Wednesday 28 March 2018

रेशमाचा तलम स्पर्श गावाला झाला... अन्

जिल्हा वर्धा. इथून २५ किमीवरच्या झाडगावची ही गोष्ट. लोकसंख्या जेमतेम अडीच हजार. बाकी विदर्भाप्रमाणे इथला शेतकरीही कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा ही पारंपरिक पिकं घेणारा. नैसर्गिक आपत्तीने नैराश्य येणं हे स्वाभाविकच. यावर्षीही बोंडअळी आणि नंतर गारपीट झालीच. बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पण झाडगावचे शेतकरी यातून तरले. कारण होतं अर्थातच ‘बदल’. 
भोजराज भागडे या शेतकऱ्याने गावात पहिल्यांदा रेशीम शेतीचा प्रयोग केला. १२ वर्षांपूर्वी त्यांनी एक एकरात रेशीम शेती सुरु केली. इतर शेतक-यांनी भागडे यांना त्यावेळी वेड्यात काढलं. पण लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, त्यांनी आपलं काम चालू ठेवलं. सहा महिन्यातच, त्यांना दरमहा उत्पन्नाचा कायम स्वरूपी स्त्रोत निर्माण झाला. उत्पादित केलेले कोष त्यांनी कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये विकले. यातून फायदा दिसू लागल्यावर त्यांनी हळुहळू लागवड क्षेत्र वाढवलं. उन्हाळ्यातल्या पाण्याच्या कमतरतेवर त्यांनी, त्यांच्या परीने उपाय शोधला आहे. शेजारच्या शेतक-याकडून ते 10 हजार रुपयांचं पाणी विकत घेऊन रेशीम कोषाचं उत्पादन घेतात. भागडे यांची आता साडेचार एकरमध्ये तुतीची लागवड आहे. यातून ते आठ वेळा रेशीम कोष उत्पादन घेतात. एकावेळी 500 अंडीपुंज पासून सरासरी 3.50 क्विंटल उत्पादन एका महिन्यात मिळतं. एक क्विंटलला साधारणपणे 50 हजार रुपये भाव मिळतो. म्हणजे एक महिन्यात, सुमारे 1 लाख 75 हजार रुपये उत्पन्न आणि वर्षाला 14 लाख रुपये कमाई. रेशीम शेतीवर त्यांनी घर बांधलं आहे, चारचाकी गाडी घेतली आहे. त्यांची दोन्ही मुलं अभियांत्रिकीे शिक्षण घेत आहेत. “रेशीम शेतीमुळे माझं जीवनमान उंचावलं. आणि आता एखाद्या अधिकाऱ्यासारखी माझी जीवनशैली झाली आहे,” असं भागडे अभिमानाने सांगतात. रेशीम शेतीसाठी केलेल्या कामामुळे भागडे यांना राज्यशासनाकडून ‘रेशीम मित्र’ पुरस्कार मिळाला आहे. 

भागडे यांची प्रगती पाहून झाडगावातील इतर शेतकरी हळूहळू तुती लागवडीकडे वळू लागले आहेत. एकाचे दोन, दोनाचे चार करता करता, गावातील 20 शेतकरी रेशीम शेती करू लागले आहेत. कर्नाटकातील रामनगर येथे इथले कोष विक्रीसाठी जातात. तर कधी व्यापारी गावात येऊन कोष खरेदी करतात. यामुळे गावात 75 लाख ते 1 कोटी रुपयांची उलाढाल होते.
भागडे सांगतात, “तुती लागवड करण्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक आहे. एकदा तुती लागवड केली की 12 ते 15 वर्ष उत्पादनाची हमी असते. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून यासाठी अनुदान मिळतं. तीन वर्षात 2 लाख 90 हजार रुपये प्रति एकर अनुदान दिलं जातं. यामध्ये शेड बांधकाम आणि इतर साहित्य खरेदी आणि तुतीची बेणे दिली जातात. याशिवाय प्रत्येक पिकासाठी लागणारे अंडीपुंज खरेदी करण्यासाठी रेशीम विकास अधिकारी कार्यालयामार्फत 175 रुपये 100 अंडीपुंज प्रमाणे अनुदान दिलं जातं.
तुतीच्या वाढीसाठी सेंद्रिय खत पुरतं. त्यामुळे लागवड खर्च, खतं, फवारणी या खर्चातून सुटका. महिन्यातून आठ दिवस एक मजूर पुरेसा असल्यामुळे मजुरी खर्च कमी. विदर्भात उन्हाळ्याच्या कालावधीत तापमान जास्त असल्यामुळे एप्रिल, मे महिन्यात कोष उत्पादन करणं शक्य नाही. पण उर्वरित 10 महिने हे पीक चालू राहतं. कोणतंही जनावर तुती खात नाही. अळ्यांची विष्ठा खत म्हणून शेतात वापरता येते. शिवाय तुतीच्या काड्या जनावरे खातात. आणि या काड्यांचा कंपोस्ट खतासाठी चांगला उपयोग होतो”. 
रेशमाच्या तलम स्पर्शाने या गावात घडलेला बदल इथला शेतकरी आता बाकी जिल्ह्यात पोचवायला उत्सुक झाला आहे. मास्टर ट्रेनर म्हणूनही काहींनी काम सुरु केलं आहे. इतर जिल्ह्यात जाऊन ते तेथील शेतक-यांना तुतीच्या लागवडीपासून कोषनिर्मितीपर्यंतचं प्रशिक्षण देतात. यासाठी रेशीम कार्यालय त्यांना मानधन आणि प्रवास भत्ता देते. 
- सचिन मात्रे.

No comments:

Post a Comment