Saturday 10 March 2018

बँक ऑफ न्यूयॉर्कने दखल घेतलेली जि.प. शाळा!!

पुण्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सहज टॅब आणि संगणक हाताळतात. तुम्हांला वाचून आश्चर्य वाटेल पण संपूर्ण शाळेत वायफाय आहे. शाळेत इ-लर्निंग आहे. मुलांना संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यासाला पूरक असे व्हिडिओ, गाणी, सोपे शैक्षणिक खेळ असं बरंच काही हाताळायला मिळतं. विशेष म्हणजे ही शाळा विजेसाठी ‘महावितरण’वर अवलंबून नाही. इतर खेड्यांप्रमाणे वाबळेवाडीलाही भारनियमनाच्या संकटाने ग्रासलेलं होतं. शाळा डिजिटल हवी तर वीज हवीच. त्यामुळे यावर उपाय म्हणून शाळेने सौरउर्जेचा वापर करून घ्यायचे ठरवले. आज ही शाळा स्वत:ची विजेची संपूर्ण गरज स्वत:हून भागविते. इतकंच नाही तर, वाबळेवाडी गावातील काही पथदिव्यांनाही वीज पुरविते. हे कामही ग्रामस्थांच्या मदतीने उभं केल्याचं वारे सर नम्रपणे सांगतात.आम्हांला वाटत होते, शाळा जवळपास पूर्ण पाहून झाली, पण सर्वात महत्त्वाचे आश्चर्य तर बाकीच होते. वारे सरांनी आम्हांला शाळेच्या मागील भागात नेले. तिथं एक वेगळंच बांधकाम उभारताना दिसले. या बांधकामाविषयी वारे सर म्हणाले, “येत्या शैक्षणिक वर्षात आमच्या विद्यार्थ्यांसाठी हे सरप्राईज असेल. बहुतांश मुलांना शाळेच्या चार भिंतीत शिकायला नको वाटतं, त्यांना मोकळ्या हवेत, बाहेरची गंमत- जंमत बघत शिकायचं असतं. माझ्या विद्यार्थ्यांनीही अशीच भरपूर सूर्यप्रकाश, वारा आणि मोठ्या खिडक्या असलेल्या शाळेची मागणी केली होती, ती आम्ही पूर्ण करतोय.”

                                                                       वारे सरांच्या बोलण्यातून कळलं की शाळेची जागा कमी पडत असल्याने शाळेला लागून असलेली मागची काही एकर जमीन गावकऱ्यांनी एकमताने शाळेला दान केलेली आहे. या जागेवर विद्यार्थ्यांच्या मनातील शाळा उभारण्याचं काम सुरु आहे आणि त्या कामाकरिता आर्थिक मदत देतेय ती- बँक ऑफ न्यूयॉर्क!! होय, वाबळेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेची कीर्ती ‘बँक ऑफ न्यूयॉर्क’पर्यंत पोहोचली आणि त्यांनी स्वत:हून आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. या बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या मदतीतून शाळेची पर्यावरणपूरक इमारत उभी राहतेय. या वर्गांच्या भिंती म्हणजे पूर्ण काचेच्या, सरकत्या खिडक्या असणार आहेत. वर्गात पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा येणार आहे. पावसाचे पाणी साठविण्यासाठी प्रत्येक वर्गाखाली सुमारे 30 हजार लीटरची मोठी टाकी उभारून जलपुनर्भरण करण्याचं नियोजन आहे आणि अर्थात सौरउर्जेचा वापर तर होणारच आहे!!
इथल्या एका विद्यार्थिनीने तेलाच्या जुन्या डब्यापासून इकोफ्रेंडली ‘हँडवॉश स्टेशन’ उभारले आहे. ग्रामीण भागातील पाण्याच्या टंचाईतसुद्धा स्वच्छतेचा आग्रह धरणारा हा आगळा उपक्रम आहे. पूर्वी पाण्याच्या टाकीद्वारे हात धुवायला लागणारे 200 लीटर पाणी आता केवळ 50 लीटरवर आले आहे, शिवाय स्वच्छतेसाठी राख आणि निंबोणीपासून विद्यार्थ्यांनी बनविलेला साबणही आहे.
शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे सरांना 2016 साली ‘राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार’ही मिळालेला आहे. अगदी साध्या वेशातील वारे सरांनी ही जिल्हा परिषद शाळा अशाप्रकारे बदलली आहे की अनेक पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून काढून विद्यार्थ्यांना वाबळेवाडीच्या आयएसओ शाळेत दाखल करीत आहेत. आम्ही गेलो तेव्हा शाळेत प्रवेशासाठी रांगा लागलेल्या होत्या, हे वेगळं सांगायला नकोच!!

- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

No comments:

Post a Comment