Sunday 4 June 2017

मुलांना चित्रकलेचे धडे देणारी शिक्षिका

जुईली चित्रकार, मुलांना चित्रकलेचे धडे देणारी शिक्षिका. क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांशी आपलेपणाने बोलणारी. तिला दोन मुली. ती सांगते, थोरली मुलगी आता मोठी होतेय, तिला आपल्या शरीराबद्दल सतत खूप प्रश्न पडत असतात. तिचं शंकासमाधान करताना जाणवलं की, आपल्या उत्तरामुळे हिचं समाधान नाही झालं तर तिनं दुसऱ्या कुणाकडे, नेटवर उत्तरं नकोत शोधायला. त्यातून चुकीची माहिती मिळायची शक्यताही असते. मग जुईलीनं स्वतःच पुस्तकं वाचून तिच्या शंकांना उत्तरं द्यायला सुरुवात केली. स्वतःच समाधान झालं की मुलगी मैत्रिणींनाही ती उत्तरं सांगू लागली. पुन्हा त्यांचे प्रश्न जुईलीकडे येऊ लागले. शरीरात होणारे बदल काय असतात, कसे होतात, का होतात हे सगळं शास्त्रीयदृष्टया मुलींना सांगायला हवं. आणि हे केवळ आपल्या मुलींपुरतं मर्यादित राहायला नको. सर्वच मुलींना हे कळायला हवं. हे जुईलीला प्रकर्षानं जाणवलं आणि ती कामाला लागली.
जुईलीच्या घरातच दोन डॉक्टर - सासरे आणि नवरा. या दोघांशी चर्चा, पुस्तकांचं वाचन, अभ्यास, फोटोंचं संकलन - असं सगळं करून पहिलं सत्रं आकाराला आलं - ‘कळी उमलताना’. 10 ते 14 असा वयोगट तिनं निश्चित केला. यात विषय ठरवले - मी आता मोठी झाले, म्हणजे माझ्यात काय बदल झाले, बाह्यांग बदल, शरीरांतर्गत बदल. पाळी म्हणजे काय असतं, मलाच का असं झालं, या काळात निगा कशी राखायची. 
सुरुवातीला ती स्वतःच्या मुलींच्या मैत्रिणींच्या आयांशी बोलली. ड्रॉईंग क्लासच्या मुलींच्या आयांशीही चर्चा झाली. जुईलीचे बरीच वर्षे ठाण्यात क्लासेस आहेत. त्यामुळे क्लासच्या टीचर चुकीचं काही सांगणार नाहीत, असा एक विश्वासही लोकांच्या मनात तयार झाला. मग पहिलं सेशन ठरलं. घराजवळच पोलिसलाईन. तिथल्याही एक-दोन मुली आल्या. पाठोपाठ त्यांच्या कॉन्स्टेबल आया. त्यांनी, काय सांगताय मुलींना, इथं काय चाललंय असे प्रश्न विचारले. मग त्यांनाच थोडावेळ सेशनला बसवलं. सेशननंतर जुईलीनंच त्यांना विचारलं की, मुलींच्या शंकांना देता का तुम्ही उत्तरं, तेवढा वेळ देऊन त्यांच्याशी बोलत असाल तर नका पाठवू. सेशन ऐकल्यामुळे त्यांनाही जाणवलं होतंच की मुलींशी इतकं मोकळेपणाने घरात बोलत येत नाही. मग याच दोघी कॉन्स्टेबलनी पुढं सहकार्य केलं. पोलिसलाईनमधल्या बऱ्याच मुलींना, त्यांच्या आयांनाही आणलं. जुईलीचे हे सगळं काम विनामूल्य, विनाजाहिरात चालू आहे. आजवर अशी सात सेशन्स तिनं घेतली आहेत. प्रत्येक सत्रात 8-10 मुली सहभागी होतात.
जुईली म्हणते, आजकाल मुलींना 10 व्या वर्षी किंवा त्याआधीही पाळी सुरू होते. त्यासाठी त्यांना शरीराविषयी प्राथमिक माहिती असायलाच हवी. कित्येकदा मुलींच्या आयांनाही कितीतरी गोष्टी माहिती नसतात.
क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी भविष्यात किती महत्त्वाच्या असतात, हे जुईलीनं आखणी केलेली सत्रं बघून लक्षात येतं. पाळीच्या ता्रखेची कॅलेंडरवर खूण करून ठेवायची सवय लावून घ्यायची, हे ती आवर्जून मुलींना सांगते. लग्नानंतर कित्येकदा मुलींना आपल्याला दिवस गेलेत हेच कळत नाही. कारण पाळीची तारीख लक्षात नसते. आपली पाळी नक्की किती दिवसांनी सुरू होते, हेही काही मुलींना कळत नाही. पाळीच्या तारखेच्या नोंदीमुळे, दर 15 दिवसांनी पाळी आली किंवा एक-दोन महिने आली नाही, तरी डॉक्टरांना आपण योग्य माहिती देऊ शकतो. त्यातून आजारांची, समस्यांची वेळेवर उकल होऊ शकत असल्याचं ती सांगते.
मुलींचे बरेचसे प्रश्न, शंका ती अगदी कळकळीने ऐकते, सोडवते. जुईलीच्या पालकत्वाचा प्रवास असा स्वतःच्या मुलींच्या शंकांचं निरसन करता करता समाजातील अन्य मुलींशी संवाद करण्यापर्यंत अर्थपूर्ण होत गेला आहे.
जुईली महाजन संपर्क क्र. - 9870096966 / 022 - 25332705

शब्दांकन: वर्षा जोशी - आठवले

No comments:

Post a Comment