

गोंदिया जिल्ह्याच्या ज्या भागात शालू काम करते, तिथे जंगल आहे. रस्ते नाहीत. अन्य सुविधाही नाहीत. लोकांची बोलीभाषा प्रत्येक वस्तीत वेगवेगळी. कमी आणि अर्धवट शिक्षण, रूढी परंपरांमुळे अनेक चुकीच्या समजुती घट्ट बनून लोकांच्या मनांत रुतून बसलेल्या. नक्षलवादी किंवा प्रशासकीय अधिकारी यांचा आपल्या जगण्यात, दिनक्रमात, गावात आणि घरातही, कधीही हस्तक्षेप होईल, असं वातावरण. अशा ठिकाणी, तिथल्या आदिवासी महिलांपर्यंत आणि अन्य महिलांपर्यंतही पोचणं शालूसाठी फार जिकिरीचं होतं. पण या सर्व प्रतिकूलतेवर मात करत शालूने, आज तिथल्या हजारो महिलांशी संपर्क साधून त्यांना लघुव्यावसायिक होण्याइतपत प्रशिक्षित केलंय.

महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी माविमच्या अनेक योजना आहेत. या सर्वच उपक्रमांत शालू विविध पातळीवरचं सर्व प्रकारचं काम करत गेली. स्वतःला झोकून देत काम करण्याचा तिचा स्वभाव. स्वभावाला अनुसरून ती कामं करत गेली. २०१०साली शालूची पदोन्नती झाली. ती आता सीएमआरसी व्यवस्थापक आहे. तिच्या आणि अर्थात माविमच्या या कामाचा पसारा गोंदिया जिल्ह्यात मुख्यत्वे, ५८गावं आणि २८ग्रामसंस्थांमध्ये पसरलेला आहे. हे काम सहारा लोकसंचालित साधनकेंद्रातर्गत चालतं. शालू आणि तिच्या सहकाऱ्यांचं हे काम सालेकसासह आसपासची अनेक गावं आणि जिल्हे इथेही चालतं.
अगदी कठीण भागात आणि सामान्यातल्या सामान्य शेतकरी महिलांपर्यंत शालूची पोच आहे, त्यामुळे खऱ्या गरजू व्यक्तींना माविमच्या या प्रशिक्षणाचा, सुविधांचा फायदा मिळू शकला आहे. माविमच्या एका योजनेत प्रत्येक गावाला तीन लाख रुपये रक्कम मदतनिधी किंवा कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे महिलांना शेळीपालन, इतर घरगुती व्यवसाय आणि तशाच प्रकारच्या व्यवसायउभारणीसाठी भांडवल मिळतं. भांडवलाची सोय झाली की पुढच्या कामाला बळ मिळतं. वेळोवेळी विविध गटांना ही मदत मिळावी, म्हणून शालू सतत धडपडत असते.
शालूच्या कार्यक्षेत्रातली ही घटना बोलकी आहे. अर्चना कुटे या महिलेने आंतरजातीय लग्न केलेलं. लग्नानंतर तिला दोन मुली झाल्या आणि काही काळातच तिच्या पतीचं अकाली निधन झालं. दोन्ही घरच्यांच्या विरोधात हे लग्न झाल्यामुळे संकटग्रस्त अर्चनाला तिच्या नातेवाईकांपैकी कुणाचाच आधार नव्हता. मात्र, आमगावच्या ‘साही महिला बचत गटा’चा आणि सहारा लोकसंचालित साधन केंद्र, सालेकसाचा तिला खूप आधार मिळाला. त्यामुळे तिला व्यवसायासाठी माविमकडून चांगलं अडीच लाख रकमेचं कर्ज मिळू शकलं. त्यातून तिने कपड्याचं दुकान टाकलं. आज तिने स्वतःचं घर बांधलं आहे. ती मुलींसह नीट राहते आहे. मुलींना चांगले शिक्षण देऊ शकते आहे. “महिलांना असे मजबूत उभं करताना, त्यांच्या स्थिर होतानाच्या या प्रवासात खूप शक्ती मिळते. त्यामुळे कितीही काम केलं, तरी मी थकत नाही", शालू म्हणते. असं समाधानाचं काम करण्याची संधी दिल्याबद्दल माविमविषयी खूप कृतज्ञता वाटत असल्याचं सांगते.
शालू तिच्या पाच बहिणींमध्ये दुसरी. तिची एक बहीण पोलीस तर एक माविम सहयोगिनीच आहे. भाऊ खाजगी नोकरीत आहे. शालूचे आईवडील मोलमजुरी करणारे. मग शालूनेच घराची जबाबदारी घेऊन सर्वांना शिकायला मदत केली. आधीचं राहतं घर मातीचं होतं. तिने तेही चांगलं पक्कं बांधून घेतलं. गायन, नृत्य, कवितांची शालूला आवड आहे. या एवढ्या व्यापातही शालूने राज्यशास्त्र विषय घेऊन एमए पूर्ण केलं. या सगळ्यात तिचं लग्न जरी मागे पडलं असलं, तरी तिचा संसार मात्र खूप मोठा आहे. शालूपाशी प्रचंड ऊर्जा आहे. आणि तिची ऊर्जा संसर्गजन्य आहे.
- गीतांजली रणशूर
No comments:
Post a Comment