Sunday 4 June 2017

ही आमच्या दोघींसाठीची लढाई


काल अकरा वर्षांच्या सानियाने, मी डॉक्टरकडे गेल्यावर घरकामाची बाई सुट्टीवर आहे, म्हणून घर साफ केलं. भांडी घासली. कपडे घडी करून कपाटात ठेवले. मी परतल्यावर, मला लिंबू सरबतही दिलं. माझे डोळे पाणावले. मागची आठ वर्षं आठवली. 
माझा एकल पालकत्वाचा प्रवास - ही आमच्या दोघींसाठीची लढाई आहे. सानिया दोन वर्षांची झाल्यावर आम्ही तिच्या बाबाचं घर सोडून आई-पपांकडे आलो. त्यानंतर संकटांची मालिकाच सुरू झाली. माझा रूमाटाइड आर्थरायटिस, अंथरूण धरणं, कोर्टात केसेस. सानिया माझ्या जगण्याचा आधार बनली.
अडीच वर्षांची माझी मुलगी, मला झोपवायला माझ्या कपाळावर हात ठेवून बोबडी गाणी गायची. मला लाज वाटायची. मी इतकी हतबल की ऑफिसला आणि ट्रीटमेंटला जाण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. माझे आई-वडील मग तिला जयसिंगपूरला घेऊन गेले. मी दर आठवड्याला शनि-रवि तिला भेटायला जायचे. असं वर्षभर चाललं. त्याच दरम्यान माझी आई गेल्यावर माझे वडील आणि सानिया पुन्हा मुंबईत आले. ती शाळेत जायला लागली. लांबवर कुठे भांडणं ऎकली, तरी घाबरून दारामागे लपणं, ना कुणामध्ये मिसळणं, बोलणं – अशी तिची स्थिती. तिची नर्सरी टीचर म्हणायची- हिची ‘टच मी नॉट पॉलिसी’ आहे. 
ज्युनियर केजीला दुसऱ्या शाळेत गेल्यावर तिला इंग्लिशमध्ये एक मार्क मिळाला. मला शाळेतून बोलावणं आलं. “ही बोलत नाही, लांब लांब असते, मार्कपण कमी. तिचे वडील कुठे आहेत?” आमच्या डिव्होर्सची गोष्ट सांगितल्यावर त्या टीचरनी तिला आपल्या बाजूला बसवून घ्यायला सुरूवात केली. तरीही शाळेत रुळायला सानियाला खूप वेळ लागला. ती पहिलीत असताना तिचं सगळं जग असलेल्या माझ्या वडिलांना पॅरलिसीस झाला. त्यांना बघायचं की सानियाला - असा प्रश्न होता. त्यांना केअर सेंटरमध्ये ठेवलं. मी नोकरी सोडली. घरूनच ट्रान्सलेशनची कामं करायला लागले. आम्ही दर आठवड्याला त्यांना भेटायला जायचो. वर्षभरात तेही गेले. 

सानिया आणखीच घाबरायला लागली. अमूक झालं तर काय, तमूक झालं तर काय - असं तिला वाटू लागलं. शाळेतून आल्यावर लोळत टीव्ही बघायचा किंवा चित्र काढत बसायचं, हेच करू लागली. ती बारीक कधीच नव्हती. आता अजिबातच हालचाल नाही, सतत टीव्ही बघणं याची मला काळजी वाटत होती. माझे एक भावोजी मुंबईत जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून बदली होऊन आले होते. त्यांनी सुचवल्यानुसार तिसरीत गेल्यावर तिला रिदमिक जिम्नॅस्टिक्सला घातलं. आठवड्यातून तीन दिवस. शिवाजी पार्कला. साधं चक्रासन घालायलाही घाबरणारी सानिया हळूहळू जिम्नॅस्टिक्सच्या ट्रिक्स शिकत गेली. त्याच वेळी, डायना नावाच्या शिक्षिकेने सानियाला खूप जीव लावला. सानिया पूर्णपणे बदलली. 
आता ती सर्वांशी बोलते, सर्वांमध्ये मिसळते, खेळते, घर आवरते, सुंदर चित्रं काढते. वर्षभरापासून ती रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या ऍडव्हान्स बॅचला जातेय. वर्षा उपाध्ये, सदिच्छा कुलकर्णी आणि बाकीच्या कोचेसनी तिला खूप चांगलं वळण लावलं, शिकवलं. तिला हा खेळ आवडतो. शिवाजी पार्कचा क्लास सुटला की ती स्वतःहून वजन कमी करण्यासाठी धावते. स्वतःच्या खाण्यावर नीट लक्ष ठेवते. तिच्या जेवणाचे लाड कधीही केले गेले नाहीत. जे असेल ते खायचं हेच पाळलं गेलं. खाण्याची शौकीन असल्यामुळे तिलाही ते चांगलं जमलं. सध्या ती ड्रॉइंगच्या एलिमेंटरी परीक्षेची तयारी करतेय. जिम्नॅस्टिक्सच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तिला सिल्व्हर मेडलही मिळालंय. हा खेळ महागडा आहे. त्याची आर्थिक टोकं जुळवताना माझी दमछाक होते. तिला रोज क्लासला नेऊन तिथे दोन तास बसावं लागतं.
तिच्याकडे एक अशी गोष्ट असावी, जी तिला कायम साथ करेल, ते म्हणजे चांगलं आरोग्य आणि सोबत तिची इच्छा असेल तर एक चांगलं करियर म्हणून सगळी धावपळ मी करतेय.
सानिया मोठी झाल्यावर पुढे काय करायचं, हाही एक मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहणार आहे. त्यामुळे आई-वडील-आजी-आजोबा-भावंड या सगळ्या भूमिकांमध्ये तिच्यासाठी जगताना काही गोष्टी स्वतःसाठीही मी करतेय. त्याही प्रत्यक्षात उतरतील असं वाटतं
.
प्रवास पालकत्वाचा : कोमल कुंभार

No comments:

Post a Comment