Wednesday 21 June 2017

एपिलेप्सीग्रस्तांचं पालकत्व अनोखं


स्वतःच्या मुलांचं पालकत्व सगळेच करतात. यशोदा वाकणकर करत असलेलं एपिलेप्सीग्रस्तांचं पालकत्व अनोखं आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून 23 वर्ष एपिलेप्सीचा आजार घेऊन जगलेल्या यशोदाला तिचे आई-बाप अनिल आणि सुनंदा अवचट यांनी सर्वसामान्य मुलीसारखंच वागवलं. तेच सूत्र यशोदाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या कामाचं आहे. ब्रेन सर्जरीनंतर तिचा आजार बरा झाला. पण एकदा फिट येणार्‍या दोन जुळ्या मुलांच्या वडिलांना पैशाअभावी औषधं न घेता परत जाताना यशोदाने पाहिलं. संवेदना फौंडेशन, पुणे या Epilepsy अर्थात फेफरे, फिट्स, अपस्मार, मिरगी या नावाने प्रचलित असणाऱ्या आजाराच्या उपचारार्थ काम करणार्‍या संस्थेच्या जन्माचं हे कारण ठरलं. सुरवातीला वृत्तपत्रात एक निवेदन प्रसिद्ध करून सुरू केलेलं हे काम आता फेसबुकद्वारे सर्वदूर पसरत आहे.
Epilepsy म्हणजे काय? मेंदूद्वारे चालणार्‍या संदेशवहनात येणारा तात्कालिक किंवा दीर्घ अडथळा वा बिघाड. हा आजार औषधं, पथ्य, नियमित उपचाराने नियंत्रणात राहतो, बराही होतो. भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 1% एवढं प्रमाण असणाऱ्या या आजाराचं नेमकं कारण अजून स्पष्ट नाही. जगभरातले वैद्यकीय तज्ञ, मेंदूतज्ञ, सरकारं, आरोग्य विभाग त्याचा शोध घेत आहेत.
एपिलेप्सी झालेल्या व्यक्तीला औषधोपचारासोबत प्रेमळ संवाद, मायेचा स्पर्श, सोबत याचीही गरज असते. एपिलेप्सीबाबत बरेच अपसमज आहेत. ते दूर करण्यासाठी ‘संवेदना’ सपोर्ट ग्रुप तयार करत आहे. पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद इथे हे काम सुरू आहे. एपिलेप्सीग्रस्तांना उपचारखर्च, शिक्षण, नोकरी मिळावी यासाठी ‘संवेदना’द्वारे जागृती केली जाते. अनेक मेंदूतज्ञही यासाठी गावोगावी प्रयत्नशील आहेत. त्यांच्यामार्फत आजारी व्यक्तींना ‘संवेदना’ची हेल्पलाइनही मिळते.
मोहन फाटक यांच्या मुलाला मिरगीचा बारीकसा आजार होता. मुलासाठी वधुसंशोधन करताना त्यांना हे लपवायचं नव्हतं. या अनुभवातूनच एपिलेप्सी आजार झालेल्यांचं वधू-वर मंडळ सुरू करण्याची कल्पना निघाली. यशोदाचं म्हणणं असं की, मतिमंद म्हणून फिट्स येत असतील अशांच्या लग्नाचा विचार करू नये. पण एरवी नॉर्मल आणि क्वचित फिट येणार्‍यांना, त्यांच्या पालकांना अशा समुपदेशनाने आधार मिळवून देता येतो. वैद्यकीय सल्ल्याने आजारग्रस्तांच्या सर्व अवस्था नीट पार पाडता येतात. 2008 साली ‘संवेदना’ने भरवलेला एपिलेप्सी वधू-वर मेळावा भारतातला पहिलाच ठरला. त्यानंतर आयोजलेल्या चारही वधू-वर मेळाव्यांना भारतभरातून प्रतिसाद मिळाला. संस्थेने आजवर असे २५ विवाह जमवले. ती जोडपी सुखाने संसार करत आहेत आणि त्यांना नॉर्मल बाळंसुद्धा आहेत. “एकमेकांना समजून घेत उभे राहिलेले यांचे संसार बघण्यात मोठं समाधान आहे,” यशोदा सांगते.
राधिका देशपांडे यांच्या मुलीला हा आजार तीव्र स्वरूपात होता. मुलगी बरी झाल्यावर त्यांनी ‘संवेदना’सोबत कामाला वाहून घेतलं. मोहन फाटकांसह रवींद्र बापट, सुवर्णा मोडक, रामकृष्ण बोकील हेही झोकून देऊन काम करतात. यशोदाचे बाबा अनिल अवचट, पती पराग वाकणकर हे दोघं कामामागे भक्कमपणे उभे आहेत.
‘संवेदना’च्या शेअरिंग मिटिंग्ज महत्वाच्या असतात. लोक स्वतःबद्दल, स्वतःच्या आजाराबद्दल बोलून खूप मोकळे होतात. त्यांचा ताण, न्यूनगंड कमी होतो.
दर बुधवारी संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान निवारा वृद्धाश्रम, नवी पेठ, पुणे इथे एपिलेप्सी समुपदेशन, एपिलेप्सी वधू-वर नोंदणी, आणि एपिलेप्सीसाह जगणाऱ्या गरजू व्यक्तींसाठी ‘संवेदना’ची औषध मदत योजना सेवा उपलब्ध आहे.
अधिक माहिती व संपर्कासाठी - 9822008035, 9850887644
प्रवास पालकत्वाचा – यशोदा वाकणकर
www.snavedana.org
- गीतांजली रणशूर, पुणे

No comments:

Post a Comment