Tuesday 6 March 2018

विज्ञानाला रंजक बनविताना







गेली 13 वर्षे अध्यापन करीत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे शाळांमध्ये असणारी विज्ञान प्रयोगशाळांची वानवा. खरंतर विज्ञान निसर्गातल्या अनेक चमत्कारांमागची कारणमीमांसा सांगणारा रंजक विषय आहे. डोक्याला चालना देणारा, नव्याने विचार करायला शिकविणारा विषय आहे. पण बहुतेक शाळांमधे हा विषय केवळ कथन पद्धतीने शिकविला जातो. केवळ पाठ्यपुस्तक वाचून दाखवून हा विषय मुलांमधे रुची निर्माण करू शकत नाही. विज्ञान हा अनुभवण्याचा विषय आहे. विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष कृती आणि प्रयोगातून सिद्ध करायला मिळाल्या, तर ते ज्ञान मुलांच्या मनावर कायमस्वरुपी बिंबविले जाईल असं मला सारखं वाटायचं.
नंतर मला सप्टेंबर 2014 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नं.5 शाळेत विज्ञान अध्यापनाची संधी मिळाली. आता नेमकं काय करायचं हे माझ्या डोक्यात पक्कं झालं होतं. माझ्याकडे सहावी- सातवीच्या वर्गाच्या अध्यापनाची जबाबदारी होती. सुरुवातीला मी या वर्गांच्या पाठ्यपुस्तकातील प्रयोगांची यादी केली. मुलांना पाठ नीट समजावा म्हणून कोणकोणते प्रयोग करणे आवश्यक आहे, त्याची नोंद केली. आमच्या शाळेत प्रयोगशाळा नाही, पण शाळेत सुविधा नाही म्हणून विद्यार्थी या प्रयोगांपासून वंचित राहावेत, हे मला पटत नव्हतं. मी स्वखर्चाने प्रयोगांसाठीचं आवश्यक साहित्य म्हणजे चंचुपात्रे, बर्नर, वेगवेगळी आम्ले, लिटमस पेपर, नवसागर, मोरचूद असे सुमारे आठ हजार रुपयांचं साहित्य खरेदी केलं.
            आत्तापर्यंत फक्त पुस्तकात पाहिलेलं साहित्य आपल्या वर्गात आलेलं पाहून विद्यार्थी खुश झाले. आवश्यक ती काळजी घेऊन माझ्या मार्गदर्शनाखाली मुलांना प्रत्यक्ष प्रयोग करता येणार होते. विद्यार्थी आता अतिशय उत्सुकतेने विज्ञानाच्या तासिकेची वाट पाहू लागले. या आधी केवळ पुस्तकातच पाहिलेली उपकरणे त्यांना प्रत्यक्ष हाताळायला मिळू लागली. प्रयोगातून विज्ञान शिक्षण सुरु झाल्याने विज्ञानातील तत्वे, नियम त्यांना कृतीद्वारे पडताळून पाहता येऊ लागले.
उदा. संप्लवनासारखी विज्ञानाची संकल्पना मुलांनी स्वत: प्रयोगाद्वारे पडताळून पाहिली. खरेतर स्थायूंना उष्णता दिली की त्यांचे रूपांतर द्रवात होते आणि द्रवाला उष्णता दिली की त्याचे रुपांतर वायूत होते. बहुतांश पदार्थांना उष्णता दिल्यास आपल्याला हे अवस्थांतर पाहता येते. मात्र काही पदार्थांना उष्णता दिल्यास त्यांचे द्रवात रूपांतर न होता, थेट वायूतच रूपांतर होते, त्यालाच ‘संप्लवन’ असं म्हणतात, हे आमच्या विद्यार्थ्यांनी सप्रयोग सिद्ध केलं. नवसागराला उष्णता दिली आणि त्यावर बाष्पमोजणी पात्र धरलं, थोड्याच वेळात तिथं नवसागराची वाफ जमा झालेली दिसली. संप्लवनाचा नियम लागू होणारे इतर पदार्थ विद्यार्थ्यांना शोधायला सांगितले, तर कापूर आणि डांबराच्या गोळ्या अशी योग्य उत्तरे विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक दिली.
असेच अनेक प्रयोग मुलं करून पाहतात. त्यातून चुंबकाचे गुणधर्म, आम्ल- आम्लारी पदार्थात रंग बदलणारा लिटमस पेपर पाहताना मुलांना मजा येते. आम्ल- आम्लारीचे गुणधर्म शिकविताना त्या प्रयोगांसाठी रासानिक आम्लांसोबत मी दही, लिंबाचा रस, चिंचेचा रस असे नैसर्गिक पदार्थ वापरण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त केलं. त्यामुळे फक्त पाठ्यपुस्तकात लिहिलं आहे, तेवढंच न वाचता त्यापलीकडे जात आपण स्वत: अनेक नवे प्रयोग करू शकतो यावर विद्यार्थ्यांचा विश्वास बसला आणि प्रत्यक्ष अनुभवांमुळे पाठांतराची गरजच भासेना.याखेरीज कदम मॅडम यांनी विज्ञानाची रांगोळी आणि भित्तीपत्रकाचाही उपक्रम घेतलेला आहे.
- वैशाली कदम.

No comments:

Post a Comment