Monday 26 June 2017

न्यायाधीशांचं अनोखं दान




 20 जूनची दुपार. रत्नागिरीच्या सत्र न्यायालयात, दोन विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना हजर राहायला सांगितलं होतं. खेड कुरवळ जावळीच्या न्यू इंग्लीश स्कूलमधला शुभम संजय लाड आणि राजापूर उत्कर्ष विद्यामंदिर, शिवणेखुर्दची मिनल हातणकर हे त्यांच्या आई-वडिलांसह तिथे हजर होते. सर्वसामान्यांना कोर्टात जायची भीती वाटते तशीच त्यांनाही वाटत होती. त्यांना बोलावण्याचं नेमकं कारण तरी काय होतं? ते त्यांना न्यायालयात गेल्यावरच कळलं.
रत्नागिरी जिल्हय़ातल्या 30 न्यायाधीशांच्या एका गटाने दोन गरीब, गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारायचं ठरवल्यानंतर आयोजलेला तो कार्यक्रम होता.
शुभम लाडने अपंगत्वावर मात करत 10 वीत 76 % गुण मिळवले. शुभमला स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाही. एका डोळय़ाने दिसत नाही. अस्थिव्यंगही आहे. त्याही स्थितीत त्याने परीक्षा दिली. पालकांनी त्याच्या उपचाराकरिता दिवस-रात्र एक करूनही शुभम बरा झालेला नाही. राजारापूरमधील मिनल शंकर हातणकरने अतिशय गरीब परिस्थितीचा सामना करत दहावीत 84.20 % मिळवले.
या दोघांच्या यशाची गाथा वाचून जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश शिवराम डिगे यांनी जिल्हय़ातील 30 न्यायाधीशांशी चर्चा करून या दोन्ही विद्यार्थ्यांना संपूर्ण मदत करण्याचा निर्णय घेतला. 20 जूनला शुभमला 40 हजार तर मीनलला 60 हजार रूपये सुरूवातीला शैक्षणिक खर्चासाठी दिले. तसंच दोघांच्याही संपूर्ण उच्च शिक्षणाचीही जबाबदारी न्यायाधीशांच्या या गटाने घेतल्याचं जाहीर केलं. शुभमच्या उपचारांची जबाबदारीही न्यायाधीशांनी स्वीकारली. लवकरच त्याला उपचाराकरिता पुण्यातील एका नामांकित हॉस्पीटलमध्ये नेण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा न्यायाधीश 1 जे.पी.झपाटे, जिल्हा सत्र न्यायाधीश एम.व्ही.दीक्षित, एस.एस.गायकवाड, बी.डी. शेळके, जिल्हा न्यायाधीश के. ए. बागी आदी उपस्थित होते.
न्यायाधीशांना समाजाच्या अनेक उपक्रमांपासून लांब राहून कायद्याचं पालन करावं लागतं. कायद्याद्वारे न्यायालयात ते न्यायदान करतच असतात. मात्र त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारण्याची ही घटना अनोखी ठरते. या घटनेमुळे शुभम आणि मीनल यांच्या जीवनाला दिशा मिळणार आहे. भीतीच्या भावनेने न्यायालयात आलेल्या या मुलांच्या पालकांनी घरी परत जाताना न्यायाधीशांच्या माणुसकीला सलाम ठोकला.
 जान्हवी पाटील.

No comments:

Post a Comment