Sunday 4 June 2017

चिमण्यांचे आनंदवन


तीव्र उन्हाळा सुरू आहे. या काळात चिमण्यांना वाचवा, चिमण्यांसाठी पाणी ठेवा असे मेसेजिस फिरत असतात. मेसेजिस वाचून लगेच कृती करणारे थोडेच.
धुळे शहरातल्या साने गुरुजी सोसायटीत, चिमण्यांना आपलं वाटणारं एक घर आहे. या घराचं नाव आहे - 'चिमण्यांचे आनंदवन'. गेल्या बारा वर्षांपासून या सोसायटीत संध्या आणि नंदू मराठे चिमण्यांची काळजी घेत आहेत. मराठे दांपत्याने आपल्या घरासमोर चिमण्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था केलीय. तुळशी वृंदावनाला लागूनच त्यांनी चिमण्यांसाठी लोखंडी मचाण तयार केले आहेत. त्यात चिमण्यांसाठी मातीच्या भांड्यांमध्ये खाद्य आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था आहे. दिवसातून दोन वेळा, या भांड्यामधे खाद्य आणि पाणी भरलं जात.
विशेष म्हणजे ऋतूनुसार या चिमण्यांचं खाद्य बदलतं. उन्हाळ्यात तांदूळ, हिवाळ्यात बाजरी आणि पावसाळ्यात गहू असं हे खाद्य.
घरासमोर छोटीशी बाग़ केली आहे. झाडा-वेलींवर बाजरी, दादर यांची कणसं लावली आहेत, मातीची घरटी बांधली आहेत. अगदी छोट्या परिसरात चिमण्यांसाठी ही तजवीज केली असली, तरी दररोज या आनंदवनात शेकडो चिमण्या नित्य नियमाने हजेरी लावत आनंदवनातील आपला वाटा हक्काने घेतात. नंदू रिक्षाचालक आहेत. आर्थिक परिस्थिती बेतातीच असताना या दांपत्याने चिमण्यांची काळजी घेण्याची जबाबदारी स्वयंप्रेरणेने घेतलीय.
नंदू सांगतात, “चिमण्यांनाही आपल्याप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. चिमण्या जगल्या, तर आपण जगू या विचाराने आम्ही हे काम करतो. इतरांनीही या कामातून प्रेरणा घ्यावी ही अपेक्षा आहे.”
भूतदया बोलण्यातून नव्हे तर कृतीतून दिसली पाहिजे, याचं मूर्तिमंत उदाहरण मराठे दांपत्य आहे. त्यांनी निर्मिलेल्या आनंदवनातला चिमण्यांचा चिवचिवाट, निसर्गचक्र अव्याहतपणे सुरू असल्याची जाणीव करून देतो. तिथलं चिमण्यांचं बागडणं - माणसं वाटतात, तितकी स्वार्थी नाहीयेत - ही आशा जिवंत ठेवतो. 
– प्रशांत परदेशी.


No comments:

Post a Comment