Tuesday 16 May 2017

शेतकरी झाला विक्रेता



नांदेडच्या आठवडी बाजारातली ही गोष्ट. दुरून आवाज येत होता, ‘फक्त दहा रुपयात टरबूज...दहा रुपयात टरबूज’. एक दहा-बारा वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडील टरबूज विकायला बसले होते. समोर ट्रॅक्टरभर हिरव्यागार टरबूजांचा ढीग. डोक्यावरच्या रणरणत्या उन्हाची पर्वा न करता लोकही दोन-चार टरबूज खरेदी करून जात होते. विशेष म्हणजे, प्रत्येकाला टरबूजाच्या गोडीविषयी माहिती बाप-लेक आवर्जून सांगत होते. एखाद्याचं टरबूज गडबडीत हातातून पडून फुटले तर त्याला म्हणत होते, ‘राहू द्या साहेब, दुसरे बदलून घ्या, हा शेतकऱ्याचा माल आहे, दलालाचा नाही.’ हा उमदा शेतकरी आहे, पुरभाजी माधवराव तिडके. तिडके नांदेड जिल्ह्यातील दिग्रस (नांदला) गावचे.
 त्यांची सात एकर शेती. त्यात दोन बोअर. त्यामुळे पाण्याची चांगली सोय. गहू, ज्वारी, सोयाबीन, ऊस, हळद ही पारंपरिक पिकं ते घेतातच. यावर्षी प्रयोग म्हणून त्यांनी टरबूज हे 75 दिवसाचं उन्हाळी घ्यायचं ठरवलं. सुरुवातीला 30 गुंठे जमिनीवर हे पीक घेतलं. आणि खर्च वजा करून त्यांना एक लाखाचा नफाही मिळाला. तिडके सांगतात, ‘सकाळी आणि संध्याकाळी एक तास ठिबकने पाणी दिले. पहिला बहार 18 टन निघाला. तो शेतातून 8.50 प्रति किलोने विकला. आता दुसरा बहार 8 टन निघाला आहे’.
पहिल्या बहराचा माल वजनाने जास्त भरत होता. पण या पिकाचा काहीच अनुभव नसल्याने वाहतुकीचा प्रश्न होता. म्हणून तो शेतातून विकला. दुसर्‍या बहाराचा माल आकाराने लहान. त्याला दलालांकडून नगण्य भाव मिळू लागला. कष्टाने पिकविलेले टरबूज जवळपास फुकटच द्यायचे. दलाल ते तिप्पटीनं विकून चांगला नफा मिळवणार हे तिडके यांना पटले नाही. शेवटी हे टरबूज स्वतःच विकायचा त्यांनी निर्णय घेतला.
एक उत्पादक शेतकरी स्वतःच्या मालाचा विक्रेता झाला. नांदेड हे जिल्हयाचं शहर जवळच. तिथल्या आनंदनगर, तरोडा नाका भागात टरबूज विक्री सुरू झाली. मालाची किंमत ठरवून 1 ते 1.5 किलो वजनाचं एक टरबूज 10 रुपयांना विकलं. ग्राहकांनीही भरघोस प्रतिसाद दिला. यावर्षी टरबूज शेतीत मिळालेल्या यशाने तिडके यांना आत्मविश्वास मिळाला आहे. त्यामुळेच पुढील वर्षी दोन एकरात टरबूज आणि खरबूज लावण्याचे ठरविले आहे. अर्थात पुढील वर्षी विक्री आपणच करणार हेही ते आत्मविश्वासाने सांगत होते.
सध्या अनेक शेतकऱ्यांनी टरबूजाचे पीक घेतले आहे. त्यांचा माल 5 ते 8 रूपये किलोने विकत असतानाच पुरभाजी तिडके यांनी दहा रूपये किलोने टरबूज विकून उत्तम नफा मिळवून दाखवला आहे. सर्वच टरबूज उत्पादकांसमोर त्यांनी उदाहरण ठेवले आहे. हा मार्ग बाकीच्यांनीही चोखाळायला हवा.
पुरभाजी तिडके संपर्क क्र.- 9011733287

- उन्मेष गौरकर.

No comments:

Post a Comment