्गात एक चुणचुणीत उत्तर भारतीय मुलगी होती. एक दिवस, तिने तिचा बालविवाह झाला असल्याचं, नवरा तिला नांदवायला घेऊन जाणार असल्याचं सांगितलं. तिला ते नको होतं. तिला पुढे शिकायचं होतं. मग पोलिसांकडे जाऊन, थोडं ओळखीतून, जरब दाखवून ते लग्न रद्द केलं. त्या मुलीला संकटातून बाहेर काढता आल्याचं समाधान वाटलं.”
विद्यार्थ्यांकडूनही भरपूर काही शिकायला मिळालं असल्याचं अरुणा मॅडम सांगतात, ''आपण जे आयुष्य जगत असतो, त्याच्या पलीकडचं जग कितीतरी मोठं आहे, हेही जाणवतं. “एक मुलगा नेहमीच खूप उशिरा यायचा. एकदा त्याला त्याबद्दल विचारलं, तर त्याने झोप नीट होत नाही सांगितलं. त्याच्याशी बोलल्यावर कळलं की, तो रात्री कचरागाडीवर कामाला जायचा आणि पहाटे तीनला घरी पोचायचा. मग झोप कशी मिळणार? त्याच्या जिद्दीचं खूप कौतुक वाटलं मला.” अशी अनेक मुलं जिद्दीनं, कष्टानं शिकत आहेत. आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना शिकता येईल असं वातावरण, सुविधा मिळवून दिल्या पाहिजेत असं अरूणा पेंडसे म्हणतात. 
प्रवास पालकत्वाचा: प्रा. अरूणा पेंडसे
शब्दांकन: सोनाली काकडे 

फरक पडायला लागला..

.

"कुणी दारात बी उभं नाय करत हो, आमच्या पोरायला... निस्ते हिंडत असतेत गावभर" असं म्हणणारे बाबा काल सांगत होते, "आता अंघोळ करतेत, तुम्ही केस कापिल्यापासून नीट भांग पाडितेत पोरं... फरक पडायला लागलाय...!" 
 जालना जिल्ह्यातील अंबड इथंल्या 'हसरी खेळती आनंददायी शाळे'त जाणाऱ्या मुलांचे पालक सांगत होते. भंगार गोळा करणारे हात आता clap clap म्हणतात, भीक मागणारी झोळी आता वह्या पुस्तकांनी भरलीय, कुणी गाण्याच्या चालीवर हात वर करून नाचतंय, May I come, sit down, stand up हे संकेतही समजू लागलेत या चिमुकल्याना शाळेमुळे.
हातावर पोट भरणारे वैफु, फुलवारी, गोसावी, रायरंड जमातीचे लोक म्हणजे या मुलांचे पालक. भटकी जमात. त्यामुळे मुलांवर लक्ष देण्यासाठी वेळच नाही. शाळा, शिक्षण नाही. त्यामुळे मुलांचं भविष्य अंधकारमय. हे टिपलं 'समाजभान'च्या दादासाहेब थेटे आणि त्यांच्या मित्रांनी. मागच्या दिवाळीतच त्यांनी पालावरच्या या भटक्यांसाठी 'एक दिवा पेटवूया, चला दिवाळी साजरी करूया' हा उपक्रम आयोजित केला होता. त्यावेळी जाणवलं की, या वंचित लोकांच्या आयुष्यात आलेल्या अंधकारामागे त्यांचं अज्ञान आणि निरक्षरता आहे. म्हणून त्या पालांचा सर्वे करण्यात आला. लोकांना शिक्षणाचं महत्व पटवून मुलांच्या शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यात आलं. त्यांची मानसिकता तयार झाल्यानंतर पाचोड रोडवर त्यांच्या झोपड्यांच्याा परिसरातच 'हसरी खेळती आनंददायी शाळा' सुरु करण्याचा निर्णय 'समाजभान टीम'कडून घेण्यात आला. समविचारी एक झाले. त्यामुळे आर्थिक गणित जुळलं. आणि वंचितांची हसरी शाळा सुरु झाली.
शाळा तर सुरू झाली. पण शिक्षकांचं काय? परिसरातलं वातवरण पाहून बऱ्याच शिक्षकांनी तिथे येण्यास नकार दिला. पुढे सारिका गिरी आणि मंजुषा एडके या तयार झाल्या.14 एप्रिल 2017 रोजी शाळेचा मुहूर्त झाला. तेव्हापासून नियमितपणे सकाळी 8:30 ते 10 या वेळेत वस्तीत शाळा भरू लागली. परिसरात एकूण 100 ते 150 मुलं. पैकी 42 मुलं आज शाळेत येऊ लागली आहेत. सुरुवातीला वाढलेले केस घेऊन मुलं आहे तशी शाळेत येत. वेशभूषेपासून त्यांच्यात संस्कार हवेत, म्हणून पहिली पायरी केस व्यवस्थित कापण्याची झाली. आणि मग पुढे चालू झाला आनंदमय शाळेचा प्रवास...!!
'समाजभान टीम'मध्ये सहकार्य करणारे निलेश लोहिया, संतोष वरकड, गितराम मते, प्रकाश शेळके, विजय शेळके, रामेश्वर खापरे, सनी खरात, संतोष मकासरे, हनुमान कवडे, नितीन गिल्डा, तुकाराम जमदारे, अनिल खडके, दत्ता शिनगारे, सतीश शिनगारे, राहुल खरात, संतोष जिगे असे अनेकजण सहकार्य करत आहेत.
‘हसरी खेळती आनंददायी शाळा’ या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करायला आजच्या घडीला बऱ्याच अंशी यशस्वी झालीय. एरवी उन्हाळी सुट्ट्या ही संकल्पनाच माहित नसलेली मुलं सध्या १५ जूनची वाट पाहताहेत. खऱ्याखुऱ्या शाळेच्या विश्वात प्रवेश करायला...
दादासाहे थेटे यांचा संपर्क क्र. - 9764042323

- अनंत साळी.

इवल्याशा हातातून उतरली वारली चित्रे "आई, सकाळी लवकर उठव हं", 10 वर्षाच्या मुलाने मला बजावले. "आई , मी पण येणार भिंत रंगवायला", 4 वर्षाच्या चिमुरड्याचा उत्साह उतू जात होता. यावर्षीच्या उन्हाळी सुट्टीत 'गुणप्रज्ञा' (गोरेगांव, मुंबई) सोसायटीच्या भिंतीवर 'स्वरगंध कलामंच' च्या सदस्यांनी वारली पेटिंग केले. स्वरगंध कलामंचाच्या प्रकाश देसाई, शशांक कामत, समता महाजन, पंडित गिरीश छत्रे आणि गौरी परूळेकर यांची ही कल्पना. 
यासाठी अगदी तीन ते १५ वयोगटातील मुलांनी हजेरी लावली. सतत तीन दिवस, तीन तासात मुलांनी ५०० स्क्वेअर फुटांची भिंत रंगवली.
वारली चित्रकला शिकायला मिळाली म्हणून भार्गव आणि किमया खुश होते. तर, सुदीक्षानं सांगितलं की, आम्हाला अशी संधी पहिल्यांदाच मिळाली. भिंत रंगवणे हे एक कठीण काम आहे असं वाटत होतं. पण नंतर पेंट ब्रश कधीच खाली न ठेवता रंगकाम करत राहावं असं वाटू लागलं.
 '' 'परिसर स्वच्छ ठेवा', 'कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा', 'पाण्याचे नियोजन करा व पाणी वाचवा', 'झाडे लावा', 'पर्यावरणाचे संगोपन करा' हे संदेश सुबकतेने पोहोचवण्यासाठी वारली चित्रकला प्रभावी वाटली आणि आम्ही ती एन्जॉय केली" कॉलेजला जाणारी राधा बारिक स्ट्रोक्स् देताना सांगत होती.
संपर्क : प्रकाश देसाई - अध्यक्ष – 9967598961 / समता महाजन - प्रमुख कार्यवाह - 9819720037

संघर्षातून उभी राहिलेली तिरवंजे शाळा


या कथेच्या नायिका आहेत, शाळेच्या मुख्याध्यापिका अलका ठाकरे मॅडम. 2012 साली मॅडमची एका शाळेत नियुक्ती झाली. मॅडम शाळा शोधत गावात पोहोचल्या. चंद्रपुरात भद्रावती तालुक्यातलं, पायथ्याशी कोळशाच्या खाणी असणारं हे गाव - तिरवंजे.
मॅडमने इथे येऊन पाहिलं. मुलं दोन कोंदट खोल्यात आणि मंदिराच्या किचन शेडमध्ये कशीबशी शिकत होती. त्यांना कळलं, की शाळेला चार खोल्यांच्या बांधकामासाठी 'सर्व शिक्षा योजने'तून 11 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. हेही कळलं की तिरवंजे गावाजवळच 'वेस्टर्न कोलफिल्ड'च्या मालकीच्या कोळसा खाणी आहेत. याच डब्ल्यूसीएल कंपनीने गावातील बहुतांश मोकळ्या जागा विकत घेतल्या आहेत.
एकीकडे कंपनीने पार्किंगसाठी विकत घेतलेली जागा वापराविना पडून आणि दुसरीकडे मुलं कोंदट जागेत बसून. मग याच पडीक जागेत शाळा उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. एका शिक्षकाने बांधकामात पुढाकार घेतला. इमारत अर्धवट असतानाच कोणीतरी डब्ल्यूसीएलकडे कागाळी केली आणि कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल करुन बांधकाम थांबवलं. विनापरवाना बांधकाम केल्याने त्या शिक्षकाने वरिष्ठांची बोलणी खाल्ली. पैसा आणि जागा असूनही विद्यार्थी मात्र कोंदट जागेतच राहिले!
या गावातील मुलांचं भविष्य उजळायचं, तर शिक्षणाला पर्याय नाही, हे ठाकरे मॅडम जाणून होत्या. शिक्षणाचं हेच महत्त्व त्यांनी गावातल्या महिलांनाही समजावलं. अशा कोंदट जागेत बसून मुलांचा अभ्यास होणार तरी कसा? आपल्याला सरकारकडून शाळेच्या इमारतीसाठी अनुदान मिळालं आहे, आपण बांधकाम पूर्णत्वाला नेऊया. त्यासाठी आपल्याला सरकारशी आणि कंपनीशी वाटाघाटी कराव्या लागतील. मॅडमच्या आवाहनाने गावात चांगलीच वातावरणनिर्मिती झाली.
मॅडम आणि गावकरी कायदेशीर मार्गाने ती जागा शाळेला कशी मिळविता येईल, हा प्रयत्न करु लागले, पण दाद मिळेना. आपल्याच गावाची जागा आणि कामगार वापरणारी ही कंपनी, गावात साधी शाळा उभारु देत नाही, म्हणजे काय? - अशी लोकभावना तयार झाली आणि महिलांनी कंपनीच्या गाड्यांचा 'रास्ता रोको' केला. प्रशासन नमलं, तीन महिन्यांची मुदत त्यांनी मागितली. या कालावधीत शाळेला नवं बांधकाम करता येणार नव्हतं. पण त्यानंतर कंपनीकडून संवाद न झाल्यास ती जागा शाळेचीच होणार, असा ठराव झाला.
तीन महिने उलटले. डब्ल्यूसीएलकडून कसलीच हालचाल न झाल्याने जागा शाळेला मिळाली. एका बलाढ्य कंपनीविरोधातील लढाई शाळेनं जिंकली. आता उर्वरित बांधकाम पूर्ण करायचं होतं. दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेला निधी नव्या बांधकामाला पुरणार नव्हता. म्हणून मॅडमनी स्वत:च निधी उभारायचं ठरवलं, सर्वात आधी 10 हजार रुपयांची देणगी स्वतः देत! ते पाहून शाळेचा इतर स्टाफ, ग्रामस्थ महिलांनीही 200-300 रुपये देऊ केले.
पैसे जमा झाले. पण आंदोलन करणार्याॅ, त्यामुळे एफआयआर दाखल झालेल्या शाळेचं हे 'भानगडीचं काम' करायला कोणीच ठेकेदार तयार होईना. कसाबसा एकजण 10 लाखांत काम करायला तयार झाला, पण गावातले राजकारणी त्यालाही 'तुझे पैसे बुडणार' म्हणून रोज फितवायचे. त्यातून त्याने ठाकरे मॅडमच्या वडिलांचं निधन झाल्याच्या तिसऱ्या दिवशी पैशांची मागणी केली. अशा अडीअडचणींतून शेवटी 2014 मधे शाळा उभी राहिली.
या प्रवासाबद्दल डोळ्यातलं पाणी पुसत ठाकरे मॅडम सांगतात, "शाळेचं बांधकाम होईपर्यंत मला दोन वर्षे शांत झोपही लागली नाही. या काळात गावातल्या महिलांनी मला देलेली साथ अनमोल होती. या महिला कमी शिकलेल्या असल्या, तरी शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटलेलं आहे. एका कार्यक्रमाला बोलावलं नाही, म्हणून नाराज होऊन तत्कालीन सरपंचांनी माझ्या बदलीचा ठरावही करुन घेतला होता, पण गावातल्या महिलांनी ते घडू दिलं नाही.”
आज, या जि प शाळेची बैठी इमारत मुलांनी बनविलेल्या फुला-फळांच्या, औषधी वनस्पतीच्या बागा तसंच मोठं मैदान मिरवत दिमाखात उभी आहे. शाळेच्या भिंती मराठी-इंग्रजीच्या शब्दखेळांनी आणि गणिती कोड्यांनी सजलेल्या आहेत. आणि शाळेचा ‘आदर्श शाळा’ म्हणून गौरव झाला आहे. 
 स्नेहल बनसोडे- शेलुडकर, संपादक, www.samata.shiksha

Problem झालाय

लेखिका, महिला प्रश्न व नातेसंबंध अभ्यासक
‘चूपचूप बैठी हो, जरूर कोई बात है...’ ही जाहिरात सुरू झाली की अनेक घरातील टीव्हींचा आवाज तरी म्यूट व्हायचा किंवा चॅनेल बदललं जायचं. 'त्या दिवसांत' मुलींनी गुपचूप बसायचं आणि कुणाला काही कळू द्यायचं नाही अशी अपेक्षा असायची. त्यामुळे सॅनिटरी पॅडचं नावही व्हिस्पर वगैरे.. पाळी म्हणजे कानात कुजबुजून बोलायचा विषय. बरं, ही जाहिरात लागल्यावर घरातल्या लहान मुलांनी 'हे काय' असं विचारल्यावर आणखी पंचाईत व्हायची. घरोघरी हेच. मेडिकल स्टोअरमध्ये सॅनिटरी पॅड मागितल्यावर दुकानदाराची होणारी कसरत. आधी पेपरमध्ये नीट गुंडाळल्यानंतर काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत ही 'कुजबुज' विकली जाते. या 'कुजबुज' ला आणखी एक नाव, ते म्हणजे ... प्रॉब्लेम!
आता या 'प्रॉब्लेम' चा अर्थ समजणाऱ्यांना समजतो. त्यामुळे समस्त महिलावर्गाची कहाणी केवळ 'प्रॉब्लेम' एवढं म्हटलं की बयाँ होऊन जाते. भारतात या ‘प्रॉब्लेम’ म्हणजेच मासिक पाळीच्या विषयावर फार जाहीर चर्चा होत नाही.
#LahukaLagaan#डोन्टटॅक्समायब्लड या कँपेन या आठवड्यात सोशल मिडीया गाजल्या. या कँपेनमुळे चारभिंतीत चर्चिल्या जाणाऱ्या मासिक पाळी, सॅनिटरी नॅपकिन विषयावर जाहीर चर्चा सुरू झाली. सॅनिटरी नॅपकिनवर टॅक्स लावू नये अशी मागणी महिलांमधून होऊ लागलीय. एरव्ही महिला चळवळीतील कार्यकर्त्यांचा हा विषय. तो आता सर्वसाधारण घटकांतील महिलांपर्यंत आला. 
पाळीच्या काळातील स्वच्छतेबाबत आपल्या देशात फार जागरुकता नाही. महिलाही स्वतःच्या गरजांना प्राधान्य देत नाहीत. 
आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन वापरणाऱ्या महिलांचं प्रमाण फक्त १२ % आहे. त्यातही पॅडच्या क्वालिटीपेक्षा किंमत आणि रक्त शोषण्याची क्षमता याकडेच जास्त लक्ष दिलं जातं. त्यामुळे पॅड वापरणाऱ्या महिला सुरक्षित आणि सर्वच पॅड फार हायजिनिक आहेत असं मानण्याचं काही कारण नाही.
अद्यापही ८८ % महिला पाळीदरम्यान कपडा किंवा अन्य साधनं वापरतात. देशांतल्या काही भागांत तर या काळात वाळू, राख, झाडांची सुकलेली पाने यांचाही वापर होतो. राजस्थानातील काही भागांमध्ये पाण्याची कमतरता असल्याने अतिशय बारीक वाळूचा वापर महिला करत असतात. हे सगळं फार भयावह आहे.
एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सॅनिटरी पॅडचा दर्जा १९८० साली ठरवण्यात आलेल्या मानकांप्रमाणे प्रमाणित केला जातो. पॅडची रक्त शोषण्याची क्षमता वाढवण्यासाठी काही घटक वापरले जातात. तसंच दुर्गंधी टाळण्यासाठी सुगंधी द्रव्यांचा वापर केला जातो. या दोन्हींमुळे कँसरची शक्यता वाढते, अशी चिंता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. सॅनिटरी पॅडचा संपर्क येतो तो शरीरातील नाजूक भागाशी. तिथे जंतूसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. असं असूनही याबाबतीत म्हणावं तेवढं संशोधन झालेलं नाही.
सॅनिटरी पॅडचं जागतिक मार्केट प्रचंड मोठं आहे. यावर काही ठराविक कंपन्यांचा कब्जा आहे. आपण फक्त भारताचा विचार करू. 
आपल्याकडे ‘प्रॉक्टर अँड गँम्बल’च्या ‘व्हिस्पर’चं मार्केट ५०.४९ % आहे. दुसऱ्या क्रमांकावर ‘जॉन्सन अँड जॉन्सन’चा ‘स्टे फ्री’ ब्रँड आहे. २३ % महिला ‘स्टे फ्री’ वापरतात. तर २.२ % महिला ‘कोटेक्स’ वापरतात. विविध स्वयंसेवी संस्थाही पॅडची निर्मिती करतात. आणि ग्रामीण भागात स्वस्तात त्याची विक्री केली जाते. तरीही सुरक्षित पॅडबाबत मात्र फार कोणी बोलतांना दिसत नाही. महिलांची सोय म्हणून काही पॅडची उत्पादनं होतात. बाजारात ती फारशी चालत नाहीत. त्यांची उत्पादनक्षमता कमी असते. बाजारपेठेतील उत्पादनांशी स्पर्धा करायची नाही याच भावनेने हे उत्पादक बाजारपेठेत उतरतात. ‘गुंज’सारखी संस्था कापडी पॅड तयार करते अश्या कापडी पॅडला निसर्गाला अनुकुल म्हणूनही काही महिला प्राधान्य देतात.
आपल्याकडे अजूनही ‘कप’ हे साधन फार वापरात नाही. जिथे पॅडच परवडत नाही तिथे कप तर फार लांबची गोष्ट.
सध्या ९०० दशलक्ष पॅड्सची निर्मिती भारतात होते. बाकी परदेशातून आयात होतात. आपल्याकडे १५ ते ५४ वयोगटातील स्त्रियांची संख्या ३०० दशलक्ष इतकी आहे. ४ ते ८ दिवसांपर्यंत पाळीचा रक्तस्राव होत असतो. प्रत्येकीला दिवसाला सरासरी ३ पॅड लागतात असं धरलं, तर ५८,५०० दशलक्ष पॅडची आपली गरज. सध्याचा वापर हा प्रतिवर्षी २,६५९ दशलक्ष पॅड्सचा आहे. हे प्रमाण फक्त ४.५% आहे. युरोप आणि अमेरिकेत हे प्रमाण ७३ ते ९२ % आहे. भारतात हे प्रमाण वाढून १८ ते २० % होईल असा अंदाज आहे. भारताला आवश्यक असलेल्या पॅड्सपैकी ३५ % पॅडस् भारतात बनतात. येत्या काळात हे प्रमाण वाढवायला लागणार आहे. अशातच टॅक्सचा विषय आल्याने महिलांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय.
टॅक्स वाढवला तरी सुरक्षेची हमी सरकार घेणार आहे का? टॅक्स वाढवतांना इतर काय पर्याय उपलब्ध करुन देणार आहेत? या चार दिवसात महिलांनी कुणाला प्रॅाब्लेम ठरवायचं, हे महिलांनीच आता ठरवायला हवं.
- प्रियदर्शिनी हिंगे