Wednesday 21 June 2017

एकेक स्टिरिओटाईप्स ...

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी: 
मागल्या वेळी समुद्राचीच गोष्ट सांगितलीय तर जड डायपरच्या अनुभवासोबत आठवलेलं असंच काही शेअर करायलाच हवंय.
समुद्रात मस्ती करून आल्यावर आम्ही सगळेच अगदी शिस्तीत किनार्‍यावर बसलो. सूर्य आस्ताला येऊ लागला होता. खारं वारं अंगात किंचित शिरशिरी आणत होतं. दंगामस्ती करताना न जाणवलेली भूक पोटात ढुशा द्यायला लागली होती. बीचवर नेहमी येणारे लोक असतील, नव्यानं येणारे पर्यटक असतील... सगळेच वळूनवळून किंवा थांबून बघत होते. त्यांना कळत नव्हतं की हे चाललंय काय? हे इतके अपंग लोक एकगठ्ठा का जमलेत? - मुळात इतक्या वेगवेगळ्या तर्हेने अपंग असणारी माणसं पाहण्याची बर्‍याच लोकांची ती पहिलीच वेळ असेल.
आम्हा सगळ्यांच्या पोटात भुकेनं जाळ उठला होता... तितक्यात प्रत्येकाच्या हातात गुलाबीसर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर नि शेवेने सजलेली भेळ आली. भारीच! समुद्रात भरपूर खेळल्यामुळं, ओरडाआरड्यामुळं मन तणावरहित होतं. समोर अस्ताच्या सूर्याने माखलेले रंगच रंग आकाशात, समुद्रात. रूचकर भेळ. कोणी नुसतंच शांत बसलं होतं, कुणी गप्पा मारत होतं... इतक्यात एक ज्येष्ठ माणूस धीर करत जवळ आला. त्यातल्या त्यात नसीमादीदी मोठ्या वाटत असल्यामुळं तो त्यांच्याजवळ गेला. जवळ जात म्हणाला, ‘‘इधर कैसे आए?’’ - नसीमादीदी म्हणाल्या, ‘‘बसनं आलो. फिरायला. मुलांना मुंबई दाखवायला.’’ मग पुन्हा क्षणदोन क्षण थांबत, काळजीयुक्त नि सहानुभूतीच्या आवाजानं त्यानं पुढचा प्रश्ना विचारला, ‘‘ये, इतने सारे बच्चोंका ऐसा कैसा हो गया? ये व्हीलचेअर वगैरा....’’
मी दीदींच्या शेजारीच होते. त्यावेळी माझी पहिली प्रतिक्रिया फस्सकन हसण्याचीच होती. आज वाटतं, काय अगाध सामान्यज्ञान नि लॉजिक होतं त्या माणसाचं. असंच लॉजिक लावलेले पुढे कैकजण भेटले. मान्य आहे, की नसीमादीदींच्या शेजारी बारा-पंधरा व्हीलचेअरवाली लहानमोठी मुलं-मुली होती, पण म्हणजे व्हीलचेअर बाऊण्ड व्यक्तीला व्हीलचेअर बाऊण्ड मुलंच होतात हे कसं पोहोचलं नि पक्कं झालं असेल अनेकांच्या मनात? म्हणजे कुठलीही अपंग व्यक्ती असेल आणि तिनं लग्न केलं असेल, तर तिला होणारी मुलं हमखास अपंगच असणार, हे ही पक्कंच असेल बहुतेकांच्या मनात.
मी हॉस्पिटलमध्ये ऍडमीट असताना तीन-चार वेळा असंच काही घडलंय. माझी मदतनीस मंदा ही उंचीनं खूप कमी. ती सोबत थांबायची तेव्हा नर्सिंग स्टाफपैकी कुणी ना कुणी विचारायचं, बहीण काय तुमची? अहो, बहीण मानायला काही हरकत नाहीये. हरकत आहे ती असे सरसकट समज बाळगण्याला!
अनेक ठेंगू असणारे स्त्रीपुरुष किंवा मतिमंदत्वाचे विशिष्ट प्रकार असणारी माणसं चेहरेपट्टीनं एकसारखी दिसतात. ते का, असं समजून सांगणारे नि समजून घेणारे वाढायला पाहिजेत यार... नाही तर फार फार त्रास होतो. त्रास होतो म्हणताना, हे ही मान्य आहे की बरेचदा अज्ञानापोटी, निष्काळजीपणानं प्रतिक्रिया दिल्या जातात. मुद्दामच नाही काही. कारण काहीही असो, मन तयारीचं नसेल तर विचित्र भावना मनात घर करत जाते.
- सोनाली नवांगुळ

No comments:

Post a Comment