Saturday 31 March 2018

वडिलांच्या श्राद्धाऐवजी शाळेला दिली देणगी

व्यक्तीच्या जन्माआधीपासून ते त्याच्या मृत्यूनंतरही सोहळे साजरे करण्याची आपली रीत. पण केवळ परंपरेच्या नावाखाली धार्मिक कृत्यांसाठी खर्च करण्याऐवजी त्याला विधायक आकारही देता येऊ शकतो. असेच एक आदर्श उदाहरण म्हणजे आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एका शिक्षकाने सुमारे दोन लाख रूपयांची कामं लातूरच्या जिल्हा परिषद शाळेसाठी करून दिली आहेत. आज ही मांजरी शाळा लातूरमधली सर्वांगसुंदर आयएसओ जि.प. शाळा म्हणून ओळखली जाते. या शिक्षकाचं नाव आहे रावसाहेब भामरे.



भामरे सर सध्या लातूरमधील मुरुडच्या डीआयईसीपीडीत तंत्रज्ञान विषय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. पण काही वर्षांपूर्वी ते मांजरीच्या जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचं काम करीत होते. सर म्हणतात, “माझे दिवंगत वडील स्वर्गीय माणिकराव भामरे यांच्या निधनानंतर वर्षभराने वर्षश्राद्ध वगैरे धार्मिक कृत्यं करण्याऐवजी मी शाळेसाठी काही चांगलं काम करायचं ठरवलं. आमचे दिवंगत वडीलही देवभोळे नव्हते, रुढी-परंपरांसाठी पैसा खर्चण्याऐवजी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा सामाजिक कार्याला देणगी देण्याला त्यांचं प्राधान्य असायचं. त्यामुळे पोलीस इन्स्पेक्टर असणाऱ्या आमच्या वडिलांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी मला हाच मार्ग योग्य वाटला.”




2015 च्या नोव्हेंबर महिन्यात मांजरी शाळेच्या कायापालटाचं काम सुरु झालं. यात भामरे सरांनी दिलेल्या 1 लाख 89 हजारातून शाळेची रंगरंगोटी, इमारत दुरुस्तीची काही कामे आणि गणितपेटीसारखे रचनावादी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात आले. हे काम मार्च 2016 मध्ये संपलं. मात्र शाळेला परिपूर्ण करण्यासाठी इतरही अनेक कामं करणं गरजेचं होतं. त्यासाठीचा वाटा शाळेतील इतर सहकारी शिक्षकांनी आणि मांजरी ग्रामपंचायतीने उचलला. शाळेतील सात शिक्षकांनी सुमारे एक लाख रुपयांचा निधी उभारला तर मांजरी ग्रामपंचायतीने वित्त आयोगाच्या निधीतून एक लाख रुपयांची देणगी शाळेला जाहीर केली. शाळेच्या शिक्षकांची सुरु असलेली धडपड पाहून ग्रामपंचायतीने स्वेच्छेने ही देणगी दिली.


 


जमा झालेल्या सुमारे चार लाख रुपयांतून मांजरी जिल्हा परिषद शाळेचा कायापालटच घडला. या शाळेत ज्ञानरचनावादी तळफळे चांगल्या दर्जाच्या ऑईलपेंटने रंगवून घेतलेले आहेत, मुलांना बसायला दर्जेदार बेंचेस, डिजिटल वर्गखोली आणि उत्तम स्वच्छतागृहांचीही सोय केलेली आहे. शाळेला आयएसओ नामांकन मिळण्यासाठीचा खर्च तत्कालीन केंद्रप्रमुख गायकवाड आणि विस्ताराधिकारी अलमले सर यांनी उचलला. त्याविषयी भामरे सर सांगतात, “शाळेच्या गुणवत्तेसाठी शिक्षक झटत असताना अधिकाऱ्यांनीही आनंदाने आपल्या खिशाला कात्री लावल्याचं कदाचित हे पहिलंच उदाहरण असेल. अधिकारी पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहिल्यानेच काम करायला आणखी उत्साह आला.”
मांजरी शाळेचा कायापालट झाल्यानंतर भामरे सर आता तंत्रज्ञान विषय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. ‘एज्युटेक लातूर’ नावाचे यू ट्यूब चॅनेल ते चालवतात. त्यात तंत्रज्ञानाचा अध्यापनात उपयोग कसा करुन घ्यावा, याचे छोटे-छोटे मार्गदर्शनपर व्हिडिओ आहेत. याशिवाय ‘स्टेप’ आणि ‘इ-कॅलेंडर’ ही दोन नवी अॅप त्यांनी 2017 साली लॉन्च केलेली आहेत. लातूरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या संकल्पनेतून ही अॅप्स विकसित करण्यात आली आहेत.
भामरे सरांनी विकसित केलेल्या या अॅप्सविषयी जाणून घेण्यासाठी क्लीक करा:https://bit.ly/2Chifw6

Friday 30 March 2018

एसटी वर्कशॉपमधली मेकॅनिक वर्षा

नगरच्या तारकपूर आगारात एसटी दुरुस्तीचं काम करताना एक मुलगी नजरेस पडते. वर्षा गाढवे गेल्या चार महिन्यांपासून ‘मोटार मेकॅनिक' म्हणून इथे काम करू लागली आहे. आत्तापर्यंत एसटीच्या वर्कशॉपमध्ये फक्त पुरुषच एसटी दुरुस्त करताना दिसायचे. आता हे बदललं.



परभणी जिल्ह्या्तलं पूर्णा हे वर्षाचं माहेर. तिचा एक भाऊ रिक्षा चालवतो, तर दुसरा आयटीआयचं शिक्षण घेत आहे. आई-वडील मोलमजुरी करतात. कधी वडीलही रिक्षा चालवतात. वर्षा बारावीला विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाली. त्यानंतर आदर्श शिक्षिका होण्याच्या आशेने तिने डीएड केलं. काही दिवस एका खाजगी शाळेत नोकरी केली, मात्र वेतन अपुरं. मग ती नोकरी सोडली. मार्च 2012 मध्ये औरंगाबादच्या संतोष गाढवे यांच्याशी तिचं लग्न झालं. संतोष औरंगाबादला आर्मी रिपोर्टीग कार्यालयात काम करतात. 



सासरे ब्रह्मदेव गाढवे, रिक्षाचालक यांना सुनेची शिकायची आवड आणि त्यासाठी चाललेली धडपड जाणवली. त्यांनीच पुढाकार घेऊन वर्षाला आटीआयमध्ये ‘इलेक्ट्रीकल मेकॅनिक’ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन दिला. शिकायचं तर स्वकमाईवर हे घरातल्यांनी सांगितलं. तेव्हा ती सासऱ्यांकडून रिक्षा चालवायला शिकली. आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण करतानाच तिने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएची पदवीही घेतली. ‘इलेक्ट्रीकल मेकॅनिक’ झाल्यावर वर्षाने औरंगाबाद एमआयडीसीत एका कंपनीत वर्षभर उमेदवारी केली. आणि आता एसटी वर्कशॉपमध्ये. वर्षा सांगते की इथले जुने-जाणते अनुभवी मोटार मेकॅनिक सहकार्य करतात. आगारप्रमुख अविनाश कल्हापुरे सांगतात की, वर्षा यांची कामाबाबत कोणतीच तक्रार नाही.
“महिलांनी सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पाऊल टाकलं पाहिजे. मला शिक्षणाला पाठबळ देण्यासोबत रिक्षा चालवण्याला, एसटी महामंडळात नोकरी करण्यासाठी आई-वडील, सासरे, पती यांनी पाठबळ दिलं. मीही जिद्दीने परिश्रम घेतले. त्यामुळे यशस्वी मोटार मेकॅनिक होता आलं”, असं वर्षा यांनी सांगितलं.

Wednesday 28 March 2018

रेशमाचा तलम स्पर्श गावाला झाला... अन्

जिल्हा वर्धा. इथून २५ किमीवरच्या झाडगावची ही गोष्ट. लोकसंख्या जेमतेम अडीच हजार. बाकी विदर्भाप्रमाणे इथला शेतकरीही कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा ही पारंपरिक पिकं घेणारा. नैसर्गिक आपत्तीने नैराश्य येणं हे स्वाभाविकच. यावर्षीही बोंडअळी आणि नंतर गारपीट झालीच. बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पण झाडगावचे शेतकरी यातून तरले. कारण होतं अर्थातच ‘बदल’. 
भोजराज भागडे या शेतकऱ्याने गावात पहिल्यांदा रेशीम शेतीचा प्रयोग केला. १२ वर्षांपूर्वी त्यांनी एक एकरात रेशीम शेती सुरु केली. इतर शेतक-यांनी भागडे यांना त्यावेळी वेड्यात काढलं. पण लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, त्यांनी आपलं काम चालू ठेवलं. सहा महिन्यातच, त्यांना दरमहा उत्पन्नाचा कायम स्वरूपी स्त्रोत निर्माण झाला. उत्पादित केलेले कोष त्यांनी कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये विकले. यातून फायदा दिसू लागल्यावर त्यांनी हळुहळू लागवड क्षेत्र वाढवलं. उन्हाळ्यातल्या पाण्याच्या कमतरतेवर त्यांनी, त्यांच्या परीने उपाय शोधला आहे. शेजारच्या शेतक-याकडून ते 10 हजार रुपयांचं पाणी विकत घेऊन रेशीम कोषाचं उत्पादन घेतात. भागडे यांची आता साडेचार एकरमध्ये तुतीची लागवड आहे. यातून ते आठ वेळा रेशीम कोष उत्पादन घेतात. एकावेळी 500 अंडीपुंज पासून सरासरी 3.50 क्विंटल उत्पादन एका महिन्यात मिळतं. एक क्विंटलला साधारणपणे 50 हजार रुपये भाव मिळतो. म्हणजे एक महिन्यात, सुमारे 1 लाख 75 हजार रुपये उत्पन्न आणि वर्षाला 14 लाख रुपये कमाई. रेशीम शेतीवर त्यांनी घर बांधलं आहे, चारचाकी गाडी घेतली आहे. त्यांची दोन्ही मुलं अभियांत्रिकीे शिक्षण घेत आहेत. “रेशीम शेतीमुळे माझं जीवनमान उंचावलं. आणि आता एखाद्या अधिकाऱ्यासारखी माझी जीवनशैली झाली आहे,” असं भागडे अभिमानाने सांगतात. रेशीम शेतीसाठी केलेल्या कामामुळे भागडे यांना राज्यशासनाकडून ‘रेशीम मित्र’ पुरस्कार मिळाला आहे. 

भागडे यांची प्रगती पाहून झाडगावातील इतर शेतकरी हळूहळू तुती लागवडीकडे वळू लागले आहेत. एकाचे दोन, दोनाचे चार करता करता, गावातील 20 शेतकरी रेशीम शेती करू लागले आहेत. कर्नाटकातील रामनगर येथे इथले कोष विक्रीसाठी जातात. तर कधी व्यापारी गावात येऊन कोष खरेदी करतात. यामुळे गावात 75 लाख ते 1 कोटी रुपयांची उलाढाल होते.
भागडे सांगतात, “तुती लागवड करण्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक आहे. एकदा तुती लागवड केली की 12 ते 15 वर्ष उत्पादनाची हमी असते. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून यासाठी अनुदान मिळतं. तीन वर्षात 2 लाख 90 हजार रुपये प्रति एकर अनुदान दिलं जातं. यामध्ये शेड बांधकाम आणि इतर साहित्य खरेदी आणि तुतीची बेणे दिली जातात. याशिवाय प्रत्येक पिकासाठी लागणारे अंडीपुंज खरेदी करण्यासाठी रेशीम विकास अधिकारी कार्यालयामार्फत 175 रुपये 100 अंडीपुंज प्रमाणे अनुदान दिलं जातं.
तुतीच्या वाढीसाठी सेंद्रिय खत पुरतं. त्यामुळे लागवड खर्च, खतं, फवारणी या खर्चातून सुटका. महिन्यातून आठ दिवस एक मजूर पुरेसा असल्यामुळे मजुरी खर्च कमी. विदर्भात उन्हाळ्याच्या कालावधीत तापमान जास्त असल्यामुळे एप्रिल, मे महिन्यात कोष उत्पादन करणं शक्य नाही. पण उर्वरित 10 महिने हे पीक चालू राहतं. कोणतंही जनावर तुती खात नाही. अळ्यांची विष्ठा खत म्हणून शेतात वापरता येते. शिवाय तुतीच्या काड्या जनावरे खातात. आणि या काड्यांचा कंपोस्ट खतासाठी चांगला उपयोग होतो”. 
रेशमाच्या तलम स्पर्शाने या गावात घडलेला बदल इथला शेतकरी आता बाकी जिल्ह्यात पोचवायला उत्सुक झाला आहे. मास्टर ट्रेनर म्हणूनही काहींनी काम सुरु केलं आहे. इतर जिल्ह्यात जाऊन ते तेथील शेतक-यांना तुतीच्या लागवडीपासून कोषनिर्मितीपर्यंतचं प्रशिक्षण देतात. यासाठी रेशीम कार्यालय त्यांना मानधन आणि प्रवास भत्ता देते. 
- सचिन मात्रे.

Monday 26 March 2018

या वाढदिवसाला ना पोस्टरबाजी, ना मेजवानी, ना डीजे, ना हारतुरे, ना अन्य कुठली भेटवस्तू.


राजकीय नेतेमंडळींच्या वाढदिवसाचा थाट आपल्या परिचयाचा असतो. पण आपल्या अनुयायांना विश्वासात घेत साधेपणे आणि त्यातही लोकहिताच्या कामाने वाढदिवस करणारे मोजकेही आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहाद्याचे नगराध्यक्ष वनश्री मोतीलाल पाटील, हे या मोजक्यांपैकीच. त्यांचा वाढदिवस अलिकडेच झाला. या वाढदिवसाला ना पोस्टरबाजी, ना मेजवानी, ना डीजे, ना हारतुरे, ना अन्य कुठली भेटवस्तू. भेटायला येणाऱ्यांना जी एक भेटवस्तू घेऊन यायला सांगितलं होतं, तेवढीच फक्त. त्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली आणि अवघ्या काही क्षणात हा संदेश वाऱ्यासारखा मित्रपरिवार आणि समर्थकांमध्ये पसरला. पाटील यांना भेटण्यासाठी रांगा लागल्या होत्या. भेट म्हणून आणलेली वह्यापुस्तकं खोलीभर झाली होती.
या भेट मिळालेल्या वह्यापुस्तकांमध्ये स्वतःची भर घालून शहरातल्या गोरगरीब मुलांना वाटण्याचा संकल्प पाटील यांनी केला. त्यानुसार शहादा नगरपालिका शाळेतल्या मुलांना दोनशेवर पुस्तक आणि एक हजारावर वह्या वाटण्यात आल्या आहेत. साधी राहणी, लोकांचा विचार करणारे , बुलेटवर फिरत सहज लोकांमध्ये वावरणारे पाटील लोकप्रिय नगराध्यक्ष आहेत. अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना नगरसेविका रिमा पवार यांनी मांडली . शुभेच्छारूपात मिळालेली ही वह्यापुस्तकं अनेक मुलांच्या जीवनात बदल घडवून आणणार आहेत.
मोतीलाल पाटील गेल्या दोन तपांपासून राजकारणात आहेत. नोव्हेंबर २०१६ मध्ये ते लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. नगरपालिकेच्या कामात त्यांनी पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. लोकांचं आरोग्य चांगलं राहील यासाठीच्या योजना राबवण्यावर त्यांचा विशेष भर असतो. त्यांच्या नदीनांगरणीच्या प्रयोगातून शहाद्यामध्ये पाण्यावर चांगलं काम उभं राहिलं आहे. २००० साली त्यांनी केलेल्या या प्रयोगामुळे नांदरखेडयाजवळून वाहणाऱ्या गोमाई नदीला जीवदान मिळालं होतं. १९७० मध्ये एमएससी (कृषी) झालेल्या पाटील यांनी शेती, कृषीपर्यटन, सहकार क्षेत्रात ठसा उमटवला आहे. 
- प्रशांत परदेशी.

१३ गृहिणींचा ‘टुगेदरनेस’

ठाण्यातल्या गृहिणी उज्ज्वला बागवाडे यांनी बीडमध्ये नागरगोजे दाम्पत्यानं ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या शांतिवन संस्थेला भेट दिली. तिथल्या दोन दिवसांच्या मुक्कामात उज्ज्वलाताईंना जाणवलं की संस्थेला अन्नधान्याची मोठीच चणचण आहे. ठाण्यातल्या मैत्रिणींशी या संदर्भात गप्पा मारतामारता धान्यबँकेची कल्पना सुचली आणि २ डिसेंबर २०१५ ला १३ मैत्रिणींनी मिळून We Together ग्रुप ची स्थापना झाली. ठाणे आणि कर्जतमधल्या या सख्यांनी प्रत्येकी चार सदस्य जोडत जोडत साखळी पद्धतीनं बँक विस्तारली. आज या बँकेचे सदस्य आहेत ४५०. शांतीवनासोबत श्रद्धा फाउंडेशन आणि सेवाश्रम या संस्थांनाही धान्यबँक मदत करते. आतापर्यंत धान्य बँकेने १६ हजार किलोपेक्षा जास्त धान्य संस्थांना पोहचवलं आहे. किमान ५ महिन्यांच्या अन्नधान्याची गरज यातून पूर्ण होत आहे. अन्नधान्याच्या गरजेची कायम काळजी घेतली जाईल हा विश्वास हा ग्रुप संस्थांना देतो. 
          
 धान्यबॅंके सदस्य प्रत्येकी एक किलो धान्य आणि जमल्यास स्वयंपाकाकरिता लागणारं इतर जिन्नस देतात. ज्यांना धान्य देता येणं जमत नाही, त्यांच्याकरता रोख रकमेचा पर्याय ठेवला आहे. जमा झालेल्या रकमेचंही धान्यच विकत घेऊन दिलं जातं. किमान ५० रुपये किंवा १ किलो धान्य अशी आखणी आहे. त्यामुळे सर्व थरातील लोकांना यात सहभागी होता येतं. उज्ज्वलाताईंच्या सोसायटीत घरकाम करणाऱ्या २ मैत्रिणीही या साखळीत आहेत. सभासदांना संस्थांकडून देणगीची पावती दिली जाते. दर तिमाहीतून एकदा या बँकेत धान्य आणि रोख रक्कम जमा करायची असते. साधारण आठवडाभराचा अवधी दिला जातो. मुख्य सभासद आपल्या साखळीतील लोकांना डिपॉझीट करण्याचा कालावधी कळवते. 
जमा झालेलं सर्व धान्य कर्जतच्या श्रद्धा फाऊंडेशनला दिलं जातं. जमा झालेल्या रक्कमेतून घाऊक बाजारातून संस्थांच्या गरजेनुसार धान्य, साबण आणि इतर जिन्नस खरेदी केले जातात. जमा रक्कमेतील 40 टक्के रक्कमेचं सामान श्रद्धा फाऊंडेशनला दिलं जातं. श्रद्धा फाऊंडेशनची गाडी येऊन त्यांचं सामान घेऊन जाते. शांतीवनाकरता अहमदनगरच्या एका होलसेल व्यापाऱ्याकडून सामानाची खरेदी करण्यात येते. शांतीवनाच्या वाट्याची 60 टक्के रक्कम किती आहे, हे त्यांना कळवण्यात येतं. त्या रकमेचं सामान संस्था आणते आणि मग धान्यबँक सामानाचे पैसे भरते .
दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी ‘We Together’ च्या तेरा जणी जमतात आणि बँक आणखी सक्षम कशी होईल यावर चर्चा करतात. उज्ज्वलाताई सांगतात, आपण फक्त गृहिणी आहोत. आपल्याला काही करता येणार नाही असा विचार कोणीही करू नये. गृहिणींच्याच पुढाकारामुळे या साखळीशी माणसं जोडली जात आहेत आणि कित्येकांच्या भुकेची सोय होत आहे. गेल्या दोन वर्षात कितीतरी गृहिणींना आपणही समाजासाठी काहीतरी करू शकतो, हा आत्मविश्वास या साखळीमुळे आला आहे.

-साधना तिप्पनाकजे.

Saturday 24 March 2018

केदारवाकडीची पोरं हुशार

जालन्यातील केदारवाकडीची जिल्हा परिषद शाळा. इथले कल्याण अंभोरे सर विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक आहेत. कारण आहे अंभोरे सरांची नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धत. आपल्या शाळेतील विद्यार्थी कोणत्याच विषयात मागे राहू नयेत यासाठी अंभोरे सरांची धडपड असते. प्रत्येक विषयासाठी काही ना काही नावीन्यपूर्ण साहित्य तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
गणितासारख्या विषयात केदारवाकडीची तिसरी- चौथीची मुलंही तरबेज झालेली आहेत. शाळेत ‘भास्कराचार्य गणित समृद्धीकरण’ या शिक्षण विभागाच्या उपक्रमाची साहित्य पेटीही आहे. या पेटीतील साहित्याच्या मदतीने विद्यार्थी वेगवेगळ्या गणिती क्रिया करतात. यातील एकमेकांना जोडता येणाऱ्या ठोकळ्यांच्या साहाय्याने विद्यार्थी आपण सांगितलेला अपूर्णांक तयार करून दाखवितात आणि तो लिहूनही दाखवतात. उदा. 5/10. या पेटीत असलेले भौमितिक आकार हातात घेऊन विद्यार्थी तो आकार ओळखतात. उदा. चौकोनाला चार कोन असतात, प्रत्येक कोन 90 अंशांचा असतो अशा प्रकारची गणिती माहितीही ते सांगू शकतात.
   मात्र या पेटीव्यतिरिक्त इतरही बरेच साहित्य अंभोरे सरांनी तयार केलेले आहे. त्यात मुख्य उल्लेख करायला हवा तो गणिती क्रियांच्या कार्डसचा, एकक- दशक कार्डसचा. अंभोरे सर म्हणतात, “गणित हा सरावानेच पक्का होणारा विषय आहे. अभ्यासात वेगळेपणा, रंजकता आणि सातत्य असेल तर विद्यार्थी गणिताला कंटाळत नाहीत हा माझा अनुभव आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे गणित करायला मिळाले पाहिजे असे मला वाटते. पाठ्यपुस्तकात दिलेली उदाहरणे मर्यादित असतात. फळ्यावर जरी उदाहरणे द्यायची ठरवली तरी फळ्याच्या जागेला मर्यादा असते, म्हणून मी ही बेरीज- वजाबाकी- गुणाकार- भागाकाराची कार्डस् तयार केली.”
सरांनी प्रत्येक गणिती क्रियेची किमान 100 वेगवेगळी कार्डस तयार केलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक विद्यार्थ्याला नवीन गणित करायला मिळतं आणि एकमेकांचं बघून गणित सोडविण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय सरांनी स्केचपेनने रंगांच्या विशिष्ट खुणा करून या कार्डमध्ये शतक, दशक, एककाचीही कार्ड बनविली आहेत. या कार्डच्या आधारे आणि आईस्क्रीमच्या काड्यांच्या आधारे विद्यार्थी वही पेन न वापरता गणितं तोंडी करु शकतात. उदा. 31 फुगे 4 विद्यार्थ्यांना वाटायचे आहेत तर प्रत्येकाला किती फुगे मिळतील आणि किती शिल्लक राहतील हे गणित विद्यार्थी काड्यांच्या सहाय्याने सोडवितो. तो दशकाच्या 3 काड्यांचे गठ्ठे आणि एककाची एक काडी घेऊन त्याचे चार विद्यार्थ्यांत समान हिस्से कसे करता येतील ते पाहतो. दशकाचा प्रत्येकी एक गठ्ठा चौघात वाटता येणार नाही हे लक्षात आलं की तो दशकाचा गठ्ठा सोडवून समान वाटणी करतो आणि प्रत्येकाला 7 फुगे मिळतील तर 3 फुगे शिल्लक राहतील असे उत्तर तोंडीच देऊ शकतो.
केदारवाकडीचे विद्यार्थी भागाकारच नव्हे तर गुणाकार, वजाबाकी आणि बेरजाही तोंडी करू शकतात. या शिवाय अंगणवाडी किंवा पहिलीच्या विद्यार्थ्यांना मुळाक्षरांची ओळख व्हावी म्हणून शब्दचित्र कार्डही तयार केलेली आहेत. ही चित्रं काढण्यात अंभोरे सरांना त्यांची कर्णबधीर मुलगी स्नेहा मदत करते. तिची चित्रकला सुंदर आहे आणि तिला मुलांच्या अभ्यासासाठी असे शैक्षणिक साहित्य तयार करायला खूप आवडते.
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आगळी सेवा

मुंबईत राहणाऱ्या एका विधवा आईचा मुलगा परेदशात राहत होता. वृध्दापकाळात घरी आईला सांभाळायला कोणीच नसल्याने अन्नवाचून आईचा तडफडून मृत्यू झाला. दीड वर्षाने मुलगा परतला. तेव्हा त्याला घरी आईच्या शरीराचा सांगाडा दिसला. ही घटना टीव्हीवर पाहिल्यानंतर बीड येथील रोटरी क्लबचे माजी असिस्टंट गव्हर्नर गिरीश क्षीरसागर, शिवशंकर कोरे यांचे हृदय हेलावले. अशी घटना आपल्या बीड शहरात घडू नये असं त्यांना वाटलं. आणि त्यातूनच अशा निराधारांसाठी काय करता येईल याचा विचार सुरु झाला.







परवानानगर येथील स्टेट बँक कॉलनीतील 20 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांनी या घटनेबद्दल सांगितलं. त्यासाठी अन्नछत्र सुरु करण्याची कल्पनाही त्यांनी मांडली. या कर्मचाऱ्यांनी हा विचार उचलून धरला. आणि रोटरी क्लबच्या मदतीने 25 जानेवारी 2018 रोजी निराधार वृद्धांसाठी अन्नछत्र सुरु झालं.
या गटाने बीड शहरात आधी सर्व्हे केला. त्यातून 50 निराधार, अपंग आणि वृद्धांची नावं पुढं आली. सध्या या 50 जणांना घरपोच दोनवेळचा डबा घरपोच पाठवला जात आहे. परवानानगर कॉलनीतील दत्त मंदिरातील प्रसादालयातून हे काम चालतं. याच कॉलनीतील गृहिणी स्वयंपाकासाठी स्वतःहून पुढं आल्या आहेत. या कामासाठी कोणतंही मानधनही त्या घेत नाहीत. त्यांना स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, अन्नधान्य, बीडमधील दानशूर लोक देत आहेत. खाजगी सुरक्षा रक्षक दिलीप जोशी हे सायकलवर फिरून जवळपास सर्व वृध्दांना दोन वेळचा डबा घरपोच देऊन खारीचा वाटा उचलत आहेत. पोळी, भाजी, भात असा रोज तर दर गुरूवारी डब्यात गोड पदार्थ दिला जातो. आता शहरात ज्यांच्या घरी वाढदिवस, मंगलकार्य असेल अशी कुटुंबंही अन्नछत्रास आर्थिक योगदान देऊ लागली आहेत.
“दत्त प्रसादालयातून बीडमधील भुकेल्या निराधारांना डबा दिला जात असून त्यांनी अन्न ग्रहण केल्यांनतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहूनच आम्हाला खरा आनंद मिळतो आहे,” असं सेवानिवृत्त बँक कर्मचारी शिवशंकर कोरे यांनी सांगितलं.
 दिनेश लिंबेकर, बीड

Thursday 22 March 2018

मरण सोपं, विधी अवघड, ३३ वर्षात १,४४२ जणांवर अंत्यसंस्कार

वाढत्या शहरीकरणाच्या प्रभावाने असेल, संकटकाळात धावून जाणाऱ्यांची, अंत्यसंस्कारात सहभागी होणार्‍यांची संख्या घटत असल्याचं दिसून येतं. अंत्यविधीची रीतही अनेकांना ज्ञात नाही. ‘मरणं सोपं, विधी अवघड’ अशी म्हण त्यावरून रूढ होत असावी. उस्मानाबादमध्ये मात्र अशा वेळेसाठी बाळासाहेब गोरे लोकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. एखाद्या दुर्घटनेत जखमी व्यक्तीचे मोबाईलमध्ये फोटो घेणारे शेकडो आढळतात. मात्र मदतीसाठी पुढं येणारे विरळाच. मृतदेहाला स्पर्श न करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. रिवाजानुसार अंत्यसंस्कारांचं ज्ञान असणाऱ्यांचा अभाव आहे. त्यामुळे विधीसाठी अडथळे येतात. हा अडथळा दूर करायचं काम बाळासाहेब वसंतराव गोरे यांनी सुरु केलं आहे. उस्मानाबाद नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात ते कर्मचारी म्हणून काम करतात. अंत्यसंस्काराच्या विधींना पुण्यकर्म मानत १९८४ पासून त्यांनी हे काम सुरु केलं. आज शहरात, कुठल्याही कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर नातेवाईक त्यांना फोन करतात. वेळ कुठलीही असो, बाळासाहेब घराबाहेर पडतात आणि पुण्यकर्मासाठी त्यांची धडपड सुरू होते. अंत्यविधीसाठी, तिसऱ्याच्या विधीसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी त्यांना तोंडपाठ असते. त्या त्या कुटुंबातल्या नातेवाइकाला सोबत घेऊन ते बाजारपेठ गाठतात. जाळण्यासाठी इंधन, तिसऱ्यासाठी लागणारे साहित्य घेऊन ते ठिकाणी पोहाेचतात. त्यांची ही सेवा शहरातल्या प्रतिष्ठितांपासून सामान्य कुटुंबांपर्यंत आहे. केवळ हिंदू नव्हे, तर ख्रिश्चन धर्मातल्या व्यक्तींवरही त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. आजवर ३३ वर्षात त्यांनी १,४४२ व्यक्तींचे अंत्यविधी केले आहेत.
तांबरी भागात त्यांचं घर आहे. जवळचं राहणाऱ्या उत्तमराव नलावडे यांना हे अंत्यसंस्काराचं काम करताना त्यांनी अनेकदा पाहिलं. आणि तेच त्यांच्या मनात घर करून राहिलं. त्यांचं हे काम बघूनच “मलाही अंत्यसंस्कारासाठी लोकांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली,’’ असं बाळासाहेब सांगतात
पूर्वाश्रमीचे खो-खोचे राष्ट्रीय खेळाडू ही, त्यांची आणखी एक ओळख. १९७४ साली त्यांनी दहावीत असताना भोपाळला पहिली राष्ट्रीय खो-खो स्पर्धा जिंकली होती. त्याबद्दल त्यांना तीन वर्षे शिष्यवृत्ती मिळाली. खेळातून शिष्यवृत्ती मिळविणारे बाळासाहेब जिल्ह्यातले पहिले खेळाडू आहेत. अडचणीच्या काळात धावून जाणारे बाळासाहेब गोरे यांच्या या सेवेचा उस्मानाबादकरांना हेवा वाटतो.

- चंद्रसेन देशमुख .

Monday 19 March 2018

अंधांसाठी वाचून दाखवणारं यंत्र

कोणाला तरी मदत होईल असं काम करण्याची बॉनी दवेची इच्छा होती. त्यातूनच टीसीएस फाऊंडेशनच्या डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर उपक्रमाशी तो जोडला गेला. दृष्टिबाधितांसाठी काहीतरी करून दाखवण्याची जबाबदारी त्यांच्या ग्रुपवर सोपवण्यात आली होती. नाशिकमध्ये काम करताना ते नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईंडच्या - नॅबच्या - पदाधिकाऱ्यांना भेटले. त्याचबरोबर नाशिक,मुंबई,अहमदाबाद, दिल्ली, फरीदाबाद, इथं सर्व वयोगटातल्या १०० हून अधिक दृष्टिबाधितांशी चर्चा केली. त्या दरम्यान त्यांची भेट मुंबईतल्या एका अंध कुटुंबाशी झाली. या कुटुंबातल्या सर्वसामान्य मुलाचा अभ्यास घेण्यासाठी पालक त्यांच्या मित्राकडून पुस्तकं वाचून रेकॉर्ड करून घेत. यातूनच बॉनी आणि त्याच्या मित्रांची संशोधनाची दिशा ठरली.
अंध व्यक्ती वाचनासाठी ऑडिओ आणि ब्रेल पुस्तकांवर अवलंबून असतात. या साधनांची मर्यादा लक्षात घेऊन बॉनी दवे, अक्षिता सचदेवा, अभिषेक बघेल, जय चकलासिया आणि निनाद नाईक या पाच जणांनी ग्रॅफाइट उपकरण तयार केलं आहे. हे ग्रॅफाइट उपकरण छापील मजकूर अचूकपणे चित्ररूपात कॅप्चर करून सहजरित्या वाचून दाखवतं. मजकूर उपकरणामध्ये स्कॅन करण्यासाठी कसाही ठेवला तरी ओसीआर तंत्रज्ञानाद्वारे ते अचूकपणे वाचतं. मजकूर स्कॅन केल्यावर तो क्लाऊडवरती सेव्ह केला जातो आणि मोबाइल अँपमधून पाहिजे तेव्हा ऐकता येतो. यासाठी, प्रत्येक वेळी उपकरण जवळ बाळगण्याची गरज नाही.
ग्रॅफाइटच्या निर्मितीचा प्रवास संयमाची परीक्षा पाहणारा होता. अजूनही त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सध्या नाशिकमध्ये राहणारा बॉनी सांगत होता. नॅबमध्ये त्या वेळी ‘सारा’ यंत्र होतं. त्याच्या मदतीनं केवळ इंग्रजी मजकुराचंच वाचन होतं. सारासाठी जवळपास दोन लाखाचा खर्च असतांना हे यंत्र केवळ ५० हजारात तयार झाल्याचं बॉनीने सांगितलं.
आता नॅब संकुलात या यंत्राचा वापर होत असल्याचा आनंद बॉनीने व्यक्त केला.
ग्रॅफाइटच्या मदतीनं सध्या इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतला मजकूर वाचता येतो. वाचण्याचा वेगही सोयीप्रमाणे कमी-जास्त करता येतो. हे उपकरण हुबेहूब मानवी आवाजाप्रमाणे मजकुराचं वाचन करतं. तसंच एकापेक्षा अधिक स्तंभ असलेल्या मजकुराचं वाचनही करता येतं. सहजपणे हाताळता येणारं हे उपकरण पोर्टेबल असून ते बॅकपॅकमध्येही ठेवता येतं. बॅटरी आणि वीज या दोन्हींच्या साहायानं वापरता येतं .
-प्राची उन्मेष

लातुरातील समानतेचे आगळे रक्षाबंधन



रक्षाबंधन म्हणजेच राखीपौर्णिमेचा सण आपल्याकडे पारंपरिक उत्साहात साजरा होता. यामध्ये बहीण- भावाला राखी बांधते, औक्षण करते, गोड- धोड मिठाई खाऊ घालते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून काहीतरी भेट देतो, शिवाय आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचनही देतो. पण आजच्या बदलत्या काळानुसार फक्त पुरूषांनी बायकांचे संरक्षण करावे, अशी परिस्थिती आता राहिली नाही. देशाच्या संरक्षणमंत्रीपदी एक स्त्री असताना, स्त्रिया कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. उलट बऱ्याचदा अचानक आलेल्या संकटाला अगदी सामान्य स्त्रीसुद्धा जास्त धीराने तोंड देते, हे आपण पाहतो. मग त्याही पुरूषांचे संरक्षण करू शकतातच की!“अगदी हाच विचार डोक्यात ठेवून गेल्या काही वर्षांपासून आम्ही लातूर तालुक्यात ‘कन्या सुरक्षा कवच’ अंतर्गत एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे आमच्या जिल्हा परिषद शाळेत एक वेगळी राखीपौर्णिमा साजरी होते. या रक्षाबंधनात मुली तर मुलांना राख्या बांधतातच पण मुलगेही मुलींना राख्या बांधतात. शिक्षक- शिक्षिका एकमेकांना राख्या बांधतात, मी जर एखाद्या शाळेला भेट दिली तर शिक्षक मलाही राख्या बांधतात, मी देखिल त्यांना राख्या बांधते. आपण सगळेजण एकमेकांना सांभाळूया, आनंदाने एकत्र राहूया आणि एकमेकांचे संरक्षण करूया असा संदेश आम्ही या राखीपौर्णिमेतून देतो.” लातूरच्या गटशिक्षणाधिकारी मा. तृप्ती अंधारे सांगत होत्या.2017 सालीही अंधारे मॅडम यांनी लातूर तालुक्यातील हरंगूळ आणि जेवळीच्या जिल्हा परिषद शाळांत ही अनोखी राखीपौर्णिमा साजरी केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी शाळेतील मुला- मुलींनी एकमेकांना राख्या बांधल्या. काही विद्यार्थ्यांनी तर शिक्षक – शिक्षिकांनाही राख्या बांधल्या. शिक्षक- शिक्षिकांनी एकमेकांना राख्या बांधल्या. शिवाय शिक्षकांनी अंधारे मॅडम यांना आणि अंधारे मॅडम यांनी शिक्षकांनाही राख्या बांधल्या. आनंदाची बाब म्हणजे या कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि इतर ग्रामस्थही सहभागी झाले होते. लातूर तालुक्यात सर्वत्रच या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले गेले. माटेफळच्या जिल्हापरिषद शाळेत तर मुख्याध्यापक पवार यांनी आधी सर्व सहकारी शिक्षिकांना राख्या बांधल्या.
 
 नेहमी भावाला राखी बांधणाऱ्या मुली आज आपल्या हातावरची राखी पाहून खुष झाल्या होत्या. समानतेचे आगळे रक्षाबंधन साजरे करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या अंधारे मॅडम म्हणाल्या “खरंतर राखीचा धागा फक्त निमित्त आहे. त्यानिमित्ताने आपणही कुणीतरी आहोत, आपल्याकडे ताकद आहे हा आत्मविश्वास मुलींमधे निर्माण होणे मला फार महत्त्वाचे वाटते. आपल्या संरक्षणासाठी आपण केवळ पुरूषांवर अवलंबून राहणे भ्याडपणाचे आहे, हे आम्ही मुलींना ‘कन्या सुरक्षा कवच’ उपक्रमातून शिकवतोच आहोत. त्यासाठी कराटे, तायक्वांदोसारख्या आत्मसंरक्षणाच्या कलाही त्यांना शिकवितो आहोत. आपण आपले संरक्षण करण्याइतके मजबूत झालेच पाहिजे, हे वारंवार मुलींच्या मनावर बिंबविण्यासाठी हे रक्षाबंधनाचे निमित्त!”
- स्नेहल बनसोडे-शेलुडकर

एक मूठ धान्य...

‘मैत्र मांदियाळी’ हा जालना शहरातील समाजोपयोगी उपक्रम आयोजणारा ग्रुप. ग्रुपची मदतीविषयी चर्चा चालायची, मदत कशी जमवायची याविषयी चर्चा चालायची, तेव्हा हे सगळं ग्रुपमधील काहींची लहान मुलंही ऐकायची. आपला चांगुलपणा, आपणही समाजाला काही देणं लागतो, त्यासाठी संघटीत होणं गरजेचं आह, हे सगळं या लहानग्यांचा मनात झिरपलं. आपणही काहीतरी करायला हवं, हे मुलांनी ठरवलं. पुन्हा एकदा मोठी मंडळी एकत्र जमली आणि त्याचं दिवशी बच्चेकंपनी शहरातील वृंदावन कॉलनी भागात जमली. 8 ते 14 वयोगटातील ही मुलं. प्रत्येकानं कॉलनीत फिरून मूठभर धान्य, एक वही, एक पेन आणि एक वस्तू जमा करायला सुरुवात केली. आदित्य किंगरे, नेहा, निकिता, कृष्णा, रुद्राक्ष, समीक्षा, ऋग्वेद मोहरीर, वैष्णवी, वीरेंद्र पाटील, शौनक कुलकर्णी अशी ही लहानगी. ही ‘ज्युनिअर मैत्र मांदियाळी’ आता सुट्टीच्या दिवशी सर्वजण एकत्र येते. भाग्यनगर, शिवनगर या भागातून त्यांनी ही मोहीम काढली. आणि चिल्लीपिल्ली गॅंगने गहू 125 किलो, तांदुळ 15 किलो, तूरडाळ 1 किलो, 2 साबण जमा केले आहेत.
‘एक अंधार संपला की दुसऱ्या अंधाराचा शोध घ्या आणि तिथे प्रकाश निर्माण करून नव्या अंधाराचा शोध घ्या.’ बाबा आमटे यांचं हे वाक्य. हेच मनात धरून जालना शहरातील मैत्र मांदियाळी हा ग्रुप काम करतो आहे. विशेष म्हणजे मुलांना ‘हे करा, ते करा’ असं न सांगताही प्रत्यक्ष कृतीतून याच वाटेवर आणलं आहे.
मैत्र मांदियाळी ग्रुप मुलांच्या शिक्षणासाठी मदत करतो, शैक्षणिक साहित्य, शाळा-कॉलेजची फी, हॉस्टेलचा खर्च ते कपड्यांपर्यंत मदत करीत आहे. ग्रुपमधील सदस्य अजय किंगरे यांच्यासह इतरही सदस्यांच्या घरी सहकुटुंब जमतात, चर्चा होतात, गरजू व्यक्तींपर्यंत मदत पोहोचवण्याची योजना आखतात. हेच सगळं मुलांच्या कानावर पडत गेलं.
नुकतंच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे ही लहान मंडळी गेली असता ‘मोबाईलमधून बाहेर पडून तुम्ही हे चांगलं काम करत आहात’ अशी शाब्बासकी देत त्यांनी मुलांचं कौतुक केलं. आणि 100 किलो गहू दिला. या गँगच्या पाठीवर पडलेली ही शाब्बासकीची पहिली थाप!
या लहानग्यांनी आतापर्यंत एकूण 285 किलो गहू,115 किलो तांदूळ, 7 किलो तूरडाळ, 3 किलो मीठ, 8 पेन, 7 वह्या, 14 साबण आणि 5 शाम्पू पुड्या जमा केल्या आहेत. मदत जमा करण्याचे हे कार्य अजूनही चालू आहेच.
मैत्र मांदियाळीने एवढंच केलं की, प्रत्येक कार्यक्रमात मुलांना सोबत घेतलं. त्यांना ‘प्रश्नचिन्ह’ या फासेपारधी समाजाच्या मुलांच्या शाळेत व ‘शांतीवन’ अनाथालयात शिबिरात पाठवलं आणि हेमलकसा येथेही नेलं.
आता ही मुलं पूर्ण जालना शहरातील घराघरात जाणार आहेत. हे सर्व धान्य ‘प्रश्नचिन्ह’ या फासेपारधी समाजाच्या मुलांच्या शाळेला पाठवणार आहेत.
मुलं मोठ्यांचं अनुकरण करतातच. मोबाईलच्या विश्वात रमण्याच्या या काळात मोठ्यांच्या सामाजकार्याचं अनुकरण ही लहानगी करू लागलीत हे विशेष. 

 - अनंत साळी.

Thursday 15 March 2018

सलूनमधून समाजसेवा

शरद सुरुशे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीत, बस स्थानकाजवळ सलून चालवतो. शिक्षण फारसं नाही. पण वंशपरंपरागत व्यवसाय हाताशी आहे हीच काय ती जमेची बाजू. दोन भावांना सोबत घेऊन सध्या शरदचा हा छोटासा व्यवसाय सुरु आहे. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या अर्थप्राप्तीतूनही त्याला आपण समाजोपयोगी काही करावं असं वाटू लागलं.
१२ जानेवारी २०१६ रोजी त्याला कन्यारत्न प्राप्त झालं. आणि त्याला समाजकार्याचा मार्ग सापडला. १२ जानेवारी हा राजमाता जिजाऊंचा जन्म दिवस. मुलीच्या जन्माचं स्वागत त्याने मोठया आनंदात केलंच. पण, इतरांनाही मुलीच्या जन्माचं स्वागत करायला शिकवलं.शरदच्या मुलीचं नाव 'सान्वी'. तिच्या जन्माप्रित्यर्थ त्याने अनेक उप्रकम सुरु केले. कुणालाही मुलगी झाल्यास, त्या मुलीच्या वडिलांची दाढी-कटिंग तो तीन महिने मोफत करतो. मुलीच्या आईवडिलांचा सत्कार करतो. त्या मुलीचं जावळही मोफत काढतो. शासनाच्या सुकन्या योजनेत स्वतःचे १०१ रुपये टाकून खाते उघडून देतो. सान्वीच्या वाढदिवसाला गरीब, गरजू मुलांना शालेय साहित्य आणि गणवेश वाटप करतो. शरदने चक्क, ‘शिवरत्न जिवाजी महाले सान्वी आधार योजना’च सुरू केली आहे. धान्य गोळा करून गरीब, गरजूंना वाटप, उन्हाळ्याच्या दिवसात स्वखर्चाने चार महिने पाणपोयी चालवणं वगैरे.
शरदच्या या समाजकार्याची दखल आता अनेक संस्थानी घेतली असून त्याला विविध पुरस्कारही मिळाले आहेत. छोटंसं सलून चालविणाऱ्या शरद सुरुशेचं काम आणि त्यामागचा विचार पाहून लोक भारावतात. ‘मेरी बेटी मेरी पहचान’, ‘बेटी बचाओ...बेटी पढाओ’ या घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी, कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहणाऱ्या शरद सुरूशे याचं काम चकित करणारं, प्रेरणा देणारं.

 - गजानन थळपते.

Tuesday 13 March 2018

आधी खावे मग सांगावे


कळसूबाईच्या पायथ्याशी असलेलं बारी गाव. तिथे राहणारे घोडे बंधू , पोपट आणि बाळू. त्यांची ७-८ एकर जमीन. भात हे मुख्य पीक. पाऊस भरपूर. पण जमिनीची सुपीकता कमी होत होती. संकरित बियाणं आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा कस कमी होत असल्याचं बाळू यांच्या लक्षात आलं. रासायनिक खतांचा वापर शरीरासाठी घातक असल्याचंही समजलं. मग दोन्ही भावांनी विचार करून पारंपरिक शेतीचा निर्णय घेतला. गांडूळखत , शेणखत वापरून तांदूळ, नाचणी, वरई, ज्वारी, डाळी, कडधान्य अशी पिकं आता ते घेतात. 'आधी खावे मग सांगावे' या तत्त्वाला अनुसरत त्यांनी हे धान्य आधी आपल्या घरात वापरलं. त्याचे चांगले परिणाम जाणवू लागल्यानंतर, ते लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. आपल्या शेतात पिकणाऱ्या धान्यापासून पौष्टिक आणि चवदार पदार्थ तयार करण्यासाठी घोडे बंधूंनी अलीकडेच गावात कळसूबाई महिला गट स्थापन केला आहे. ज्वारीची शेव, नाचणी आणि ज्वारीच्या शेवया, नाचणीचे पापड, नाचणीची बिस्किटं असे पदार्थ हा गट तयार करतो.
                                                              रक्तवाढीसाठी उपयुक्त असा तामकुडा आणि मधुमेह असणाऱ्यांसाठी काळा भात ही त्यांच्या शेतीची वैशिट्यं. यापासून त्यांना वार्षिक ९०हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं.
पारंपारिक शेतीसोबतच, पारंपारिक जातीच्या गायीचं जतनही घोडे बंधू करत आहेत. भारतीय जातीच्या ३२ गायी त्यांच्याकडे आहेत. त्यापासून वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं. पारंपरिक पद्धतीत सध्या तुलनेनं उत्पन्न कमी आहे. ते वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दूरगामी विचार करता हीच पद्धत योग्य ठरेल असं त्यांना वाटतं. शिवाय मुंबईतल्या सामान्य नोकरीपेक्षा हे उत्पन्न नक्कीच अधिक आहे, असं ते सांगतात. काही काळ त्यांनी मुंबईतही नोकरी करून पाहिली. मात्र २००६ पासून पुन्हा शेती करण्चाया निर्णय त्यांनी घेतला.
घोडे बंधू सेंद्रिय शेतीचा प्रचारही करतात. नागपूरमधला बीजमहोत्सव , पुण्यातली भीमथडी जत्रा आणि स्वतःच्या बारी गावामधल्या मिलेट फेस्टिवलला येणाऱ्या पर्यटकांना पारंपरिक शेतीचं महत्त्व घोडे बंधू पटवून देतात. 

 -विजय भोईर

Monday 12 March 2018

विज्ञानप्रसारक बापमाणूस

एकुलती एक गुणी मुलगी कविता. तिला रक्ताचा कर्करोग झालेला. तिचं कोमात जाणं. महिनोन् महिने चालणारे उपचार. या मुलीचा बाप डॉ शंभुनाथ कहाळेकर, तंत्रग्राम संकल्पनेचे जनक. विज्ञानप्रसारक म्हणून सर्वपरिचित झालेले. त्यांच्या लेकीचा आजार सुरू झाला १९९२ साली. ती आजारातून बरीही झाली. तेव्हा तिचं लग्न झालं. शंभुनाथांना नातही झाली. पण नंतर कविताचा आजार बळावला. या सर्व काळात या दुःखी, व्यथित बापाने मन गुंतवण्यासाठी विज्ञानप्रसाराचा मार्ग शोधला.
गेल्या २५ वर्षात विज्ञानरंजनाचे तीन हजार प्रयोग, 



विज्ञानेश्वरी,विज्ञानबोध,विज्ञानवेध,विज्ञानगीता,विज्ञानपुराण,विज्ञानकविता, वीजविज्ञान, खेड्यासाठी विज्ञान, घर पहावं बांधून,विज्ञानातील गमतीजमती,वैद्यकीय उपकरणे हे त्यांच्या नावावर जमा आहे.अलिकडे विज्ञानरंजन आणि तंत्रग्राम प्रदर्शन असा कार्यक्रम ते करतात. विज्ञानाच्या अनेक गंमतीजमती, छोट्या प्रयोगातून विज्ञान समजून देणं, भोंदूगिरीवर आघात आणि रोजगारमार्गदर्शन असा हा कार्यक्रम. सारं विनामूल्य.
       पाचपाचशे घरं असलेली, निवघा बाजार आणि चीमेगाव ही त्यांनी केलेली नांदेड जिल्ह्यातली तन्त्रग्रामं. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना 20 लाखाचा निधी दिला. या कामात त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी, आमदार डी.पी सावंत यांचं मोलाचं सहकार्य झालं. इथे महिलांना पाचशे रुपये भांडवलावर निर्धूर चूल बनविण्याचं तंत्र शिकविण्यात आलं. त्यावर या महिलांची पोटापुरती कमाई होते. महिलांना कचऱ्यापासून कोळसा बनविण्याची यंत्रंदेखील देण्यात आली आहेत. तंत्रज्ञानाधारित असे शंभर उद्योग करायला कहाळेकर मार्गदर्शन करतात.
कहाळा गावी जन्मलेले डॉ शंभुनाथ कहाळेकर. १९७७ मध्ये आयआयटी, खरगपूरहून एमटेक पदवी, टाटा कन्सल्टिंगमध्ये काही वर्ष नोकरी, १९८७ पासून नांदेडच्या एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकी, पीएचडी मार्गदर्शक, मराठी विज्ञान परिषदेचे सक्रीय सदस्य, आहेत. विज्ञानप्रसाराच्या कार्यासाठी आणि पुस्तकलेखनासाठी पुरस्कार ही त्यांची ओळख. कहाळेकरांची मुलगी कविता आज हयात नाही. २०१७ मध्ये ३६व्या वर्षीच तिचं निधन झालं. नात कीर्ती आणि पत्नी सुनीता यांच्या मदतीने ते दुःखातून बाहेर पडत आहेत. आज वयाच्या ६६ व्या वर्षीही विज्ञान तंत्रज्ञानप्रसाराचं त्यांचं कार्य सातत्याने सुरूच आहे.

- सु.मा. कुळकर्णी.

Saturday 10 March 2018

बँक ऑफ न्यूयॉर्कने दखल घेतलेली जि.प. शाळा!!

पुण्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सहज टॅब आणि संगणक हाताळतात. तुम्हांला वाचून आश्चर्य वाटेल पण संपूर्ण शाळेत वायफाय आहे. शाळेत इ-लर्निंग आहे. मुलांना संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यासाला पूरक असे व्हिडिओ, गाणी, सोपे शैक्षणिक खेळ असं बरंच काही हाताळायला मिळतं. विशेष म्हणजे ही शाळा विजेसाठी ‘महावितरण’वर अवलंबून नाही. इतर खेड्यांप्रमाणे वाबळेवाडीलाही भारनियमनाच्या संकटाने ग्रासलेलं होतं. शाळा डिजिटल हवी तर वीज हवीच. त्यामुळे यावर उपाय म्हणून शाळेने सौरउर्जेचा वापर करून घ्यायचे ठरवले. आज ही शाळा स्वत:ची विजेची संपूर्ण गरज स्वत:हून भागविते. इतकंच नाही तर, वाबळेवाडी गावातील काही पथदिव्यांनाही वीज पुरविते. हे कामही ग्रामस्थांच्या मदतीने उभं केल्याचं वारे सर नम्रपणे सांगतात.आम्हांला वाटत होते, शाळा जवळपास पूर्ण पाहून झाली, पण सर्वात महत्त्वाचे आश्चर्य तर बाकीच होते. वारे सरांनी आम्हांला शाळेच्या मागील भागात नेले. तिथं एक वेगळंच बांधकाम उभारताना दिसले. या बांधकामाविषयी वारे सर म्हणाले, “येत्या शैक्षणिक वर्षात आमच्या विद्यार्थ्यांसाठी हे सरप्राईज असेल. बहुतांश मुलांना शाळेच्या चार भिंतीत शिकायला नको वाटतं, त्यांना मोकळ्या हवेत, बाहेरची गंमत- जंमत बघत शिकायचं असतं. माझ्या विद्यार्थ्यांनीही अशीच भरपूर सूर्यप्रकाश, वारा आणि मोठ्या खिडक्या असलेल्या शाळेची मागणी केली होती, ती आम्ही पूर्ण करतोय.”

                                                                       वारे सरांच्या बोलण्यातून कळलं की शाळेची जागा कमी पडत असल्याने शाळेला लागून असलेली मागची काही एकर जमीन गावकऱ्यांनी एकमताने शाळेला दान केलेली आहे. या जागेवर विद्यार्थ्यांच्या मनातील शाळा उभारण्याचं काम सुरु आहे आणि त्या कामाकरिता आर्थिक मदत देतेय ती- बँक ऑफ न्यूयॉर्क!! होय, वाबळेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेची कीर्ती ‘बँक ऑफ न्यूयॉर्क’पर्यंत पोहोचली आणि त्यांनी स्वत:हून आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. या बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या मदतीतून शाळेची पर्यावरणपूरक इमारत उभी राहतेय. या वर्गांच्या भिंती म्हणजे पूर्ण काचेच्या, सरकत्या खिडक्या असणार आहेत. वर्गात पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा येणार आहे. पावसाचे पाणी साठविण्यासाठी प्रत्येक वर्गाखाली सुमारे 30 हजार लीटरची मोठी टाकी उभारून जलपुनर्भरण करण्याचं नियोजन आहे आणि अर्थात सौरउर्जेचा वापर तर होणारच आहे!!
इथल्या एका विद्यार्थिनीने तेलाच्या जुन्या डब्यापासून इकोफ्रेंडली ‘हँडवॉश स्टेशन’ उभारले आहे. ग्रामीण भागातील पाण्याच्या टंचाईतसुद्धा स्वच्छतेचा आग्रह धरणारा हा आगळा उपक्रम आहे. पूर्वी पाण्याच्या टाकीद्वारे हात धुवायला लागणारे 200 लीटर पाणी आता केवळ 50 लीटरवर आले आहे, शिवाय स्वच्छतेसाठी राख आणि निंबोणीपासून विद्यार्थ्यांनी बनविलेला साबणही आहे.
शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे सरांना 2016 साली ‘राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार’ही मिळालेला आहे. अगदी साध्या वेशातील वारे सरांनी ही जिल्हा परिषद शाळा अशाप्रकारे बदलली आहे की अनेक पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून काढून विद्यार्थ्यांना वाबळेवाडीच्या आयएसओ शाळेत दाखल करीत आहेत. आम्ही गेलो तेव्हा शाळेत प्रवेशासाठी रांगा लागलेल्या होत्या, हे वेगळं सांगायला नकोच!!

- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

Friday 9 March 2018

भारतीय आईनस्टाइन अजिंक्य !




आईनस्टाइन! ज्याच्या नावावर तब्बल साडेतीन हजार पेटंट आहेत. असं म्हणतात की, आईनस्टाइननंतर त्याच्या बुध्यांकाची बरोबरी करणारा अजून तरी कुणीही भूतलावर अवतरला नाही. पण, यवतमाळच्या अजिंक्यचा प्रवास या दिशेने सुरू आहे. संशोधनाच्या विश्वात, ‘इनमॅच्युअर एज’ अर्थात, वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत आईनस्टाइनच्या नावावर 15 पेटंट रजिस्टर्ड होते. यवतमाळच्या अजिंक्य रवींद्र कोत्तावार या मॅकेनिकल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याच्या नावावर वयाच्या 25 व्या वर्षी तब्बल 12 पेटंट रजिस्टर्ड झाली होतीे. वयाच्या 25 व्या वर्षापूर्वी मला आईनस्टाइनच्या विक्रमाबद्दल माहीत असतं, तर मी निश्चित 15 पेटंटचा आकडा पार केला असता, पण आता वेळ निघून गेली आहे, असं अजिंक्य सांगतो.
                                  

 अजिंक्यची घरची परिस्थिती जेमतेम. त्याने यवतमाळमधूनच मॅकेनिकल अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. शाळेपासूनच त्याला विविध प्रयोग करून पाहायची हौस. अभियांत्रिकीमुळे त्याला अधिकच चालना मिळाली. सध्या अजिंक्य 26 वर्षांचा असून त्याच्या नावावर 17 पेटंट रजिस्टर्ड आहेत. 26 वर्षाच्या वयात भारतातील सर्वाधिक पेटंट रजिस्टर्ड करणारा तरूण म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्याची दखल घेतली आहे. आयपी इंडिया अर्थात इंटिल्यॅक्चुअल प्रॉपर्टी ऑफ इंडिया या संकेतस्थळावर
अजिंक्यच्या सर्व पेटंटची माहिती बघायला मिळते. आयपी इंडियावर नोंदणी झाल्याशिवाय कोणत्याही संशोधनासाठी पेटंट मिळत नाही, असं अजिंक्य सांगतो. डिसेंबर 2017 मध्ये झी युवा वाहिनीतर्फे ‘यंग इंडियन सायंटिस्ट’ हा सन्मान देऊन अजिंक्यचा गौरव करण्यात आला. पद्मश्री डॉ. विजय भटकर यांच्या समवेत अजिंक्य सध्या एज्युकेशन सिस्टीमवर काम करीत आहे. विद्यार्थ्यांना प्रक्टीकल लर्निंगवर भर देऊन शिक्षणपद्धती विकसित करण्यासाठी त्याचे सध्याचे संशोधन सुरू आहे. त्याने दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्याक्रम तयार केला आहे. विद्यार्थी प्रात्यक्षिकातून धडे गिरवतील अशी विविध 500 मॉडेल्स त्याने तयार केलीे आहेत.
आसाममधील सिलचर इथल्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी इथे त्याने उच्च शिक्षण घेतलं. तिथे चहाच्या बागांमध्ये फिरताना, त्याने चहाच्या झाडांची फेकून दिलेली पानं बघितली. त्या पानांपासून त्याने बायो डिझेल तयार केलं. त्याचं हे संशोधन तिथल्या पेट्रोलियम लॉबीने पूर्णत्वास जाऊ दिलं नाही. शेवटी, त्रासामुळे आसाम सोडून यावं लागलं, असं तो सांगतो. असाच वाईट अनुभव ‘डिजिटल बायोमेट्रिक वोटिंग सिस्टम’च्या संशोधनादरम्यान त्याला आला. पारदर्शी मतदानप्रक्रिया या विषयात त्याने प्रात्यक्षिकासह हे वोटिंग सिस्टम मॉडेल तयार केलं. अगदी पीएमओ कार्यालयापर्यंत याबाबत पत्रव्यवहार केला. सुरूवातीला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या पीएमओ कार्यालयाने नंतर मात्र हे प्रात्यक्षिक बघण्यास नकार देऊन अशा संशोधनाच्या भागनगडीत पडूच नको, असा संदेश अप्रत्यक्षपणे दिला, अशी खंत अजिंक्यने व्यक्त केली.
2013 मध्ये, अजिंक्यने तयार केलेलं वाहनाची कार्यक्षमता वाढविणारं इंजिन, हे त्याचं पहिले संशोधन. या पेटंटची नोंदणी झाल्यानंतर गेल्या पाच वर्षात भारतातील सर्वाधिक पेटंट दाखल करणारा तरूण म्हणून अजिंक्यची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. त्यानंतर त्याने पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या मल्टिफ्युअल वाहनाचं - केवळ एक स्वीच बदलून वाहन पेट्रोल किंवा डिझेलवर चालू शकेल- असं संशोधन केलं. सध्या एक नामांकित मोटरकंपनी अजिंक्यला घेऊन या संशोधनावर काम करत आहे. अपघाताची सूचना देणारी दुचाकी, ॲनिमल रिप्लाइंट, मुलांसाठी गेमिंग झोन असलेला दरवाजा, पोर्टेबल एअर मोबाईल चार्जर, आरओ वॉटर बॉटल अशा अनेक संशोधनांची पेटंट्स त्याने मिळवली आहेत. अत्यंत दूषित पाणी एका बॉटलमध्ये टाकल्यानंतर केवळ चार वेळा हलवून ते आरओ पाण्याप्रमाणे शुद्ध होईल, अशी बॉटल त्याने तयार केली आहे. ही बॉटल अत्यंत कमी पैशात सर्वसामान्यांना विकत घेता यावी, यासाठी भविष्यात स्वत:चं प्रॉडक्ट तयार करण्याची त्याची तयारी सुरू आहे. नामांकित कंपन्यांकडून त्याला उच्चपदाच्या नोकरीच्या संधी येत आहे. मात्र आपल्याला लोकांसाठी काम करायचं आहे. या संशोधनाचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांना व्हावा यासाठी माझे प्रयत्न आहेत, असे अजिंक्य अभिमानाने सांगतो.

-नितीन पखाले.

शालूपाशी प्रचंड ऊर्जा आहे. आणि तिची ऊर्जा संसर्गजन्य आहे.

 २००४ सालची ही गोष्ट. शालू तिच्या कामाचा भाग आणि विभाग म्हणून तिकडे गेली आणि चक्क नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडली. तिने परोपरीने विनवण्या केल्या. सत्य सांगितलं. तरीही उपयोग झाला नाही. शालूला पूर्ण दिवसभर दोरखंडांनी बांधून ठेवलं गेलं. तिच्या सर्व साहित्याची तपासणी केली गेली. ज्यांच्या तावडीत ती सापडली, त्यांनी, शालूने सांगितलेल्या सर्व तपशिलांची तिच्या कारंजा या गावी जाऊन खातरजमा केली, माहिती घेतली. ती पोलिसांची खबरी नाही, याबाबत पक्की खात्री पटली, तेव्हाच आणि पुन्हा त्या वस्तीत फिरकणार नाही, अशी तिच्याकडून कबुली घेऊनच तिची सुटका केली. शालू साखरे नुकतीच माविममध्ये सहयोगिनी म्हणून काम करू लागली होती आणि हा भयंकर अनुभव तिने घेतला. या अनुभवानंतर, तिने घाबरून काम नको, म्हटलं असतं, कामाचा विभाग बदलून मागितला असता किंवा काम सोडलंच असतं, तरी ते समजण्यासारखं होतं. पण यातलं तिने काहीएक केलं नाही. शालू या प्रसंगानेदेखील डगमगली नाही. तिने हाती घेतलेलं काम थांबवलं नाही.
                                                                  गोंदिया जिल्ह्याच्या ज्या भागात शालू काम करते, तिथे जंगल आहे. रस्ते नाहीत. अन्य सुविधाही नाहीत. लोकांची बोलीभाषा प्रत्येक वस्तीत वेगवेगळी. कमी आणि अर्धवट शिक्षण, रूढी परंपरांमुळे अनेक चुकीच्या समजुती घट्ट बनून लोकांच्या मनांत रुतून बसलेल्या. नक्षलवादी किंवा प्रशासकीय अधिकारी यांचा आपल्या जगण्यात, दिनक्रमात, गावात आणि घरातही, कधीही हस्तक्षेप होईल, असं वातावरण. अशा ठिकाणी, तिथल्या आदिवासी महिलांपर्यंत आणि अन्य महिलांपर्यंतही पोचणं शालूसाठी फार जिकिरीचं होतं. पण या सर्व प्रतिकूलतेवर मात करत शालूने, आज तिथल्या हजारो महिलांशी संपर्क साधून त्यांना लघुव्यावसायिक होण्याइतपत प्रशिक्षित केलंय.
आता, शेळीपालन, मत्स्यपालन यासारख्या योजनांत तिथल्या महिलांचा सहभाग वाढला आहे, सर्व बाबतीत मागास असणाऱ्या या आदिवासींना, गोंदिया जिल्ह्यातल्या महिलांना मुख्य प्रवाहाशी जोडताना शालूने काय केलं नाही? तिने त्यांची गोंडी भाषा शिकून घेतली. मध्यप्रदेशाच्या सीमेलगतच्या या भागात काही लोक छत्तीसगढी भाषाही वापरतात. हे लक्षात आलं आणि तीही भाषा तिनं आत्मसात केली. शिवाय लोधी, गुजराती, मराठी, हिंदी, इंग्रजी मिळून एकूण सात भाषा शालूला लिहायला, बोलायला आणि वाचायला येतात.
महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी माविमच्या अनेक योजना आहेत. या सर्वच उपक्रमांत शालू विविध पातळीवरचं सर्व प्रकारचं काम करत गेली. स्वतःला झोकून देत काम करण्याचा तिचा स्वभाव. स्वभावाला अनुसरून ती कामं करत गेली. २०१०साली शालूची पदोन्नती झाली. ती आता सीएमआरसी व्यवस्थापक आहे. तिच्या आणि अर्थात माविमच्या या कामाचा पसारा गोंदिया जिल्ह्यात मुख्यत्वे, ५८गावं आणि २८ग्रामसंस्थांमध्ये पसरलेला आहे. हे काम सहारा लोकसंचालित साधनकेंद्रातर्गत चालतं. शालू आणि तिच्या सहकाऱ्यांचं हे काम सालेकसासह आसपासची अनेक गावं आणि जिल्हे इथेही चालतं.
अगदी कठीण भागात आणि सामान्यातल्या सामान्य शेतकरी महिलांपर्यंत शालूची पोच आहे, त्यामुळे खऱ्या गरजू व्यक्तींना माविमच्या या प्रशिक्षणाचा, सुविधांचा फायदा मिळू शकला आहे. माविमच्या एका योजनेत प्रत्येक गावाला तीन लाख रुपये रक्कम मदतनिधी किंवा कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे महिलांना शेळीपालन, इतर घरगुती व्यवसाय आणि तशाच प्रकारच्या व्यवसायउभारणीसाठी भांडवल मिळतं. भांडवलाची सोय झाली की पुढच्या कामाला बळ मिळतं. वेळोवेळी विविध गटांना ही मदत मिळावी, म्हणून शालू सतत धडपडत असते.
शालूच्या कार्यक्षेत्रातली ही घटना बोलकी आहे. अर्चना कुटे या महिलेने आंतरजातीय लग्न केलेलं. लग्नानंतर तिला दोन मुली झाल्या आणि काही काळातच तिच्या पतीचं अकाली निधन झालं. दोन्ही घरच्यांच्या विरोधात हे लग्न झाल्यामुळे संकटग्रस्त अर्चनाला तिच्या नातेवाईकांपैकी कुणाचाच आधार नव्हता. मात्र, आमगावच्या ‘साही महिला बचत गटा’चा आणि सहारा लोकसंचालित साधन केंद्र, सालेकसाचा तिला खूप आधार मिळाला. त्यामुळे तिला व्यवसायासाठी माविमकडून चांगलं अडीच लाख रकमेचं कर्ज मिळू शकलं. त्यातून तिने कपड्याचं दुकान टाकलं. आज तिने स्वतःचं घर बांधलं आहे. ती मुलींसह नीट राहते आहे. मुलींना चांगले शिक्षण देऊ शकते आहे. “महिलांना असे मजबूत उभं करताना, त्यांच्या स्थिर होतानाच्या या प्रवासात खूप शक्ती मिळते. त्यामुळे कितीही काम केलं, तरी मी थकत नाही", शालू म्हणते. असं समाधानाचं काम करण्याची संधी दिल्याबद्दल माविमविषयी खूप कृतज्ञता वाटत असल्याचं सांगते.
शालू तिच्या पाच बहिणींमध्ये दुसरी. तिची एक बहीण पोलीस तर एक माविम सहयोगिनीच आहे. भाऊ खाजगी नोकरीत आहे. शालूचे आईवडील मोलमजुरी करणारे. मग शालूनेच घराची जबाबदारी घेऊन सर्वांना शिकायला मदत केली. आधीचं राहतं घर मातीचं होतं. तिने तेही चांगलं पक्कं बांधून घेतलं. गायन, नृत्य, कवितांची शालूला आवड आहे. या एवढ्या व्यापातही शालूने राज्यशास्त्र विषय घेऊन एमए पूर्ण केलं. या सगळ्यात तिचं लग्न जरी मागे पडलं असलं, तरी तिचा संसार मात्र खूप मोठा आहे. शालूपाशी प्रचंड ऊर्जा आहे. आणि तिची ऊर्जा संसर्गजन्य आहे.
- गीतांजली रणशूर

Tuesday 6 March 2018

जिद्द आणि फक्त जिद्दच


भंडाऱ्यातल्या किटाडी या खेड्यात राहणारा, खेळांची आवड असणारा, योगेश्वर रवींद्र घाटबांधे. पोलिओमुळे अपंगत्व आलं. मात्र, त्याने खेळण्याची जिद्द सोडली नाही. गेल्या महिन्यात अपंगाच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धा पुण्यात झाल्या. त्यात योगेश्वरने एफ-56 गटात भालाफेक, थाळीफेक आणि गोळाफेक स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं ते केवळ जिद्दीच्या बळावर. ही काही त्यांची पहिलीच पदकं नाहीत. राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत एकूण ४५ पदकं त्यांनी आतापर्यंत मिळवली आहेत. यात १७ सुवर्ण, १५ रौप्य आणि १३ कांस्य पदकं आहेत. नागपूरच्या विरजा अपंग प्रशिक्षण संस्थेच्या, स्वतःही अपंग असलेल्या अध्यक्षा रेणुका बीडकर यांच्याकडून प्रेरणा आणि पहिली संधी मिळाली. योगेश्वर ४ आंतरराष्ट्रीय, ५ राष्ट्रीय, १५ राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाला. २००७-०८ मध्ये चेन्नई इथं झालेल्या आठ देशांच्या स्पर्धेपासून योगेेश्ववरच्या क्रीडा कारकिर्दीला खरा आकार मिळाला. नागपूर इथं झालेल्या अपंगांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या तसंच बंगळुरू, चंदिगढ, गाझियाबाद, जयपूर इथं भरलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तो सहभागी झाला. २०१५ मध्ये गाझियाबाद इथं झालेल्या पॅराअॅथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं कर्णधारपद त्याने भूषवलं. या स्पर्धांमध्ये भालाफेक, थाळीफेक प्रकारात कांस्यपदक मिळवून आपली योग्यता योगेश्वरने सिद्ध करून दाखवली. 






खेळाप्रमाणे शिक्षणावरही योगेश्वरने पकड ठेवली आहे. त्याने एमए, बीएडपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे . पाच वर्ष किटाडीमधेच कनिष्ठ महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून त्याने काम केलं. सध्या गावीच पाणलोट समिती सचिव म्हणून योगेश्वर काम करत आहेत. त्याच्या या कामाची दखल घेत त्याची किटाडीचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करून देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी शासनानं मदत करावी अशी योगेश्वरची अपेक्षा आहे. स्वत:ला दुबळं समजू नका. मनात जिद्द असेल, तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, असं योगेश्वरचं देशातल्या युवा अपंगाना सांगणं आहे. 
-हर्षा रोटकर.