Wednesday 3 May 2017

ए जिंदगी, गले लगा ले

निळ्या डोळ्यांच्या गो-यापान योगिताला डोळ्यांचा काही त्रास असेल, असं कोणालाच वाटलं नाही. जन्मानंतर काही महिन्यांतच तिला डायरिया-गॅस्ट्रो झाला. मुलगी जगते की नाही, इतकी वाईट स्थिती. इथचं जिद्दीची पहिली चुणूक योगितानं दाखवली. काही दिवस हॉस्पिटलमध्ये घालवून ती घरी आली. थोड्या दिवसातच ती आजूबाजूला बघत नाही, हे लक्षात आलं. मग सहाच महिन्याच्या या तान्ह्या बाळीचं डोळ्याचं ऑपरेशन झालं. लेन्सेस बसवल्या. दुर्देवानं ऑपरेशन अयशस्वी झालं. वय वाढलं, मग थोडं दिसतंय, म्हणून शिशुवर्ग सुरु झाला. इंग्लिश-देवनागरी अक्षरं पाटीवर गिरवणं चालू झालं. पाच वर्षांची झाली. पण बाकी हालचाली खूप कमी, चालणं-बोलणंही नव्हतंच. काही नातेवाईकांनी तर ती मतीमंद असल्याचीही शंका काढली. त्यातूनही तिची शिकायची इच्छा दिसत होतीच. 
मग डॉक्टरांच्या सल्ल्याने कमला मेहता अंध विद्यालयात तिला नवव्या वर्षी पहिलीत प्रवेश मिळाला. सोमवार ते शुक्रवार दादरला हॉस्टेलमध्ये आणि शनिवार-रविवार आजी-आजोबांकडे जोगेश्वरीला असं चक्र सुरु झालं.
 पुढे वडील सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी गावी शालोपयोगी साहित्याचं दुकान काढलं. त्यामुळे आई-वडील गावीच राहायचे. योगिताचं अभ्यासाबरोबर संगीतशिक्षणही चालू होतं. तिचा संगीतामधला रस पाहून, शाळेने ‘अल्लारखा’ संस्थेची शिष्यवृत्ती दिली. त्यामुळे रीतसर तबल्याचं शिक्षण घेता आलं. अभ्यास आणि संगीत दोन्ही छान चालू होतं. दहावीपर्यंत डाव्या डोळ्याने थोडं दिसत होतं. पण परीक्षेच्या आधी डोळ्याला अपघात झाला. डॉक्टरने मेंदू कमजोर होतोय, त्यावर ताण नको, असं सांगितलं. आणि संगीत किंवा शिक्षण यापैकी एकाचीच निवड करायला सांगितली. प्रयत्नशील योगिता हार कसली मानतेय ? संगीत आणि शिक्षण - दोन्ही चालू राहिलं. इतिहासामध्ये एमए देखील झालं. 
सध्या ती संगीत विशारदची तयारी करते आहे. तिचा आवडता कलाप्रकार लोकसंगीत. तबला, ढोलकी, मृदंग, ताशा-दिमडी, हलगी, पखवाज, खंजीरी, टाळ अशी जवळपास ३०-३५ वाद्य ती वाजवते. विशेष म्हणजे तालवाद्य ती रेडिओवर ऐकून शिकली आहे. कांचनताई सोनटक्केंच्या नाट्यशाळा संस्थेशी ती दुसरीपासून जोडली आहे. तिथे तिने अभिनय, पार्श्वसंगीत, गाणं, नाटक असं सगळं केलंय. 
 मुंबई विद्यापीठाच्या फेस्टिवलमध्ये योगिताच्या गटानं सुवर्णपदक मिळवलं. कॉलेजमध्ये बेस्ट स्टुडन्ट ट्रॉफी तर योगिताचीच! आज ती अस्मिता विद्यालय, जोगेश्वरी इथे सर्वसाधारण मुलांना संगीत आणि इतिहास शिकवते. आकाशवाणीच्या बातम्या ऐकणं ती कधीच चुकवत नाही. केंद्रिय दिव्यांगण सशक्तीकरण विभागाच्या ‘क्रिएटिव्ह adult’ या क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी २०१६च्या राष्ट्रपती पुरस्काराची ती मानकरी. स्वतःला दृष्टिहीन न समजता - मी दृष्टिबाधीत आहे, असं ती सांगते.
इतक्या वर्षाच्या प्रवासाने आता आपल्याला जगाकडे पहायची दृष्टी मिळाल्याचं ती सांगते. आपण स्वतःला आहे तसं स्वीकारलं, तर न्यूनगंडाचा प्रश्नच येत नाही, असं ती म्हणते. मेडिटेशन, शास्त्रीय संगीत हे तिच्या आनंदी राहण्याची प्रेरणा. आनंदी राहा, आनंदी जगा आणि आनंद पसरवा हे तिचं जीवनसूत्र. तिच्या मनमोकळ्या हास्याचं रहस्य हेच आहे.
जगण्यासाठी दृष्टीपेक्षाही सकारात्मक दृष्टिकोन हवा, हेच योगिता आपल्याला शिकवते.
 - मेघना धर्मेश.

No comments:

Post a Comment