Tuesday 16 May 2017

....आणि ती खरंच प्रेरणा बनली!

अंधाऱ्या कोपऱ्यात ठेवलेल्या कुंडीतले रोप आणि घरादाराचं दुर्लक्ष झालेलं मूल, दोघांचीही अवस्था सारखीच असते. पण या दोघांना प्रेम मिळालं आणि काळजी घेतली गेली तर?
वर्ध्याच्या हिंगणघाट पंचायत समितीतील लाडकी नावाचं छोटंसं गाव. या गावातल्या जि प शाळेतील मीना-राजू मंचाची उत्साही सदस्य- प्रेरणा. प्रत्येक उपक्रमात हिरिरीने भाग घेणारी, वर्गात उत्साहाने प्रश्न विचारणारी! पण प्रेरणाचे हे बदललेलं स्वरुप मी तुम्हांला सांगतेय. त्या आधी, दुसरी- तिसरीपर्यंत वर्गातली सर्वात लाजाळू मुलगी होती ती. अंगणवाडीतल्या तिच्या लहान भावाची शाळा सुटली की मधल्या सुट्टीपासून त्याला सांभाळणारी प्रेरणा.
लहानग्या प्रेरणाच्या मनावर सतत दडपण असायचं की मी भावाला अंगणवाडीतून आणून माझ्यासोबत ठेवलंय, त्यामुळे मला कुणी रागावणार तर नाही ना? मी प्रेरणाला यातून बाहेर काढायचं ठरवलं. प्रेरणाचा विश्वास संपादन करण्यासाठी मी तिच्या भावाला तिच्यासोबत वर्गातच बसण्याची परवानगी देऊन टाकली. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले. तिला मुद्दाम सोपे प्रश्न विचारून उत्तरं देता आलं की संपूर्ण वर्गासमोर शाबासकी देऊ लागले. तिला जवळ घेऊन मी तिच्या डोक्यावरुन हात फिरवायचे. या छोट्याश्या कृतीने प्रेरणाचा चेहरा चमकायचा.
प्रेरणाच्या घरची परिस्थिती गरिबीची. आई- वडील दोघंही शेतमजूर. घरातील मोठी मुलगी या नात्याने भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावरच पडलेली. आई, वडील आणि आजी पारंपरिक विचाराचे असल्याने तथाकथित 'वंशाचा दिवा' असलेल्या धाकट्या भावाचे लाड व्हायचे आणि प्रेरणासह तिच्या बहिणी मात्र 'डोक्यावर भार असलेल्या मुली' होत्या.
प्रेरणाची अभ्यासातली आणि नेतृत्त्वगुणाची चमक मला दिसत होती. कुटुंबाकडून तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचं वाईट वाटायचं. मी प्रेरणाच्या घरी वारंवार जाऊ लागले. तिच्या आई- वडिलांना प्रेरणाच्या हुशारीची आणि लहान वयातच ती दाखवत असलेल्या समजूतदारपणाची जाणीव करून दिली. मुलगा- मुलीला वेगवेगळी वागणूक द्यायला नको. उद्या हीच प्रेरणा चांगली शिकून, मोठी होऊन तुमच्या कुटुंबाचा आधार बनेल असा विश्वास मी वेळोवेळी द्यायचे.
हे सारं घडायला तीन-चार वर्षे लागली. पण आता प्रेरणामधे खूपच सकारात्मक बदल झाले होते. दरम्यान तिला मीना-राजू मंचामध्येही सहभागी करुन घेतलं होतं; जेणे करून तिच्यावर लहानपणापासून स्त्री-पुरुष समानतेचे संस्कार व्हावेत आणि मोठेपणी तिच्या पालकांप्रमाणे तिने मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नये.
आता सगळं सुरळीत होतंय असं वाटतानाच प्रेरणाच्या आईला कॅन्सरनं गाठलं आणि पुन्हा एकदा घरची सगळी जबाबदारी प्रेरणावर येऊन पडली. खूप प्रयत्न करूनही प्रेरणाची आई वाचली नाही. आम्ही सगळे शिक्षक तातडीनं तिच्या घरी पोहोचलो. प्रेरणाची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करवत नव्हती. पण घरी पोहोचतो तर प्रेरणा तिच्या रडणाऱ्या दोन्ही भावंडांना कुशीत घेऊन धीराने उभी होती. आईचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जातानाही ती शांत होती, उलट भावंडांना आणि वडिलांना जगण्याचा धीर देत होती.
मला त्या क्षणी प्रेरणाचा प्रचंड अभिमान वाटला. आपण मोठ्यांनीसुद्धा प्रेरणाकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे! प्रेरणा आजही शाळेला नियमित येते, घरची सगळी जबाबदारी सांभाळून!
लेखन: सुनीता चांदेकर.

No comments:

Post a Comment